Corona: चीनमध्ये अडकले अनेक आफ्रिकन नागरिक, सरकारचंही असहकार

चीन

फोटो स्रोत, Alamy

जेव्हा किम सिन्यू पावेल डार्येल, हा 21 वर्षीय विद्यार्थी कॅमरूनमध्ये आहे. तो चीनमधील जिंगझू शहरात राहतो. त्याला कोरोना विषाणूची लागण झाली तेव्हा चीन सोडायचा त्याचा कोणताही इरादा नव्हता. खरं तर त्याला ते अगदी सहज शक्य होतं.

"काही झालं तरी मला आफ्रिकेत मला हा रोग न्यायचा नव्हता." तो त्याच्या विद्यापीठाच्या हॉस्टेलमधून बोलत होता. सध्या त्याला 14 दिवसांसाठी वेगळं ठेवण्यात आलं होतं.

त्याला ताप, कोरडा खोकला झाला होता. फ्लू सारखी लक्षणं दिसत होती.

त्याला लहानपणी मलेरियाची लागण झाली होती. आता जेव्हा त्याला या रोगाची लागण झाली तेव्हा त्याला ते मलेरियाचे दिवस आठवले. त्यामुळे त्याला आणखीच भीती वाटली.

"जेव्हा मी रुग्णालयात गेलो तेव्हा मी कसा मरणार याचाच मी विचार करत होतो." तो पुढे सांगत होता.

13 दिवस त्यांना स्थानिक रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. HIV बाधित रुग्णांना जी प्रतिजैविकं(Antibiotics) दिली जातात, तीच या विद्यार्थ्याला दिली. दोन आठवड्यांच्या उपचारानंतर त्याला सोडण्यात आलं.

CT स्कॅनमध्ये रोगाची कोणतीच लक्षणं दिसली नाही. कोरोना व्हायरसची लागण झालेला तो पहिला अफ्रिकन व्यक्ती आहे. इतकंच काय बरा होणाराही तो पहिलाच व्यक्ती आहे. त्याच्या उपचारांचा खर्च चीनने उचलला.

आफ्रिका खंडात इजिप्तमध्ये या रोगाचे रुग्ण सापडले. ज्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्था तितकीशी चांगली नाही त्या देशांना या रोगाशी लढण्यास त्रास होईल असं अनेक डॉक्टरांनी सांगितलं. या रोगामुळे सध्या 1700 लोकांचा मृत्यू झाला असून 72,000 लोकांना या रोगाची लागण झाली आहे. बहुतांश प्रकरणं चीनमधीलच आहे.

"माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय मला घरी परतायचं नाही. चीन सरकारने माझ्या उपचाराचा खर्च उचलल्यामुळे तसंही मला घरी जायची गरज पडली नाही." तो पुढे सांगत होता.

लोकांना परत पाठवावं की नाही?

जानेवारी महिन्याच्या शेवटापासून अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना वुहान आणि आसपासच्या शहरातून मायदेशी बोलावण्यास सुरुवात केली. अमेरिका त्यात आघाडीवर होता.

हजारो अफ्रिकन विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि कुटुंबं चीनमधील वुहान शहरात अडकली आहेत. इथूनच या रोगाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. सरकारने आणखी मदत करायला हवी होती असं अनेकांना वाटतं.

"आम्ही आफ्रिकेचे नागरिक आहोत. मात्र आम्हाला जेव्हा सर्वाधिक गरज आहे तेव्हा आमचं सरकार आमची मदत करत नाहीये." असं टिस्लियानी सलिमा सांगते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे आणि झांबियन वुहाव स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्ष आहे.

फोटो स्रोत, PAvel daryl kem senou

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सलीमा गेल्या एक महिन्यापासून स्वत:च वेगळ्या राहते आहे. तिच्यासाठी वेळेचं काही महत्त्वच उरलेलं नाही. चीनच्या सोशल मीडिया अप्स वर अपडेट्स पाहणे आणि झोपणे या दोनच गोष्टीतच त्यांचा वेळ जातो.

या रोगामुळे अडकून पडलेले 186 विद्यार्थी आणि दुतावास यांच्यातली ती मध्यस्थ आहे. सध्या या शहरात एका दिवसात 100 पेक्षा अधिक लोक दगावत आहेत. त्यामुळे अनेक लोकांना अन्नाचा आणि माहितीचा पुरवठा या दोन्हीबद्दल चिंता आहे.

तिच्या अनेक मित्रमैत्रिणी त्यांच्या देशात परत गेल्या. ही लोक मात्र इथेच राहिली.

"बहुतांश आफ्रिकन देशांनी अशाच प्रकारचा प्रतिसाद दिला आहे. सार्वजनिकरित्या किंवा खासगीत आफ्रिकन देश सांगतात की ते ही परिस्थिती हाताळू शकतात. मात्र परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे." एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती सांगितली. "जर तुम्ही शासनाची अधिकृत प्रतिक्रिया ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना चीनला दुखवायचं नाही. आम्ही काहीच बोलू शकत नाही."

चीनचे आफ्रिकेशी सध्या व्यापारी संबंध आहेत. हे संबंध गेल्या काही वर्षांत आणखी दृढ झाले आहेत. त्यामुळे तिथे सध्या 80,000 आफ्रिकन विद्यार्थी आहेत. तिथल्या शिष्यवृत्ती योजनांमुळे अनेक विद्यार्थी तिथे शिकायला आले आहेत. मात्र तिथल्या काही समुदायांच्या नेते सांगतात की तिथल्या नागरिकांना सरकारने अजिबात सहकार्य केलं नाही.

फोटो स्रोत, EPA

वुहानमधील आयवरी कोस्ट असोसिएशन ने सरकारशी चर्चा करून 77 विद्यार्थ्यांना 490 डॉलर दिले. मात्र शासनाच्या भूमिकेमुळे इथली लोक वैतागली आहेत.

"शहरात सध्या भुताटकी सारखं वातावरण आहे. मी बाहेर गेले तर मी परत येईन की नाही याची शाश्वती नाही. गेटवर डॉक्टर तापमान बघतात." तिच्या राहत्या घरून ती फोनवरून बीबीसीशी बोलत होती.

कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर त्यांना परत घेऊन जाण्यासंदर्भात या समुदायाच्या लोकांनी राष्ट्राध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं. मात्र सरकारने त्यांना काहीही प्रतिसाद दिला नाही असं तिथल्या समुदायाचे नेते डॉ.पिसो नेत्स्के म्हणाले. आफ्रिकन नागरिकांना परत पाठवायचं की नाही यासंदर्भात इथल्या आफ्रिकन समुदायात एकी नाही असं ते कबुल करतात. मात्र त्यांच्या सरकारने दाखवलेल्या असहकार्याबद्दल ते नाराजीही व्यक्त करतात.

फोटो स्रोत, AFP

काही देशांनी मात्र त्यांच्या नागरिकांना सहाय्य केलं आहे. अमेरिका त्यांच्या नागरिकांना परत नेलं. त्यावरून चीनमध्ये नाराजी पसरली होती. आफ्रिकेच्या लोकांमध्येही अस्वस्थता पसरली होती.

"आमची फसवणूक झाली असं आम्हाला वाटलं. जेव्हा अमेरिकेचे लोक परत जात होते तेव्हा लोक अस्वस्थ झाले. इथल्या प्रशासनावरही लोकांना विश्वास नाही." असं ते म्हणाले.

Development Reimagined या बिजिंगमधील एका सल्लागार संस्थेतील हनाह रायडर म्हणतात, "लोकांना इथून परत नेणं आणि चीनवर विश्वास ठेवणं हे दोन वेगळे मुद्दे आहेत. आपल्या नागरिकांची काळजी घेणं हे प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे. मग ते कुठेही का असेना. अगदी चीनही त्याला अपवाद नाही."

आतापर्यंत इजिप्त, अल्गेरिया, मॉरिशस, मोरोक्को, सेचिलस या देशांनी त्यांच्या नागरिकांना चीनमधून परत आणलं आहे. या सगळ्यामुळे चीनमध्ये अडकलेले अफ्रिकेचे लोक अस्वस्थ आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)