कोरोना विषाणूने घेतला अनेक नामवंतांचा बळी

क्यू

फोटो स्रोत, WEIBO

बॉडीबिल्डर, आर्टिस्ट, शास्त्रज्ञ, वरिष्ठ डॉक्टर... जीवघेण्या कोरोनाने कुणालाच सोडलं नाही.

कोरोनाच्या कोव्हिड-19 विषाणुने थैमान घातलेल्या चीनमध्ये आजवर 1800 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. यापैकी बहुतांश मृत्यू कोरोनाचं एपिसेंटर असलेल्या वुहानमध्ये झाले आहेत.

कोरोनाने चीनचं मोठं आर्थिक नुकसान झालं. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या विषाणुने ज्या नामवंतांचा बळी घेतला त्यामुळे झालेलं नुकसान अधिक मोठं आहे.

लिऊ झिमिंग : हॉस्पिटल संचालक

चीनमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या 1716 हेल्थ वर्कर्सना कोरोनाची लागण झाल्याची आणि त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीनच्या ज्येष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मंगळवारी यात एका मोठ्या नावाचा समावेश झाला. ते होते लिऊ झिमिंग.

फोटो स्रोत, WEIBO

फोटो कॅप्शन,

डॉ. लिऊ

51 वर्षीय डॉ. लिऊ झिमिंग वुहान वुचांग हॉस्पिटलचे संचालक होते.

चीनमधल्या प्रसार माध्यमांनी सोमवारी रात्रीच त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. मात्र, त्यानंतर घूमजाव करत त्यांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी हॉस्पिटलने त्यांचा मृत्यू झाल्याचं कळवलं. या विषाणुमुळे मृत्यू झालेले ते पहिले हॉस्पिटल संचालक आहेत.

डॉ. लिऊ यांच्या खाजगी आयुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र, चीनी सोशल मीडियावर एखाद्या हिरोप्रमाणे त्यांना निरोप देण्यात आला.

वेबोवर आलेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, "या हिरोला अखेरचा निरोप."

तर दुसरा एक जण लिहितो, "स्वर्गात कुठलेच आजार नसतात. तुम्ही दिलेल्या बलिदानाबद्दल तुमचे खूप खूप आभार."

ली वेनलियांग : व्हिसल ब्लोअर डॉक्टर

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे डॉ. ली वेनलियांग.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ली वेनलियांग

डिसेंबरमध्ये त्यांनी आपल्या मित्रांना एका नव्या विषाणुपासून सावध केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी त्यांना 'अफवा' पसरवू नका, अशी तंबी दिली होती. चीनच्या प्रसार माध्यमांनी डॉ. लिऊप्रमाणेच डॉ. ली यांच्या मृत्यूची बातमी देतानाही गोंधळ घातला होता.

डॉ. ली वेनलियांग यांचा मृत्यू झाल्याची बातमी 6 फेब्रुवारी रोजी देण्यात आली. नंतर माध्यमांनी आपली बातमी मागे घेतली आणि त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

या बातमीने चीनमध्ये लाखो लोक हळहळले. डॉ. ली यांच्या मृत्यूने चीनमध्ये दुःख आणि संतापाची लाट उसळली. चीनी सरकारवर अनेकांनी अविश्वास दर्शवला.

या विषाणुविषयी त्यांनी दिलेल्या धोक्याच्या सूचनेला सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूची बातमीही लपवण्याचा प्रयत्न केला, यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

चँग काई : चित्रपट दिग्दर्शक

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

कोरोनाच्या कोव्हिड-19 या विषाणूने हुबेई फिल्म स्टुडियोचे चित्रपट दिग्दर्शक चँग काई यांचाही बळी घेतला. धक्कादायक म्हणजे त्यांचे आई, वडील आणि बहिणीचाही या आजारात मृत्यू झाला आहे.

चँग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एका मित्राने एक पत्र उघड केलं. हे पत्र स्वतः चँग यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलं होतं, असा त्यांचा दावा आहे. या पत्रात 55 वर्षांच्या चँग यांनी मृत्यूपूर्वी त्यांना ज्या अग्नीदिव्यातून जावं लागलं, त्याची व्यथा कथन केली आहे.

काईक्झिन या न्यूज पोर्टलने हे संपूर्ण पत्र छापलं आहे. त्यात ते लिहितात, "माझे वडील खाली आले तेव्हा त्यांचं अंग तापाने फणफणत होतं. त्यांना खोकला येत होता आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यांना अनेक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. मात्र, बेड उपलब्ध नसल्याचं सांगत सगळयांनीच त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. आम्ही खूप निराश झालो आणि घरी परतलो."

काही दिवसात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. या आजारपणामुळे आणि त्यामध्ये झालेल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे काही दिवसातच त्यांच्या आईचाही मृत्यू झाला.

"या निष्ठूर विषाणूने माझ्या आणि माझ्या पत्नीच्या शरीरातही प्रवेश केला. मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये गेलो. दाखल करून घेण्यासाठी गयावया केली. मात्र, कुठेच बेड नव्हते. आम्हाला उपचार घेण्याची संधीच मिळाली नाही."

काही दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तोवर त्यांची प्रकृती खूप खालावली होती.

14 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी अजूनही या आजाराचा सामना करत आहेत. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा आहे. तो यूकेमध्ये शिकतोय.

आपल्या या पत्राच्या शेवटी ते लिहितात, "मी माझ्या वडिलांचा आज्ञाधारक मुलगा होतो. मुलाचा जबाबदार वडील होतो. पत्नीसाठी प्रिय पती होतो आणि आयुष्यात एक प्रामाणिक व्यक्ती होतो. मी ज्यांच्यावर प्रेम केलं आणि ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सर्वांना - अखेरचा निरोप."

लिऊ शौक्षिअँग : चित्रकार

प्राध्यापक लिऊ शौक्षिअँग हुबेईमधले सुप्रसिद्ध आर्टिस्ट होते. त्यांनी चितारलेली तैलचित्रं फारच गाजली.

फोटो स्रोत, WEIBO

फोटो कॅप्शन,

प्रा. लिऊ

जैमिआन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 62 वर्षांच्या प्रा. लिऊ यांनी 13 फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला.

1958 साली वुहानमध्ये लिऊ शौक्षिअँग यांचा जन्म झाला. हुबेई फाईन आर्ट अकादमीतून त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे तिथेच त्यांनी शिकवायला सुरुवात केली.

तैलचित्रांच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. चीनमधल्या काही सर्वात मोठी कला संग्रहालयं आणि गॅलरीजमध्ये त्यांची चित्रं ठेवण्यात आली आहेत.

वेबो या चीनच्या सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. एकाने आज एका 'महान प्रतिभेचा अंत' झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

तर एकजण लिहितो, "हा विषाणू आणखी किती प्रतिभांचा बळी घेणार आहे? या विषाणूमुळे मोठं आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, अशा व्यक्तींच्या मृत्यूमुळे होणारं नुकसान मोजता येणार आहे का?"

दुआन झेंगचेंग : शास्त्रज्ञ

86 वर्षांचे शास्त्रज्ञ दुआन झेंगचेंग यांचाही कोरोनाने बळी घेतला. चीयनीज अकॅडमी ऑफ इंजीनिअरींगमधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. नॅशनल इंजीनिअरिंग रिसर्च सेंटर फॉर डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते मुख्य शास्त्रज्ञ होते.

1934 साली चीनमधल्या जिअँग्सू भागात त्यांचा जन्म झाला. चीनच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून त्यांनी पदवी घेतली. पुढे तिथेच त्यांनी शिकवायला सुरुवात केली.

द ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 1996 साली त्यांनी जगातला पहिला बॉडी गॅमा नाईफ विकसित केला. बॉडी गॅमा नाईफ एक प्रकारची रेडिएशन थेरपी आहे. ट्युमरवर उपचारासाठी त्याचा उपयोग होतो. या शोधासाठी 2005 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

त्यांचे विद्यार्थी त्यांना 'मेडिकल मॅडमॅन' म्हणायचे. कारण ते कधीच कशापुढेच हार मानत नव्हते.

15 फेब्रुवारी रोजी प्रा. दुआन झेंगचेंग यांचा मृत्यू झाला.

क्यू जून : बॉडीबिल्डर

वुहानचे रहिवासी असलेले क्यू जून गेल्यावर्षी प्रकाशझोतात आले. 72 वर्षांच्या या बॉडीबिल्डरचे फोटो सोशल मीडियावर आले आणि बघता बघता सगळीकडे क्यू जून यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

फोटो स्रोत, WEIBO

फिनिक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार क्यू जून नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बॉडी बिल्डिंगकडे वळले. त्यासाठी त्यांनी जिम सुरू केली. पुढे ते ट्रेनर बनले. अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

ते रोज न चुकता जिम करायचे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेची ते तयारी करत होते.

23 जानेवारी रोजी त्यांना कोव्हिड-19ची लक्षणं दिसू लागली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रक्ताचे नमुने तपासल्यावर त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं.

मात्र, 6 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी या आजाराशी झुंज दिली. 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलाने आप्तेष्टांचा संदेश पाठवला, "आयुष्यात कधीही आजारी न पडलेले माझे वडील या संकटातून वाचू शकले नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)