कोरोना व्हायरसमुळे बळावतोय 'सायनोफोबिया'चा नवा आजार?

  • तेसा वोंग
  • बीबीसी न्यूज, सिंगापूर
कोरोना

फोटो स्रोत, AFP

सॅमी अँग बर्लिनमध्ये आपल्या डॉक्टरांकडे गेल्या आणि त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आलं. इतर सर्व रुग्ण आत जात होते. मात्र अँग यांना जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत हॉस्पिटलबाहेर कुडकुडत उभं रहावं लागलं.

थोड्या वेळाने त्यांच्या डॉक्टरच बाहेर आल्या आणि म्हणाल्या, "मनाला लावून घेऊ नकोस. पण, या चायनीज विषाणुमुळे आम्ही कुठल्याच चीनी रुग्णाची तपासणी करत नाही."

हे सगळं ऐकून अँगला मोठा धक्का बसला. अँग मूळ चीनी आहेत आणि बर्लिनमध्ये त्या मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. मात्र, अँग बराच काळापासून चीनला गेलेल्या नाहीत आणि त्यांची प्रकृतीदेखील ठणठणीत होती.

चीनमध्ये कोरोना विषाणूची साथ आली तेव्हापासून जगभरात चीनी नागरिकांना अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागतोय. केवळ चीनीच नाही तर आशियातून आलेल्या लोकांनाही असेच अनुभव येत आहेत.

कोरोना विषाणूला बळी पडलेल्यांबद्दल एकीकडे सहानुभूती व्यक्त होत असली तरी याच कोरोनामुळे चीनचे नागरिक आणि आशियाई अल्पसंख्याकांना जगभरात वर्णद्वेष आणि तिरस्कार सहन करावा लागतोय.

खरंतर चीनी लोकांप्रती भेदभाव करणं नवीन नाही. शतकानुशतकं हे सुरू आहे. त्यातूनच सायनोफोबिया (Sinophobia) ही संज्ञाही जन्माला आली. सायनोफोबिया म्हणजे चीनी लोकांचा विरोध.

"पाश्चिमात्यांसाठी अपरिचित तर पौर्वात्यांसाठी अतिपरिचित"

चिनी नागरिकांप्रती विषाणूंशी संबंधित कडवटपणा जगभरात दिसतोय आणि तो अगदी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला जातो आहे.

आशियाई लोक अल्पसंख्य असलेल्या युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये तर हा सायनोफोबिया प्रकर्षाने जाणवतो. चिनी लोकांना उघड उघड गलिच्छ आणि असभ्य म्हणून हिणावलं जातंय.

आशियाई लोकांची 'व्हायरस' म्हणून संभावना करणं तर अगदी सामान्य झालंय. त्यांना सार्वजनिक ठिकाणांपासून दूर ठेवलं जातं. त्यांना वर्णद्वेषी टक्के-टोमण्यांचा सामना करावा लागतो.

फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या वृत्तपत्रांमध्ये 'yellow peril' (पिवळं संकट), 'Chinese virus panda-monium' (विषाणू पसरवणारे चीनी - दूर रहा) 'China kids stay home' (चीनी, तुम्ही घरीच थांबा) असे मथळे असलेल्या बातम्या छापून येत आहेत.

चीनमधल्या एका मांस विक्री करणाऱ्या बाजारातून या विषाणूचा फैलाव झाला असावा आणि वटवाघुळाच्या शरिरात असलेला हा विषाणू माणसात संक्रमित झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यावरून चीनी लोक कसं काहीही खातात, किती रानटी आहेत, यावरून अनेक विनोदही सोशल मीडियावर सुरू झाले.

अशाच प्रकारच्या टिप्पण्या आशियातही उमटत आहेत. इथेसुद्धा चीनी लोकांवर खालच्या पातळीवरची आणि द्वेषपूर्ण टिका होताना दिसते.

चिनी नागरिक परदेशातल्या गजबजलेल्या शहरांमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांमध्ये हा विषाणू संक्रमित करत आहेत, अशीही शंका उपस्थित करण्यात आली आहे.

सिंगापूर आणि मलेशियामध्ये तर चीनी लोकांवर प्रवेशबंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या ऑनलाईन याचिकेवर लाखो लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तिथल्या सरकारांनीही चीनी नागरिकांवर काही प्रमाणात प्रवेशबंदी घातली आहे. जपानमध्ये काहींनी चीनी नागरिकांना 'बायोटेरेरिस्ट' म्हणजेच 'जैविक दहशतवादी' म्हटलं आहे. इंडोनेशिया आणि इतरही काही देशांमध्ये परदेशी नागरिकांना विशेषतः मुस्लिमांना संक्रमित करण्याचा चीनचा कट असल्याचं बोललं जातं.

चायनीज पब्लिक पॉलिसीचा अभ्यास करणारे हाँगकाँगमधले प्रा. डोनाल्ड लो म्हणतात, "पाश्चिमात्य लोकांना चीन खूप लांबचा वाटतो आणि तिथे जो सायनोफोबिया दिसतो तो चीन त्यांच्यासाठी बराचसा अपरिचित असल्याने त्यातून आलेला आहे. मात्र, आशिया आणि त्यातही दक्षिण-पूर्व आशियात चीनी लोकांचा जो विरोध दिसतो तो त्यांना खूप जवळून ओळखत असल्याने म्हणजेच चीन त्यांच्यासाठी अतिपरिचित असल्याने आलेला आहे."

आशियात प्रादेशिक आणि ऐतिहासिक वाद, चीनमधून मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर या सर्वांमुळे गेली अनेक शतकं लोकांच्या मनात चीनविषयी एकप्रकारचा संताप आहे. दक्षिण चीन सागरावर चीनने सांगितलेला हक्क आणि चीनमधल्या झिंझिंआंग प्रांतात विगर मुस्लिमांना बंदी बनवणं, हे अलिकडच्या काळातले काही वादग्रस्त मुद्दे आहेत. या प्रकारांमुळे दक्षिण-पूर्व आशिया विशेषतः मुस्लिमबहुल राष्ट्रांमध्ये चीनप्रती संतापाची लाट उसळली आहे.

या भागात चीनने अनेक देशांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे. या आर्थिक मदतीचं स्वागत होतं असलं तरी या आर्थिक मदतीमुळे या प्रदेशात चीनचा प्रभाव वाढत असल्याची भीतीही व्यक्त होतेय.

हाँगकाँग आणि सिंगापूर हे देश प्रामुख्याने चीनी वसाहती आहेत. मात्र, या देशांमध्येदेखील मेनलँड चीनचा विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चीनमधून या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं. याशिवाय बीजिंगचा या देशांवर असलेला प्रभाव, दबाव, या सर्व कारणांमुळे चीनविषयी या देशांच्या नागरिकांमध्ये चीड आहे.

'आश्चर्य आणि तिरस्कार'

काहींच्या मते सध्या जगभर सिनोफोबिया किंवा चीन विरोधाची लाट ही चीनने कोरोना संकट ज्या पद्धतीने हाताळलं आणि गेल्या काही वर्षात जागतिक घडामोडींमध्ये चीनची जी भूमिका राहिली आहे, यातून आलेली आहे.

प्रा. लॉ यांच्यामते चिनी लोकांप्रती एक सर्वसामान्य दृष्टीकोन हा 'आश्चर्य आणि तिरस्कार' यांचं मिश्रण आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी चीनने वुहानमध्ये अवघ्या काही दिवसात मोठं हॉस्पिटल उभारलं. यावरून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. मात्र, मांसविक्री आणि चीनी कामकाजात असलेली अपारदर्शकता यावरून त्यांच्यावर टीकाही होते.

सुरुवातीला विषाणूसंबंधी माहिती घेण्यात आणि या संकटाला आळा घालण्यात खूप दिरंगाई झाली, अशी कबुली चीनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. इतकंच नाही तर डॉ. ली वेनलिआंग यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरूनही चीनवर बरीच टीका झाली. डॉ. ली वेनलिआँग यांनीच सर्वप्रथम डिसेंबर महिन्यात या विषाणूविषयी धोक्याचा इशारा दिला होता. त्यांनी आपल्या मित्रांना अशा एखाद्या जीवघेण्या विषाणूचा फैलाव होण्याची भीती वर्तवली होती. मात्र, तेव्हा पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली होती आणि अफवा पसरवू नका, अशी तंबीही दिली होती.

जगभरातल्या देशांमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक करून आपण एक जबाबदार राष्ट्र असल्याचा संदेश चीनला द्यायचा आहे. एक मजबूत आणि कणखर राष्ट्र असल्याची प्रतिमा उभारण्याचा चीनचे अध्यक्ष शी चिनपिंग यांचा प्रयत्न आहे.

मात्र, गरज असेल तेव्हा समोरच्याला शिंगावर घ्यायलाही चीन मागेपुढे बघत नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापार युद्ध, चीनकडून इतर राष्ट्रांची होत असलेली हेरगिरी, वादग्रस्त क्षेत्रावर चीनचा दावा, अशाच दबंगगिरीची काही उदाहरणं.

यावर प्रा. लॉ म्हणतात, "आपल्यावर सर्वांनी प्रेम करावं, मात्र, सोबतच सर्वांनी आपल्याला घाबरून असावं, असं चीनला वाटतं."

पश्चिम युरोप, अमेरिका किंवा आशियामध्ये चीनविषयी जी एक नकारात्मकता दिसते ती जगभर सर्वत्र आहे असं नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि पूर्व युरोपात त्यांच्याकडे फार सकारात्मक दृष्टीकोनात बघितलं जातं, असं प्यु सेंटर फॉर रिसर्च संस्थेचं म्हणणं आहे.

काही निरीक्षक आणि चीन सरकारच्या मते चीनविषयीच्या सिनोफोबियासाठी चीनचे शत्रू राष्ट्रही जबाबदार आहेत. कारण चीनला विरोध करून त्यांना राजकीय फायदा मिळवता येतो.

हाँगकाँग युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये समाजशास्त्रज्ञ असणारे प्रा. बॅरी स्टॉटमन म्हणतात की अलिकडच्या काळात विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिकेत चीन विरोध वाढलेला दिसतो.

ते म्हणतात, "हल्ली अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारा म्हणून चीनकडे बघितलं जातं आणि चीन सरकार जे काही निर्णय घेतं त्यावर कडाडून टीका केली जाते. परिणामी जगभरातले लोक तेच उचलतात आणि त्यातूनच फार पूर्वीपासून असलेल्या सायनोफोबियाला बळ मिळतं."

फोटो स्रोत, EPA

'चीनचं प्रत्युत्तर'

आपल्या लोकांवर होणारी टीका, त्यांच्यासोबत होणारा भेदभाव हे सगळं चीननेही गांभीर्याने घेतलं आहे.

गेल्या काही आठवड्यात चीनी प्रसार माध्यमांमध्ये जगभर चीनी नागरिकांसोबत होणारा भेदभाव आणि वर्णद्वेष यावर टीका करणारे लेख प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे जागतिक वाचकांना कळावं आणि जगाने याची दखल घ्यावी, यासाठी हे लेख इंग्रजी भाषेत छापण्यात आले आहेत.

चीन सरकारने कोरोना संकट ज्या पद्धतीने हाताळलं, त्यावरून आंतरराष्ट्रीय मीडियात बरीच टीका झाली. चीनमधल्या काही स्थानिक प्रसार माध्यमांनीदेखील चीन सरकारवर टीका केली आहे. मात्र, हे चुकीचं वृत्तांकन आहे आणि हा चीनप्रती अन्यायपूर्ण भेदभाव असल्याचं चीन सरकारचं म्हणणं आहे.

चीन सरकारने इतर देशांवर विशेषतः अमेरिकेवर टीका केली आहे. चीनी प्रवाशांवर लादलेल्या 'अनावश्यक' प्रवेशबंदीमुळे 'घबराट निर्माण झाल्याचं आणि दहशत पसरल्याचं' त्यांचं म्हणणं आहे.

एकीकडे चीन आणि इतर राष्ट्रांमध्ये अशाप्रकारचा वाद सुरू असताना परदेशातील चीनी आणि आशियाई नागरिकांमध्ये चिंता आणि निराशा वाढत आहे.

फोटो स्रोत, EPA

बर्लिनमधल्या चीनी मेकअप आर्टिस्ट सॅमी अँग म्हणतात, "मला भीती वाटते." पुढचे काही आठवडे बाहेर न पडण्याचा त्यांचा विचार आहे.

हा केवळ सॅमी अँग यांचा अनुभव नाही तर बर्लिनमधल्या एका रेल्वे स्टेशनवर अँग यांच्या एका जर्मन-आशियाई मित्राला काही जणांनी त्रास दिला. तर आपल्या घरी जाणाऱ्या एका चीनी महिलेला काही लोकांनी मारहाण केली. ही वर्णद्वेषाची घटना असल्याचं बर्लिन पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या चीनी महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की ती रस्त्याने जात असताना तिला 'व्हायरस' म्हणून चिडवण्यात आलं. तिने विरोध केला असता काही लोकांनी तिला मारहाण केली.

सॅमी म्हणतात, "मला व्हायरस म्हटल्यामुळे मला लोकांशी भांडायचं नाही. ते वृत्तपत्रांमध्ये वाचतात तेवढंच त्यांना माहिती असतं. तुम्ही त्यांचं मन बदलू शकत नाही."

"मी त्यांना माझा व्हिसा दाखवला, त्यांना सांगितलं की मी इथली पर्मनंट रेसिडंट आहे, तरीही काही फरक पडणार नाही. कारण त्यांना दिसतो तो केवळ माझा चीनी चेहरा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)