'माझं आठ दिवसाचं बाळ जग सोडून गेलं पण त्याने एकाला जीवदान दिलं'

व्हॅलेंटिना

फोटो स्रोत, VALENTINA DAPRILE

फोटो कॅप्शन,

व्हॅलेंटिना डॅप्रिले

केवळ आठ दिवसांचं बाळ गमावल्यानंतर एखाद्या आईचं दु:खं काय असेल, हे शब्दात सुद्धा मांडता येणं शक्य नाही. मात्र, लंडनमधील व्हॅलेंटिना डॅप्रिले या महिलेच्या धैर्याचं कौतुक करावं तेवढं कमीच.

व्हॅलेंटिना डॅप्रिले आणि लुईजी या दाम्पत्याचं केवळ आठ दिवसांचं चिमुकलं बाळ मृत्युमुखी पडलं आणि या दांपत्यावर दु:खाचं डोंगर कोसळलं. मात्र, त्यातूनही सावरुन या दांपत्यानं बाळाच्या अवयवांचं दान करण्याचा निर्णय घेतला.

'मला माफ करा, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही,' अशी वेदनादायी बातमी डॉक्टरांनी ज्यावेळी पाणवलेल्या डोळ्यांनी आणि दु:खदायक स्वरात सांगितली, तो क्षण व्हॅलेंटिना कधीच विसरू शकत नाहीत.

लंडनस्थित किंग्स कॉलेज हॉस्पिटलमधील न्यूबॉर्न इंटेन्सिव्ह केअर यूनिट (NICU) च्या डॉक्टरांनी अँजेलो रे या चिमुकल्याला वाचवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, अँजेलो रे लाईफ सपोर्ट यंत्राशिवाय राहू शकत नव्हता. शिवाय, त्याच्या मेंदूत कोणतीच हालचाल MRI स्कॅनमध्ये दिसत नव्हती.

व्हॅलेंटिना सांगतात, आता ज्यावेळी मी जुलै 2016 मधील तो दिवस आठवते, तेव्हा मी आतून पोखरली जाते.

अॅंजेलोचा जन्म झाल्यानंतर त्याला लगेच इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं. व्हॅलेंटिना यांनी पोटच्या बाळाला अजून हातातही घेतलं नव्हतं, तेवढ्यात तो जग सोडून गेला.

व्हॅलेंटिना सांगतात, "मी हा विचार करुनच अस्वस्थ व्हायचे की, माझ्या बाळानं काय विचार केला असेल. आम्ही नऊ महिने सोबत होतो, मग अचानक माझी आई कुठं गेली? ती का सोडून गेली?"

बाळाला जन्म देण्याच्या एक आठवडा आधी व्हॅलेंटिना घसरुन पडल्या होत्या. त्यावेळी त्यांचा श्वासोच्छवास बंद झाला होता. त्यांच्या शरीरावर निळ्या रंगाची किनार पसरली होती. त्यांचे पती लुईजी यांनी तातडीनं 999 क्रमांकावर फोन केला. फोनवरून जशा सूचना मिळाल्या तसं त्यांनी व्हॅलेंटिना यांना बरं करण्याचे प्रयत्न केले.

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. त्यामुळं त्यांचा सहा वर्षांचा मुलगा लिओन घरीच होता. तो हे सर्व पाहत होता.

ही घटना घडेपर्यंत म्हणजे घसरुन पडण्या आधीपर्यंत व्हॅलेंटिना यांना कुठलाच त्रास झाला नव्हता. किंबहुना, आपण घरीच बाळाला जन्म देऊ, असंही त्यांना वाटत होतं.

मात्र, घरात घडलेल्या घटनेनंतर व्हॅलेंटिना यांना तातडीनं लंडनमधील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं इमर्जन्सी वॉर्डात नेऊन त्यांचं सिझेरियन करण्यात आलं. त्यानंतर व्हॅलेंटिना यांना तातडीनं रक्त देण्यासाठी केंबरवेलच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

बाळ एका ठिकाणी आणि त्या दुसऱ्या ठिकाणी अशी त्यांची स्थिती होती. लुईजी यांना एकदा एका रुग्णालयात जावं लागत असे तर एकदा दुसऱ्या रुग्णालयात.

त्याचवेळी डॉक्टरांना लक्षात आलं की, अँजेलोच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं मोठा परिणाम झालाय.

"ज्यावेळी डॉक्टरांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली, तेव्हा हे स्वीकारणंच माझ्यासाठी सर्वांत अवघड गेलं की, माझ्या बाळाला वाचवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही. अगदी काहीच नाही," असं व्हॅलेंटिना सांगतात.

मुलासाठी व्हॅंलेटिना यांची काहीही करण्याची तयारी होती पण या घडीला त्या हतबल होत्या. काहीच करू शकत नव्हत्या.

माझं बाळ केवळ सहा दिवसांचं आणि त्याला कुणीच ओळखणार नाही, असा वेदनादायी विचार व्हॅलेंटिना यांच्या मनात डोकावल्यानंतर त्यांच्या मनात आणखी एक विचार डोकवला, तो म्हणजे अँजेलोच्या अवयवांचं दान करण्याचा.

व्हॅलेंटिना सांगतात, बाळाचं अवयवदान करणं आमच्या हातात होतं. आपलं बाळ आज आपल्यात नाही पण त्याच्यामुळे दुसऱ्या कुणाचा तरी जीव वाचेल असा विचार त्यांनी केला.

फोटो कॅप्शन,

अॅमी आणि व्हॅलेंटिना

लुईजी आणि व्हॅलेंटिना यांनी बाळाच्या अवयवदानाचा निर्णय ज्यावेळी सांगितला, त्यावेळी किंग्स कॉलेज हॉस्पिटलच्या NICU मध्ये अॅमी ओव्हरेंड या नर्स कार्यरत होत्या. त्या सांगतात, या हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून काम करतेय, पण लुईजी आणि व्हलेंटिना यांच्याशी झालेला संवाद आधी कधीच कुणाशी झाला नव्हता.

अॅमी पुढं सांगतात, "साधरणत: वयस्कर व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवयवदानाबद्दल उघडपणे बोललं जातं. कारण तसं प्रबोधनही झालंय. मात्र, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या अवयवदानाचं निर्णय पालकांसाठी प्रचंड कठीण असतो."

त्यानंतर NICU टीमनं हॉस्पिटलशी अवयवदानासंदर्भात चर्चा सुरू केली. अशा अवयवदानाच्या शक्यतेबाबत हॉस्पिटलही साशंक होतं. कारण हॉस्पिटलनं अशा अवयवदानाची प्रक्रिया याआधी कधीच केली नव्हती. एकतर हे बाळ अगदीच काही दिवसांचं होतं. त्यात लहान मुलांच्या अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया आणखी आव्हानात्मक असते.

अँजेलो रे या बाळाचे अवयव दान केले जाऊ शकतात का, यासाठी काही तपासण्या झाल्या. शिवाय, त्याचे नेमके कुठले अवयव दान केले जाऊ शकतात, हेही तपासलं गेलं.

व्हॅलेंटिना आणि लुईजी यांच्या इच्छेनुसार सर्व व्यवस्थित झालं. म्हणजेच, अँजेलो रे हा अवयवदाता ठरला. त्याच्या सर्व तपासण्या अवयवदानासाठी योग्य होत्या.

"अँजेलोच्या कुटुंबीयांसाठी ही गोष्ट वेदनादायी आणि तितकीच महत्त्वाची होती." असं अॅमी सांगतात.

व्हेलिंटना यांना प्रश्न पडला होता की, तिच्या सहा वर्षांच्या मुलाला म्हणजेन लिओनला कसं सांगायचं की, त्याचा भाऊ घरी परत येऊ शकणार नाही. लिओन मोठ्या आतुरतेने त्याच्या लहान भावाची वाट पाहत होता.

लुईजी आणि व्हॅलेंटिना यांनी लिओनला समजावण्याची जबाबदारी अॅमींवर टाकली.

अॅमी आणि लिओन एका कोपऱ्यात बसले. अॅमी यांनी लिओनसाठी चॉकलेट केक आणला होता. अँजेलो रेला कसं बरं नाहीय, हे अॅमी त्याला समजावून सांगू लागल्या.

अॅमीनं लिओनला समजुतीनं सांगितलं की, अँजेलो रे तुमच्यासोबत घरी येणार नाही, तो देवाच्या घरी जाईल. लिओन हे सर्व शांतपणे ऐकत होता. त्याही स्थितीत आई-वडिलांसमोर कणखर राहण्याचा तो प्रयत्न करत होता.

व्हॅलेंटिना, लुईजी आणि लिओन यांनी त्यांच्या बाळाला 'अँजेलो रे' असं नाव दिलं होतं. अँजेलो हा मूळचा इटालियन शब्द. याचा अर्थ देवदूत.

फोटो स्रोत, VALENTINA DAPRILE

अँजेलो रेचं लाईफ सपोर्ट काढण्यापूर्वी लिओन NICU मध्ये गेला होता. सहा वर्षांच्या लिओनला NICU मध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानं हत्तीची गोष्टही चिमुकल्या अँजेलो रेला ऐकवली होती, तिथं त्यानं काही चित्र सुद्धा रेखाटले. काही स्टिकर्सनी अँजेलो रेचं इन्क्युबेटर सजवलं होतं. हे सर्व एकप्रकारे त्याच्या लहान भावाला शेवटचा अलविदा करण्यासारखंच दृश्य होतं.

ज्यावेळी अंजेलो रेचं लाईफ सपोर्ट काढण्याची वेळ आली, तेव्हा त्याला एका खासगी रुममध्ये नेण्यात आलं. तिथं व्हॅलेंटिना आणि लुईज हेही होते. तिथं प्रचंड शांतता होती. बाळाचं लाईफ सपोर्ट काढलं जाईल आणि त्याच्या हृदयाची शेवटची धडधड होईल, तेव्हाही व्हॅलेंटिना आणि लुईज यांना तिथं राहायचं होतं.

अँजेलो रेचं लाईफ सपोर्ट काढल्यानंतर तो मृत्यूमुखी पडला. त्यानंतर एक तास त्याचं हृदय धडधडत होतं. त्यानंतर अँजेलो रेला पुन्हा NICU मध्ये आणण्यात आलं, तेव्हाही व्हॅलेंटिना आणि लुईज यांना सोबत ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. कारण त्यांना त्यांच्या बाळासोबत आणखी काही काळ घालवता येईल.

"त्याचं हृदय थांबल्यानंतर मी त्याला पुन्हा हातात घेतलं, त्यावेळचा त्याचा गंध आणि त्याचं मऊ शरीर मी कधीच विसरु शकत नाही," असं व्हॅलेंटिना सांगतात.

"तो असा क्षण होता, ज्यावेळी त्याला मी हृदयापाशी धरलं होतं, त्यावेळी आम्हा दोघांचंही हृदय एकदाच धडधडत होतं. मी ते शब्दात सांगूही शकत नाही," असं पाणावलेल्या डोळ्यांनी व्हॅलेंटिना सांगतात.

त्या पुढे सांगतात, "माझ्या बाळानं शेवटचा श्वास माझ्या कुशीत घेतला. अनेक स्त्रियांना हा क्षण मिळत नाही. पण मला तो क्षण मिळाला, जो माझ्यासोबत आयुष्यभर राहील."

अँजेलो रे 30 जुलै 2016 रोजी हे जग सोडून गेला. त्यावेळी त्याचं वय केवळ आठ दिवसांचं होतं.

हृदयाचं कुणी दान केल्यास, ते हृदय साधारण 10 वर्षांपर्यंत ठेवता येतं. शिवाय, ते एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असं अनेकदा प्रत्योरोपणही करता येतं. ज्यांना जन्मत:च हृदयाचा त्रास असेल, अशांसाठी हे हृदय वापरता येतं.

दरम्यान, काही दिवसांच्या अंतरानं व्हॅलेंटिना आणि लुईज यांना हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की, हृदयाचा त्रास असलेल्या नवजात बाळाला अँजेलो रेचं हृदय देण्यात आलंय.

त्यावेळी व्हॅलेंटिना यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. त्यावेळी ती म्हणाली, "आता आम्हाला खात्रीय की, आमच्या बाळाचं हृदय जिवंत राहील आणि ही नक्कीच अद्भूत गोष्ट आहे."

नवजात बाळांच्या अवयवदानाच्या घटना दुर्लभ

नवजात बाळाचं (28 दिवसांपेक्षा कमी वयाचं बाळ) अवयवदान ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे.

इंग्लंडमधील NHS ब्लड अँड ट्रान्सप्लांटच्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षात केवळ 40 चिमुकल्यांचंच (28 दिवसांपेक्षा कमी वयाच्या बाळांचं) अवयवदान केलं गेलंय.

विशेष म्हणजे, अवयव जरी 28 दिवसांपेक्षा कमी वयाच्या बाळाचे असले, तरी त्यांनी सर्व वयातील लोकांना वाचवण्याचं काम केलंय. अर्थात, काही अवयव केवळ चिमुकल्यांसाठीच उपयुक्त पडतात. मात्र, किडनीसारखे अवयव कुठल्याही वयोगटातील व्यक्तीसाठी प्रत्योरोपण केले जाऊ शकते.

चिमुकल्या अवयवदात्यांची संख्या पूर्वी फारच कमी होते. मात्र, आता पालकांमधील जनजागृतीमुळं ही संख्या वाढत जातेय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)