तुमच्या आईची हत्या करणारा तुमच्यासमोर आल्यावर काय कराल?

  • रिबेक्का हिन्शके आणि एन्डान्ग नूरदिन
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, जकार्ता
सारा सालसाबिल्ला
फोटो कॅप्शन,

सारा सालसाबिल्ला

तुमच्या आईला ठार करणाऱ्या माणसांना तुम्ही काय म्हणाल? तुम्ही त्यांना माफ करणार का?

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इंडोनेशियातल्या प्रिसन बेटावर असलेल्या 17 वर्षांच्या सारा सालसाबिल्ला हिला एक दिवस या प्रश्नांना सामोरं जावं लागलं.

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एक दिवस ईवान सेटियावान आपल्या मोटरबाईकवरून जात होते. त्यांच्या मागे त्यांची गर्भार पत्नी बसली होती. काही आठवड्यातच त्यांची पत्नी दुसऱ्या बाळाला जन्म देणार होती. तिच्या चेकअपसाठीच ईवान पत्नीला घेऊन हॉस्पिटलला निघाले होते. ते ऑस्ट्रेलियन दूतावासाच्या थोडं पुढे आले.

ईवान सांगत होते, "तेवढ्यात प्रचंड मोठा आवाज झाला आणि आम्ही दोघं हवेत फेकले गेलो."

ईवान यांना बरंच उशिरा कळलं की तो एक आत्मघातकी हल्ला होता. अल-कायदाशी संबंधित 'जिम्हा इस्लामिया' या स्थानिक अतिरेकी गटाने हा हल्ला केला होता. अल कायदाने इंडोनेशियात अनेक अतिरेकी हल्ले केले होते. बालीमध्ये 2002 साली केलेल्या हल्ल्यात 202 लोकांचा मृत्यू झाला होता.

ईवान पुढे सांगतात, "मला फक्त रक्त दिसत होतं. खूप रक्त. धातूचे बारीक बारीक तुकडे हवेड उडाले होते. एक तुकडा माझ्या डोळ्यात गेला आणि माझा डोळा निकामी झाला."

ईवान यांच्या गर्भार पत्नी तर बाईकवरून खूप दूर फेकल्या गेल्या होत्या. दोघांनाही तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ईवान यांच्या पत्नी हलिला सेरोजा दौले या गंभीर जखमी झाल्या होत्या. अचानक झालेल्या या सर्व प्रकारामुळे तो हादरून गेल्याने त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या.

"प्रसववेदना सुरू झाल्याने तिला तात्काळ ऑपरेशन रुममध्ये नेण्यात आलं. मात्र, अल्लाहच्या कृपेने तिची नैसर्गिक प्रसूती झाली."

त्या रात्री हलिला यांनी एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं रिझकी. रिझकी म्हणजे 'आशिर्वाद'.

या दांपत्याला पहिली मुलगी आहे. तिचं नाव आहे साराह. साश्रू डोळ्यांनी सारा सांगते, "माझी आई खूपच कणखर होती. तिची हाडं मोडली होती. पण तशा परिस्थितीतही तिची नैसर्गिक प्रसूती झाली. ती खूपच मजबूत होती. माझी आई."

मात्र, हल्ल्यामुळे झालेल्या दुखापतीतून हलिला कधीच बऱ्या झाल्या नाही आणि हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर साराच्या पाचव्या वाढदिवसाला तिने या जगाचा निरोप घेतला.

फोटो स्रोत, IWAN SETIAWAN

फोटो कॅप्शन,

ईवान आणि रिझकी

"मी माझी सर्वात प्रिय मैत्रीण गमावली. माझा जोडीदार. जिच्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. तिच्याबद्दल सांगणंही खूप वेदनादायी आहे", डबडबलेल्या डोळ्यांनी ईवान सांगत होते.

सुरुवातीला ईवान यांच्या मनात खूप संताप होता. त्यांना हल्लेखोरांचा सूड उगारायचा होता.

ते सांगतात, "हल्ल्यातून बचावलेले हल्लेखोर ठार झाले पाहिजे, असं मला वाटत होतं. मात्र, लगेच नाही."

फोटो स्रोत, IWAN SETIAWAN

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"छळ करून त्यांना ठार करावं, असं मला वाटत होतं. त्यांची त्वचा काढून त्या जखमेवर मीठ चोळावं, जेणेकरून त्यांच्या बॉम्बहल्ल्यामुळे कशा वेदना होतात, याची शारीरिक आणि मानसिक कल्पना त्यांना यावी. मी आणि माझ्या मुलांनी केवळ जगण्यासाठी खूप संघर्ष केला आहे."

या घटनेला आता 15 वर्षं लोटली आहेत. तर हलिला यांचं निधन होऊन 13 वर्षं लोटली आहेत. रिझवी आता ज्युनिअर हायस्कूलला आहे तर साराची शाळा आता जवळपास संपत आली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आम्ही ईवानसोबत बोटीने एक अरूंद खाडी ओलांडत जावा किनारपट्टीलगत असलेल्या नुसाकाम्बांगन बेटावरच्या इंडोनेशियाची सर्वात सुरक्षित तुरुंगाकडे जात होतो.

मुलांकडून त्यांची आई आणि ईवानकडून त्यांच्या पत्नीला हिरावणाऱ्या बॉम्बहल्ल्यातले फाशीची शिक्षा सुनावलेले दोन हल्लेखोरांना या कारागृहात कैद होते.

पावसाची रिमझिम सुरू होती. आम्ही बंदरावर पोचलो तेव्हा ईवान सांगत होते, "माझं हृदय जोरात धडधडतंय. खूप भावनिक झाल्यासारखं वाटतंय. माझ्या मनात काय सुरू आहे, ते शब्दात सांगू शकत नाही."

"या प्रवासामुळे त्या हल्लेखोरांचं मन मोकळं होईल, अशी आशा करतो."

या दोन हल्लेखोरांपैकी एकाला ईवान यापूर्वीही भेटले होते. इंडोनेशिया सरकार मूलतत्त्ववाद्यांच्या मनपरिवर्तनासाठी एक खास deradicalisation कार्यक्रम राबवतं. या कार्यक्रमांतर्गत दहशतवादी आणि त्यांच्या हल्ल्यांना बळी पडलेले पीडित यांची भेट घडवून आणली जाते. याच कार्यक्रमांतर्गत ईवान त्या अतिरेक्याला भेटले होत. मात्र, सारा आणि रिझकीसाठी ही पहिलीच वेळ होती.

ईवान सांगत होते, "ही संधी मिळणं, माझ्या मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे."

"मी त्यांना शिकवलं आहे की कधीही संतापू नये. मात्र, ज्यांनी हे केलं ते कसे दिसतात, हे त्यांना जाणून घ्यायचं आहे."

17 वर्षांची सारा आमच्या सोबत होती. ती स्टाईलिश दिसत होती. तिने ट्राऊझर त्यावर काळ्या पांढऱ्या पट्ट्या असलेला शर्ट आणि डोक्यावर काळा स्कार्फ घातला होता. प्रवासभर ती सेल्फी काढत होती आणि कुठल्याही किशोरवयीन मुला-मुलींप्रमाणे ती पूर्णवेळ फोनला चिकटून होती.

मात्र, आपण हे का करतोय, हे सांगताना तिच्या डोळ्यात दृढनिश्चय स्पष्ट दिसत होता.

ती म्हणाली, "ही मीटिंग अतिरेक्यांना विचार करायला भाग पाडेल आणि ते अल्लाहला माफी मागतील, अशी मला आशा आहे. त्यांना आपल्या कृत्याचा खरंच पश्चाताप होत असेल तर त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि कदाचित असं पुन्हा कधीच घडणार नाही."

गेली अनेक वर्ष साराला केवळ एकच प्रश्न पडला आहे. तिच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे, "त्यांनी असं का केलं?"

नारंगी रंगाच्या जम्पसूट घातलेला ईवान दरमावान मुंटो ऊर्फ रॉईस एका छोट्या खोलीत वाट बघत बसला होता. तो अशक्त दिसत होता आणि व्हिलचेअरवर बसला होता. त्याला नुकताच स्ट्रोक येऊन गेला होता. त्याच्या हातात आणि पायात बेड्या होत्या.

जेव्हा रॉईसचा खटला सुरू होता आणि न्यायमूर्तींनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा रॉईसने हात उंचावत म्हटलं होतं, "मला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल मी आभारी आहे. कारण त्यामुळे मी शहीद म्हणून मरणार आहे." इराकविरोधातल्या युद्धात ऑस्ट्रेलिया अमेरिकेचा मित्रराष्ट्र असल्यामुळे ऑस्ट्रेलियन दूतावासाला लक्ष्य करण्यात आल्याचं मानलं जातं.

रॉईसच्या दोन्ही बाजूला दोन सुरक्षारक्षक होते. वातावरण तणावपूर्ण होतं. गार्ड्सने आम्हाला सांगितलं की रॉईसने काही करण्याचा प्रयत्न केला तर लगेच भिंतीकडे जा.

फोटो कॅप्शन,

ईवान दरमावान मुंटो ऊर्फ रॉईस

ईवान, सारा आणि रिझकी त्याला भेटले आणि ते सर्व प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसले. सर्वात आधी ईवान यांनीच बोलायला सुरुवात केली.

ते म्हणाले, "माझ्या मुलांना ज्या व्यक्तीने त्यांची आई हिरावली आणि वडिलांचा डोळा गमावला त्याला भेटायची उत्सुकता होती."

रॉईसने ईवानला अगदी सहजपणे विचारलं की बॉम्बस्फोट झाला तेव्हा तुम्ही नेमके कुठे होतात?

ईवान यांनी सांगितलं की त्यांची पत्नी गर्भवती होती आणि बॉम्बहल्ला झाला त्याच रात्री तिने या मुलाला जन्म दिला, असं म्हणत त्यांनी रिझकीकडे बोट दाखवलं.

रॉईस म्हणाला, "मलाही एक मुलगा आहे. मी माझ्या पत्नी आणि मुलाला गेली कित्येक वर्ष बघितलेलंच नाही. मला त्यांची खूप आठवण येते. माझी परिस्थिती तर तुमच्यापेक्षाही वाईट आहे. तुमच्याजवळ तुमची मुलं आहेत. माझा मुलगा तर मला ओळखतही नाही."

फोटो कॅप्शन,

सारा, रिझकी आणि रॉईस

राईसने सारा आणि रिझकीकडे बघितलं. दोन्ही मुलं रॉईस यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला कचरत होती. अचानक सगळे साराकडे बघायला लागले. तिला काहीतरी विचारायचं होतं.

तिला हे सगळं सहन होत नव्हतं आणि तिला रडू कोसळलं. ईवान लगेच तिच्याजवळ गेले आणि तिला जवळ घेतलं. त्यानंतर तिला थोडा धीर आला आणि तिने हळू आवाजातच रॉईस यांना त्यांनी असं का केलं, हे विचारलं.

रॉईस म्हणाला "ते जे म्हणत आहेत ते मी केलेलंच नाही. ते मी का मान्य करू? माझ्या डोळ्यातच उत्तर दिसतंय."

तो पुढे म्हणाला, "कदाचित तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल. मुस्लिमांवर हल्ला करणं मला मान्य नाही. ते योग्य नाही. तुम्ही मुस्लिमांना ठार करू शकत नाही."

मी लगेच विचारलं, "पीडित मुस्लीम नसतील तर?"

त्यावर रॉईस ताबडतोब म्हणाला, "मला तेही मान्य नाही."

फोटो स्रोत, Getty Images

रॉईसचा प्रभाव इतर कैद्यांवर पडू नये, यासाठी त्याला एका स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

त्याआदी रॉईस कट्टर धर्मोपदेशक अमन अब्दुर्रेहमान याच्यासोबत एकाच कोठडीत होता. त्याने तुरुंगातच आपण तथाकथित इस्लामिक स्टेटप्रति निष्ठा बाळगू, अशी प्रतिज्ञा केली होती. या दोघांनी तुरुंगात राहूनच 2016 साली जकार्तामध्ये झालेले बॉम्बहल्ल्याची योजना आखल्याचा संशय आहे.

ईवान तिथून निघत असताना रॉईसने त्यांची माफी मागितली. तो म्हणाला, "सर्वच माणसं चुका करतात. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. मला त्याचं वाईट वाटतं."

मात्र, तिथून बाहेर पडल्यावर ईवान यांना चांगलाच धक्का बसल्याचं जाणवलं.

ते म्हणाले, "त्याला अजूनही वाटतं की त्याने केलं ते योग्य होतं. मला भीती वाटते की त्याला संधी मिळाली तर तो पुन्हा हेच करेल."

"मी खरंच निराश झालोय. त्याने इतक्या वेदना दिल्या आहेत. तरीही तो मान्य करायला तयार नाही. यापेक्षा जास्त मी काय करू शकतो?"

आम्ही लष्कराच्या बसमध्ये बसलो. या बसने आम्हाला कारागृहचा परिसर दाखवला.

या बेटावर दोन कारागृह आहेत. आम्ही बाटू कारागृहात गेलो होतो. तिथून परमिसन कारागृहाकडे निघालो होतो. परमिसन कारागृहात आम्ही ऑस्ट्रेलियन दूतावास हल्ल्यातला दुसरा गुन्हेगार अहमद हसनला भेटणार होतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

हसन

हसनच्या खटल्यावेळी काढलेल्या फोटोंमध्ये हसनने हात उंचावला आहे आणि तो प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे रागाने बघत असल्याचं दिसतं. त्याला सुरक्षा रक्षकांनी घेरलं आहे आणि आसपास पत्रकारांची बरीच गर्दी आहे. मात्र, आज आम्ही त्याला भेटलो तेव्हा ती वेगळीच व्यक्ती असल्याचं आम्हाला जाणवलं.

त्याने लांब इस्लामी सदरा घातला होता. डोक्यावर नमाज पठणावेळी घालतात ती टोपी होती. तो थोडा घाबरलेला वाटत होता आणि अगदी हळू आवाजात आमच्याशी बोलत होता.

ईवान याआधीही त्याला भेटले होते.

त्याला भेटल्यावर ईवान हळूच त्याच्या गुडघ्यावर हात ठेवत म्हणाले, "मी माझ्या मुलांना तुला भेटायला घेऊन आलोय. तू ते का केलंस, हे त्यांना कळावं, यासाठी मी त्यांना आणलं आहे."

हसनने होकारार्थी मान हलवली.

तो म्हणाला, "त्यांना कळलंच पाहिजे. त्यांनी त्यांची आई गमावली आहे."

"मी तुमच्या वडिलांना हे सांगितलं आहे आणि मी अल्लाहचे आभार मानतो की आता तुम्हालाही हे सांगण्याची संधी मला मिळाली आहे."

"तुमच्या वडिलांना दुखवायचा माझा हेतू नव्हता. तुमचे वडील तिथून जात होते आणि नेमकं त्याचवेळी माझ्या मित्राने बॉम्बस्फोट केला. मला आशा आहे तुम्ही मला माफ कराल."

एव्हाना हसनच्या आवाजात कंप जाणवू लागला होता. तो म्हणत होता, "माझ्यात खूप दोष आहेत. मी खूप चुका केल्या आहेत."

सारा त्याच्याकडे बघत होती. ती म्हणाली, "तुम्ही ते का केलं? त्यामागे काय कारण होतं?"

तो म्हणाला, "माझ्या मित्राला आणि मला चुकीचं शिक्षण देण्यात आलं. आपण काय करतोय, याची पूर्ण कल्पना येण्याआधीच आम्ही ते करायला नको होतं."

यानंतर साराने त्याला तिची व्यथा सांगितली. आपली आई आपल्या पाचव्या वाढदिवसाच्या दिवशीच कशी वारली. सगळे संध्याकाळी चार वाजता पार्टीची तयारी करत होते आणि तेवढ्यात तिच्या आईने जगाचा निरोप घेतला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

ती सांगत होती, "मी लहान असताना नेहमी वडिलांना विचारायचे की माझी आई कुठे आहे. ते म्हणायचे ती अल्लाहच्या घरी आहे. मी त्यांना विचारायचे अल्लाहचं घर कुठे आहे? ते सांगायचे मशीद हेच अल्लाहचं घर आहे."

"एक दिवस मी मशिदीकडे पळाले. माझी आजी मला शोधत होती. जेव्हा तिला मी दिसले तेव्हा मी तिला सांगितलं की मी आईची वाट बघतेय. मी आई घरी येण्याची वाट बघत होते. पण ती कधीच परतली नाही."

हसनने डोळे बंद केले आणि हात उघडून अल्लाहची प्रार्थना केली. तो अल्लाहची माफी मागत होता.

शेवटी तो म्हणाला, "मी तुम्हाला भेटावं आणि तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं, ही अल्लाहचीच मर्जी आहे."

"पण मी तुला स्पष्टीकरण देऊ शकत नाही. मला माफ कर मुली."

"मला रडू आवरत नाहीय. मी साराला माझी स्वतःची मुलगी मानतो. मला माफ कर. हे तुझ्याच हातात आहे."

त्या खोलीत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

हसनचे हे अश्रू आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचं ईवान सांगत होते.

ते म्हणाले, "हसन रडला तेव्हा मला कळलं की तो चांगला आहे. त्याला इतरांचं दुःख आणि वेदना कळतात. कदाचित त्यावेळी तो चुकीच्या माणसांच्या प्रभावाखाली आला असेल. आता मात्र, त्याने त्यांचं मन मोकळं केलं आहे."

या भेटीच्या शेवटी सगळ्यांनी फोटो काढले. त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले. क्षमा करण्याची भावना काय असते, हे त्या खोलीत जाणवत होतं.

ईवान म्हणाले, "मी नेहमी म्हणायचो की त्यांच्यासाठी फाशी पुरेशी नाही. त्यांचा छळ करून मारलं पाहिजे, जेणेकरून त्यांना इतरांच्या वेदना कळतील. मात्र, अल्ला क्षमा करणाऱ्यांच्या पाठिशी असतो."

आम्ही आपापले अश्रू पुसत त्या खोलीतून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा लष्कराच्या बसमध्ये बसलो.

या कारागृहाच्या मागे एक प्रसिद्ध बीच आहे. कैद्यांना या जागी कधीच आणलं जात नाहीत. याला परमिसन किंव व्हाईट बीच म्हणतात. या बीचवर विशेष पथकाच्या जवानांना प्रशिक्षण दिलं जातं.

साराह, रिझकी आणि ईवान यांनी आम्हाला तो बीच बघण्याचा आग्रह केला.

या बीचवर मोठाले खडक आहेत. फेसाळ लाटा उसळतात. बीचवर ते तिघेही हातात हात घेऊन धावत होते. तिघेही खुश होते. मी साराला इतकं हसताना यापूर्वी बघितलं नव्हतं.

सारा सांगत होती, "आजच्या भेटीतून मी बरंच काही शिकले. हसनने माफी मागितली आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप आहे. मला हे कळलं की कुणीतरी एखादं अत्यंत घृणास्पद कृत्य करू शकतो आणि नंतर ती व्यक्ती बदलू शकते. म्हणून मी त्याला माफ केलं."

"मी आता आनंदी आहे कारण इतकी वर्षं मला जी प्रश्नं विचारायची होती आणि जे जाणून घ्यायचं होतं त्याची उत्तरं मला मिळाली आहेत."

क्षमादान

2002 साली बालीमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 202 जणांचा मृत्यू झाला होता. या 202 जणांमध्ये गॅरील अर्नांदा याचे वडीलही होते. या कारागृहात गॅरील या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार अली इमरॉनला भेटला. अली इमरॉननेदेखील आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)