पाकिस्तानवासीयांची मने जिंकणारा डॅरेन सॅमी आहे तरी कोण?

डॅरेन सॅमी, वेस्ट इंडिज Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॅरेन सॅमी

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी आता पाकिस्तानचा मानद नागरिक होण्याच्या वाटेवर आहे. कॅरेबियन बेटांवरच्या सॅमीला पाकिस्तानातील सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सॅमी पाकिस्तानच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत कसा झाला?

"आम्ही एक प्रवास सुरू केला. आम्ही कोणत्या परिस्थितीतून जात होतो हे आम्हाला ठाऊक होतं. आम्ही या स्पर्धेत खेळू की नाही याबाबत साशंकता होती. खूप प्रश्न होते. बोर्डाने आमचा अनादर केला. बिनडोकी संघ असं मार्क निकोलस यांनी आमचं वर्णन केलं. या सगळ्यातूनच आमचा संघ एकजूट झाला, उभा राहिला. मला या पंधरा खेळाडूंचे आभार मानायचे आहेत. सगळ्या बाजूंनी घेरुन टाकणारी प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देत संघातील प्रत्येकजण नेटाने लढला. जिंकण्यासाठी आवश्यक लढवय्या वृत्तीसह त्यांनी प्रेमळ चाहत्यांना अनोखी भेट दिली".

2016 ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीच्या भाषणाचा हा सारांश.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॅरेन सॅमी ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसह

विश्वविजेतेपदावर कब्जा केल्यानंतर आनंद, जल्लोषाच्या वातावरणात, आंतरराष्ट्रीय मंचावर, जगभर थेट प्रसारण दिसत असताना डॅरेन सॅमीने आपल्याच बोर्डाविरुद्ध म्हणजेच व्यवस्थेविरोधात बोलण्याचं धारिष्ट्य दाखवलं. अडचणी काय होत्या ते सांगितलं. टीका केली पण त्यात विखार नव्हता. संघाला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.

पॉलिटिकली करेक्ट न राहता खरं बोलण्याची शिक्षा सॅमीला झाली परंतु त्यामुळे दोन वेळा विश्वविजेता संघाचा कर्णधार ही त्याच्या नावामागची बिरुदावली कोणी काढून घेऊ शकलं नाही.

सेंट ल्युसिआ बेटांवरचा पहिला वेस्ट इंडिज क्रिकेटपटू

कॅरेबियन बेट समूहात अनेक बेटांचा समावेश आहे. निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या सेंट ल्युसियाचं वेस्ट इंडिज संघात प्रतिनिधित्व करणारा डॅरेन सॅमी हा पहिला खेळाडू आहे. वेस्टइंडिजसाठी खेळण्याची परंपरा सॅमीच्या निमित्ताने सुरू झाली. 2002 मध्ये U19 वर्ल्ड कप स्पर्धेत सॅमी वेस्ट इंडिज संघाचा भाग होता.

रॉस टेलर, हशीम अमला, मोहम्मद अशरफुल, हॅमिल्टन मासाकाटझा, अझर अली, जॉर्ज बेली हेही त्या स्पर्धेचा भाग होते. या सर्व खेळाडूंनी पुढे जाऊन आपापल्या राष्ट्रीय संघाचं नेतृत्व केलं. क्रिकेटपटू म्हणून नाव कमावण्यापूर्वी सॅमीने वाणिज्य मंत्रालयात ऑफिस असिस्टंट म्हणून काम केलं. क्रिकेटपटू म्हणून स्थिरावल्यानंतर सॅमीने तो जॉब सोडला.

एमसीसी संघाचा भाग

डॅरेन सॅमी मेरलीबोन क्रिकेट क्लबच्या यंग क्रिकेटर्स संघाचा भाग होता. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रतिभाशाली खेळाडूंना इंग्लंडमधील लॉर्ड्सस्थित मेरलीबोन क्रिकेट क्लबतर्फे प्रशिक्षणाची, सरावाची संधी मिळते.

ऑलराऊंडर

बॅटिंग करू शकतो असा बॉलर किंवा बॉलिंग करू शकतो असा बॅट्समन ही सॅमीच्या खेळाची व्याख्या. तंत्रशुद्धतेपेक्षा पिळदार शरीरयष्टीच्या बळावर टोलेजंग फटकेबाजी करणं ही सॅमीची खासियत. फास्ट बॉलर आणि स्पिन बॉलर यांचा सुवर्णमध्य म्हणजे सॅमीची बॉलिंग. चेंडूचा वेग काढून घेत बॅट्समनला जाळ्यात अडकवण्यात सॅमी माहीर आहे. सॅमीची आकडेवारी अचंबित करणारी वगैरे नाही. परंतु संघाला विशिष्ट परिस्थितीत ज्या गोष्टीची आवश्यकता असते ते सॅमी करतो ही त्याची उपयुक्तता.

कर्णधारपद

विशेषज्ञ बॅट्समन किंवा विशेषज्ञ बॉलर नसूनही सॅमीकडे वेस्ट इंडिजच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली यातूनच त्याचं व्यवस्थापकीय कौशल्य अधोरेखित होतं. आता-खेळा-नाचा वृत्तीच्या खेळाडूंची मोट बांधण्याचं काम सॅमीने केलं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधनाच्या मुद्यावरून संघर्ष सुरू असताना सॅमीने कर्णधारपद सांभाळलं. मूलभूत अशा गोष्टींसाठी लढा द्यावा लागत असताना सॅमी ठामपणे खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॅरेन सॅमी 2012 वर्ल्ड कप विजयानंतर आनंद व्यक्त करताना1

2004 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदापासून वेस्ट इंडिजचा संघ दूर होता. मात्र सॅमीच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016मध्ये दोनदा ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरलं. या जेतेपदांसह वेस्ट इंडिजच्या सार्वकालीन महान कर्णधारांच्या पंक्तीत सॅमीचं नाव नोंदलं गेलं. बोर्डाविरुद्ध जाहीरपणे बोलण्याचा फटका सॅमीला बसला आणि त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्याला संघातूनही वगळण्यात आलं. मात्र हे सगळं होईपर्यंत वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात दखल घ्यावीच लागेल अशा व्यक्तींमध्ये सॅमीचा समावेश झालेला होता.

सॅमीचा तो कॅच आणि सचिनने केला क्रिकेटला अलविदा

क्रिकेट चाहत्यांसाठी दैवत असं वर्णन होणाऱ्या सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी मुंबईत होती. जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी ती टेस्ट मॅच म्हणजे हळवा क्षण होता. कारण त्यानंतर सचिनला मैदानात खेळताना पाहता येणार नव्हतं. शेवटच्या टेस्टमध्ये सचिनचं शतक अनुभवता यावं यासाठी मैदानातले आणि घरी मॅचचा आनंद लुटणारे चाहते प्रार्थना करत होते. सचिनही शतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. नरसिंग देवनारायणचा चेंडू सचिनने कट केला. मात्र बाऊन्समुळे चेंडू बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सॅमीच्या हातात जाऊन विसावला. सचिन आऊट होताच वानखेडे मैदानावर भयाण शांतता पसरली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सॅमी सचिन तेंडुलकरचं अभिनंदन करताना

सॅमी आणि वेस्ट इंडिजनेही या विकेटचं सेलिब्रेशन केलं नाही. सचिन-सचिन असा जयघोष आणि टाळ्यांच्या गजरात सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. ही सचिनची शेवटची इनिंग्ज नसेल असा विचार क्रिकेटरसिकांनी केला नव्हता. पण वेस्ट इंडिजची दुसऱ्या इनिंग्जमध्येही घसरगुंडी उडाल्याने टीम इंडियाने एक डाव आणि 126 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तेंडुलकरची शेवटची खेळी संपुष्टात आणण्यात सॅमीच्या कॅचचा मोठा वाटा होता. परंतु क्रिकेटविश्वाला सचिनचं असलेलं योगदान आणि चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन सॅमीने विकेटचं सेलिब्रेशन केलं नाही. हा त्याचा मोठेपणा.

ट्वेन्टी-20 लीग स्पेशालिस्ट

सॅमी जगभरातल्या ट्वेन्टी-20 लीग स्पर्धांमध्ये खेळतो. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सॅमीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र विशेषज्ञ बॅट्समन तसंच विशेषज्ञ बॉलर नसल्याने सॅमी कोणत्याच संघात स्थिरावला नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कॅनडा ट्वेन्टी-20 स्पर्धेत सॅमी स्टीव्हन स्मिथबरोबर

कॅनडा ट्वेन्टी-20 लीगमध्ये ब्रॅम्प्टन वोल्व्ह्स, ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेतील होबार्ट हरिकेन्स, कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सेंट ल्युसिया झोयुक्स, सॅनफोर्ड स्पर्धेत सॅनफोर्ड सुपरस्टार्स अशा अनेकविध संघाकडून सॅमी खेळला आहे.

पाकिस्तान सुपर लीगशी नातं

जगभरात सुरू झालेल्या ट्वेन्टी-20 लीगच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2016मध्ये पाकिस्तान सुपर लीगची घोषणा केली. सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या वर्षी सगळे सामने दुबईत आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेत पाच संघ होते आणि सॅमी पेशावर झाल्मी संघाकडून खेळला. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पेशावर झाल्मी संघाचा कॅप्टन होता. या स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघाने जेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सॅमीचं नाव कुठेही नाही. मात्र पेशावर झाल्मी संघाशी त्याचे ऋणानुबंध जुळले ते कायमचेच. 2017 मध्ये शाहिद आफ्रिदीनेच या हंगामासाठी डॅरेन सॅमी संघाचा कॅप्टन असेल असं जाहीर केलं. सॅमीने ही जबाबदारी पेलताना पेशावर झाल्मी संघाला जेतेपद मिळवून दिलं.

पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनात मोलाचा वाटा

2017 मध्येही पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन दुबईतच आयोजित करण्यात आलं होतं. प्राथमिक फेरीचे 20 सामने आणि बाद फेरीचे 3 सामनेही दुबईतच झाले. मात्र फायनल पाकिस्तानात व्हावी असा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आग्रह होता. पाकिस्तानात खेळायला होकार देणारा सॅमी हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू होता. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पाकिस्तानात खेळण्यास राजी नव्हते. सॅमीने अनेक खेळाडूंशी वैयक्तिक चर्चा करत त्यांचं मन वळवलं.

सॅमीच्या पुढाकारामुळे इंग्लंडचे ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड मलान, वेस्ट इंडिजचा मार्लन सॅम्युअल्स आणि रियाद एमरिट, दक्षिण आफ्रिकेचा मॉर्न व्हॅन वॅक, झिम्बाब्वेचा शॉन अर्व्हाइन, , बांगलादेशचा अनामूल हक हे विदेशी खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळले. दोन्ही संघांसाठी व्हीआयपी स्वरुपाची सुरक्षायंत्रणा तैनात करण्यात आली होती. लाहोरच्या गडाफी स्टेडियम इथं 5 मार्च 2017 रोजी चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यात झालेल्या फायनलमध्ये सॅमीच्या पेशावर झाल्मी संघाने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला 58 धावांनी नमवत जेतेपदावर नाव कोरलं. फायनलमध्ये 11 चेंडूत 28 धावांची खेळी करणाऱ्या सॅमीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाकिस्तानमध्ये पीएसएल फायनलनंतर डॅरेन सॅमी

त्यावेळी बोलताना सॅमी म्हणाला होता, "हा माझ्यासाठी फक्त क्रिकेटचा सामना नव्हता. पीएसएल स्पर्धेत मी ड्राफ्टपासून सुरुवात केली. लालाने(शाहिद आफ्रिदी) मी कॅप्टन असल्याची घोषणा केली. त्यामुळे हा चषक माझ्या हृदयाजवळचा आहे. मी इथं येऊन खेळण्यात लालाची भूमिका मोलाची आहे. लाहोर आणि पेशावरमधील क्रिकेटचाहत्यांच्या चेहऱ्यावर मी हास्य आणू शकलो याचा आनंद आहे. पेशावर झाल्मी हा फक्त एक संघ नाही, चाहत्यांसाठी आम्ही अनेक गोष्टी करतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सुपर लीगचे आभार. इथल्या अद्भुत वातावरणात खेळण्याची मला संधी मिळाली. पेशावरने जेतेपद जिंकलं असलं तरी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विजय झाला आहे".

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पेशावर झाल्मी संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी जेतेपदाच्या करंडकासह

हा प्रयोग यशस्वी झाल्याने 2018मध्ये पाकिस्तान सुपर लीगचे बाद फेरीचे तीन सामने पाकिस्तानात खेळवण्यात आले. फायलनमध्ये इस्लामाबाद युनायटेडने सॅमीच्या पेशावर झाल्मी संघाला नमवत जेतेपद पटकावलं. सॅमीच्या पुढाकारामुळे 16 विदेशी खेळाडू पाकिस्तानात खेळण्यास तयार झाले.

2019 मध्ये पाकिस्तान सुपर लीगचे 8 सामने पाकिस्तानात आयोजित करण्यात आले. साहजिकच पाकिस्तानात खेळायला तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या वाढली. सॅमीच्या पेशावर झाल्मी संघाला फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॅरेन सॅमीचं पाकिस्तानात प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

सलग तीन वर्षं पाकिस्तानात ठराविक सामन्यांच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाची पाकिस्तान सुपर लीगचे सर्व सामने पाकिस्तानाच खेळवण्यात येत आहेत. 20 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत ही लीग होत असून सहा संघांमध्ये जेतेपदासाठी मुकाबला रंगत आहे. सॅमीकडे यंदाही पेशावर झाल्मी संघाचं कर्णधारपद आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या यशस्वी आयोजनामुळे झिम्बाब्वे आणि श्रीलंका संघांनी पाकिस्तानात खेळण्यास अनुमती दिली. मात्र या सगळ्याची सुरुवात सॅमीच्या ठोस भूमिकेतून झाली. सॅमीने आपल्या देशात क्रिकेट परत आणलं याची जाण असल्याने पाकिस्तानात त्याच्याप्रती प्रेम पाहायला मिळतं. कदाचित म्हणूनच मला पाकिस्तानात खेळताना सेंट ल्युसियामध्येच खेळतोय असं वाटतं असं सॅमी म्हणतो. सॅमीचे पाकिस्तानमध्ये प्रचंड चाहते आहेत.

पैशापल्याड जात पाकिस्तानला आपलंसं केल्याने सॅमीच्या नावाची शिफारस मानद नागरिकत्वासाठी करण्यात आली आहे. याबरोबरीने सॅमीला पाकिस्तानच्या 'निशान-ए-पाकिस्तान' या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पेशावर झाल्मीचे मालक यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विनंती केली. 23 मार्चला पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी सॅमीचा सन्मान करतील.

निशान-ए-पाकिस्तान हा पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान आहे. 1957 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ 26 विदेशी व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. यामध्ये प्रामुख्याने विदेशी राष्ट्रप्रमुखांचा समावेश आहे. एखाद्या विदेशी क्रिकेटपटूला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

एखाद्या देशाचे मानद नागरिकत्व सॅमी हा केवळ तिसरा क्रिकेटपटू आहे. 2007 वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स यांना सेंट किट्स सरकारने मानद नागरिकत्व देऊन गौरवलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

महत्त्वाच्या बातम्या