NewvsInd: टीम इंडियाची चौथ्या दिवशीच शरणागती; न्यूझीलंडचा 10 विकेट्सनी दणदणीत विजय

टीम साऊदी, न्यूझीलंड, भारत, वेलिंग्टन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

न्यूझीलंडचा टीम साऊदी

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या कसोटीत 10 विकेट्सनी दारुण पराभव झाला. न्यूझीलंडचा टेस्ट क्रिकेटमधला हा शंभरावा विजय आहे. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या टीम साऊदीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

चौथ्या दिवशी 144/4 वरून पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाचा दुसरा डाव 191 धावांतच आटोपला. टीम साऊदीने 5 तर ट्रेंट बोल्टने 4 विकेट्स घेत टीम इंडियाच्या डावाला खिंडार पाडलं. मयांक अगरवालने 58 धावांची खेळी केली. टीम इंडियाने चौथ्या दिवशी सकाळी 47 धावांत 6 विकेट्स गमावल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

हनुमा विहारी

9 धावांचं लक्ष्य न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

टीम इंडियाचा पहिला डाव 165 धावांतच आटोपला होता. कायले जेमिसन आणि टीम साऊदी यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 46 धावा केल्या.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावांची मजल मारत 183 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. केन विल्यमसनने 89 धावांची खेळी केली. इशांत शर्माने 5 विकेट्स घेतल्या. कॉलिन डी ग्रँडहोम (43), कायले जेमिसन (44), ट्रेंट बोल्ट (38) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी करत न्यूझीलंडची आघाडी वाढवली.

दुसऱ्या डावातही टीम इंडियाची घसरगुंडी कायम राहिली. मयांक अगरवालचा (58) अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

टीम इंडिया

ट्वेन्टी-20 मालिकेत 5-0 निर्भेळ यशानंतर प्रदर्शनानंतर टीम इंडियाला वनडे मालिकेत सपशेल पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)