COVID-19 : कोरोना व्हायरसमुळे जगावर जागतिक आरोग्य संकट - WHO

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, AFP

जगानं एका मोठ्या जागतिक आरोग्य संकटासाठी सज्ज राहावं असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

कोरोना विषाणू लगेचच जागतिक साथ ठरेल असं नाही, पण देशांनी त्यासाठी तयार रहावं असं WHO ने म्हटलंय.

कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण जगातील विविध देशांमध्येही आढळू लागल्यानं चिंता वाढलीय. त्यामुळेच कोरोना विषाणूचं जागतिक साथीमध्ये रुपांतर होण्याची भीती वाढलीय.

यातील बहुतांश संसर्ग चीनमध्ये झाला असला, तरी दक्षिण कोरिया, इटली आणि इराण यांसारखी इतर राष्ट्रही या विषाणूशी झगडत आहेत. या विषाणूमुळे 'कोव्हिड-19' हा श्वसनविकार होतो.

एखादा संसर्गजन्य रोग जगातील विविध भागांमध्ये व्यक्ती-व्यक्ती स्तरावर सहजरित्या पसरू लागतो तेव्हा जागतिक साथ पसरल्याचं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Reuters

चीनमध्ये गेल्या वर्षी हा विषाणू उद्भवला आणि तिथे आत्तापर्यंत सुमारे 77 हजार लोकांना याची लागण झाली असून जवळपास 2600 लोकांचा या आजारात मृत्यू झाला आहे.

सव्वीस देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले 1200 हून अधिक रुग्ण आढळले असून 20 हून अधिक जणांचा यात मृत्यू झाला आहे. या आजाराने सोमवारी इटलीत चौथा बळी घेतला.

कोव्हिड-19ने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एक टक्क्यापासून दोन टक्क्यांपर्यंत असल्याचं दिसत असलं, तरी प्रत्यक्षातील मृत्युदर अजून समजलेला नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

इराक, अफगाणिस्तान, कुवेत आणि बहारीन या देशांमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेले पहिले रुग्ण सोमवारी आढळले; हे सर्व लोक इराणहून आले होते.

या विषाणूला आळा घालण्याची संधी 'अंधुक' होत चालली आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख तेद्रोस अदहानम घेब्रेयेसस यांनी दिला.

युनायटेड किंगडममधील ईस्ट अँग्लिआ विद्यापीठातील आरोग्य संरक्षण विषयाचे प्राध्यापक पॉल हन्टर यांनी अशीच भीती व्यक्त केली. चीनबाहेरच्या रुग्णांचं वाढतं प्रमाण 'अतिशय चिंताजनक' आहे, असं ते म्हणाले.

'जागतिक साथ थोपवण्याची आपली क्षमता गेल्या 24 तासानंतर कमीकमी होऊ लागली असून जागतिक साथ पसरण्याचा टप्पा जवळ आल्याचं दिसतं आहे,' असं ते सोमवारी म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, हा विषाणू अधिक दूरपर्यंत पसरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देश करत आहेत, त्यामुळे सध्या तरी या परिस्थितीकडे जागतिक साथ म्हणून पाहिलं जात नाहीये.

"विविध देशांनी काहीच उपाय केले नसते, तर याहून कितीतरी अधिक पटींनी रुग्ण आपल्याला आढळले असते," असं त्या म्हणाल्या. "रोगप्रसार थोपवणं म्हणजे हेच."

कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि आपण काळजी काय घ्यायची?

ताप आणि खोकला, त्याचप्रमाणे पुरेशी हवा श्वसनावाटे आत घेता न येणं आणि श्वासोच्छवासामध्ये येणाऱ्या अडचणी, ही या संसर्गाची मुख्य चिन्हं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसापासून बचावासाठी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी साबणाने किंवा जेलने वारंवार हात धुवावेत, आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा आणि स्वतःचे डोळे, नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करू नये. ही काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.

खोकला आणि शिंक आल्यावर रुमाल वापरावा, कफ वा शेंबूड पुसून हात धुवून घ्यावेत, असं केल्यास हा आजार पसरण्याचा धोका कमी होईल.

कोरोणू विषाणूच्या जागतिक उद्रेकाचे संकेत

बीबीसीचे वैद्यकीय प्रतिनिधी फर्गस वॉल्श यांनी केलेलं विश्लेषण

दक्षिण कोरिया, इराण आणि इटली इथली एकत्रित परिस्थिती पाहिली असता जागतिक साथीचे सुरुवातीचे टप्पे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. जगाच्या विविध भागांमधील समुदायांत कोरोना विषाणू पसरण्याचे, जागतिक उद्रेकाचे हे संकेत आहेत.

यातील प्रत्येक देशामध्ये चीनशी संबंध न येताही विषाणू पसरत असल्याचं दिसतं आहे. इटलीमध्ये प्रसाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न चीनशी साधर्म्य सांगणारे आहेत.

विशेषतः इराणमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, कारण तिथल्या आरोग्य प्रशासनाने म्हटल्यानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये हा विषाणू पसरला आहे, आणि लेबनॉनमधील पहिला रुग्ण इराणमधून आलेला प्रवासी असल्याचं समोर आलं आहे.

फोटो स्रोत, AFP

जागतिक साथ आली, तरीही या विषाणूच्या प्रसाराचा वेग मर्यादित करणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हिवाळ्याच्या अखेरपर्यंत देशांना हा विषाणू थोडाफार थोपवता आला, तर नंतरच्या उष्ण हवामानामुळे विषाणू हवेत टिकून राहण्याचा कालावधी कमी होण्याची आशा निर्माण होईल. मोसमी फ्लूच्या बाबतीत असंच होतं. पण हे ठामपणे सांगता येणार नाही.

सर्वांत गंभीर फटका बसलेले देश कोणते?

दक्षिण कोरिया - चीनव्यतिरिक्त या विषाणूची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात आढळले आहेत. सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार दक्षिण कोरियात आणखी 231 लोकांना याची लागण झाली असून तिथल्या एकूण रुग्णांची संख्या 830 च्या पुढे गेली आहे. आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सैन्यातील 11 सदस्यांना हा संसर्ग झाल्यानंतर सुमारे 7,700 जवानांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.

पण विषाणूचा सर्वाधिक प्रसार झालेले समूह आग्नेयेकडील दाइगू शहरातील एका रुग्णालयाशी आणि धार्मिक गटाशी संबंधित आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

काही दक्षिण कोरियन विमान कंपन्यांनी दाइगूच्या दिशेने होणारी विमान वाहतूक थांबवली आहे. या शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख इतकी आहे.

वाहतुकीचं निलंबन 27 मार्चपर्यंत सुरू राहील, असं 'कोरियन एअर' कंपनीने जाहीर केलं आहे.

इटली - युरोपातील सर्वाधिक 165 कोरोनाग्रस्त रुग्ण इटलीमध्ये आहेत आणि या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या आठवडाअखेरीला मोठ्या प्रमाणावर उपाय जाहीर करण्यात आले.

लॉम्बार्डी आणि व्हेनेटो या प्रांतांमध्ये अनेक छोट्या शहरांना बंदिस्त करण्यात आलं आहे. पुढील दोन आठवडे इथल्या ५०,००० रहिवाशांना विशेष परवानगीविना शहराबाहेर पडता येणार नाही.

या क्षेत्राबाहेरसुद्धा अनेक व्यवसाय आणि शाळांचं कामकाज थांबवण्यात आलं आहे, आणि 'टॉप-फ्लाइट' दर्जाच्या अनेक फुटबॉल सामन्यांसह विविध क्रीडास्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, चीनमध्ये या विषाणूचा उद्भव सुरू झाला त्या वुहान शहराच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जाहीर केलं की, काही अनिवासी व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणं दिसत नसतील, तर त्यांना शहर सोडण्याची मुभा दिली जाईल.

परंतु, हा आदेश शासकीय शिक्कामोर्तब घेऊन काढलेला नव्हता, त्यामुळे आता तो मागे घेण्यात आला आहे, असं प्रशासकीय अधिकारांनी नंतर सांगितलं.

चीनमध्ये सोमवारी 409 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. यातील बरेच जण वुहान प्रांतातील आहेत.

फोटो स्रोत, AFP

इराणने सोमवारी जाहीर केल्यानुसार, तिथे या विषाणूची लागण झालेले 43 रुग्ण आहेत. यातील बहुतांश लोक कौम या धार्मिक महत्त्व असलेल्या शहरातील आहेत. विषाणूची लागण झालेल्यांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांचा हा चीनबाहेरचा सर्वांत मोठा आकडा आहे.

विषाणूच्या फैलावाची व्याप्ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप कौममधील खासदाराने केला आहे. केवळ या शहरातच 50 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं ते म्हणाले. परंतु, देशाच्या उप-आरोग्य मंत्र्यांनी हा दावा तत्काळ फेटाळून लावला.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी उत्तर कोरियाने 380 परदेशी व्यक्तींना वेगळं ठेवलं आहे.

मुख्यत्वे राजधानी प्योंग्यांगमध्ये असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचं दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने म्हटलं आहे.

उत्तर कोरियाने कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, पण या देशाची बरीच मोठी सीमा चीनला लागून आहे आणि ती बहुतांशाने बंदिस्त नाही.

आंतरराष्ट्रीय निर्बंधांखाली असलेल्या उत्तर कोरियामध्ये या आजाराशी संबंधित चाचण्या करण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे कोणत्याही विषाणूचा प्रसार तिथे अनिर्बंधपणे होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)