कोरोना व्हायरसः कोव्हिड 19 सर्वात आधी कोणाला झाला असावा?

कोरोना Image copyright Getty Images

सध्याच्या कोरोनोव्हायरस (कोव्हिड -19) च्या उद्रेकाने चीनी अधिकारी आणि तज्ज्ञांना अडचणीत टाकलंय.

आव्हान आहे ते या उद्रेकामागचा 'पेशंट झिरो' किंवा पहिला रोगी शोधण्याचं.

कोण आहे 'पेशंट झिरो' आणि तो महत्त्वाचा का?

एखाद्या व्हायरल वा विषाणूंमुळे होणाऱ्या (Bacterial) रोगाची लागण झालेल्या पहिल्या व्यक्तीला 'पेशंट झिरो' म्हटलं जातं.

झपाट्याने पसरणाऱ्या या एखाद्या विशिष्ट रोगाची लागण झालेली ही पहिली व्यक्ती शोधणं महत्त्वाचं आहे कारण यामुळे हा आजार नेमका कधी उद्भवला आणि का सुरु झाला यासारख्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.

अधिक लोकांना याचा संसर्ग होऊ नये वा भविष्यात हा रोग पुन्हा पसरु नये यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं असतं.

कोरोनाव्हायरसचा 'पेशंट झिरो' सापडलाय का?

थोडक्यात सांगायचं तर - नाही.

कोरोनाव्हायरसची पहिली लागण 31 डिसेंबरला आढळल्याचं चिनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. न्यूमोनियासदृश्य संसर्गाची लागण झालेल्या सुरुवातीच्या अनेक रुग्णांचा हुबेई प्रांतातल्या वुहानमधल्या मासे आणि प्राण्यांची विक्री करणाऱ्या मार्केटशी संबंध होता.

हाच प्रांत सध्याच्या या उद्रेकाच्या केंद्रस्थानी आहे. चीनमध्ये आणि जगभरात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या 75,000 पेक्षा जास्त प्रकरणांपैकी सुमारे 82% केसेचा या वुहानशी संबंध असल्याचं जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची आकडेवारी सांगते.

पण लान्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या चीनी संशोधकांच्या अभ्यासानुसार कोव्हिड 19ची लागण झालेली पहिली व्यक्ती 1 डिसेंबर 2019ला (म्हणजे खूपच आधी ) आढळली होती. आणि या व्यक्तीचा वुहानमधल्या त्या मार्केटशी काहीही संबंध नव्हता.

वुहानच्या जिनयिनतान हॉस्पिटलमधील ज्येष्ठ डॉक्टर वु वेनजुआन हे या संशोधनाच्या लेखकांपैकी एक आहेत. हा रुग्ण एक ज्येष्ठ व्यक्ती होती आणि त्यांना अल्झायमर झाला होता असं डॉ. वेनजुआन यांनी बीबीसीच्या चायनीज सर्व्हिसशी बोलताना सांगितलं.

"हा रुग्ण त्या मासळीबाजारापासून चार ते पाच बसेसच्या अंतरावर राहात होता. आणि ते आजारी असल्याने घराबाहेर फारसे पडत नव्हते," डॉ. वु वेनजुआन यांनी सांगितलं.

Image copyright Getty Images

पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी तीन लोकांमध्ये अशीच लक्षण दिसू लागली आणि यापैकी दोन जणांचादेखील वुहानशी संबंध नसल्याचं डॉ. वेनजुआन सांगतात.

पण या साथीच्या उद्रेकाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या 41 रुग्णांपैकी 27 जणांचा त्या मार्केटशी संबंध असल्याचं संशोधकांना आढळलंय.

कोरोनाव्हायरसच्या या उद्रेकाची सुरुवात वुहानमधल्या या मासे-प्राण्यांच्या बाजारापासून झाल्याचं मानण्यात येतंय. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूची लागण होण्यापूर्वी एका जिवंत प्राण्यापासून एका व्यक्तीला हा संसर्ग झाल्याची शक्यता असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.

एका व्यक्तीपासून इतकी मोठी साथ पसरू शकते का?

इबोला विषाणूचा शोध 1976मध्ये पहिल्यांदा लागला. पण नंतर 2014 आणि 2016मध्ये पश्चिम आफ्रिकेत याचा मोठा उद्रेक झाला.

11,000 लोकांचा यामुळे मृत्यू झाला तर 28,000 पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली होती असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे.

दोन वर्षांपेक्षा जास्त काळ हा संसर्ग टिकून होता आणि 10 देशांत या विषाणूची लागण झाली होती. यामधले बहुतेक देश आफ्रिका खंडातले असले तरी त्यांच्यासोबतच अमेरिका, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि इटलीतही याचे रुग्ण आढळले होते.

पण एकाच व्यक्तीपासून - गिनीमधल्या 2 वर्षांच्या मुलापासून या साथीची सुरुवात झाल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी त्यावेळी काढला होता.

हा मुलगा ज्या झाडाच्या ढोलीत खेळत असे तिथे वटवाघळांची वस्ती होती. त्यातूनच त्याला या विषाणूंची लागण झाल्याचं संशोधकांनी म्हटलं होतं.

इबोलाचा स्त्रोत शोधण्यासाठी हा मुलगा ज्या गावात राहात होता त्या मेलिआंडोऊ गावात जाऊन वैज्ञानिकांनी तिथले नमुने गोळा केले, स्थानिकांशी बोलून माहिती घेतली. आणि त्यानंतर EMBO Moleculare Medicine या पत्रिकेत निष्कर्ष छापण्यात आले.

'टायफॉईड मेरी'

सर्वात प्रसिद्ध 'पेशंट झिरो' म्हणून मेरी मॅलन यांचं नाव घेता येईल. कदाचित त्या पहिल्यावहिल्या 'पेशंट झिरो' होत्या. न्यूयॉर्कमध्ये 1906मध्ये आलेल्या टायफॉईड तापाच्या साथीची सुरुवात त्यांच्यापासून झाल्याने त्यांना - टायफॉईड मेरी असं नाव पडलं होतं.

Image copyright Getty Images

मूळ आयर्लंडच्या मेरी या श्रीमंत कुटुंबांसाठी स्वैपाकिणीचं काम करायला अमेरिकत स्थलांतरित झाल्या.

जिथेजिथे मेरी काम करत त्या कुटुंबातल्या सदस्यांना टायफॉईड तापाची लागण होत असे.

डॉक्टर्सनी त्यांना या रोगाच्या 'हेल्दी कॅरियर' (Healty Carrier) म्हटलं होतं. म्हणजे अशी व्यक्ती जिला रोगाचा संसर्ग झालेला आहे पण जिच्यात रोगाची लक्षणं वा परिणाम दिसत नाहीत.

विषाणूचा प्रसार करण्याची क्षमता काही लोकांमध्ये इतरांपेक्षा जास्त असते याविषयीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अशाप्रकारची क्षमता असणाऱ्या आणि नोंद करण्यात आलेल्या सुरुवातीच्या काही व्यक्तींपैकी मेरी एक आहेत.

मेरी मॅलन यांची नोंद अशी अति-संसर्ग प्रसार क्षमता असणारी व्यक्ती म्हणजेच सुपर - स्पेडर (super-spreader) म्हणून करण्यात आलेली आहे.

त्याकाळी दरवर्षी हजारो न्यू यॉर्कवासियांना या रोगाची लागण होत होती आणि यापैकी 10% जणांचा यात बळी जात होता.

अनेक वैज्ञानिकांना ही संकल्पना का पटत नाही?

अनेक तज्ज्ञ एखाद्या संसर्गाची पहिली नोंद वा पहिला रुग्ण शोधून काढण्याच्या विरोधात आहेत. कारण यामुळे रोगाविषयीची चुकीची माहिती पसरण्याची वा त्या व्यक्तीवर सगळं खापर फुटण्याची शक्यता असल्याची भीती या वैज्ञानिकांना वाटते.

यासाठीचं फेमस उदाहरण म्हणजे एड्सच्या साथीचा 'पेशंट झिरो' चुकीची नोंद झालेला माणूस.

Image copyright Getty Images

गेयटन डग्लस या फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करणाऱ्या होमोसेक्शुअल व्यक्तीला इतिहासातला सगळ्यात चुकीची प्रतिमा उभा करण्यात आलेला रुग्ण म्हणता येईल.

1980च्या दशकात अमेरिकेत HIVचा प्रसार केल्याचा दोष त्यांना देण्यात आला.

पण ते या विषाणूचे पहिले रुग्ण नव्हते असं तब्बल तीन दशकांनंतर वैज्ञानिकांनी म्हटलं. हा विषाणू 1970च्या दशकाच्या सुरुवातीला कॅरिबियन बेटांमधून अमेरिकेत आल्याचं 2016मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटलंय.

रंजक बाब म्हणजे HIVच्या या उद्रेकाच्या वेळीच 'पेशंट झिरो' ही संकल्पना अपघातानेच अस्तित्वात आली होती.

80च्या दशकाच्या सुरुवातीला लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पसरलेल्या या रोगाचा तपास करताना सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनच्या (CDC) संशोधकांनी 'कॅलिफोर्निया राज्याबाहेरच्या' रुग्णांचा उल्लेख करताना 'O' असा उल्लेख केला.

इतर संशोधकांनी याचा अर्थ चुकून शून्य - 0 असा लावला आणि त्यातून पेशंट झिरो निर्माण झाला.

त्यावेळच्या या संशोधनाबद्दल त्यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या प्राध्यापक ऑलिव्हर पायबस यांनी म्हटलं होतं, "या संशोधनातून पेशंट झिरोचा एक रंजक मुद्दा मांडण्यात आला आहे. एड्स कसा उद्भवला याविषयीच्या चर्चेचा हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय. यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही आणि या व्यक्तीला जबाबादार ठरवणं हे दुर्दैवी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)