कोरोना व्हायरसमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

  • ब्रजेश मिश्र
  • बीबीसी प्रतिनिधी
कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

जेनेरिक औषधांची निर्मिती आणि निर्यात याबाबत भारत आघाडीवर आहे. 2019 वर्षात भारताने 201 देशांना जेनेरिक औषधं निर्यात केली आणि त्यातून अब्जावधी रुपये कमवले.

पण आजही या औषधांच्या निर्मितीसाठी भारत चीनवर अवलंबून आहे आणि या औषधांच्या निर्मितीसाठी चीनमधून अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स (API) आयात केली जातात. औषध निर्मितीसाठीचा हा कच्चा माल असतो.

चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने त्याचा मोठा परिणाम आयात आणि निर्यातीवर झालाय आणि API आयात होऊ न शकल्याने अनेक कंपन्यांचं उत्पादन घटतंय. याचा परिणाम भविष्यामध्ये औषधांच्या जागतिक पुरवठ्यावर पहायला मिळू शकतो.

भारत सरकारच्या वाणिज्य विभागाची मान्यता आणि पाठिंबा असणाऱ्या ट्रेड प्रोमोशन काऊन्सिल ऑफ इंडिया (TPCI)च्या अहवालानुसार 2018-19 वर्षामध्ये भारतामधून 19.14 अब्ज डॉलर्स मूल्याच्या औषधांची निर्यात झाल्याचा अंदाज आहे.

ही औषधं तयार करण्यासाठी लागणारा 85 टक्के कच्चा माल (API) चीनमधून आयात केला जातो. भारतातलं एपीआयचं उत्पादन अतिशय कमी असून जे एपीआय भारतात तयार केलं जातं त्याचं अंतिम उत्पादन तयार करण्यासाठीही काही गोष्टी चीनमधून आयात केल्या जातात. म्हणजे भारतीय कंपन्या API उत्पादनासाठीही चीनवर अवलंबून आहेत.

एपीआयच्या वाढणाऱ्या किंमती

चीनमधून होणाऱ्या एपीआयच्या आयातीवर कोरोनाव्हायरसमुळे परिणाम झालाय. चीनमधून पुरवठा बंद झाल्याने औषधनिर्मिती करणाऱ्या भारतातल्या कंपन्यांना आता महाग दरांनी एपीआय विकत घ्यावं लागतंय.

फोटो स्रोत, Getty Images

आरती फार्मा ही मुंबईतली कंपनी एपीआय आयात करते आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ते विकते. चीनमधून येणारा कच्च्या मालाचा पुरवठा पूर्णपणे बंद असल्याचं कंपनीचे मालक हेमल लाठिया यांनी सांगितलं. कोणतीही कन्साईन्मेंट येत नाही, आणि कधी येणार हे माहिती नाही.

बीबीसीसोबत बोलताना त्यांनी सांगितलं, "भारतात तयार होणारं एपीआयही चीनवर अवलंबून आहे. म्हणूनच इथल्या एपीआय निर्मात्यांवरही परिणाम झालेला आहेआणि आम्ही चीनमधून जी थेट एपीआय आयात करत होतो, त्यातही घट होऊ लागलेली आहे."

एप्रिलपर्यंत ही आयात कदाचित पुन्हा सुरु होईल असा अंदाज ते व्यक्त करतात. पण एक ते दीड महिना मात्र ही अडचण कायम राहण्याची शक्यता आहे.

हेमल लाठिया सांगतात, "एपीआयच्या जुन्या साठ्याच्या किंमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. चीनमधून एपीआय आयात करून स्थानिक कंपन्यांना त्याची विक्री करणाऱ्या कंपन्या आता कमी पुरवठ्यामुळे किंमती वाढवून एपीआय विकतायत."

भारतातलं एपीआय उत्पादन कमी का?

चीनमधलं एपीआयचं उत्पादन भारतापेक्षा 20 ते 30 टक्क्यांनी जास्त असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

पण चीनमधून होणारी एपीआयची आयात थांबल्याने अडचण निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. 2014मध्येही याबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावेळी दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तणाव होता. त्यामुळेच कदाचित चीन हा कच्च्या मालाचा पुरवठा थांबवू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात बैठकादेखील झाल्या आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images

अत्यावश्यक औषधांच्या यादीतील 12 औषधं अशी आहेत जी तयार करण्यासाठी लागणारा 80 ते 90 टक्के कच्चा माल चीनमधून येत असल्याचं तत्कालीन केंद्रीय रसायन आणि खत (Chemicals & fertilizers )मंत्री अनंत कुमार यांनी म्हटलं होतं.

चीनवर अवलंबून राहणं कमी व्हावं म्हणून भारतातलं एपीआयचं उत्पादन वाढवण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिल्याचं वृत्त होतं.

उत्पादन घटलंय का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

बहुतेक कंपन्यांनी एकतर उत्पादन कमी केलंय वा त्यांच्याकडे असलेल्या पुरवठ्यामधून त्या काम चालवत असून फक्त अतिशय गरजेच्या वस्तूच विकत घेण्यात येत असल्याचं हेमल लाठिया सांगतात. अधिकचा स्टॉक कोणी विकत घेत नाहीये. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किंमती वाढतायत. पण पुढच्या दीड महिन्यांत हा पुरवठा सुरू झाला नाही, तर अडचणी आणि किंमती दोन्हीत वाढ होईल.

आपण साधारण 70% एपीआय चीनकडून आयात करत असल्याचं मॅक्सटार - बायो जेनिक्स या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीचे संचालक जगदीश बन्सल सांगतात. त्यांची कंपनी कॅप्सूल तयार करते. चीनमधून आयात बंद झाल्याने सध्या ज्यांच्याकडे स्टॉक आहे ते तो चढ्या किंमतींनी विकत आहेत.

जगदीश बन्सल सांगतात, "सध्या असलेला स्टॉक साधारण महिनाभर चालेल. पण महिन्याभरात आयात सुरू झाली नाही तर भरपूर अडचणी येतील."

चीनमधून होणारी एपीआय आयात बंद झाल्याने आपल्या कंपनीतलं औषधांचं उत्पादन कमी होत असून लवकरच पुरवठा सुरु न झाल्यास उत्पादन थांबण्याची शक्यता असल्याचं ते सांगतात.

पण सध्यातरी याचा औषधांच्या किंमतींवर परिणाम होणार नसल्याचं जगदीश बन्सल यांचं म्हणणं आहे. पण चीनकडून पुरवठा होण्यास दीर्घकाळ लागल्यास या किंमतींवर परिणाम होईल.

फोटो स्रोत, Getty Images

दोन-तीन महिने काम थांबू नये इतका स्टॉक सगळ्या कंपन्या बाळगत असल्याचं दिल्ली ड्रग्स ट्रेडर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आशिष ग्रोव्हर सांगतात. पण त्यानंतर अडचण येऊ शकते. पण एक-दोन महिन्यांत चीनमधून एपीआयची आयात सुरू होईल अशी आशा ते व्यक्त करतात.

आशिष ग्रोव्हर म्हणतात, "उत्पादन सुरू आहे पण एपीआयच्या किंमती वाढतायत. एखाद्या औषधासाठीची मागणी अचानक वाढू नये नाहीतर संकट आल्यासारखं वाटेल. चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरलेला आहे. पण त्याच्याशी संबंधित कोणतंही औषध इथून जात नाही. म्हणूनच सध्या इतर औषधांच्या किंमतींवर परिणाम झालेला नाही."

सरकारी आकडेवारी काय सांगते?

फार्मास्युटिकल एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिल ऑफ इंडिया (Pharmexcil) च्या वार्षिक अहवालानुसार 2018-19 वर्षामध्ये भारतातून सुमारे 19 अब्ज डॉलर्सच्या औषधांची निर्यात झाली होती.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या मागणीच्या आधारे डीपीटी आणि बीसीजीसाठीची साधारण 65% औषधं भारतात तयार होतात आणि गोवरसाठीच्या लसींपैकी 90% भारतात तयार होतात.

जेनेरिक औषधांचं उत्पादन करणाऱ्या जगातल्या प्रमुख 20 कंपन्यांपैकी 8 कंपन्या भारतीय आहेत.

भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांपैकी 55% औषधं उत्तर अमेरिका आणि युरोपातून आयात केली जातात. भारताकडून औषधं आयात करणाऱ्या देशांपैकी अमेरिका आयात करणारा सर्वात मोठा देश आहे.

आफ्रिकेच्या जेनेरिक औषधांच्या बाजारपेठेपैकी भारताचा हिस्सा 50% आहे.

2018-19 साली भारताने जगातल्या 201 देशांना 9.52 कोटी डॉलर्सची औषधं निर्यात केली होती.

पण जर समजा आता चीनकडून एपीआयचा पुरवठा पुढचा दीर्घ काळ बंद राहिला तर भारतासोबत जगभरात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

सोबतच भारतीय अर्थव्यवस्थेचं यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)