भारताच्या न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभवाची 5 कारणं

भारत, न्यूझीलंड, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

विराट कोहली

न्यूझीलंडने ख्राईस्टचर्च टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला 7 विकेट्सनी नमवलं. या विजयासह दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 असा निर्भेळ विजय मिळवला. काय आहेत टीम इंडियाची पराभवाची कारणं?

टीम इंडियाने पहिल्या डावात 242 रन्स केल्या. टीम इंडियाच्या बॉलर्सनी न्यूझीलंडला 235 धावांतच रोखलं. टीम इंडियाला 7 धावांची अल्प आघाडी मिळाली.

मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली. टीम इंडियाचा डाव 124 धावांतच आटोपला. विजयासाठी मिळालेलं 132 धावांचं लक्ष्य न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

1. किमयागार कायले जेमिसन

काही महिन्यांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात सॅम करनने टीम इंडियाला सतवलं होतं. न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पणवीर कायले जेमिसनने टीम इंडियाला अडचणीत आणलं. साडेसहा फूटांपेक्षा जास्त उंचीच्या जेमिसनने भारतीय बॅट्समनना शॉर्ट पिच बॉलने हैराण केलं. फास्ट बॉलिंगला अनुकूल पिचेसवर जेमिसनने आपल्या उंचीचा फायदा उठवत भारतीय बॅट्समनला आपल्या जाळ्यात अडकवलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कायले जेमिसन

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॅट्समन म्हणून सुरुवात करणाऱ्या जेमिसनने उपयुक्त बॅटिंग करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. वेलिंग्टन टेस्टमध्ये नील वॅगनर नसल्यामुळे जेमिसनला संधी मिळाली. त्याचा फायदा उठवत जेमिसनने 4 विकेट्स आणि 44 रन्स केल्या. ख्राईस्टचर्च टेस्टमध्ये जेमिसनने पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट्स पटकावत टीम इंडियाच्या डावाला खिंडार पाडलं.

बॅटिंग करताना 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्येही जेमिसनने शिस्तबद्ध मारा करत टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्टला चांगली साथ दिली. दोन टेस्टमध्ये मिळून जेमिसनने 9 विकेट्स आणि 93 रन्स करत आपलं कर्तृत्व सिद्ध केलं.

2. शॉर्ट पिच बॉलच्या माऱ्यासमोर टीम इंडिया घायाळ

न्यूझीलंडने या मालिकेसाठी टीम इंडियाच्या बॅट्समनवर शॉर्ट पिच अर्थात आखूड टप्प्याच्या बॉलचा मारा केला. फास्ट बॉलिंगसाठी पोषक अशा पिचेसवर टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर, कायले जेमिसन, कॉलिन डी ग्रँडहोम यांनी सातत्याने आखूड टप्प्याचे चेंडू टाकत टीम इंडियाच्या बॅट्समनला अडचणीत टाकलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अजिंक्य रहाणे

भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्यांवर खेळण्याची सवय असलेल्या टीम इंडियाच्या बॅट्समनला बरगड्यांच्या दिशेने येणाऱ्या बॉलरुपी बाणांनी घायाळ केलं. टीम इंडियाचा युवा ओपनर पृथ्वी शॉ, भरवशाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी हे शॉर्ट पिच माऱ्यासमोर हतबल ठरताना दिसले. शॉर्ट पिच बॉलवर अवघडलेल्या स्थितीत पूल किंवा हुकचा फटके मारताना टीम इंडियाचे बॅट्समन आऊट होताना दिसले.

3. बॉलिंग कमकुवत आणि न्यूझीलंडचं शेपूट वळवळलं

सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या टीम इंडियाचे बॉलर्स टेस्ट सीरिजमध्ये पूर्ण प्रभावानिशी खेळताना दिसले नाहीत. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्माची या सीरिजसाठी निवड झाली. मात्र वेलिंग्टन टेस्टनंतर इशांतचं दुखणं पुन्हा बळावलं. जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत होता. मात्र त्याचं हे पुनरागमन घाईघाईने झाल्याचं स्पष्ट होतं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मोहम्मद शमी

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चारदिवसीय सामने न खेळता बुमराहला खेळवणं फायदेशीर ठरलं असतं. टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या बुमराहला सूर न गवसल्याने संघाचा विजय दुरावला.

टीम इंडियाने न्यूझीलंडच्या अव्वल बॅट्समनला टिच्चून मारा केला. मात्र त्यांच्या शेपटाला रोखण्यात टीम इंडियाला नेहमीच समस्या जाणवली. भारतात प्रतिस्पर्धी बॅट्ममनला सळो की पळो करून सोडणारे रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा न्यूझीलंडमध्ये मात्र निष्प्रभ ठरले.

4. ऋषभ पंतचं नवखेपण संपेना

अनुभवी विकेटकीपर वृद्धिमन साहाऐवजी युवा ऋषभ पंतला पसंती देण्यात आली. भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्यांवर साहाचं कीपिंग महत्त्वाचं असतं, मात्र न्यूझीलंडमध्ये फास्ट बॉलिंग केंद्रित खेळपट्या आहेत आणि संघाला डावखुरा आक्रमक बॅट्समन असणं फायदेशीर ठरू शकतं या विचारातून कोहली-शास्त्री जोडीने दोन्ही सामन्यात ऋषभ पंतला संधी दिली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ऋषभ पंत

ऋषभला चारही इनिंग्जमध्ये मिळून 19, 25, 12, 4 अशा खेळी केल्या. आक्रमक बॅटिंगसाठी प्रसिद्ध ऋषभने या सीरिजमध्ये बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सपशेल अपयशी ठरला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅचेसमध्ये शतक नावावर असलेल्या ऋषभला बॅटिंग आणि कीपिंगमध्ये सातत्य राखता आलेलं नाही.

5. विराट कोहलीला केलं लक्ष्य

टीम इंडियाचा खेळ कर्णधार विराट कोहलीभोवती केंद्रित आहे हे जाणून न्यूझीलंड संघाने विराट कोहलीलाच लक्ष्य केलं. विराटला झटपट आऊट केलं तर टीम इंडियाचा डाव गडगडतो हे यानिमित्ताने सिद्ध झालं. 2, 19, 3, 14 हे विराटचे आकडे त्याच्या लौकिलाला साजेसे नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

न्यूझीलंडने कोहलीला टार्गेट केलं

टप्पा पडल्यानंतर स्विंग होऊन स्टंपच्या दिशेने आत येणाऱ्या चेंडूंवर कोहली बाद होताना दिसला. न्यूझीलंडच्या सगळ्याच बॉलर्सनी कोहलीच्या खेळाचा सूक्ष्म अभ्यास करून कच्चे दुवे हेरले होते. कोहली खेळपट्टीवर स्थिरावला तर मोठी खेळी करतो. मोठी खेळी करताना मॅरेथॉन भागीदाऱ्या रचतो हे न्यूझीलंडला ठाऊक होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)