कोरोनाचा धसका; ट्वीटर कर्मचाऱ्यांना म्हणतं घरूनच काम करा

ट्वीटर, कोरोना, आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ट्वीटरने आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयत्न ट्वीटरनेही केला आहे. ट्वीटरने आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगितलं आहे.

ट्वीटरने एक ब्लॉग लिहित यासंबंधीची सूचना केली आहे. हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक असल्याचंही या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

तसंच जगभरातल्या आपल्या कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं, असं आपलं ठाम मत असल्याचंही कंपनीचं म्हणणं आहे.

ट्वीटरने कर्मचाऱ्यांच्या परदेश प्रवासावर बंदी घातली आहे. गरज नसेल तर परदेश प्रवास करू नका, असे आदेश कंपनीने दिले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा ब्लॉग प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ट्वीटरच्या एचआर विभाग प्रमुख जेनिफर क्रिस्टी म्हणाल्या, "कोव्हिड-19 चा फैलाव कमी करणे, हा आमचा उद्देश आहे."

फोटो स्रोत, SOPA Images

फोटो कॅप्शन,

ट्वीटर

कर्मचाऱ्यांना काही काळ घरून काम करता यावं, यासाठी ट्वीटर वेगवेगळे मार्ग शोधत असल्याचंही या ब्लॉगमध्ये सांगण्यात आलं आहे. "हा आमच्यासाठी मोठा बदल आहे. दूरवरच्या भागातूनही काम करता यावं, या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जागतिक सेवा प्रदान करणारी कंपनी आहोत. त्यामुळे कुणालाही कुठूनही ट्वीटरसाठी काम करता यावं, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत."

ट्वीटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह जॅक डोर्सी दुर्गम भागातूनही ट्वीटरसाठी काम करता यावं, या मताचे आहेत आणि त्यासाठी यंदा 6 महिने आफ्रिकेत राहण्याची आपली योजना असल्याचं त्यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यातच जाहीर केलं होतं.

आशिया खंडात या विषाणुचा सर्वाधिक फैलाव झाल्याने या भागातल्या अनेक कंपन्यांनी आधीच हे पाऊल उचललं आहे. आता इतर खंडातील कंपन्याही खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारचे उपाय योजत आहेत.

फेसबुक, गुगसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेत होणाऱ्या बैठका, परिषदा एकतर रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत.

फोटो स्रोत, Chesnot

फोटो कॅप्शन,

ट्वीटर

गुगलच्या डबलिन या युरोप मुख्यालयातील कर्मचारी मंगळवारी घरून काम करणार आहेत. कोव्हीड-19 या विषाणुच्या आर्यलँडमध्ये होणाऱ्या संभाव्य उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र बुधवारी सगळे कर्मचारी ऑफिसमध्ये परततील.

इतकंच नाही तर A&T दूरसंचार कंपनी, सीटीबँक यासारख्या मोठ्या कंपन्यांनीदेखील कर्मचाऱ्यांचे परदेश दौरे विशेषतः आशियातले दौरे रद्द केले आहेत.

चीनमधून सुरू झालेली कोव्हिड-19 या कोरोना विषाणूची साथ आता आशिया खंडाबाहेर अमेरिका, युरोप आणि मध्य-पूर्वेतही पोचली आहे. तर या विषाणूमुळे जगभरात 3000 हून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वच मोठ्या कंपन्यांकडून विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)