T20 WorldCup: शफाली वर्मा कशी बनली भारताची रॉकस्टार?

  • अॅमी लेफ्टहाऊस
  • बीबीसी स्पोर्ट्स, सिडनी
शेफाली वर्मा

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

शेफाली वर्मा

16 वर्षांच्या मुला-मुलींच्या आयुष्यातले प्रश्न ठराविक असतात. कोणत्या कॉलेजला अॅडमिशन घ्यायचं, मोकळ्या वेळेत फिरायला जायचं की घरीच बसून टीव्ही पाहायचा, किंवा वडिलांसमोर हट्ट करून टू-व्हीलर गाडीची चावी कशी घ्यायची, इत्यादी.

पण शफाली वर्माचा कुमारवयीन काळ थोडासा वेगळा होता.

भारताची आघाडीची बॅट्समन शफाली वर्मा सध्या वूमन्स टी-20 वर्ल्डकप स्पर्धा गाजवत आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने तिने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

भारताचा संघही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत आला आहे. एकही सामना गमावलेला नसल्यामुळे इंग्लंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाल्यानंतर भारताला थेट फायनलचं तिकीट मिळालं.

शफाली वर्मा या वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारी तिसरी खेळाडू आहे. या धावा तिने आकर्षक अशा 161 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. एकापेक्षा जास्त वेळा फलंदाजीची संधी मिळालेल्या खेळाडूंमध्ये हा स्ट्राईकरेट सर्वाधिक आहे.

टी-20 कारकिर्दीत 120 पेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंच्या बाबतीतही शफाली वर्माचाच स्ट्राईक रेट 147 इतका सर्वाधिक आहे.

भारताकडून 18 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली शफाली चौकार आणि षटकारांच्या बाबतीतही इतरांच्या बरीच पुढे आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तिने आतापर्यंत 58 चौकार आणि 21 षटकार खेचले आहेत.

सध्या ती आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आक्रमक शैलीत खेळणारी शफाली सलामीवीर स्मृती मंधाना हिच्याप्रमाणेच एक विश्वासू फलंदाज म्हणून पुढे आली आहे.

इंग्लंडचा स्पिनर अलेक्स हर्टले बीबीसी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं, "आम्ही मंधानाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं. तिच्याप्रमाणे फटके कुणीच खेळू शकणार नाही, असं आम्हाला वाटलं. पण त्यानंतर शफालीची फलंदाजी आम्ही पाहिली. तिच्यासमोर तर मंधानाही फिकी वाटते. शफालीचे फटके अविश्वसनीय असतात."

येत्या दोन वर्षांत तिची फलंदाजी आणखी परिपक्व होईल. एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून ती उदयाला येईल, असं हर्टले सांगतात.

पण शफालीच्या यशामागचं रहस्य नेमकं काय आहे?

मोकळेपणाने केली जाणारी फलंदाजी हीच या मागचं खरं कारण असल्याचं तिची सहकारी शिखा पांडेला वाटतं.

ती सांगते, तिला तिचा नैसर्गिक खेळ करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. आम्ही तिला घरगुती स्पर्धांमध्ये पहिल्यांदा पाहिलं होत. तेव्हापासूनच ती आक्रमक क्रिकेट खेळते. पुढे तिला राष्ट्रीय संघात घेण्यात आलं. आम्ही तिला तिच्या खेळात बदल करण्यास कधीच सांगितलं नाही.

16 वर्षांची होते, तेव्हा मी क्रिकेटचा सरावसुद्धा सुरु केला नव्हता. मी त्यावेळी गल्ली क्रिकेट खेळायचे. म्हणून एक 16 वर्षांची मुलगी भारतासाठी क्रिकेट खेळते हे पाहून छान वाटतं.

शेफाली भारतीय पुरुष संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्याप्रमाणेच निर्भीड रॉकस्टार असल्याचं खेळाडूंचं मत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीला सुद्धा अतिशय निडर असल्याचं वाटतं.

महिला संघातला तिचा उदय भारतीय क्रिकेट संघाच्या भविष्यासाठी चांगली बाब मानता येईल.

यावेळी बोलताना भारताची माजी कर्णधार मिताली राजला 2002मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडल्याची आठवण आली. त्यावेळी पेपरमध्ये छापून आल्याशिवाय कुणालाच याची माहिती नव्हती, असं ती सांगते.

ती पुढे सांगते, आमच्यावेळी प्रवासासाठी पैसे मिळायचे नाहीत. आम्हाला चांगले प्रशिक्षक नव्हते, असं राजने तिच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे.

आम्ही प्रेरणा म्हणून पुरुष खेळाडूंकडेच पाहायचो. पण आता नव्या महिला खेळाडूंसाठी महिला क्रिकेटमधूनच रोल मॉडेल तयार होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

टी-20 वर्ल्डकप पाहायला आलेला बहुतांश प्रेक्षकवर्ग कौटुंबिक आहे. मुलं आजूबाजूला खेळताना दिसतात, ते खेळाडूंचे ऑटोग्राफ घेण्यासाठी धावतात.

शेफाली सध्या भारतीय संघातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. भारताने पर्थमध्ये झालेल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली होती.

विकेटकिपर तानिया भाटीयासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षकांनी गराडा घातला होता. हरमनप्रीत कौर विजयानंतर बोलत असताना तिला प्रोत्साहन देण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

दिल्लीजवळच्या रोहतकमधल्या मैदानात सचिन तेंडुलकर शेवटचा रणजी सामना खेळत असताना तिचे वडील तिला घेऊन गेले होते. सचिनला खेळताना पाहून नऊ वर्षांच्या शफालीने क्रिकेटमध्येच करिअर करायचं ठरवलं.

शफालीचा भाऊ स्थानिक क्रिकेट संघात खेळायचा. पण मुलगी असल्यामुळे तिथं खेळण्यात तिला अडचणी आल्या. इथले क्लब मुलींना प्रशिक्षण देत नव्हते.

त्यामुळे तिच्या वडिलांनी एक शक्कल लढवली. शेफालीचे केस कापून तिला एखाद्या मुलासारखे कपडे घालायला लावले. एके दिवशी भाऊ आजारी पडल्यानंतर ती त्याच्या ठिकाणी खेळायला गेली.

त्याच वर्षी शेफालीला मॅन ऑफ द सीझन नावाचा पुरस्कारसुद्धा मिळाला. याच शेफालीने त्याच्या सहा वर्षांनंतर आता सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यात शेफालीने 49 चेंडूंत 73 धावा फटकावल्या. यावेळी तिचं वय 15 वर्षे 285 दिवस होतं. त्यामुळे भारताकडून अर्धशतक नोंदवणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू शेफाली बनली आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1989मध्ये पाकिस्तानविरुद्ध 59 धावांची नोंद केली होती.

मुलगी लहान आहे, म्हणून तिला खेळण्यापासून रोखू नये, जर तिची इच्छा असेल आणि तिने खेळाकडे लक्ष केंद्रीत केला तर ती काहीही करू शकते, असं शफाली सांगते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यात 29 चेंडूत 15 धावा ही वर्ल्डकप स्पर्धेतील तिची सर्वात कमी धावसंख्या आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा तिचा प्रयत्न असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)