कोरोना व्हायरस: इटलीत 366 जणांचा मृत्यू, प्रवासावर बंदी

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, MIGUEL MEDINA/AFP VIA GETTY IMAGES

कोरोना व्हायरसनं जगातल्या बहुतांश देशात धुमाकूळ घातलाय. चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरस युरोपपर्यंत पोहोचलाय. किंबहुना, चीननंतर सर्वाधिक बळी युरोपातील इटलीत गेल्याची नोंद झालीय.

इटलीत कोरोना व्हायरसच्या बळींची संख्या 8 मार्च या एका दिवसात 133 नं वाढून 366 झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलीय. तर संसर्ग झालेल्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढलीय.

नागरी संरक्षण यंत्रणेच्या माहितीनुसार, संसर्ग झालेल्यांची संख्याही 25 टक्क्यांनी वाढून 5,883 वरुन 7,375 वर गेलीय.

कोरोना व्हायरसच्या बळींची आणि संसर्ग झालेल्यांची आकडेवारी चिंताजनक असल्यानं इटलीनं मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.

फोटो स्रोत, Getty Images

इटलीतल्या लोंबार्दिया प्रांतासह 14 प्रांतांना प्रवासासाठी परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. बाहेरील देशातून इटलीत येणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण अत्यल्प आहे. तसेच आता देशांतर्गत प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आहेत.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी इटलीत नवे नियम लागू करण्यात आलेत, त्यानुसार प्रवासासाठी लोकांसमोर ही अट ठेवण्यात आलीय.

इटलीचं आर्थिक केंद्र मानलं जाणारं मिलान हे शहर लोंबिर्दिया प्रांताची राजधानी आहे.

शाळा, जिम, संग्रहालयं, नाईटक्लब आणि इतर सार्वजनिक ठिकाणं बंद करण्याचे आदेश इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी दिलेत. येत्या 3 एप्रिलपर्यंत या सर्व अटी आणि बंदीच्या सूचना कायम राहणार आहेत.

गेल्याच आठवड्यात 10 दिवसांसाठी इटलीतले सर्व विद्यापीठं आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

इटलीतल्या आर्थिक गोष्टींवर मोठा परिणाम

कोरोना व्हायरसमुळं इटलीत झालेल्या मृत्यूंची संख्या, संसर्ग झालेल्या लोकांची संख्या पाहिल्यास आता हे निश्चित झालंय की, चीनबाहेर इटलीत सर्वाधिक प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रसार झालाय.

उपाय म्हणून लोकांना वेगळं ठेवलं जातंय. मात्र, इटलीत याचा आर्थिकदृष्ट्या परिणाम उत्तरेतील भागावर झालाय. उत्तर इटलीचा भाग हा आर्थिकदृष्ट्या ताकदवान मानला जातो.

10 लाख लोकसंख्या असलेल्या लोंबार्दिया प्रांतातल्या आरोग्य व्यवस्थेवर तर मोठा ताण पाहायला मिळतोय. इथल्या हॉस्पिटलच्या कॉरिडोरमध्येही रूग्णांवर उपचार केले जातायत.

"आम्हाला लोकांच्या जीवाची काळजी आहे. त्यासाठी करण्यात येत असलेल्या या उपायांमुळं कदाचित काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. कदाचित त्या गोष्टी लहान असतील किंवा मोठ्याही," असं पंतप्रधान कॉन्टे यांनी सांगितलं.

आधी म्हटल्याप्रमाणं लोंबार्दियामधील मिलान हे शहर इटलीचं आर्थिक केंद्र आहे. मात्र, नव्या नियमांनुसार लोकांना शहर सोडून जाता येणार नाही आणि शहरात इतरांना प्रवेशही मिळणार नाहीय.

फोटो स्रोत, TWITTER@GIUSEPPECONTEIT

फोटो कॅप्शन,

इटलीचे पंतप्रधान

लोंबार्दियासारख्या अटी इटलीतल्या या 14 प्रांतांना लावण्यात आल्यात : मोडेना, परमा, पियेंझा, रेजिओ एमिलिया, रिमिनी, पेसारो आणि उरबिनो, अलेसँड्रिया, एस्टी, नोवारा, व्हर्बानो कुसिओ ओसोला, व्हर्सेली, पाडुआ, ट्रेव्हिसो आणि वेनिस.

वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. मिलान शहरातील विमानतळही जवळपास ठप्पच पडलंय.

अॅलिटालिया ही इटलीची राष्ट्रीय एअरलाईन कंपनी आहे. या कंपनीच्या माहितीनुसार, माल्पेन्सा विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली असून, लिनेट विमानतळावरुन देशाअंतर्गत विमानसेवा सुरू राहील. आंतरराष्ट्रीय विमानसेवा रोम शहरातूनच सुरू आहे.

कोरोना रोखण्यासाठी इटलीनं लोकांना वेगळं ठेवण्यासाठी घातलेल्या अटींचं जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी कौतुक केलंय.

जगभरात कोरोना व्हायरसची काय स्थिती आहे?

जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग आतापर्यंत 1 लाख 7 हजार लोकांना झाला असून, मृतांची संख्या 3600 वर पोहोचलीय.

सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यू चीनमध्ये झालेत. मात्र, या रविवारी (8 मार्च) चीनमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी झाल्याची नोंद झाली. जानेवारीपासून आतापर्यंत पहिल्यांदाच असं झालं.

इराणमध्ये 6566 रूग्ण आढळलेत, तर 194 जणांचा मृत्यू झालाय.

फ्रान्समध्ये तर दोन खासदारांना कोरोना व्हायरस झाल्याचं समोर आलंय. फ्रान्समध्ये 1126 रूग्ण आढळले असून, युरोपमध्ये इटलीनंतर सर्वाधिक कोरोना व्हायरस फ्रान्समध्येच पसरलाय.

एक हजारपेक्षा अधिक लोकांना एका ठिकाणी गोळा होण्यास फ्रान्स सरकारनं बंदी घातलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)