कोरोना व्हायरस असं पोखरतो रुग्णाचं शरीर

कोरोना Image copyright SPL

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चीनमध्ये कोव्हिड-19 या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले. यानंतर या आजाराचा अत्यंत वेगाने फैलाव झाला.

जगभरातील 140 हून अधिक देश कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. कोरोना व्हायरसला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) Pandemic अर्थात जागतिक आरोग्य संकट घोषित केलं आहे.

कोरोना विषाणूमुळे कोव्हिड-19 हा आजार होतो.

या आजाराची प्राथमिक लक्षणं अत्यंत साधी आहेत. मात्र, आजार जास्त बळावला तर मृत्यूचा धोकाही संभवतो.

हा विषाणू शरीरात कसा पसरत जातो? कोव्हिड-19 या आजाराची नेमकी उपचार पद्धती कशी आहे? आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेले रुग्ण का वाचू शकले नाहीत?

विषाणूचा 'इन्क्युबेशन' काळ

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कोरोनाला जागतिक आरोग्य संकट घोषित केलं आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव आहे Sars Cov-2.

विषाणूचा संसर्ग झाल्यापासून ते लक्षणं दिसण्यापर्यंतचा जो काळ असतो त्याला 'इन्क्युबेशन पीरियड' म्हणतात.

शरीरात प्रवेश केल्यावर हा विषाणू शरीरात चिकटून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो.

हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो.

शरीरातल्या या भागात एकप्रकारची 'कोरोना विषाणूंची फॅक्ट्री' तयार होते. म्हणजे श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवर हल्ला चढवू लागतात.

काही लोकांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच संसर्गाची लक्षणं दिसतात. मात्र, अनेकांना आपण आजारी आहोत, असं वाटतही नाही.

कोरोना विषाणूचा इन्क्युबिशन काळही वेगवेगळा असतो. काही जणांमध्ये पाच दिवसात आजाराची लक्षणं दिसू लागतात.

किरकोळ लक्षणं

बहुतांश लोकांमध्ये दिसणारी लक्षणं अगदी किरकोळ असतात. संसर्ग झालेल्या दहा पैकी आठ लोकांमध्ये आजाराची अगदीच सामान्य लक्षणं दिसतात, असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ-सर्दी आणि खोकला. अंगदुखी, घसा खवखवणे आणि डोकेदुखीसुद्धा असते.

शरीरातील रोगप्रतिकार क्षमता या विषाणूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करते.

शरीरावर परदेशी आक्रमण झालं आहे, असं मेंदूला वाटतं आणि ते संपूर्ण शरीराला अलर्ट करतो. त्यानतंर कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीर स्वतः सायटोकाईन नावाचं रसायन स्त्रवू लागतं.

कोरोना विषाणूची लागण झालेल्या बहुतांश व्यक्तींना कोरडा खोकलाच असतो. खोकल्यात कफ नसतो. मात्र, काही जणांचा घसाही खवखवतो.

Image copyright Getty Images

काही तुरळक जणांमध्ये खोकल्यासोबत कफही असतो. अशा प्रकरणांमध्ये खोकल्यावाटे निघणाऱ्या कफमध्ये कोरोनामुळे नष्ट झालेल्या फुफ्फुसांतल्या पेशीही असतात.

या लक्षणांसाठी डॉक्टर तुम्हाला सहसा भरपूर पाणी पिण्याचा, खूप आराम करण्याचा आणि पॅरासिटॅमॉल घेण्याचा सल्ला देतात. या लक्षणांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नसते.

ही परिस्थीती जवळपास आठवडाभर असते. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती या विषाणूचा सामना करण्यास सक्षम असते त्यांच्या प्रकृतीत आठवडाभरात सुधारणा होऊ लागते.

मात्र, काही प्रकरणांमध्ये रुग्णाचं आरोग्य अधिक ढासळतं. कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणं दिसतात.

कोव्हिड-19 विषयी आतापर्यंत एवढी माहिती मिळालेली आहे. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या काही संशोधनांमधून असंही आढळलं आहे, की या आजारात नाक गळण्यासारखी सर्दीची लक्षणंही दिसू शकतात.

कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणं

आजार वाढला तर त्याची अनेक कारणं असू शकतात. एक म्हणजे विषाणूचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार क्षमता गरजेपेक्षा जास्त काम करते.

या प्रक्रियेत शरीरात जी रसायनं तयार होतात त्यामुळे संपूर्ण शरीरात सूज येते. कधीकधी या सूजेमुळेही शरीराला गंभीर इजा होते.

किंग्ज कॉलेज लंडनमधील डॉ. नॅटली मॅक्डरमॉट सांगतात, "विषाणूमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेचा समतोल ढासळतो आणि त्यामुळे सूज येते. विषाणू हे कसं करतो, हे अजून कळलेलं नाही."

फुफ्फुसाला आलेल्या या सूजेलाच न्युमोनिया म्हणतात. हा विषाणू तोंडावाटे श्वसननलिकेतून फुफ्फुसात गेल्यावर तिथे छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्या (एअर सॅक) तयार करतो.

Image copyright SPL

फुफ्फुस हा शरीरातला तो अवयव आहे जिथून ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पसरतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो.

मात्र, कोरोनाने तयार केलेल्या छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्यांमध्ये पाणी साठू लागतं. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊन दीर्घ श्वास घेता येत नाही. या पायरीवर रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासते.

चीनमध्ये संसर्ग झालेल्या 56,000 लोकांच्या माहितीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यावरून लक्षात आलं की संसर्ग झालेल्या 14 टक्के लोकांमध्ये संसर्गाची ही गंभीर लक्षणं दिसली.

अत्यंत गंभीर आजार

या विषाणुमुळे 6% लोकांना अत्यंत गंभीर स्वरुपाचा आजार होऊ शकतो, असं सांगितलं जातं. या टप्प्यावर मानवी शरीर विषाणूपुढे गुडघे टेकतं आणि व्यक्ती आजारी पडते.

या स्टेजवर फुफ्फुस निकामी होणं, सेप्टिक शॉक, अवयव निकामी होणं आणि मृत्यूचा धोका उद्भवतो.

या पायरीवर रोगप्रतिकार शक्ती हाताबाहेर जाते आणि शरीराला गंभीर इजा पोहोचते. फुफ्फुसाला सूज आल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.

याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो. किडनी रक्तातील विषद्रव्ये गाळण्याचं काम करतात. मात्र, किडनीवर परिणाम झाला तर त्या निकामी होतात. आतड्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो.

डॉ. भारत पनखानिया सांगतात, "विषाणूमुळे शरीरातली सूज इतकी वाढते, की अनेक अवयव निकामी होतात आणि रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो."

आजाराच्या या पातळीवर उपचारासाठी ईसीएमओ म्हणजेच एक्स्ट्रा कॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनचा वापर करतात.

हे एक प्रकारचं कृत्रिम फुफ्फुस असतं. यात शरीरातलं रक्त बाहेर काढून ते ऑक्सिजनेट करून म्हणजे त्याला ऑक्सिजन पुरवून ते पुन्हा शरीरात पाठवलं जातं.

मात्र, हा उपचार यशस्वी ठरेलच, याची खात्री देता येत नाही. संसर्गाची अनेक प्रकरणं नोंदवली जात नाहीत.

धूम्रपान आणि कोरोना

लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये छापून आलेल्या एका संशोधनानुसार चीनमधली वुहान प्रांतातील जिनयिनतान हॉस्पिटलमध्ये कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेले दोन रुग्ण धडधाकट होते.

मात्र, दोघंही खूप सिगारेट ओढायचे. त्यामुळे कदाचित त्यांची फुफ्फुसं कमकुवत झाली असावीत.

कोरोना विषाणूमुळे झालेला पहिला मृत्यू हा 61 वर्षांच्या पुरुषाचा होता. ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना गंभीर स्वरुपाचा न्यूमोनिया होता.

त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

मात्र, पुढे त्यांचं फुफ्फुस निकामी झालं. हृदयाचे ठोके थांबले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर 11 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

दुसरा रुग्ण 69 वर्षांची व्यक्ती होती. त्यांनाही श्वसनाचा त्रास होता.

त्यांनाही ईसीएमओ मशीनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, तेही दगावले. त्यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) कमी होत होता. शिवाय त्यांना न्यूमोनियाही होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)