कोरोना व्हायरसची साथ आणि पडद्यामागून खेळलं जाणारं युद्ध

डोनाल्ड ट्रंप आणि शि जिनपिंग Image copyright Reuters

कोरोना व्हायरसच्या जागतिक प्रकोपादरम्यान चीन आणि अमेरिकेमध्ये एक युद्ध छेडलं गेलं आहे आणि दोन्ही देशांचं बरंच काही पणाला लागलं आहे.

चीनला जागतिक नेता व्हायचंय तर अमेरिकेच्या हातातून 'जगाचे पोलीस' ही भूमिका निसटताना दिसून येतेय. खरंतर अख्ख्या जगासाठीच हा चांगला काळ नाहीये. त्यात चीन आणि अमेरिकेचे आपसातले संबंधही चांगले नाहीयेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप वारंवार कोरोना व्हायरसला 'चीनी व्हायरस' म्हणत आहेत तर आक्रमक शैली असणारे त्यांचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ याला 'वुहान व्हायरस' म्हणत आहेत. अमेरिकेच्या अशा नाव ठेवण्याने साहजिकच चीन उखडला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री दोघांनीही कोरोना व्हायरसच्या सुरुवातीलाच त्यावर नियंत्रण न मिळवू शकल्याने चीनवर टीका केली आहे. पण चीनच्या प्रवक्त्यांनी या सगळ्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या व्हायरससंदर्भात चीनने कोणतीही माहिती जगापासून लपवली नाही.

दुसरीकडे चीनच्या सोशल मीडियामध्ये अनेक सांगोवांगी गोष्टी फिरताहेत ज्यात म्हटलंय की हा रोग अमेरिकेच्या मिलीटरी जर्म वॉरफेअरमार्फत पसरवण्यात आला आहे. तर दुसरीकडे वैज्ञानिकांनी हेही दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय की या व्हायरसची संरचना पूर्णपणे नैसर्गिक आहे.

अमेरिकेची चूक आणि चीनची हुशारी

चीन आणि अमेरिकेदरम्यान छेडलं गेलेलं हे युद्ध फक्त आरोप-प्रत्यारोपांपुरतच मर्यादित नाहीये. आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी या दरम्यान घडत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने घोषणा केली की ते इटली आणि इतर युरोपियन देशांच्या नागरिकांसाठी आपल्या देशाच्या सीमा बंद करत आहेत.त्याचवेळेस चीनच्या सरकारने घोषणा केली की ते इटलीमध्ये आपली मेडिकल टीम आणि इतर गोष्टी पाठवणार आहेत. इटलीत सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

जगासमोर स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट होती. पण यावरून हेही लक्षात आलं की दोन्ही देशांमध्ये पडद्याआड एक मोठी लढाई सुरू आहे. या अडचणीच्या काळात चीन आपण जगाचं नेतृत्व करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे .आणि या लढाईत अमेरिका चीनच्या मागे पडली आहे हे दिसून येतंय.

या लढाईचा एक भाग म्हणून अमेरिकेने चीनला वैद्यकीय मदतीने भरलेलं एक छोटं विमान पाठवलं, पण ते इतक्या उशीरा पाठवलं की त्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही.

संपूर्ण जगातल्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था किती सक्षम आणि स्वयंपूर्ण आहेत याची परीक्षा ते कोरोना व्हायरसच्या संकटाला कशा प्रकारे तोंड देत आहेत यावरुनच केली जात आहे.अशी परीक्षा करण्याची ही इतिहासातली ही पहिलीच वेळ असेल. कोरोनाविरोधातल्या या युद्धात नेतृत्व कोणाकडे आहे याला प्रचंड महत्त्व आहे.

सध्याच्या घडीला राजकारणात सक्रिय असणाऱ्या नेत्यांनी या संकटसमयी कशाप्रकारे काम केलं यावरून त्यांची क्षमता जोखली जाईल. त्यांनी या रोगाला किती प्रभावीपणे नियंत्रणात आणलं यावर त्यांच्या कार्यपद्धतीचं आकलन केलं जाईल. आपल्या देशातल्या साधनांचा वापर करून त्यांनी कशाप्रकारे या प्रकोपापासून जनतेला वाचवलं, हेसुद्धा लक्षात घेतलं जाईल.

जागतिक अर्थव्यवस्थेत असेल चीनचा दबदबा

जेव्हा चीन आणि अमेरिकेचे संबंध आधीपासूनच ताणले गेले होते नेमक्या याचवेळी ही साथ पसरली आहे.. दोन्ही देशांमध्ये काही काळासाठी ट्रेडवॉरही चालू झालं होतं. अंशतः झालेल्या एका करारामुळे त्यांच्यातले ताणले गेलेले संबंध सुधारतील अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चीनने इतर देशांत डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरणं पाठवली आहेत.

अमेरिका आणि चीन दोघं पुन्हा शस्त्रास्र जमा करण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. दोन्ही देश, भविष्यात एशिया-पॅसिफिक भागात एकमेकांसमोर उभं राहाण्याची वेळ आली, तर एकमेकांचा सामना करण्यासाठी समर्थ होण्याच्या प्रयत्नात आहेत. चीनने आधीच स्वतःला या भागात सैनिकी महासत्ता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलीये असं चीनला वाटतं.

जेव्हा या व्हायरसला मात दिली जाईल तेव्हा ढासाळलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्याने उभं करण्यात चीनची भूमिका महत्त्वाची ठरेल.

चीनची मदत घेणं आवश्यक

सद्य परिस्थितीत चीनची मदत घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण कोरोना व्हायरसशी लढण्याचा अनुभव आणि मेडिकल डेटा चीनकडे आहे. ते अनुभव आणि डेटा इतरांसोबत शेअर करणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे मेडिकल उपकरणं, मास्क आणि प्रोटेक्टिव्ह सुट्स यांसारख्या गोष्टींचा चीन सगळ्यात मोठा उत्पादक आहे.

संक्रमित लोकांचा उपचार करणारे डॉक्टर्स आणि या व्हायरसवर ताबा मिळवण्यासाठी काम करणाऱ्या मेडिकल टीम्ससाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.जगाला या गोष्टींची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.

Image copyright AFP

एका रात्रीत आपलं उत्पादन कित्येक पटींनी वाढवू शकतात, असे चीन सोडून फारच कमी देश जगात आहेत. चीन याच संधीचा फायदा घेताना दिसतोय. दुसरीकडे राष्ट्रपती ट्रंप यांच्या टीकाकारांचं म्हणणं आहे की त्यांनी ही संधी हातातून घालवली.

कोण बनणार ग्लोबल लीडर?

आता जागतिक नेत्याचं पद पणाला लागलं आहे.आशियातल्या घटनांचे दोन जाणकार - कर्ट कँपबेल, जे ओबामा प्रशासनादरम्यान आशिया-पॅसिफिकचे विदेश उपमंत्री होते आणि रश दोषी - या दोघांनी फॉरेन अफेयर्समध्ये नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात म्हटलंय की, 'गेली सात दशक अमेरिकेला जो सुपरपॉवरचा दर्जा मिळाला होता तो फक्त पैसा आणि ताकदीच्या बळावर मिळाला नव्हता तर अमेरिकेच्या देशांतर्गत सत्तेची घटनात्मकता,जगभरात सार्वजनिक गोष्टींची व्यवस्था करणं आणि संकटकाळी जलद गतीने काम करण्याची तसंच इतरांसोबत सहकार्य करण्याची इच्छा या गोष्टींमुळे मिळाला होता.'

त्यांचं म्हणणं आहे की कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे अमेरिकेचं आता याच निकषांवर मोजमाप केलं जातंय. वॉशिंटन या परीक्षेत मागे पडताना दिसतंय तर दुसरीकडे बीजिंग या संधीचा तसंच अमेरिकेने केलेल्या चुकांचा फायदा घेतंय. या कठीण काळात जागतिक स्तरावर जी पोकळी तयार झालीये तिचा फायदा घेऊन जागतिक नेता बनू इच्छित आहे.

प्रपोगंडा वॉरमध्ये चीन पुढे

अनेक लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की इतक्या वाईट परिस्थिती चीन आपल्या फायद्याचा विचार कसा करू शकतो. चीनमध्येच या व्हायरसची सुरुवात झाली होती. सुरुवातीला बीजिंगने यावर जी प्रतिक्रिया दिली ती गोपनीय राहिली पण त्यानंतर त्यांनी आपल्या साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करत जागतिक स्तरावर आपली दखल घ्यायला लावली.

पीएन अमेरिका, या प्रेस फ्रीडम संस्थेच्या सीईओ सुझन नोझेन यांनी फॉरेन पॉलिसी वेबसाईटवर लिहिलं आहे की, 'बीजिंगने आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक रितीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रपोगंडा सुरू केला आहे.याव्दारे चीन आपल्या कडक भूमिकेला लपवण्याचा, जागतिक पातळीवर हा रोग पसरवण्याचा आणि पाश्चात्य देशांच्या,खासकरून अमेरिकेच्या विरोधात आपली प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करत आहे.'

जागतिक समीकरणं बदलणार

अनेक पाश्चात्य विश्लेषक चीनला जास्तीची हुकूमशाही आणि राष्ट्रवाद असणारा देश बनताना बघत आहेत.त्यांना भीती आहे की या महामारीमुळे हा ट्रेंड वाढीस लागू शकतो.पण त्याहीपेक्षा अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं.

अमेरिकेचे सहकारी देश यावर नजर ठेवून आहेत. ते भलेही खुलेआम ट्रंप प्रशासनाची निंदा करत नसले तरी यातल्या अनेकांना अमेरिकेचं चीनसंबंधी असेललं धोरण पसंत नाही.यात चिनी टेक्नोलॉजी, हुवेई वाद, इराण आणि इतर भौगोलिक वाद समाविष्ट आहेत.

चीन या महामारीच्या वेळेस आपल्या ताकदीचा वापर करून येणाऱ्या भविष्यासाठी नवे परिमाणं ठरवत आहे.कोरोना व्हायरसविरोधात आपल्या लढाईदरम्यान आपले शेजारी देश जपान आणि दक्षिण कोरिया यांच्याबरोबर एकत्र येऊन केलेले प्रयत्न आणि युरोपियन हेल्थ युनियनला मेडिकल साहित्य पाठवणं यावरून हे स्पष्ट होतं

अमेरिकेचा सुएझ मोमेंट ठरणार हा काळ?

कँपबेल आणि दोशी यांनी आपल्या लेखात लिहिलं आहे की ब्रिटनने1956मध्ये सुएझ कालव्याला आपल्या ताब्यात घेण्याचा असफल प्रयत्न केला होता.त्यानंतर यूकेचा एक जागतिक सुपरपावर म्हणून असलेला दर्जा संपुष्टात आला.

ते लिहितात, 'अमेरिकन सरकारला हे समजलं पाहिजे की जर ते जगाच्या गरजा पूर्ण करू शकले नाहीत तर हा अमेरिकेचा सुएझ मोमेंट ठरेल.'

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)