कोरोना व्हायरस : डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं अमेरिकेसाठी 2000 अब्ज डॉलरचं पॅकेज

डोनाल्ड ट्रंप, अमेरिका, भारत, नरेंद्र मोदी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप

कोरोना व्हायरसचे अमेरिकेत एक लाखाहून जास्त रुग्ण झाले असून मृतांचा आकडा एक हाजारापेक्षा जास्त झाला आहे.

अशात देशावर ओढवलेल्या गंभीर संकटाला तोंड देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 2 हजार अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर केलं आहे. हे पॅकेज म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात मोठा मदतनिधी आहे.

अमेरिकेच्या सिनेटने हा प्रस्ताव मांडल्यानंतर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस् या वरीष्ठ सभागृहाने त्याला मान्यता दिली.

बुधवारी सुमारे 33 लाख अमेरिकन नागरिकांनी बेरोजगार असल्याबाबत अर्ज केला. हा आकडासुद्धा आजपर्यंतचा सर्वाधिक आहे.

अमेरिकेत सध्या जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वात जास्त कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तपासणीमध्ये 1 लाखांपेक्षाही जास्त व्यक्तींना या व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

या ऐतिहासिक प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विरोधी डेमोक्रेटिक पक्षाच्या कोणत्याही सदस्याला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. पण आपसातील मतभेद विसरून दोन्ही पक्ष अमेरिकेच्य हितासाठी एकत्र आल्याचं सांगत राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांन सर्वांचे आभार मानले.

यापूर्वीच्या कोणत्याही मदतनिधीपेक्षा हे पॅकेज दुप्पट असल्याचं ट्रंप यांनी यावेळी सांगितलं.

देशातील अनेक कुटुंबं, कामगार आणि व्यापारीवर्गाला तातडीची मदत करण्यासाठी या पॅकेजची मदत होईल, असं ट्रंप म्हणाले.

अमेरिकेनं चीन आणि इटलीलाही मागे टाकलं

कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या बाबतीत अमेरिकेने चीन आणि इटलीलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत 85 हजार 500 जणांना कोव्हिड-19 आजाराची लागण झाली आहे.

अमेरिकेतील जॉन हापकिन्सन विद्यापीठाने ही आकडेवारी जारी केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 81,781 तर इटलीमध्ये 80,589 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Image copyright Getty Images

जगात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाग्रस्त अमेरिकेत आढळून आले असले तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण मात्र खूप कमी आहे. कोव्हिड-19 आजारामुळे चीनमध्ये 3,291 तर इटलीत 8,215 मृत्यू झाले आहेत. मात्र, अमेरिकेतील मृतांची संख्या केवळ 1,300 आहे.

दरम्यान, लवकरच अमेरिकी नागरिक आपापल्या कामावर परतू शकतील, अशी आशा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे.

व्हाईट हाउसचं म्हणणं काय?

कोरोनाच्या Sars-Cov-2 या विषाणुच्या फैलावाविषयी गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस इथे पत्रकार परिषद घेतली. अमेरिकेत इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याविषयी विचारलं असता अमेरिकेत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात आल्याने ही आकडेवारी दिसत असल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सांगितलं.

अमेरिकेतील सर्वच्या सर्व 50 प्रांतांमध्ये कोरोनाच्या टेस्ट आता उपलब्ध आहेत आणि देशात आतापर्यंत 5 लाख 52 हजार लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी दिली.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत बोलताना "चीनमधली निश्चित आकडेवारी माहिती नाही", असं म्हणत राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी चीन देत असलेल्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली.

अमेरिकेतील निर्बंध शिथील होतील का?

भारताप्रमाणे अमेरिकेतही अनेक प्रांतात पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, 12 एप्रिल रोजी असलेल्या इस्टर संडेच्या आधी कोव्हिड-19 आजारावर लस तयार करू आणि लॉकडाऊन मागे घेऊ, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी केली आहे.

Image copyright Getty Images

या लॉकडाऊनमुळे अमेरिकेत तब्बल 33 लाख लोकांना कामावरून कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे ट्रंप यांनी केलेली घोषणा वेग धरत असल्याचं गुरुवारी चित्र होतं.

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रंप म्हणाले, "त्यांना (अमेरिकन नागरिकांना) कामावर परत जावंच लागेल, देशाला कामावर परत जावंच लागेल. आपला देश त्यावरच आधारलेला आहे आणि हे लवकरच होईल, असं मला वाटतं."

यासाठी ज्या भागाला कोरोनाची जास्त झळ बसलेली नाही, त्यांच्यापासून सुरुवात करण्याची अमेरिकी सरकारची योजना आहे. यासंबंधीची अधिक माहिती पुढच्या आठवड्यात देऊ, असंही ट्रंप म्हणाले.

अमेरिकी सरकारची पुढील योजना

गुरुवारी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सर्व प्रांतांच्या गव्हर्नरांना पत्र लिहून फेडरल सोशल डिस्टंसिंग गाईडलाईन्स जारी करण्याचा सरकारचा विचार असल्याचं आणि त्यामुळे काही प्रांतातील निर्बंध शिथील होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.

या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाग्रस्त प्रांतांचे कमी, मध्यम आणि तीव्र धोका असलेल्या झोनमध्ये विभागणी करण्यात येईल आणि त्यानुसार सोशल डिस्टंसिंग आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय किती तीव्रतेने राबवायचे हे ठरवलं जाईल, अशी माहिती ट्रंप यांनी दिली आहे.

गुरुवारी रात्री फॉक्स न्यूज चॅनलला फोनवरून दिलेल्या प्रतिक्रियेत ट्रंप यांनी लोवा, इदाहो, नेब्रास्का आणि टेक्सासमधल्या काही भागातले निर्बंध लवकरच उठवले जातील, अशी आशा व्यक्त केली.

Image copyright Getty Images

गुरुवारी कोरोनासंबंधीच्या एका नव्या संशोधनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी काळजाचा ठोका चुकवणारी आहे.

सोशल डिस्टंसिंग तत्त्वाचं काटेकोर पालन केलं तरीदेखील येत्या चार महिन्यात अमेरिकेत कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 80 हजारांच्या वर जाईल, अशी भीती या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या इन्स्टिट्युट फॉर हेल्थ मेट्रीक्स अँड इव्हॅलुएशन संस्थेने हा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार एप्रिल महिना अमेरिकेसाठी अत्यंत वाईट असणार आहे. एप्रिलमध्ये दर दिवशी 2,300 लोकांचा कोव्हिड-19 आजाराने मृत्यू होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन उठवण्यावर प्रतिक्रिया

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांच्या 'कामावर परता' (गेट बॅक टू वर्क) या उद्दीष्टाला गुरुवारी एका प्रमुख डेमोक्रेटिक नेत्याकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला.

संपूर्ण देश क्वारंटाईन करणं हा कोरोना विषाणुशी लढण्याचा सर्वोत्तम उपाय असू शकत नाही, असं न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युओमो यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "तरुणांमुळे वृद्धांना कोरोना विषाणुची लागण होऊ शकते आणि त्यामुळे तरुणांना वृद्धांसोबत एकाच घरात विलग करणं चांगली आरोग्य रणनीती असू शकत नाही."

त्यासाठी उत्तम सार्वजनिक आरोग्यविषयक रणनीती आखून लोकांना कामावर परत पाठवणं, हा तुलनेत चांगला पर्याय असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

व्हाईट हाउस टास्क फोर्समधल्या सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांना ईस्टर संडेपर्यंत निर्बंध शिथील करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या योजनेबाबत विचारलं असता त्यांनाही ठोस अशी माहिती देता आली नाही. निर्बंध शिथील करण्याची कालमर्यादा 'लवचिक' असावी, असं या तज्ज्ञांनी सुचवलं आहे.

राष्ट्राध्यक्ष सर्वांनाच कामावर परतण्याचे आदेश देऊ शकतात का?

नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी 16 मार्च रोजी देशाला आवाहन केलं होतं की कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी जनतेने 15 दिवसांसाठी एकमेकांशी जवळून संपर्क टाळावा.

मात्र, या मार्गदर्शक सूचना ऐच्छिक होत्या. त्या अमेरिकेतील सर्वच्या सर्व प्रांतातील सर्व नागरिकांवर बंधनकारक नव्हत्या.

अमेरिकेच्या राज्यघटनेने पब्लिक ऑर्डर आणि सुरक्षा याच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यांना दिले आहेत. त्यामुळे विषाणुचा फैलाव कमी करण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध कधी उठवायचे, हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक राज्याच्या गव्हर्नरला असल्याचं अमेरिकी घटनातज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सध्या अमेरिकेतील 21 प्रांताच्या गव्हर्नरांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आणि जीवनावश्यक नसलेले व्यवसाय, उद्योग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

अमेरिकेत 21 राज्यांमध्ये असे आदेश लागू आहेत.

अमेरिकेतील इतर घडामोडी?

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. या शहरात मंगळवारी सर्वाधिक मेडिकल इमरजेंसी कॉल करण्यात आले. त्यादिवशी 24 तासात तब्बल 6,400 नागरिकांनी कॉल करून वैद्यकीय सुविधेची मागणी केली. अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यावेळीसुद्धा एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात मेडिकल इमरजेंसी कॉल करण्यात आले नव्हते.

डेस्परेटली सिकिंग सुसॅन आणि क्रोकोडाईल डन्डी सारख्या चित्रपटात काम केलेल सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते मार्क ब्लम यांचं वयाच्या 69 व्या वर्षी कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाल्याचं स्क्रीन अॅक्टर्स गील्डने सांगितलं आहे.

कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर सैन्य तैनात करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव कॅनडाने धुडकावला आहे. या कृतीमुळे 'परस्पर संबंध बिघडतील', असं कॅनडाच्या उपपंतप्रधानांनी म्हटलं आहे.

पेन्सिलवॅनिया प्रांतातील एका सुपरमार्केटला एका महिलेने केलेली गंमत खूप महागात पडली. संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली असताना ही महिला प्रँक म्हणून संपूर्ण स्टोरमध्ये खोकलली आणि त्यामुळे या सुपरमार्केटने जवळपास 35 हजार डॉलर्सचा माल फेकून दिला.

नागरिकांनी घराच्या बाहेर पडणं थांबवल्यानंतर कॅलिफोर्निया शहरातल्या रस्त्यांवर जंगली कुत्री फिरताना आढळल्याचं वृत्त सॅन फ्रान्सिस्को क्रोनिकल वर्तमानपत्राने दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)