कोरोना व्हायरस: तबलीगी जमातच्या प्रश्नावर WHO - धर्मावरून रूग्णांना वेगळं काढू नका

तबलीगी जमात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

तबलीगी जमात

देशातल्या अनेक राज्यांमधून तबलीगी जमातचे लोक कोरोना व्हायरसचे 'सुपर कॅरिअर' असल्याचंही समोर आलं आहे, त्यामुळे मुस्लिमांविरुद्ध भेदभाव होत असल्याच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत.

हिमाचल प्रदेशमधल्या उना जिल्ह्यातल्या बनगढ गावात तर 37 वर्षीय मोहम्मद दिलशाद यांनी आपल्या घरात आत्महत्या केली. काही दिवसांपासून त्यांना गावातल्या इतर लोकांचे टोमणे आणि भेदभावाला सामोरं जावं लागत होतं, कारण दिल्लीत झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या ते संपर्कात आले होते.

देशातील काही ठिकाणी मुस्लिमांवर हल्लेही झाल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) धर्माच्या आधारवर कोव्हिड-19 च्या रुग्णांना वेगळं पाडू नका, असं म्हटलं आहे. 6 एप्रिलला झालेल्या प्रेस कॉन्फसन्समध्ये WHO च्या अधिकाऱ्यांनी हे विधान केलं आहे.

याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना वारंवार दिल्लीत झालेल्या तबलीगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे.

तबलीगी जमातमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचं त्यांनी 5 एप्रिलला बोलताना म्हटलं होतं.

"कोव्हिड-19च्या रुग्णांची संख्या दर 4.1 दिवसांनी दुप्पट होते आहे. तबलीगी जमातच्या कार्यक्रमामुळे ही गती वाढली आहे. मरकजमधला कार्यक्रम झाला नसता किंवा तबलीगी जमात या प्रकरणात गुंतलेली नसती तर हाच काळ 7.14 दिवस इतका असता," लव अग्रवाल यांनी सांगितलं होतं.

लव अग्रवाल यांनी याआधी मरकझच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लिमांची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली होती. यावर प्रतिक्रिया देताना WHOच्या आपात्कालीन कार्यक्रमाचे संचालक माईक रायन यांनी म्हटलं, "याने काहीही फायदा होत नाही. एखाद्या व्यक्तीला कोव्हिड-19चा संसर्ग झाला तर ती त्यांची चूक नाही. मुस्लिमांची राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली होती. प्रत्येक रुग्ण हा स्वतःच पीडित आहे, त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीला वंशाच्या, धर्माच्या किंवा इतर कुठल्या मुद्द्यावरून वेगळं करू नका, त्यांच्याबरोबर भेदभाव करू नका."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)