बर्नी सँडर्स यांची माघार, जो बायडेन होणार डेमोक्रॅटिक उमेदवार

Joe Biden and Bernie Sanders

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या शर्यतीतून बर्नी सँडर्स यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

खरं तर व्हरमाँटचे सिनेटर असलेले सँडर्स डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीच्या शर्यतीत सुरूवातीला आघाडीवर होते. विशेषतः तरुण मतदारांमध्ये ते खूप प्रसिद्ध असल्याचं दिसत होतं.

अगदी मायली सॉयरस, कार्डी बी, अरियाना ग्रांदे, मार्क रफालो अशा अनेक सेलिब्रिटीजनीही त्यांना पाठिंबा दिला होता.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट उमेदवारी मिळत नाही, तर त्यासाठी पक्षांतर्गत निवडप्रक्रिया (प्रायमरी निवडणुक किंवा 'कॉकस') होते, जी एखाद्या मिनी निवडणुकीसारखी असते.

यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीच्या शर्यतीतून अनेकांनी माघार घेतल्यावर अखेर सँडर्स आणि बायडेन या दोघांमध्येच चुरस होती.

पण गेल्या काही आठवड्यांमध्ये बायडेन यांनी सँडर्स यांच्यावर आघाडी घेतल्याचं दिसलं. त्याचदरम्यान कोरोना विषाणूची साथ पसरल्यानं दोन्ही उमेदवारांच्या प्रचारावर बंधनं आली. अनेक ठिकाणी प्रायमरी निवडणुका आणि बैठका पुढे ढकलण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवरच सँडर्स यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.

78 वर्षीय सँडर्स गेले काही दिवस आपल्या समर्थकांना ऑनलाईन स्ट्रिमिंगद्वारा संबोधित करत होते आणि प्रचार करत होते.

बुधवारी त्यांनी उमेदवारी जिंकण्यासाठी पुरेशी मतं मिळवण्याचा कुठला मार्ग दिसत नसल्याचं आपल्या समर्थकांना सांगितलं.

सँडर्स हे आधी अपक्ष उमेदवार होते. पण त्यांनी यांनी 2016 साली डेमॅक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी अर्ज केला होता. त्या वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी हिलरी क्लिंटन यांना टक्कर दिली होती.

यंदा सँडर्स यांनी आरोग्य सुविधा आणि उत्पन्नातली असमानता या गोष्टीना निवडणुकीत कळीचे मुद्दे बनवलं. तसंच सरकारी कॉलेजेसमध्ये विनामूल्य शिक्षण, श्रीमंतांवरील करात वाढ, किमान वेतनात वाढ अशी आश्वासनंही दिली. सँडर्स यांची विचारसरणी काहीशी डाव्या बाजूला झुकणारी असून, ते स्वतःला 'डेमोक्रॅटिक सोशलिस्ट' म्हणून घेतात.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

न्यू हॅम्पशायर आणि नेव्हाडामधून समर्थन मिळाल्यावर सँडर्स यंदा उमेदवारीच्या शर्यतीत सर्वांत आघाडीवर होते.

पण बायडेन यांनी टेक्सास, नॉर्थ कॅरोलिना, फ्लोरिडा, अरायझोना आणि इलिनॉय अशा महत्त्वाच्या राज्यांतून समर्थन मिळवलं. आफ्रिकन अमेरिकन मतदारांचा बायडेन यांना पाठिंबा मिळाला.

77 वर्षांच्या बायडेन यांना आता डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळणं अपेक्षित आहे. ऑगस्टमध्ये पक्षाच्या महासभेत डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवाराचं नाव घोषित केलं जाणार आहे.

बायडेन हे अमेरिकेचे माजी उप-राष्ट्राध्यक्ष आहेत. बराक ओबामांच्या काळात त्यांनी हे पद भूषवलं होतं आणि आता यंदा नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते डोनल्ड़ ट्रंप यांना आव्हान देतील.

सँडर्स यांनी काय म्हटलं?

आपण उमेदवारी मागे घेतली असली, तरी त्यासाठीच्या प्रचार मोहिमेनंही मोठा बदल घडवून आणला आहे, असं सँडर्स यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितलं.

"आपला देश कसा असायला हवा याविषयीच्या अमेरिकेच्या जाणीवा आपण बदलल्या आहेत. आर्थिक, सामाजिक, वर्ण, पर्यावरण अशा सर्व स्तरांवर न्यायाच्या दिशेनं देशाला एक मोठं पुढचं पाऊल टाकून दिलं आहे. हा वैचारिक विजयच नाही, तर पिढींचा विजय आहे. फक्त तिशीच्या नाही तर पन्नाशीच्या लोकांनीही आपल्याला मतं दिली. या देशाचं भवितव्य आपल्या विचारांत आहे."

सँडर्स यांनी बायडेन यांचं अभिनंदनही केलं आणि निवडणुकीत त्यांना साथ देणार असल्याचंही म्हटलं. "एकत्रितपणे आपण डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव करू, ते आधुनिक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धोकादायक राष्ट्राध्यक्ष आहेत."

बायडेन यांनीही ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी बर्नी यांना चांगलं ओळखतो, ते एक चांगली व्यक्ती, महान नेता आणि आपल्या देशातला एक प्रभावशाली आवाज आहेत. तुमचा आवाज मी ऐकेन. तुम्ही म्हणता तसं, मी नाही, आपण."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)