कोरोना विषाणूः तीन आठवड्यांच्या तान्हुलीने कोव्हिडवर केली मात

बाळ

डॉक्टर कोरोना चाचणीसाठी त्यांच्या तीन आठवड्यांच्या तान्हुलीच्या नाकातून स्वॅबचा नमुना घेत होते. स्कॉटलंडच्या ट्रेसी मॅग्वायर यांना आजही त्या आठवणीने अंगावर शहारा येतो. हे त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं.

त्या सांगतात, "मी त्यावेळी पहिल्यांदा माझ्या बाळाच्या पेटॉनच्या डोळ्यात पाणी बघितलं. मी तिला धरून होते आणि रडत होते. त्या क्षणी जणू आम्ही दोघी एकमेकींना धीर देत होतो."

वेळेआधीच जन्म झाल्याने बाळाचं वजन फक्त 1.5 किलो होतं. जन्म होऊन जेमतेम तीन आठवडे झाले होते आणि ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं.

26 मार्चला पेटॉनचा जन्म झाला. वेळेच्या जवळपास आठ आठवड्यांआधीच ती या जगात आली होती.

सुरुवातीच्या दोन-तीन आठवड्यांमध्येच बाळाला अंघोळ घालताना तिला थोडी लक्षणं दिसत होती. मात्र, ही लक्षणं अगदीच सौम्य होती.

बीबीसी रेडियो स्कॉटलंडच्या 'मॉर्निंग्ज विथ केई अॅडम्स' या कार्यक्रमात बोलताना ट्रेसी म्हणाल्या, "त्यांची तान्हुली स्कॉटलंडमधली सर्वात लहान कोरोनाग्रस्त आहे आणि ही बातमी खूप वेदनादायी होती."

ट्रेसी सांगत होत्या, "त्यांनी (डॉक्टरांनी) मला सांगितलं की माझ्या बाळाची प्रकृती बरी आहे. घाबरायची गरज नाही. फक्त तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ते मला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. पण मी रडत होते."

"तिला कसा आणि केव्हा संसर्ग झाला असेल? एवढं छोटसं बाळ या विषाणुचा सामना कसं करणार? हेच सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू होते. मला काहीच सुचत नव्हतं."

फोटो स्रोत, Tracy Magiure

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पेटॉनच्या फुफ्फुसांची क्षमता वाढावी, यासाठी डॉक्टरांनी तिला स्ट्रिरॉईड दिलं. नर्सनी तिची उत्तम काळजी घेतली. तिच्या दुधाच्या वेळा सांभाळल्या. यासाठी त्यांना बरीच खबरदारी घ्यावी लागत होती. या सगळ्यांना वेळही खूप लागत होता. मात्र, सर्वांनी चिकाटीने आणि कटाक्षाने बाळासाठी सर्व नियम पाळून तिची काळजी घेतली.

स्कॉटलंडमध्ये कोरोना संकटामुळे ऑपरेशननंतर जेव्हा ट्रेसीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा डॉक्टरांनी ट्रेसीला घरी गेल्यावर बाळापासून 14 दिवस दूर रहायला सांगितलं होतं.

पण ट्रेसी सांगतात, "मी डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली मी की माझ्या बाळापासून दूर राहू शकत नाही."

"कुणी तिची कितीही काळजी घेतली तरी मी आई आहे. मला सर्दी झाली असती तरी मी तिला दूर केलं नसतं."

अखेर डॉक्टरांनी ट्रेसीला बाळासोबत राहण्याची परवानगी दिली. पती अँड्रेऑन यांनी मात्र घरी गेल्यावर आयसोलेशनमध्ये रहायला सांगितलं.

ट्रेसी म्हणाल्या, "अँड्रेऑनच्या नजरेतून बघितलं तर असं वाटतं की त्याला स्वतःला अगतिक वाटत असावं. एक तर त्याचं बाळ वेळेआधीच या जगात आलं होतं आणि दुसरं म्हणजे त्याच्या पत्नीची प्रकृतीही बरी नव्हती आणि त्याला दोघांजवळ थांबताही येत नव्हतं."

फोटो स्रोत, Tracy Magiuire

जसजसे दिवस जात होते स्कॉटलँडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत होती. मात्र पेटॉनच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पेटॉन बरी झाल्यानंतर ट्रेसी हॉस्पिटलमधून घरी परतल्या.

डॉक्टर्स आणि नर्सेसच्या कामाचं तोंडभर कौतुक करत ट्रेसी म्हणतात, "ते खरंच अविश्वसनीय कामगिरी बजावत आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेत ते स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहेत. जोखमीचं काम असूनही त्यांनी माझं बाळ उपाशी राहू नये, याची संपूर्ण काळजी घेतली."

"त्यांचे आभार कसे मानावे, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. पेटॉन माझ्यासाठी जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे आणि तिच्या देखभालीसाठी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. कुठल्याही आईसाठी हे फार कठीण आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवा."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)