कोरोना माहिती: बरे झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का?

  • जेम्स गॅलघर
  • आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोरोना

फोटो स्रोत, ANI

  • कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो का? इम्युनिटी पासपोर्ट मिळणारे काम सुरू करू शकतील का?
  • संसर्ग झालेल्यांपैकी काहींना जास्त त्रास तर काहींना कमी त्रास का होतोय?
  • सिझनल फ्लूप्रमाणेच कोरोना दर हिवाळ्यात डोकं वर काढेल का?
  • कोव्हिड-19 ची लस शोधल्यानंतर या विषाणुचं समूळ उच्चाटन होईल का? कोरोनावर मात करण्यासाठीची दीर्घकालीन रणनीती कुठली असेल?

यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्या रोगप्रतिकारकशक्तीत दडलेली आहेत. कोरोना विषाणूविरोधात रोगप्रतिकारकशक्ती कशी निर्माण होते?

आपल्या शरीरात विषाणू, जीवाणू किंवा कुठल्याही बाहेरच्या अतिसूक्ष्मजीवांचा शिरकाव झाला किंवा त्याचा संसर्ग झाला की आपण आजारी पडू शकतो. अशा रोग किंवा आजार उत्पन्न करणाऱ्या घटकांशी लढा देऊन शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरात एक संपूर्ण यंत्रणा सतत कार्यरत असते. ती आहे आपली रोगप्रतिकारक यंत्रणा.

इंग्रजीत याला इम्युनिटी सिस्टिम म्हणतात. या यंत्रणेचीही एक उपसंस्था असते. तिला म्हणतात Adaptive Immune System, जी गरजेनुसार आपली यंत्रणा भक्कम किंवा शिथील करू शकते.

आजाराचं कारण ठरणारा बाहेरचा एखादा घटक शरीरात शिरला की आपली रोगप्रतिकारक यंत्रणा सक्रीय होते. ही यंत्रणा एक रसायन तयार करते, ज्यामुळे सूज येते.

दुसरं म्हणजे, या यंत्रणेचाच एक भाग असलेल्या रक्तातल्या पांढऱ्या रक्तपेशी संसर्ग झालेल्या पेशी नष्ट करते. ही आपली प्राथमिक रोगप्रतिकारक यंत्रणा आहे. याला Innate Immune Response म्हणतात. मात्र, इनेट इम्यून रिस्पॉन्सद्वारे कोरोनाचा सामना करता येत नाही.

अशावेळी कामी येते रोगप्रतिकारक यंत्रणेची उपसंस्था असलेली Adaptive Immune System. या यंत्रणेतल्या पेशी दोन प्रकारे काम करतात. एक तर या पेशी विषाणूला चिकटून त्याला थांबवतील, अशा स्पेसिफिक अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिजैविकं तयार करतात. याशिवाय T पेशी (पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार) तयार करतात. या T पेशी विषाणूचं संक्रमण झालेल्या पेशी नष्ट करतात.

मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया घडून येण्यासाठी वेळ लागतो. कोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीज तायर व्हायला सुरुवात होण्यासाठी 10 दिवसांचा वेळ लागत असल्याचं संशोधनावरून दिसून आलं आहे. आणखी एक विशेष बाब म्हणजे जे खूप जास्त आजारी पडतात त्यांच्या शरीरात सर्वात चांगला इम्यून रिस्पॉन्स तयार होतो.

रुग्णाचा अॅडेप्टिव्ह इम्यून रिस्पॉन्स मजबूत असेल तर भविष्यात त्याच विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.

मात्र, संसर्गाची सौम्य लक्षणं दिसणाऱ्यांमध्ये किंवा काहीच लक्षणं न दिसणाऱ्यांमध्ये हा अॅडेप्टिव्ह इम्यून रिस्पॉन्स पुरेशा प्रमाणात तयार होतो का, हे अजून स्पष्ट नाही.

रोगप्रतिकारशक्ती किती काळ टिकते?

रोगप्रतिकारक यंत्रणेची स्मरणशक्ती आपल्यासारखीच असते. म्हणजे काही संसर्ग तिच्या लक्षात राहतात. मात्र, काही संसर्ग ती विसरते.

उदाहरणार्थ गोवर. लहान मुलाला गोवरची एक लस दिली की त्याला पुढे आयुष्यात कधीच गोवर होत नाही. मात्र, ऋतू बदलला की सर्दी-पडसं अनेकांना होत असतं.

फोटो कॅप्शन,

कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो का?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

जगात सध्या ज्या कोरोना विषाणूची साथ आली आहे तो आहे Sars-CoV-2. या नव्या कोरोना विषाणूविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे या विषाणूविरोधातली रोगप्रतिकारक शक्ती किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही.

मात्र, याच कुटुंबातल्या इतर सहा कोरोना विषाणूंविषयी आपल्याला बरीच माहिती आहे आणि त्यावरून एक अंदाज बांधता येतो.

याच कोरोना कुटुंबातले चार विषाणू असे आहेत ज्यांचा संसर्ग झाल्यानंतर साधी सर्दी होते. या सर्दीविरोधातली रोगप्रतिकारकशक्ती फार टिकत नाही. त्यामुळे पुन्हा या विषाणूची लागण होण्याची शक्यता असते. काही अभ्यासांमध्ये तर असंही आढळून आलं आहे की काही जणांना वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा या विषाणूची लागण झाली आहे. साधी सर्दी घरगुती उपचार किंवा साध्या औषधांनीही बरी होते.

मात्र, याच कोरोना कुटुंबातले Severe Acute Respiratory Sysndrome (SARS) आणि Middle East Respiratory Syndrome (MERS) हे दोन विषाणू प्राणघातक आहेत. 2003 साली सार्सची साथ आली होती तर 2013 मध्ये मर्सने डोकं वर काढलं होतं.

या दोन्ही विषाणूंच्या संसर्गाने जगभरात काही हजार माणसं दगावली. कालांतराने या दोन्ही विषाणुंवच्या अँटीबॉडीज तयार झाल्या.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

कोरोनासाठी थर्मल चाचणी

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियामध्ये प्राध्यापक असलेले पॉल हंटर सांगतात, "एखाद्या आजाराविरोधातली रोगप्रतिकारकशक्ती तुमच्यात तयार होते का, यापेक्षा ही रोगप्रतिकारकशक्ती किती काळ टिकून राहते, हे अधिक महत्त्वाचं आहे आणि कदाचित ही रोगप्रतिकारकशक्ती आयुष्यभर टिकणार नाही."

ते पुढे सांगतात, "Sarsच्या अँटीबॉडीजच्या अभ्यासावरून असं लक्षात येत की कोरोनाविरोधातली रोगप्रतिकारकशक्ती एक ते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. मात्र, सध्यातरी खात्रीशीरपण सांगता येत नाही."

या विषाणूचा संसर्ग पुन्हा होण्याची शक्यता असली तरी एक दिलासादायक बाब म्हणजे पहिल्यांदा लागण झाल्यावर त्यावर यशस्वीरीत्या मात केल्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा संसर्ग झाला तरी तो फारसा गंभीर असण्याची शक्यता कमी असते.

कोरोना विषाणूचा पुन्हा संसर्ग झाल्याची उदाहरणं आहेत का?

कमी कालावधीत एकापेक्षा जास्तवेळा कोरोनाची लागण झाल्याच्या काही बातम्या आल्या आहेत.

काही जणांचं म्हणणं आहे की कोरोनाचा संसर्ग नव्याने होऊ शकतो. तर काहींच्या मते हा विषाणू आपल्या शरीरात लपून बसतो आणि नव्याने सक्रीय होतो.

या विषाणुचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो का, हे तपासण्यासाठी एखाद्याच्या शरीरात मुद्दाम विषाणू सोडून त्यावर अभ्यास करण्यात आलेला नाही.

मात्र, दोन माकडांवर असा प्रयोग करण्यात आला आहे.

या माकडांच्या शरीरात पहिल्यांदा विषाणू सोडून रोगप्रतिकारकशक्ती कसा प्रतिसाद देते, हे तपासण्यात आलं. त्यानंतर तीन आठवड्यांनंतर पुन्हा एकदा विषाणू सोडण्यात आला. यात या माकडांमध्ये दुसऱ्यांदा आजाराची लक्षणं दिसली नाही.

माझ्यात अँटीबॉडीज असतील तर मी सुरक्षित आहे का?

याची खात्री देता येत नाही आणि म्हणूनच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना इम्युन पासपोर्ट देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटना फारशी अनुकूल नाही.

इम्युनिटी पासपोर्ट म्हणजे काय. तर तुमची अँटीबॉडी चाचणी होणार. यात तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला लॉकडाऊनमध्येही काम करता येईल. त्यासाठी तुम्हाला पास मिळेल.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

कोरोनाच्या संसर्गातून बरं झालेल्यांना पुन्हा त्रास होऊ शकतो का?

मात्र, यात अडचण अशी आहे की प्रत्येकच रुग्णामध्ये काही प्रमाणात अँटीबॉडीज असतातच. पण त्या सर्व सारख्या नसतात. कोरोना विषाणुला चिकटून शरीरातला त्यांचा फैलाव रोखणाऱ्या अँटीबॉडीजला न्युट्रलायझिंग अँटिबॉडीज म्हणतात.

चीनमध्ये कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या 175 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यात असं आढळलं की यातल्या 30 टक्के रुग्णांमध्ये न्युट्रलायझिंग अँटिबॉडीजचं प्रमाण खूप कमी होतं.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या शरीरात अँटीबॉडीज असल्यामुळे तुम्हाला आजार होणार नसला तरी याचा अर्थ तुम्ही विषाणुचे वाहक होणार नाही, असा होत नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर तुमच्या शरीरातल्या अँटीबॉडीजमुळे तुमचा आजारापासून बचाव होईल. मात्र, तरीदेखील तुमच्या शरीरात कोरोनाचा विषाणू असू शकतो आणि तुमच्यामुळे इतरांना या विषाणुची लागणही होऊ शकते.

रोगप्रतिकारकशक्ती का महत्त्वाची आहे?

कोव्हीड-19 आजार होऊ नये, तो वारंवार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारकशक्ती महत्त्वाची आहेच. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली तर आजाराची तीव्रताही कमी होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारकशक्तीमुळे लॉकडाऊनमध्ये थोडी सूट मिळू शकते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कोरोनापासून बचाव कसा करायचा

दिर्घकालीन रोगप्रतिकारकशक्ती निर्माण करणं फारच अवघड असेल तर लस तयार करणं आणखी कठीण ठरू शकतं. किंवा कोरोनाची लस कशी घ्यायची, यावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ कोरोनाची लस एकदा घ्यायची की दरवर्षी घ्यायची, हे रोगप्रतिकारकशक्तीवर अवलंबून असणार आहे.

दुसरं म्हणजे रोगप्रतिकारकशक्तीचा कालावधी किती आहे यातून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, हेदेखील कळेल.

हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)