कोरोना: चीनमधील आयुष्य अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर कसं आलं पूर्वपदावर?

  • लू है लियांग
  • बीबीसी प्रतिनिधी
चीन

फोटो स्रोत, Getty Images

जगातली बहुसंख्य लोकसंख्या सध्या कोव्हिड-19चा प्रसार रोखण्यासाठी घरी बसलेली आहे. तर दुसरीकडे अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर चीनमध्ये आता लोकं कामावर परत येत आहे. कसं आहे आता इथलं आयुष्य?

चीनी नववर्षासाठी गाओ टिंग हुबेई प्रांतातल्या वुहानमधून त्यांच्या गावी जायला निघाल्या, तेव्हा त्या उत्साहात होत्या. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटणं, मेजवान्यांचा आस्वाद घेण्याचे बेत आखण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांपैकी किंवा रस्त्यावरच्या लोकांपैकी फारसं कोणी चेहऱ्यावर मास्क लावत नसे. अगदी त्यांनीही कधी मास्क वापरला नव्हता.

ज्या हुबेई प्रांतामध्ये त्या काम करतात, तिथून त्या बाहेर पडल्या आणि त्यानंतर तीनच दिवसांत कठोर लॉकडाऊन लावण्यात आला. तारीख होती 23 जानेवारी. आता ज्याला कोव्हिड 19 म्हटलं जातंय, त्याचा प्रसार रोखण्यासाठी हे करणं गरजेचं होतं.

यानंतर पुढचे 68 दिवस गाओ वुहानच्या पश्चिमेकडे 300 किलोमीटरवर असणाऱ्या यिचँग शहरात त्यांच्या आई वडिलांसोबतच, त्यांच्या घरी अडकून पडल्या होत्या. "आम्ही फक्त घरीच राहू शकत होतो. आमचा ताप तपासण्यासाठी रोज लोक येत. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवणं, एकत्र जेवणं, गप्पा मारणं चांगलं वाटत होतं. माझी बहीण, तिचा नवरा असे सगळे मिळून आम्ही कुटुंबातले 8 जण घरी होतो."

जवळपास दोन महिन्यांनी 29 मार्चला गाओ कामावर परतल्या. कामावर जाण्याच्या या पहिल्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, "मेट्रोमध्ये खूप लोक होते. सगळ्यांनी मास्क घातला होता." इतकं सोडल्यास बाकी सगळं पूर्वीसारखंच होतं. लोक आपापल्या फोनमध्ये गढले होते. जणू काही घडलंच नव्हतं. पण कामाच्या बाबतीत खूप काही बदललं होतं.

अनंत अडचणी

वांडा ग्रूप या मोठ्या चिनी कंपनीच्या ऑपरेशन्स मॅनेजमेंट विभागात गाओ काम करतात. वुहानमधल्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध भागात या कंपनीचं ऑफिस आहे. या लांबच लांब रस्त्यावर अनेक आंतराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्सची भरपूर दुकानं आहेत - पण फारसा व्यवसाय होत नाही. कंपनीने गुंतवणूक केलेल्या दुकानांमध्ये किती लोक येतात यावर लक्ष ठेवणं हा गाओंच्या कामाचा भाग आहे. 2019मध्ये दररोज साधारण 60,000 लोक दुकानांमध्ये येत. आता हे प्रमाण दररोज 10,000च्या आसपास आहे.

गाओंचं काम कठीण आहे, म्हणूनच अजूनही अनेकदा रात्री 9 वाजेपर्यंत त्या ऑफिसमध्ये असतात. विकेंड्सना त्या आधीचं राहिलेलं काम भरून काढण्यासाठी घरून काम करतात. यासोबतच इतर उद्योगांना फोन करून त्यांना कंपनीच्या रिकाम्या गाळ्यांमध्ये येण्यासाठी आकर्षित करायचं कामही गाओंकडे आहे. "ब्रँड्सचा सध्या या भागात चांगला व्यवसाय होत नाहीये. आम्ही त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. अनेक उद्योगांकडे पैसा नाही आणि इथल्या जागेचं भाडं त्यांना परवडणारं नाही. काही उद्योग बंद होत आहेत."

जे उद्योग बंद झाले नाहीत, त्यांनी विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढणार नाही याची काळजी घेत काम करावं लागतंय. वुहानमधली रेस्टॉरंट आता रात्री 7 वाजताच बंद होतात आणि रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांना आतमध्ये बसायला परवानगी नाही. फारच कमी लोक रात्री 7 नंतर बाहेर दिसतात. गाओंच्या ऑफिसमध्येही कर्मचाऱ्यांसाठी तयार जेवण मागवलं जातंय.

फोटो स्रोत, Getty Images

ऑफिसमधले नवे नियम

चीनमधले कोट्यवधी लोक फेब्रुवारी महिन्यात घरून काम करत होते. अनेकांसाठी हा नवीन अनुभव होता. यापैकी सगळेजण कामावर परतले नसले, तरी काही जण कामावर परतले आहेत. पण एकूण आर्थिक व्यवहारांमध्ये घट झाल्याने अडचणीत आलेल्या कंपन्यांनी कामाचे तास आणि मोबदला या दोन्हीमध्ये कपात केलेली आहे. तर दुसरीकडे गाओसारख्या अनेकांचं काम वाढलंय. कारण त्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा तेजीत आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

लोकांचं खर्च करण्याचं प्रमाण वाढावं म्हणून चीनमधल्या स्थानिक प्रशासनाने अडीच दिवसांचा (2.5) विकेंड करण्याचा प्रस्ताव मांडलाय. चीनच्या पूर्वेकडे असणाऱ्या जिआंक्षी प्रांतात नुकतीच याची अंमलबजावणी करण्यात आली. पण ही ऐच्छिक गोष्ट आहे. त्याची अंमलबजावणी कशी करायची याचा निर्णय त्या त्या भागातल्या कंपन्यांनी घ्यायचा आहे. हेबई, गान्सू, झेंजियांगमध्येही अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अडीच दिवसांचा विकेंड प्रस्तावित आहे.

कोव्हिड 19ची साथ अजूनही सगळ्यांच्या मनात आहे आणि संसर्गाची दुसरी लाट येण्याची भिती आरोग्य अधिकारी व्यक्त करत आहेत. अनेक ऑफिस वा रहिवासी इमारतींमध्ये आता एक सुरक्षारक्षक इमारतीत शिरणाऱ्या लोकांचं तापमान तपासून मगच त्यांना आत सोडतो.

26 वर्षांच्या अमल लिऊ दक्षिण शेंझेंनमध्ये असणाऱ्या चीनच्या सरकारी इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी मास्क वापरणं आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणं बंधनकारक आहे. "कँटीनमध्ये आम्ही एकमेकांपासून दूर बसतो," त्या सांगतात. लिऊ इतर देशांतल्या काही ब्रोकर्सशी कामानिमित्त संपर्कात असतात. त्यांच्याकडच्या लॉकडाऊनचे परिणाममही या लोकांना जाणवायला लागल्याचं त्या सांगतात.

"मला घरून काम करायला मजा आली नाही. जितकी मी ऑफिसमध्ये कार्यक्षम असते, तितकं काम घरून व्हायचं नाही," लिऊ सांगतात. नियमितपणे ऑफिसला येण्याला त्यांचं प्राधान्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images

कोव्हिड 19 आणि लॉकडाऊनचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्लायंट्ससोबत काम करणाऱ्यांवरही झालाय. 25 वर्षांच्या एरियल झाँग 'हु या' नावाच्या एका आघाडीच्या चायनीज व्हिडिओ गेम स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी काम करतात. ग्वांग्झू मध्ये त्यांचं कार्यालय आहे. नवीन विकसित होणाऱ्या बाजारपेठांमध्ये कंपनीचा विस्तार करण्याचं काम एरियलकडे आहे.

एरियल झाँग पूर्वी मेक्सिकोमध्ये स्थायिक होत्या. आशिया आणि लॅटिन अमेरिकेदरम्यान त्यांचा कामानिमित्त प्रवास होत राही. मार्चच्या अखेरीस त्या चीनला घरी आल्या होत्या. देशात परतल्यानंतर त्यांना आधी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं मग आठवडाभर त्यांनी घरून काम केलं. 15 एप्रिलपासून त्यांनी ऑफिसला परत जायला सुरुवात केली, पण काही गोष्टी बदललेल्या होत्या.

चीनी नववर्षाच्या आधी झाँग यांचे कामाचे तास ठरलेले होते. पण आता मात्र कामासाठी 'लॉग इन' आणि 'लॉग आऊट' होण्याच्या वेळांवरची सक्ती शिथील करण्यात आलेली आहे. जेवणाची सुटी मिळून तुम्ही रोज 9 तास काम करणं मात्र बंधनकारक आहे," त्या सांगतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही सोशल डिस्टंसिंग पाळावं लागत असल्याने कधी कधी ऑफिसमध्ये यायला उशीर होतो, शिवाय ऑफिसमध्ये येणाऱ्यांची आणि निघणाऱ्यांची एकाचवेळी गर्दी होऊ नये, म्हणूनही आता कामाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

कामानिमित्त सध्या प्रवास करता येत नसला तर ऑफिसमध्ये परतल्याने झाँग खुश आहेत. इथे फास्ट आणि स्थिर इंटरनेट असल्याने काम व्यवस्थित होत असल्याचं त्या सांगतात. पण त्यांच्या पगारात मात्र मोठी घट झालीय. त्यांच्या पगाराच्या सुमारे 60% रक्कम ही त्यांना प्रवास भत्त्यांतून मिळत होती. पण सध्या प्रवास बंद असल्याने हे भत्तेही बंद आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

कामाच्या स्वरूपात बदल

घरून काम करताना अनेक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत घट झाल्याचं बीजिंगमधल्या च्युंग काँग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे सहाय्यक प्राध्यापक झँग शियोमेंग यांना आढळून आलंय.

याविषयीची एक पाहणी त्यांच्या टीमने केली. यामध्ये 5,835 जणांकडून विविध प्रश्नांची उत्तरं घेण्यात आली. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी ऑफिसपेक्षा घरून कमी काम होत असल्याचं सांगितलं. जवळपास 37% जणांनी कार्यक्षमतेत फरक पडला नसल्याचं सांगितलं. तर आपण घरून जास्त चांगलं काम करू शकलो असं सांगणाऱ्यांची संख्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी होती.

चीन सध्या कामाचं स्वरूप आणि पद्धतीमध्ये बदल करण्यासाठीचे प्रयत्न करता येतील अशा परिस्थितीत असल्याचं बीजिंगमधल्या होआंग असेसमेंट सिस्टीममध्ये काम करणाऱ्या क्रिस्टा पेडरसन म्हणतात. यासाठी लागणारं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतील. पण कामामध्ये ही अशी 'फ्लेक्सिबिलीटी' आणण्यासाठी काही किंमत मोजावी लागेल.

"कर्मचाऱ्यांनी लवकर प्रतिसाद द्यावा, कोणत्याही वेळी द्यावा अशा अपेक्षा वाढल्याचं आम्ही पाहिलंय. कर्मचाऱ्यांनी ईमेलला तातडीने उत्तर द्यावं वा मीटिंगसाठी लवकर वा उशीरा तयार असावं अशा स्वरूपाच्याही अपेक्षा केल्या जात आहेत," त्या सांगतात.

पण हा ट्रेंड सगळ्याच क्षेत्रात नाही.

"सरकारी मालकीच्या काही कंपन्या या पूर्वी प्रमाणे लोकांनी ऑफिसला जाऊनच काम करावं यासाठी प्रयत्न करत आहेत. या अशा कंपन्या आहेत जिथे काम एका ठराविक पद्धतीनेच केलं जातं आणि यासाठी त्या त्या आराखड्यांचं पालन केलं जातं," पेडरसन सांगतात.

'आम्ही सुरक्षित आहोत असं म्हणू शकत नाही.'

संपूर्ण चीनला कोव्हिड 19 चा तडाखा बसला नव्हता. पण तरीही इतर भागात याचे परिणाम पहायला मिळतायत. 75 वर्षांच्या ही कुंगफांग पारंपरिक चीन औषध वैद्य आहेत. युनान प्रांतात त्या त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात. "आम्हाला व्हायरसचा फारसा फटका बसला नाही. फळं आणि भाज्यांचा पुरवठाही सुरळीत आहे. पण आम्ही आधी आठवड्यातून तीनदा स्विमिंगला जायचो, आता आम्हाला स्विमींग पूलला जाता येत नाही."

एरवी बीजिंगमध्ये राहणारी त्यांची तिशीतली मुलगी आता त्यांच्यासोबत राहते. "माझी मुलगी फ्रीलान्स अनुवादक आहे, कॉन्फरन्समध्ये ती इंटरप्रिटरचं काम करते. तिच्या कामावर याचा परिणाम झालाय," त्या सांगतात. चीनमध्ये अजूनही प्रवासावर मोठे निर्बंध आहेत आणि याचा परिणाम आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सवर झालाय. पर्यटन क्षेत्रालाही अर्थातच याचा फटका बसलाय.

"बीजिंगमधल्या घराचं भाडं तिला द्यावंच लागतंय. शिवाय इतर कर्ज, फी, इन्शुरन्स याही गोष्टी आहेतच."

फोटो स्रोत, Getty Images

मार्चचा मध्यावर चीनमधल्या शाळा हळुहळू सुरू व्हायला लागल्या. जानेवारीमध्ये या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 27.8 कोटी असल्याने त्यांचा प्रवास, त्यांच्या वेळाही महत्त्वाच्या आहेत. सगळ्या प्रांतांमधल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होतायत. हुबेईमधल्या शाळा सर्वात शेवटी - मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू झाल्या. शाळांमध्येही खबरदारी घेण्यात येतेय. मुलं शाळेत येण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, त्यांचा ताप मोजला जातोय. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य आहे.

बीजिंगमधल्या युन ताओ सरकारी मालकीच्या इंजिनियरिंग कंपनीत काम करतात. त्यांना 16 वर्षांची मुलगी आहे. "लेकीसाठी दिवसातून 3 वेळा जेवण बनवून मी दमले आहे. तिची काळजी घेण्यासोबतच मला तिच्या अभ्यासावरही लक्ष द्यावं लागतं आणि त्याच वेळी माझं ऑफिसचं आणि इतर कामंही करावं लागतं. ऑफिसमध्ये मी जेवढी कार्यक्षम असते, तितकं घरी मला वाटत नाही."

यून यांची एकुलती एक मुलगी ही बीजिंगच्या इंटरनॅशनल हायस्कूलमध्ये पहिल्या वर्षाला आहे. गेल्या तीन महिन्यांत ती शाळेत गेलेली नाही. "लॉकडाऊन मुळे ऑनलाईन अभ्यास सुरू झाला, पण याच्या काही वेगळ्या अडचणी आहेत. माझी मुलगी यासाठी फारशी उत्साही नव्हती. शिवाय अभ्यासासाठी प्रिंट आऊट्स काढा, रोजच्या हजेरीवर लक्ष ठेवा, तांत्रिक अडचणी सोडवा अशी जास्तीची कामं पालकांना करावी लागतात. घरातली आणि ऑफिसची कामं करताना मला स्वतःला वेळच मिळत नाही. फक्त एक चांगली गोष्ट म्हणजे मी आता पूर्वीपेक्षा अधिक चांगला स्वयंपाक करू शकते."

लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यानंतरचं आयुष्य कसं असेल याचा अंदाज घेण्यासाठी जगातल्या अनेक देशांचं लक्ष सध्या चीनवर आहे. पण चीनमध्येही अजून अनिश्चितता आहेच. जगातले इतर देश या रोगाच्या संसर्गावर नियंत्रण मिळण्यासाठी धडपडताना ते पहातायत.

एरियल झाँग म्हणतात, "इतर देशांची परिस्थिती पहाता आम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही सुरक्षित आहोत. जर इतर देशांनी यावर नियंत्रण मिळवलं नाही, तर आमच्यावर याचा परिणाम होईलच."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)