कोरोना व्हायरस आणि लठ्ठपणा : वजन जास्त असेल तर धोकाही जास्त असतो का?

फोटो स्रोत, Getty Images
वजन जास्त असण्यामुळे माणूस हृदयविकार, कॅन्सर आणि डायबिटीजसारख्या अनेक आजारांना बळी पडू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. पण लठ्ठपणामुळे कोव्हिड-19 चाही धोका वाढतो का?
सुरुवातीच्या काही अभ्यासांमधून हा निष्कर्ष समोर येतोय. याला पुरावा काय?
यूकेमधल्या 17 हजार पेशंट्सच्या अभ्यासातून हे समोर आलंय की ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त होता, त्या लोकांचा कोव्हिड-19 ने मृत्यू होण्याचा धोका 33 पटींनी वाढला होता.
यूकेच्या नॅशनल हेल्थ सिस्टिमने केलेल्या अभ्यासातही हेच समोर आलं की स्थूल व्यक्तींना कोव्हिड-19चा धोका अधिक होता. आणि स्थूलतेशी संबंधित इतर आजार असतील, जसं की हृदयविकार किंवा मधुमेह तर धोका अनेकपटींनी वाढतो.
कोव्हिड-19मुळे गंभीर आजारी असणाऱ्या आणि ICUमध्ये दाखल झालेल्या पेशंट्सचा अभ्यास, जेव्हा यूकेमध्ये केला तेव्हा लक्षात आलं की त्यापैकी 34.5% लोकांचं वजन जास्त होतं, 31.5% लोक लठ्ठ होते तर 7% अतिलठ्ठ होते.
म्हणजेच गंभीररीत्या आजारी असणाऱ्या 73% पेशंट्सचा BMI जास्त होता. फक्त 26 टक्के लोकांचा BMI चांगला होता. बॉडी मास इंडेक्स (BMI) म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या वजनाला उंचीने भागल्यानंतर येणारा आकडा.
2016 साली लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार सर्वाधिक लठ्ठ लोकांची संख्या असण्याच्या बाबतीत भारत पहिल्या 5 देशांमध्ये येतो. जगातल्या लठ्ठ पुरुषांपैकी 3.7% पुरुष भारतात आहेत तर लठ्ठ महिलांपैकी 5.3% महिला भारतात आहेत.
जगातला लठ्ठपणाचा दर पाहाता 25 पेक्षा जास्त BMI असणाऱ्या लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त असेल असं वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचं म्हणणं आहे.
वयस्कर पुरुष ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत अशांना कोव्हिड-19चा सर्वाधिक धोका आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
पण लठ्ठ असणाऱ्यांना जास्त धोका का?
एखाद्या माणसाचं वजन जेवढं जास्त असेल तेवढं शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असणार आणि फुप्फुसांची क्षमता कमी होणार. म्हणजे शरीरात आणि रक्तात ऑक्सिजन शोषून घ्यायलाही जास्त कष्ट पडणार. यामुळे हृदय आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो.
प्राध्यापक नाविद सत्तार युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमध्ये शिकवतात. ते म्हणतात, "ज्यांचं वजन जास्त असतं त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची मागणीही जास्त असते. याचा अर्थ त्याच्या शरीरातल्या श्वसनसंस्थेवर आधीच जास्त भार असतो."
अशात कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं तर ते गंभीर ठरू शकतं.
"शेवटी शरीर थकून जातं आणि पुरेसा ऑक्सिजन शरीराला मिळू शकत नाही." युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगमधल्या डॉ. डियान सेल्लयाह सांगतात.
आणि म्हणूनच वजन जास्त असणाऱ्या किंवा लठ्ठ लोकांना कृत्रिम श्वसनाची किंवा किडनीचं काम सुरळित होण्यासाठी उपचारांची गरज भासते.
चरबीची भूमिका काय?
शास्त्रज्ञांना लक्षात आलंय की आपल्या पेशींमध्ये असणाऱ्या ACE-2 या एन्झाईममुळे कोरोना व्हायरसला आपल्या शरीरात प्रवेश करणं सोपं जातं. हे एन्झाईम अॅडिपोस पेशी आणि चरबीच्या पेशींमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं.
ज्या लोकांच्या शरीरात फॅट्स जास्त असतील त्यांच्या शरीरात हे एन्झाईम जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे साहजिकच धोका वाढतो.
पण याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या लठ्ठ लोकांची रोगप्रतिकार शक्ती सशक्त नसते. त्यांना या व्हायरसला सहजासहजी परतवून लावता येत नाही.
फोटो स्रोत, Getty Images
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या रोगप्रतिकारक पेशी व्हायरसचं इन्फेक्शन परतवून लावत असताना चरबीच्या पेशी मध्ये येतात.
संशोधकांच्यामते यामुळे शरीरात सिटोकिन स्टॉर्म तयार होतो. सिटोकिन स्टॉर्म म्हणजे आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकार शक्तीने दिलेली तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया, पण याने माणसाचा जीवही जाऊ शकतो.
लक्षात न येणाऱ्या आरोग्यविषयक समस्या
लठ्ठपणा इतरही आरोग्यविषयक समस्या घेऊन येतो. त्यामुळे हृदय किंवा फुप्फुसाची कार्यशक्ती कमी होते, किडन्या नीट काम करू शकत नाहीत आणि डायबेटीजही होतो.
पण यातले अनेक त्रास शरीरात लपून राहातात आणि जोपर्यंत कोव्हिड-19 सारखं एखादं गंभीर इन्फेक्शन होत नाही तोवर लक्षात येत नाही. आणि मग शरीराची दुर्दशा करतात.
फोटो स्रोत, Getty Images
लठ्ठ लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. पण असं का होतं यांच कारणं अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
अतिलठ्ठ लोकांना हॉस्पिटलमध्येही अनेक अडचणींना तोडं द्यावं लागतं. वजन जास्त असल्यामुळे अशा लोकांना स्कॅन करण्यात अडचणी येतात, हॉस्पिटलच्या यंत्र त्यांच्या आकाराला पुरी पडू शकत नाहीत आणि त्यांच्यावर उपचार करताना त्यांना हलवणं, सरकवणंही अवघड असतं.
आरोग्य राखण्यासाठी काय करावं?
आरोग्य राखण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कमी कॅलरीचा, चौरस आहार घेणं. चरबीयुक्त पदार्थ टाळणं आणि नियमित व्यायाम करणं. बाहेर जाण्यावर बंदी असेल तर तुम्ही घरच्या घरी अनेक व्यायाम करू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)