कोरोना व्हायरस हरला, 113 वर्षांची आजी जिंकली

Stock photo of woman being tested

फोटो स्रोत, Getty Images

स्पेनमधल्या 113 वर्षांच्या आजीने कोरोना व्हायरसवर मात केलीय. मारिया ब्रान्यास या स्पेनमधल्या सर्वांत वयोवद्ध महिला म्हणून ओळखल्या जातात.

मार्च महिन्यात स्पेनमध्ये कोव्हिड-19 मुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्याचवेळी कोरोना व्हायरसचा या आजींनाही संसर्ग झाल्याचं निदान झालं.

त्यांच्यात कोव्हिड-19ची सौम्य लक्षणं आढळली होती. यानंतर त्यांना काही आठवडे विलगीकरणात ठेवण्यात आलं.

या विश्रांतीनंतर मारिया ब्रान्यास कोव्हिडमधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत.

म्हणजेच 113 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 1918-19 ची फ्लूची साथ, 1936 ते 1939 चाललेलं स्पॅनिश सिव्हिल वॉर आणि कोरोना व्हायरस या सगळ्यांवर मात केलेली आहे.

"आता ती बरी आहे, छान आहे. तिला गप्पा मारायच्या आहेत, स्वतःचा प्रभाव पाडायचा आहे. ती पुन्हा पहिल्यासारखी झालीय," मारिया यांच्या मुलीने ट्वीट केलंय.

मारिया यांचा जन्म 1907 साली मेक्सिकोमध्ये झाला. त्यानंतर त्या सॅन फ्रान्सिस्कोला रहायला गेल्या. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांचे स्पॅनिश पत्रकार वडील स्पेनच्या गिरोना प्रांतात रहायला आले.

मारिया यांना 3 मुलं आहेत. यापैकी एकाचं वय 86 आहे. त्यांच्या 11 नातवंडांपैकी सर्वांत मोठ्याचं वय आहे 60.

113 वर्षांच्या मारियांना 13 पतवंडंही आहेत.

ओलोट शहरातल्या एका केअर सेंटरमध्ये मारिया गेली दोन दशकं राहतात.

ला वांग्वार्डियाशी बोलताना गेल्या वर्षी त्यांनी म्हटलं होतं, "मी भरभरून जगण्याखेरीज बाकी काही केलेलं नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)