कोरोना : लॉकडाऊन नसतानाही तुर्कस्ताननं कसं मिळवलं संसर्गावर नियंत्रण?

कोरोनावर तुर्कस्तानचं नियंत्रण

फोटो स्रोत, EPA

कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव तुर्कस्तानमध्ये उशीरा झाला. इथं कोरोनाचा पहिला रुग्ण 19 मार्चला आढळला. त्यानंतर मात्र इथं वेगानं कोरोनाचा संसर्ग झाला.

महिन्याभरातच देशातील 81 प्रांतांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव झाला होता. जगातील इतर देशांच्या तुलनेत इथं वेगानं कोरोनाचा प्रादूर्भाव होत गेला.

चीन आणि ब्रिटनपेक्षाही परिस्थिती गंभीर बनली होती. तुर्कस्तानमध्ये मृत्यूदरात वाढ होईल आणि हा देश इटलीलाही मागे टाकेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. कारण त्यावेळी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला होता.

आता तीन महिने होऊन गेले आहेत आणि तुर्कस्तानमधली परिस्थिती आटोक्यात आहे. सगळ्यात विशेष म्हणजे तुर्कस्तानने देशभरात पूर्ण लॉकडाऊनही लागू केला नाहीये.

तुर्कस्तानमध्ये कोरोनामुळे 4397 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. हा आकडा दुप्पट असू शकतो, असाही दावा करण्यात येत आहे. कारण ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, त्यांचाच समावेश मृतांच्या आकडेवारीत करण्यात आला आहे.

पण इतर देशांशी तुलना करता सव्वा आठ कोटी लोकसंख्या असलेल्या तुर्कस्तानमधील मृतांचा आकडा कमी आहे.

वेगळ्या पद्धतीचा लॉकडाऊन

युनिव्हर्सिटी ऑफ केंटमध्ये व्हायरॉलॉजी या विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. जेरेमी रॉसमेन यांच्या मते तुर्कीनं मोठं नुकसान टाळलं आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "तुर्कीनं कोरोनाच्या संकटाला तातडीनं प्रतिसाद देत चाचण्या केल्या. रुग्णांची ओळख पटवून त्यांचं अलगीकरण-विलगीकरण कार्यक्षमतेनं केलं. त्यामुळे या विषाणुच्या संसर्गाचा वेग कमी करण्यात तुर्कीला यश मिळालं."

जेव्हा या विषाणूचा प्रादूर्भाव वेगानं होत होता, तेव्हा सरकारनं दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर निर्बंध लादले होते. कॉफी हाऊसेस, शॉपिंग मॉल बंद करण्यात आले. मशिदींमधील सामूहिक नमाज पठणही थांबविण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

पासष्ठ वर्षांपेक्षा जास्त आणि वीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांना पूर्णपणे घरी बसण्यास सांगण्यात आलं. कर्फ्यू लावण्यात आले आणि प्रमुख शहरं सील केली गेली.

इस्तंबुल हे कोरोनाच्या प्रसाराचं केंद्र बनलं होतं. एखाद्याचं हृदय बंद पडावं, त्याप्रमाणे या शहराची गती थांबली होती.

विषाणुला ट्रॅक कसं केलं जातं?

तुर्कस्तानमध्ये आता अनेक निर्बंधांमध्ये सूट दिली जात आहे. मात्र डॉ. मेलक नूर असलान अजूनही सतर्क आहेत. त्या फतीह जिल्ह्याच्या आरोग्य महासंचालक आहेत. हा इस्तांबुलमधला एक अतिशय गर्दीचा भाग आहे. अतिशय कार्यक्षम आणि बोलक्या असलेल्या डॉ. असलान कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहिमेचंही नेतृत्व करत आहेत. पूर्ण तुर्कस्तानमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी सहा हजार टीम आहेत.

त्या सांगतात, की आम्हाला युद्धभूमीवर असल्यासारखंच वाटतंय. माझ्या टीममधले लोक घरी जायचंच विसरून गेले आहेत. आठ तासांपेक्षाही जास्त वेळ हे लोक काम करत आहेत. आपलं कर्तव्य नीट पार पाडत असताना घरी जायचंही हे लोक विसरून गेले आहेत.

डॉ. असलान सांगतात, "आम्ही 11 मार्च म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासूनच विषाणुला ट्रॅक करायला सुरूवात केली होती. यासाठी गोवरची साथ आटोक्यात आणण्यासाठी आम्ही केलेल्या कामाचा उपयोग झाला.

फोटो कॅप्शन,

डॉ. मलक नूर असलन

"आमची योजना तयार होती. आम्ही कपाटातू फाइल्स काढल्या आणि कामाला लागलो," असं डॉ. असलान यांनी सांगितलं.

फतीहच्या त्या अरुंद गल्ल्यांमध्ये आम्ही दोन डॉक्टरांसोबत गेलो. पीपीई किट घातलेले हे डॉक्टर एका अॅपचा वापर करत होते. ते एका अपार्टमेंटमधल्या फ्लॅटमध्ये गेले, जिथे दोन मुली क्वारंटाईनमध्ये होत्या. त्यांचा एक मित्र कोव्हिड पॉझिटिव्ह होता.

अर्पाटमेंटच्या त्या कॉरिडॉरमध्येच त्या दोघींची टेस्ट करण्यात आली, त्यांना रिपोर्ट चोवीस तासात मिळतील असंही सांगण्यात आलं. एक दिवस आधीच त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसायला सुरूवात झाली. तातडीनं मिळालेल्या प्रतिसादाबद्दल 29 वर्षीय देमीरअल्प यांनी आभार मानले.

त्यांनी म्हटलं, "आम्ही परदेशातल्या बातम्या ऐकतो. सुरूवातीला आम्हाला जेव्हा या व्हायरसबद्दल कळलं, तेव्हा खूप भीती वाटली होती. पण आम्ही विचार केला होता, त्यापेक्षा जास्त वेगानं तुर्कस्तानमध्ये काम झालं...अगदी अमेरिका किंवा युरोपपेक्षाही अधिक वेगानं."

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर

तुर्कस्तानमधील जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी प्रमुख डॉ. इरशाद शेख सांगतात,की तुर्कस्ताननं सार्वजनिक आरोग्याचा एक वस्तुपाठच जगाला घालून दिला आहे.

त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "सुरुवातीला आम्हाला काळजी वाटत होती. दररोज तीन-साडेतीन हजार रुग्ण सापडत होते. पण टेस्टिंग खूप परिणामकारक ठरलं. महत्त्वाचं म्हणजे रिपोर्ट येण्यासाठी लोकांना पाच-सहा दिवस वाट पाहावी लागायची नाही.

तुर्कस्तानच्या यशाचं श्रेय त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटीन आणि अलगीकरण तसंच विलगीकरणासंबंधीच्या धोरणांना दिलं.

तुर्कस्तानमध्ये रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्याही देण्यात आल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही या औषधाचं कौतुक केलं होतं, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरुन हे औषध गुणकारी आहे, की नाही हे सिद्ध झालेलं नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनावरील उपचार म्हणून या औषधाच्या चाचण्यांवर बंदी घातली होती. मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनात असं म्हटलं होतं, की या औषधाच्या वापरामुळे कोव्हिड-19 च्या रुग्णांमध्ये कार्डिअॅक अरेस्टचा धोका वाढतो. या औषधाच्या फायद्यापेक्षा होणारं नुकसानच अधिक असतं.

ज्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना औषध म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन दिलं जातं, त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची परवानगी आम्हाला देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी बनविण्यात आलेलं डॉ.सेहित इल्हान वारांक हॉस्पिटल कोरोनाविरोधातल्या लढाईचं केंद्र बनलं आहे.

इथले मुख्य डॉक्टर नुरेत्तिन यीयीत सांगतात की, सुरूवातीला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करणं महत्त्वाचं आहे. डॉ. यीयीत यांनी काढलेली चित्र या हॉस्पिटलच्या भिंतींवर लावण्यात आली आहेत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

त्या सांगतात, "इतर देशांनी या औषधाचा वापर खूप उशीरा सुरू केला...विशेषकरून अमेरिकेनं. आम्ही याचा वापर सुरूवातीची लक्षण दिसत असतानाच करतो. आमचा या औषधाच्या वापरावर कोणताही आक्षेप नाहीये. आम्हाला अपेक्षित परिणाम मिळत असल्यामुळे आमची या औषधाच्या वापराला हरकत नाही.

हॉस्पिटल फिरून दाखवत असताना डॉ. यीयीत यांनी सांगितलं की, तुर्कस्ताननं नेहमीच विषाणुच्या पुढे राहण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अगदी सुरूवातीपासूनच उपचार केले आणि आक्रमकपणे विषाणुशी लढा दिला.

इथे डॉक्टर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसोबतच प्लाज्मा आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा वापर करत आहेत.

आपल्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एक टक्क्याहून कमी असल्याचा डॉ. यीयीत यांना अभिमान आहे. इथल्या ICU मधले अनेक बेड्स रिकामे आहेत. डॉ. यीयीत आपल्या रुग्णांना ICU च्या बाहेर आणि व्हेंटिरेटरविना ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम्ही चाळीस वर्षांच्या हाकिम सुकूक यांना भेटलो. ते उपचार घेऊन आपल्या घरी परत चालले होते. त्यांनी म्हटलं, "सर्वांनीच माझी खूप काळजी घेतली. मला अगदी आईच्या जवळ असल्यासारखंच वाटत होतं."

अजून लढा संपलेला नाही

तुर्कस्तानच्या मेडिकल असोसिएशनने अजूनही सरकारच्या कोरोनाविरोधातल्या प्रयत्नांना क्लीन चीट दिलेली नाहीये. सरकारनं केलेल्या प्रयत्नांमध्ये कमतरता असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. देशाच्या सीमा खुल्या ठेवणं हा त्याचाच एक भाग असल्याचंही असोसिएशनने म्हटलंय.

अर्थात, जागतिक आरोग्य संघटना तुर्कस्तानला काही प्रमाणात श्रेय देत आहेत. डॉ. शेख म्हणतात, "हे जागतिक आरोग्य संकट अजूनही प्राथमिक स्तरावरच आहे. आहे त्यापेक्षा अधिक लोकांना या विषाणुचा संसर्ग झालेला असल्याची शक्यता आहे. काही जण या आजारातून बरेदेखील होत आहेत."

कोरोनाविरोधात लढताना तुर्कस्तानच्या बाजूनं आहेत. उदाहरणार्थ- तरुण लोकसंख्या आणि ICU मधील बेड्सची संख्या. पण अजूनही दिवसभरात कोरोनाचे हजारच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत.

सध्या तरी तुर्कस्तानकडे कोरोनाच्या लढाईमधील 'यशस्वी मॉडेल' म्हणून पाहिलं जात आहे. पण तरीही सावध राहण्याची गरज आहे. कारण अजूनही कोरोनाचं संकट संपलेलं नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)