कोरोना हे अखेरचं जागतिक संकट नाही, आता पुढे काय वाढून ठेवलंय?

  • व्हिक्टोरिया गिल
  • विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

जंगली प्राण्यांपासून होणारे आजार माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण 'पोषक परिस्थिती' तयार केलं आहे, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत.

नैसर्गिक जगावरील मानवी अतिक्रमण या प्रक्रियेचा वेग दिवसेंदिवस वाढवत आहे. नवीन रोग कसे आणि कोठे उद्भवतात याचा अभ्यास करणाऱ्या जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा हा दृष्टिकोन आहे. यासाठी ते संशोधन करत आहेत.

त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून वन्यजीवांमुळे पसरणाऱ्या कोणत्या आजारांमुळे मनुष्यांना सर्वाधिक धोका आहे, हे ओळखण्यासाठी त्यांनी आता एक नमुना-ओळख प्रणाली (pattern-recognition system ) विकसित केली आहे.

या संशोधनाचे नेतृत्व यूकेतील लिव्हरपूल विद्यापीठातील शास्त्रज्ञ करत आहेत. पण, भविष्यातील साथीच्या रोगांच्या उद्रेकासाठी अधिक चांगल्या पद्धतीनं तयार राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग विकसित करण्याचा हा एक जागतिक प्रयत्न आहे.

'आपण 5 गोळ्या झाडल्या'

लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक मॅथ्यू बायलिस यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना म्हटलं, "गेल्या 20 वर्षांत आपण सहा संकटांना समोरं गेलोय. सार्स, मेर्स, इबोला, एव्हीयन इन्फ्लूएन्झा आणि स्वाइन फ्लू. पाच गोळ्या आपण झाडल्या पण सहावी आपल्याला परत मिळाली."

"आता आपण सामना करत असलेला कोरोना व्हायरस ही काही शेवटची जागतिक साथ नाही. त्यामुळे मग जंगली प्राण्यांपासून उद्भवणाऱ्या आजाराकडे अधिक बारकाईनं पाहण्याची गरज आहे."

या प्रयत्नाचा भाग म्हणून बायलिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकप्रकारचा अंदाज व्यक्त करणारी नमुना-ओळख प्रणाली तयार केली आहे.

याद्वारे आतापर्यंत ज्ञात असलेल्या प्रत्येक वन्यजीव आजाराच्या विस्तृत डेटाबेसची चौकशी करता येऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जंगली प्राण्यांपासून उद्भवणाऱ्या आजाराकडे अधिक बारकाईनं पाहण्याची गरज

ही प्रणाली विज्ञानाला ज्ञात हजारो जीवाणू, परजीवी आणि विषाणू यांना संक्रमित करणाऱ्या प्रजातींची संख्या आणि त्यात दडलेला एकप्रकारचा भविष्यकालीन संदेश शोधते.

या संदेशांचा वापर मानवांसाठी कोणता धोका सर्वात जास्त आहे हे ठळक करण्यासाठी केला जातो.

शास्त्रज्ञ म्हणतात की, जर रोग पसरवणाऱ्या घटकांवर प्राधान्यानं काम केलं, तर कोणत्याही रोगाचा उद्रेक होण्यापूर्वी त्यावर निर्बंध घालण्यास किंवा त्यासंबंधीच्या उपचाराबद्दल संशोधन करण्यास मदत होईल.

"कोणत्या आजारांमुळे साथ उद्भवू शकते, हे शोधण्यासाठीचं हे आणखी एक पाऊल असेल, पण आम्ही सध्या पहिल्याच टप्प्यात आहोत," असं प्राध्यापक बायलिस म्हणतात.

लॉकडाऊनचा धडा

जंगलतोड किंवा वेगवेगळ्या वन्यजीवनांवरील अतिक्रमण यासारख्या गोष्टी जंगली प्राण्यांपासून आजार मनुष्यांमध्ये पसरवायला मदत करत आहेत, या बाबीशी अनेक शास्त्रज्ञ सहमत आहेत.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील प्रा. केट जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, "मानवानं तयार केलेल्या शेती किंवा वृक्षारोपण परिसंस्थांमधील जैवविविधता ह तुलनेनं कमी असते आणि त्यामुळेच अशा ठिकाणी संसर्गाच्या वाढीचा धोका अधिक आहे."

पण, सगळ्याच आजारांसाठी असंच होईल, असं नाही. "काही वन्यप्राण्यांच्या प्रजाती मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात सहन करतात. याच प्रजाती रोग पसरवण्यात मोठी भूमिका निभावतात," त्या पुढे सांगतात.

"म्हणून जैवविविधता कमी होण्यानं मानव-वन्यजीव यांच्या संपर्कात वाढ होईल आणि जोखमीचं ठरेल. यामुळे मग विशिष्ट विषाणू, जीवाणू आणि परजीवी लोकांमध्ये शिरण्याची शक्यता वाढू शकते," असं त्या पुढे सांगतात.

काही आजारांच्या उद्रेकानं हे स्पष्ट केलं आहे की, भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील हस्तक्षेपामुळे साथीच्या उद्रेकाचा धोका उत्पन्न होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील हस्तक्षेपामुळे साथीच्या उद्रेकाचा धोका

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

1999मध्ये मलेशियात 'निपाह' व्हायरसचा शिरकाव झाला, तेव्हा या संसर्गाची साथ सगळीकडे पसरली होती. वटवाघुळांच्या माध्यमातून हा संसर्ग एका जंगलाशेजारील डुकरांच्या शेतात पसरला होता.

वटवाघळांनी झाडावरची फळं खाल्ली आणि अर्धी खाल्लेली फळं खाली पडली. मग डुकरांनी ही फळं खाल्ली आणि या फळांना चिकटलेले वटवाघुळांच्या लाळेतील घटक डुकरांच्या पोटात गेल्यामुळे त्यांच्यावरही या साथीच्या रोगाचा परिणाम झाला होता.

संक्रमित डुकरांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 250 जणांना व्हायरसची लागण झाली. त्यापैकी 100 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसची मृत्यूदर सध्याच्या अंदाजानुसार जवळपास 1% आहे. निपाह विषाणूमुळे संक्रमित झालेल्या 40-75% लोकांचा मृत्यू झाला होता.

केनियामधील नैरोबी येथील लिव्हरपूल विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्था विद्यापीठाचे प्राध्यापकएरिक फेवर म्हणतात की, ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे, अशा ठिकाणी संशोधकांनी सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे.

"जंगलांच्या काठावरील शेती, अशा बाजारपेठा जिथं प्राण्यांची खरेदी-विक्री होते, या सगळ्या मानव आणि वन्यजीव यांच्यातील संपर्कातील अस्पष्ट सीमा आहेत आणि अशी ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी रोग उद्भवण्याची शक्यता जास्त आहे. आपण अशा भागांकडे सतत लक्ष देणं आवश्यक आहे आणि काही असामान्य दिसल्यास त्याला प्रतिसाद देण्याची व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अॅमेझॉनच्या जंगलातून गेलेला रस्ता

"दर वर्षी तीन ते चार वेळा मानवी जीवनात नवीन आजार उद्भवण्याची शक्यता असते. हे फक्त आशिया किंवा आफ्रिकेतच नाही, तर युरोप आणि अमेरिकेतही घडत आहे," प्राध्यापक फेवर पुढे सांगतात.

मॅथ्यू बायलिस यामध्ये पुढे सांगतात की, नवीन आजारांच्या शोधासाठी सध्या सुरू असलेली पाळत ठेवणं ही अधिकच महत्त्वाची आहे. आपण साथीचा रोग जगभरात परसण्यासाठी एक पोषक परिस्थिती निर्माण केली आहे.

याप्रकारची घटना पुन्हा पुन्हा होऊ शकते, असं फेवर सांगतात.

"आपण नैसर्गिक जगाशी संवाद साधताना हे सर्व घडत आहे. आता हे महत्त्वाचं आहे की, आपण हा प्रकार कशापद्धतीनं समजून घेतो आणि त्याला कसा प्रतिसाद देतो ते. आपल्या स्वत:चा नैसर्गिक जगावर काय दुष्परिणाम होते, हे सध्याचं संकट आपल्याला सांगत आहे. आपल्यातील बर्‍याच जणांना हे संकट म्हणजे एक धडा आहे," फेवर सांगतात.

"आपण वापरत असलेल्या बहुतेक गोष्टी जसं की, स्मार्ट फोनमधील साहित्य, आपण खात असलेलं धान्य इ. या प्रकारच्या गोष्टी जितक्या जास्त आपण वापरू, तितके जास्त कुणीतरी पैसे कमावेल आणि त्यांना जगभर पसरवेल. म्हणून आपण वापरत असलेले स्रोत आणि त्याचा होणारा परिणाम यांचा विचार करणं, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)