कोरोना व्हायरस : लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळे कोरोना संसर्गाचा धोका नगण्य?

  • रेचल स्क्रेअर
  • बीबीसी वैद्यकीय प्रतिनिधी
कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

असिम्प्टमॅटिक कोरोना रुग्ण म्हणजेच ज्यांच्या शरीरात या आजाराची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत, त्यांच्यापासून नेमक्या किती प्रमाणात संसर्ग होतो याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) स्पष्ट केलं आहे.

मात्र, या रुग्णांच्या माध्यमातून संसर्गाचा धोका नगण्य असल्याचं संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आलं.

लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अगदी कमी असल्याचं डॉ. मारिया व्हॅन केरकोशोव्ह यांनी सांगितलं. कोणतीही लक्षणं न दाखवणाऱ्या काही रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे हा अंतिम निष्कर्ष नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आजाराची लक्षणं असलेल्या व्यक्तीकडून संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. मात्र लक्षणं दिसू लागण्याआधीपासूनच संसर्गाचा धोका नसतो.

ज्या देशांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शिस्तबद्ध पद्धतीने केलं तिथून यासंबंधी माहिती गोळा करण्यात आली आहे.

लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांकडून संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर नसतो. मात्र हे सगळ्याच देशात, सगळ्या परिस्थितीत लागू असेल असं नाही.

लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे की नाही यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात असं प्राध्यापक लिआम स्मिथ यांनी सांगितलं. ते लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन इथं साथीच्या रोगांचे प्राध्यापक आहेत.

अलाक्षणिक रुग्णांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे मात्र त्याचं प्रमाण नेमकं कळलेलं नाही. डॉ. व्हॅन यांनी यासंबंधी वर्गीकरण केलं आहे.

  • असे रुग्ण ज्यांच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत
  • असे रुग्ण ज्यांच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळत नाहीत मात्र ते कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळतात. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या शरीरात लक्षणं दिसून येतात.
  • असे रुग्ण ज्यांच्या शरीरात कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवतात.

कोणाकडून होऊ शकतो संसर्ग?

डॉ. व्हॅन यांच्या मते कधीही लक्षणं न जाणवणाऱ्या रुग्णांकडून संसर्ग होत नाही. लक्षणं आढळलेले रुग्ण आणि लक्षणं न आढळलेले रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली असता, लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनं मास्कसंबंधीच्या नियमावलीत ही गोष्ट नमूद केली होती. अलाक्षणिक रुग्णांकडून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नगण्य असते असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

इंग्लंडमध्ये ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिटिक्सतर्फे लोकसंख्येतून काही रुग्णांचे नमुने नियमितपणे तपासत आहेत.

अनेक देशात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं. अलाक्षणिक रुग्णांकडून अगदी मामुली स्वरुपात कोरोनाचा संसर्ग होतो. लक्षणं दिसू लागतात त्या क्षणापासून किंवा त्याआधीपासून संसर्ग होऊ शकतो. त्यावेळी ही लक्षणं सौम्य स्वरुपात असू शकतात.

लक्षणं विकसित होण्यापूर्वी तीन दिवस विषाणू शरीरात वावरत असतो.

लक्षणं आढळण्यापूर्वी होणाऱ्या संसर्गाचा परिणाम ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन संदर्भात महत्त्वाचं असतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)