पाकिस्तान : माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप, कोण आहे सिंथिया डी. रिची?

  • शुमाईला जाफरी
  • बीबीसी प्रतिनिधी
पाकिस्तान मंत्री

फोटो स्रोत, ARIF ALI

पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात सध्या वादळ उठलं आहे. यामागे आहे पाकिस्तानात राहणारी एक अमेरिकी ब्लॉगर. त्यांचं नाव आहे सिंथिया डी. रिची. सिंथियाने पाकिस्तानातील विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या (पीपीपी) अनेक नेत्यांवर लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप केले आहेत.

5 जून रोजी सिंथिया यांनी फेसबुक लाईव्हवरून हे आरोप केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पीपीपी सरकारच्या काळात देशाचे गृहमंत्री असणारे रहमान मलिक यांनी 2011 साली त्यांच्यावर बलात्कार केला होता. इतकंच नाही तर सिंथिया यांनी पीपीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

इस्लामाबादमधल्या एवान-ए-सदर म्हणजेच राष्ट्रपती भवनात गिलानी यांना भेटायला गेल्या असताना गिलानी यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचं सिंथिया यांचं म्हणणं आहे.

सिंथिया यांनी माजी आरोग्य मंत्री शहाबुद्दीन यांच्यावरही बळजबरी केल्याचा आरोप केला होता. शहाबुद्दीनसुद्धा पीपीपीशी संबंधित आहेत.

आपल्यावर झालेली बळजबरी आणि लैंगिक हिंसाचार याचा तपशील आपण देऊ शकतो. मात्र, अल्पवयीन मुलंही हा व्हीडियो बघू शकतात. त्यामुळे आपण तपशील देत नसल्याचं सिंथिया यांनी म्हटलं आहे. निष्पक्ष आणि शोध पत्रकारांना ही माहिती द्यायला आपण तयार असल्याचं सिंथिया यांनी सांगितलं.

सिंथिया यांची फेसबुक पोस्ट

आपल्या फेसबुक अकाउंटवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये सिंथिया लिहितात,

'इस्लामाबादच्या मिनिस्ट्रियल एनक्लेवमधल्या गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. 2011ची ही घटना आहे. त्यावेळी अमेरिकी कमांडोंनी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये ठार केलं होतं.

त्यावेळी मला वाटलं होतं की वजीर-ए-दाखला (गृहमंत्री) रहमान मलिक यांच्याशी माझी ही भेट माझ्या व्हिसासंबंधी आहे. मात्र, मला काही फुलं आणि असं पेय देण्यात आलं ज्यात गुंगीचं औषध टाकण्यात आलं होतं. मात्र, मी गप्प बसले. कारण पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या सरकारमध्ये असं कोण होतं जो त्यांच्याच गृहमंत्र्याविरोधात मला मदत करू शकेन? काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या कुटुंबाला लक्ष्य केलं. मी हे खपवून घेऊ शकले नाही.

आणि हो, 2011 सालीच मी माझ्याबाबत घडलेल्या या घटनेविषयी अमेरिकी दूतावासातही एका अधिकाऱ्याला सांगितलं होतं. मात्र, त्यावेळी परिस्थिती अत्यंत नाजूक होती. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातल्या क्लिष्ट संबंधांमुळे माझ्या तक्रारीत अमेरिकी दूतावासातल्या त्या अधिकाऱ्यानेही फार रस दाखवला नाही. पाकिस्तानात माझी भेट एका उत्तम व्यक्तीशी झाली. आता त्यांच्याशी माझा साखरपुडाही झाला आहे. एक जोडपं म्हणून आयुष्यात पुढे जाता यावं, यासाठी माझ्याबरोबर जे घडलं ते जगाला सांगावं, ही हिंमतही मला माझ्या जोडीदारानेच दिली.'

फोटो स्रोत, facebook

'मला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत. मात्र, सध्या मला विश्रांतीसाठी थोडा वेळ हवाय. मी माझ्या जोडीदारासोबत एकांतात काही काळ घालवू इच्छिते. मी दमले आहे. मी पाकिस्तान पीपल्स पार्टीचं नेतृत्व आणि बिलावल भुट्टो-रदारी @BBhuttoZardari यांना विनंती केली आहे की त्यांनी आपल्या पक्षातल्या लोकांना सांगावं की मला आणि माझ्या कुटुंबाला एकटं राहू द्यावं.

पुढच्या आठवड्यापासून मी कायद्याचा सामना करायला आणि कुठल्याही तपास अधिकाऱ्याला भेटायला तयार आहे. मात्र, सध्या मी सर्वांना विनंती करते की माझ्या खासगी जीवनाचा सन्मान करावा आणि मला काही काळ एकांतात घालवू द्यावा.'

अमेरिकी ब्लॉगर सिंथिया रिची यांनी आरोप केलेले नेते आणि पीपीपी पक्ष यांनी या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व नेत्यांनी सिंथिया यांचे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हणत फेटाळालेत. इतकंच नाही तर सिंथिया यांच्या हेतूवरही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे.

ट्वीट

सिंथिया यांचे सर्व आरोप निराधार आहेत आणि माजी मंत्र्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणं, एवढाच यामागचा हेतू असल्याचं माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

काही विशिष्ट व्यक्तींच्या इशाऱ्यावरून हे आरोप करण्यात येत असल्याचंही मलिक यांच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. रहमान मलिक सर्वच स्त्रियांचा आदर करतात. त्यामुळे सिंथिया यांच्या आरोपांचं उत्तर द्यायला ते वाईट भाषा वापरणार नाहीत, असंही या प्रवक्त्यांनी सांगितलं.

या आरोपांना उत्तर देणंही मी माझा अनादर असल्याचं मानतो, असं माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलं आहे.

रहमान मलिक यांनी सिंथिया यांना दोन कायदेशीर नोटिशीही पाठवल्या आहेत. यात मलिक यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातली एक नोटीस आरोप लावल्याविरोधात आहे. तर दुसरी नोटीस न्यूज चॅनलवरून या आरोपांचा पुनरुच्चार केल्याबद्दल आहे.

सिंथिया रिची कोण आहेत?

सिंथिया रिची स्वतःला लेखिका, चित्रपट निर्माती, ब्लॉगर आणि ट्रॅव्हलर असल्याचं सांगतात. आपण पत्रकार नसल्याचं सिंथिया यांचं म्हणणं आहे. एका टीव्ही नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सिंथिया यांनी सांगितलं होतं की जवळपास दशकभरापूर्वी त्या पाकिस्तानात गेल्या.

एक देश म्हणून पाकिस्तान कसा आहे, हे जवळून जाणून घेणं हा आपला त्यावेळी उद्देश असल्याचं सिंथिया यांनी सांगितलं होतं. पाकिस्तान आपलं दुसरं घर असल्याचं सिंथियाचं म्हणणं आहे.

सिंथिया म्हणाल्या होत्या, "2009 साली मी पाकिस्तानात आले तेव्हा मला जाणवलं की हा मस्त देश आहे. अनेकांना या देशाविषयी माहितीच नाही. विशेषतः आंतरराष्ट्रीय मीडियाला तर पाकिस्तान काय आहे, याची जाणीवच नाही."

फोटो स्रोत, Cynthia Dawn Ritchie

फोटो कॅप्शन,

सिंथिया रिची

आपल्या व्हीडियोत पाकिस्तानबद्दलचा अनुभव सांगताना सिंथिया म्हणतात की 2010 च्या शेवटी शेवटी त्या पाकिस्तान राहू लागल्या. पीपीपीचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्याला पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळी झरदारी राष्ट्रपती होते.

सिंथिया रिची पाकिस्तानात फिरताना येणाऱ्या अनुभवावर ब्लॉग लिहितात. पेशावरमध्ये सायकल चालवतानाचा, रिक्षा चालवतानाचा त्यांचा फोटो बराच गाजला होता.

सिंथिया यांची पाकिस्तानातच्या राजकीय वर्तुळात उठबस असल्याचं सगळेच जाणतात. मात्र, सोशल मीडियावर सिंथियांविषयी लोकांची वेगवेगळी मतं आहेत. सिंथियाचे समर्थक त्या पाकिस्तानच्या मित्र असल्याचं म्हणतात.

मात्र, त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे की सिंथिया यांचा संबंध पाकिस्तानची सत्ता पडद्यामागून चालवणाऱ्या लष्कराशी आहे आणि त्या लष्कराच्या इशाऱ्यावर नाचणारी कळसूत्री बाहुली आहेत.

वादाची सुरुवात कशी झाली?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पाकिस्तान पिपल्स पार्टीसोबत सिंथिया यांचा हा वाद सुरू झाला 28 मे पासून. या दिवशी सिंथिया यांनी एक ट्विट करत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सिंथिया यांनी आरोप केला होता की बेनझीर भुत्तो आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या महिलांवर बलात्कार करायला सांगत ज्या महिलांसोबत त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांचे संबंध होते किंवा ज्या महिलांसाठी झरदारी बेनझीर यांच्याशी अप्रामाणिक होते.

सिंथिया यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, "हे त्याच कहाणीसारखं आहे जे काम बेनझीर भुत्तो त्यांच्या पतीकडून झालेल्या विश्वासघातानंतर करायच्या. त्या आपल्या सुरक्षा रक्षकांना झरदारी यांच्याशी संबंध असणाऱ्या महिलांवर बलात्कार करायला सांगायच्या. मला कळत नाही की महिला या बलात्काराच्या संस्कृतीला खतपाणी का घालतात? पुरूषाची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? देशाची न्यायव्यवस्था कुठे आहे? मी पाकिस्तानच्या तरुणांना सांगू इच्छिते की प्लीज या बुरसटलेल्या विचारांना तिलांजली द्या."

या ट्वीटनंतर पाकिस्तानात ट्वीटर आणि फेसबुकवर चांगलाच वाद पेटला होता. जवळपास सर्वच राजकीय पक्षातल्या लोकांनी सिंथिया यांच्यावर बरीच टीका केली होती. जगातल्या पहिल्या मुस्लीम महिला पंतप्रधानांविषयी अपशब्द काढल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता. बेनझीर भुट्टो यांच्या पाकिस्तान पिपल्स पक्षाने तर या आरोपावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

मात्र, सिंथिया इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी पुन्हा ट्वीट केलं. त्यात त्या लिहितात, "जे लोक बेनझीर भुट्टोंना ओळखायचे त्यांना हे चांगलं ठावूक आहे की बेनझीर यांना त्यांच्या पतीकडून किती यातना सहन कराव्या लागायच्या. बेनझीर यांचे पतीच त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या मृत्यूसाठी जबाबदार होते आणि यात काही नवं नाही. यापूर्वी अनेकांनी हे सांगितलं आहे आणि कागदोपत्री याचे पुरावेही आहेत."

फोटो स्रोत, ANADOLU AGENCY

या ट्वीटमुळे भडकलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या समर्थकांनी सिंथिया यांना पुरावे सादर करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, सिंथिया यांनी आजवर एकही पुरावा दिलेला नाही. असं असलं तरी किस्तानातील बड्या राजकीय नेत्यांविरोधात आवाज उठवल्याबद्दल काहींनी सिंथिया यांना शूर महिला म्हटलं आहे.

बेनझीर भुट्टो यांच्याविरोधात अवमानरकारक आरोप केल्याबद्दल इस्लामाबादमध्ये पीपीपीचे स्थानिक नेते शकील अब्बासी यांनी पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिगेशन ब्युरोच्या (FIA) सायबर क्राईम शाखेला सिंथिया रिची यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र, या प्रकरणात अब्बासी पीडित पक्ष नसल्याचं सांगत ही विनंती फेटाळण्यात आली होती.

अतिरिक्त सेशन्स जजने या प्रकरणात सिंथिया रिची यांच्याविरोधात एक नोटीस जारी केली आहे. 13 जूनपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान पीपीपी समर्थक आपल्याला शिविगाळ करत असल्याचं आणि धमक्या देत असल्याचा आरोप सिंथिया यांनी केला आहे.

सिंथिया यांनी त्यांच्या पासपोर्टविषयी आणि वैयक्तिक माहिती छापणाऱ्या एका पत्रकाराविरोधात कोर्टात याचिकाही दाखल केली आहे.

पाकिस्तानी मीडियात या बातमीला किती महत्त्व मिळतंय?

सिंथिया रिची आणि त्यांचे आरोप पाकिस्तानच्या सोशल मीडियात चांगलेच गाजत आहेत. मुख्य प्रवाहातली प्रसार माध्यमंही सिंथिया रिची यांच्यासंबंधीच्या बातम्यांना प्राधान्य देत आहेत. काही न्यूज चॅनल्स तर सिंथिया यांच्याशी संबंधित प्रत्येक बातमी ब्रेकिंग म्हणून चालवत आहेत.

अनेक प्रमुख न्यूज चॅनलच्या प्राईम टाईममध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय. अनेक अँकर्सने सिंथिया यांच्याशी लाईव्ह चर्चा केली आहे. तर अनेकांनी सिंथिया यांनी ज्या नेत्यांवर आरोप केलेत त्यांच्याशी चर्चा केली.

सिंथिया यांच्याविषयी पाकिस्तानातल्या मुख्य प्रवाहातल्या मीडियामध्ये नकारात्मक कव्हरेजच अधिक आहे. अनेकांनी त्यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. दहा वर्षांपूर्वी बलात्कार आणि लैंगिक छळ झाल्याचं सिंथिया यांचं म्हणणं आहे. तर तब्बल 10 वर्षं त्या गप्प का होत्या, आत्ताच हे आरोप करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे, असे प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहेत.

पाकिस्तानातली एक नामवंत पत्रकार आणि अँकर हामीद मीर यांनी सिंथिया यांचा वाद हा फार काही मोठा मुद्दा नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, ही भडक बातमी असल्याने मुख्य प्रवाहातील मीडिया हीच बातमी उचलून धरत आहे. पाकिस्तानच्या मीडियाने खरे मुद्दे आणि जनतेच्या हिताशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचं हामीद मीर यांनी आपल्या एका चर्चेच्या कार्यक्रमात म्हटलं आहे.

ते म्हणतात, "हा इतका मोठा मुद्दा नाही की आपण कोरोना विषाणू, महागाई, पेट्रोल-डिझेलची कमतरता यासारखे मुद्दे सोडून या वादावर चर्चा करावी."

"या अमेरिकी महिला कोण आहेत, मला माहिती नाही. त्या पत्रकार आहेत की व्यावसायिक, चित्रपट निर्मात्या आहेत की आणखी काही. कुणालाही त्यांच्याविषयी खरी माहिती नाही."

फोटो स्रोत, CYNTHIA RITCHIE FACEBOOK

मात्र, हामीद मीर पुढे असंही म्हणाले की, "त्या इतक्या दिर्घकाळापासून पाकिस्तानात आहेत, हे मजेशीर आहे. त्या इथे का आहेत? पाकिस्तानातल्या मोठ्या नेत्यांवर गंभीर आरोप करता यावेत, यासाठी त्या इथे राहतात का?"

हामीद मीर म्हणाले की आधी माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी आणि मंत्री शहाबुद्दीन यांच्यासोबतचे सिंथिया यांचे फोटो समोर आले आणि आता त्या त्याच नेत्यांवर आरोप करत आहेत, हे अनाकलनीय आहे. आता सध्याच्या पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतचे त्यांचे फोटोसुद्धा समोर आले आहेत.

"आज त्या एका राजकीय पक्षाच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. उद्या आणखी कुण्या नेत्यावर करतील,"

या टीव्ही कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाकिस्तानातल्या तीन प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही असेच आरोप केले. यात सत्ताधारी तहरिक-ए-इंसाफ पक्षाचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

कार्यक्रमात सहभागी झालेले तहरिक-ए-इंसाफ पक्षाचे नेते फिरदौस शमीम नक्वी म्हणाले, "जे आज इतरांवर चिखलफेक करत आहेत ते चर्चा करण्याच्या पात्रतेचेच नाही. इतकंच नाही तर त्यांच्या आरोपांची चौकशी करावी, एवढीही त्यांची पात्रता नाही. सिंथिया यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची अजिबात गरज नाही. त्यांना काही महत्त्व आहे, असं भासवण्याचीही गरज नाही."

सिंथिया यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी पुरावे द्यावे आणि मग त्याआधारे तक्रार नोंदवावी. त्यानंतर कायदा आपलं काम करेल, असंही नक्वी यांनी सांगितलं.

सिंथिया यांच्या विरोधात अनेकजण बोलत असले तरी त्यांच्या बाजूने उभे राहणारे लोक आणि राजकीय नेतेही कमी नाहीत. सत्ताधारी तहरिक-ए-इंसाफ पक्षाच्या एक महिला मंत्री जरताज गुल एका टिव्ही चॅनलवरच्या चर्चेत म्हणाल्या की या प्रकरणी पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या प्रतिक्रियेने आपली निराशा झाली.

पीपीपी स्वतःला डावा, विकासाची कास धरणारा आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणवतो. त्यांनी सिंथिया यांनी केलेल्या आरोपांची किमान पक्षांतर्गत तरी चौकशी करायला हवी होती, असं गुल यांचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)