भारत चीन सीमा वाद: चीनचे पाच सैनिक ठार झाल्याचं वृत्त, ट्विटरवर कशी पसरली बातमी?

भारत चीन सीमा वाद

फोटो स्रोत, NICOLAS ASFOURI

गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे तीन सैनिक ठार झाल्याचं भारतीय सैन्याने जाहीर केलं आहे.

या घटनेनंतर काही भारतीय मीडियाने ही बातमी चालवली की चीनच्या 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांचे 11 जण जखमी झाले आहेत. या बातमीला चीनने अधिकृतरीत्या कुठेही दुजोरा दिलेला नाही पण ट्विटरवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने स्पष्ट केलं आहे की या चकमकीत चीनच्या सैन्याचं नेमकं किती नुकसान झालं आहे याचा आकडा आम्ही कधीच जाहीर केला नाही.

ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजीन यांनी म्हटलं आहे की गलवानमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे तीन सैनिक ठार झाले आहेत. चीनच्या सैन्याचं किती नुकसान झालं आहे याबाबत आम्ही माहिती देऊ शकत नाहीत. चिनी सैन्याचं नुकसान झाल्याची कबुली शिजीन यांनी दिली आहे पण नेमका किती नुकसान झालं हे त्यांनी सांगितलं नाही.

पुढे ते सांगतात की चीनच्या संयमाला दुबळेपणा समजू नये. भारताविरोधात संघर्ष करण्यासाठी आम्ही घाबरत नाहीत.

जी चकमक झाली ती चकमक भारतीय बाजूच्या प्रक्षोभक वृत्तीतून झाल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते म्हणाले भारत आणि सीमेवर जो तणाव सुरू आहे त्यावर शांततापूर्ण चर्चा केली जात होती. 6 जून ला कमांडर स्तरावर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये सामंजस्य झालं होतं. पण सोमवारी भारताकडून प्रक्षोभक कृत्य घडलं. त्यांची ही कृती बेकायदा आहे.

यानंतर दोन्ही सैन्यांमध्ये चकमक झाली. झाओ यांनी सांगितलं आहे की चीनने आपली नाराजी स्पष्ट केली आहे. आपल्या सैन्याला नियंत्रित राहण्याचा आदेश भारताने द्यावा असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

फोटो स्रोत, AFP

या चकमकीनंतर दोन्ही देश शांततापूर्ण मार्गाने चर्चा करण्यासाठी तयार आहेत. सीमेवरील तणाव कमी व्हावा अशी दोन्ही देशांची इच्छा आहे.

भारतीय सैन्याने सांगितलं आहे की या चकमकीत एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले आहेत.

रिपोर्टरचं ट्वीट

भारतीय मीडिया चॅनेल्सनी ग्लोबल टाइम्सच्या पत्रकार वांग वेनवेन यांच्या ट्वीटचा आधार घेऊन बातमी दिली होती की चीनचे 5 सैनिक ठार तर 11 सैनिक जखमी झाले आहेत.

त्यांनी या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. नवं ट्वीट करत त्यांनी सांगितलं आहे की त्यांना ही माहिती भारतीय सूत्रांकडून मिळाली होती. चीनच्या सैन्याचं नेमकं किती नुकसान झालं याबाबत अद्याप चीनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही असं त्यांनी लिहिलं आहे.

त्याच बरोबर त्यांनी भारतीय मीडिया अव्यावसायिक आहे असं म्हटलं आहे. माझ्या ट्वीटला त्यांनी चीनची अधिकृत भूमिका मानलं हे योग्य नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)