कोरोना औषध : डेक्सामेथासोनच्या परिणामांबद्दल WHO का आहे आशादायी?

  • मिशेल रॉबर्ट्स
  • आरोग्य संपादक, बीबीसी न्यूज ऑनलाईन
कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसशी सध्या संपूर्ण जग लढतंय. जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक कोरोनावर मात करण्यासाठी औषधांचा शोध घेत आहेत. अशातच जगभरात गेल्या काही दिवसांपासून डेक्सामेथासोनची चर्चा सुरू झालीय.

तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या लढाईत डेक्सामेथाझोन अत्यंत उपयुक्त औषध ठरतंय. डेक्सामेथासोन स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध होऊ शकतं, असं औषध आहे.

डेक्सामेथासोन प्रभावी?

कोरोनासारख्या गंभीर साथीनं ग्रासलेल्यांचे जीव वाचवण्यासाठी हे औषध महत्त्वाचं ठरू शकतं. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी ज्या औषधांच्या चाचणी घेतल्या जात आहेत, त्यात डेक्सामेथाझोन सुद्धा आहे. डेक्सामेथासोन गुणकारक ठरेल का, हे या चाचण्यांमधून तपासलं जातंय.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेलाही या औषधाकडून आशा आहेत. या औषधाच्या वापराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस गेब्रेयासेस यांनी म्हटलं की, हे एक स्टेरॉईड आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्ये या औषधाच्या वापराचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

त्यांनी म्हटलं, की WHO ला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्या रुग्णांमध्ये या औषधाच्या वापरामुळे मृत्यूचा धोका एक पंचमाश कमी झालं आहे.

फोटो स्रोत, Reuters

कोरोनामुळे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचा धोका डेक्सामेथासोन औषधानं काही प्रमाणात कमी केलाय. कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या सुरुवातीपासूनच यूकेमध्ये डेक्सामेथासोनचा वापर केला गेला असता, तर सुमारे पाच हजारांपर्यंत जणांचे जीव वाचू शकले असते, असं संशोधकांचं म्हणणं आहे. शिवाय, सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या गरीब देशांना याचा खूप फायदा होऊ शकला असता.कोरोना व्हायरसचे 20 पैकी 19 रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती न होताच बरे होत आहेत. हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्यांपैकीही बहुतांश जण बरे होत आहेत. मात्र, त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज भासतेय. या हाय-रिस्क रुग्णांना डेक्सामेथासोन गुणकारी ठरत असल्याचे दिसून येतेय.

शरीरावरील सूज कमी करण्यासाठी डेक्सामेथासोन या औषधाचा वापर होतो. शरीर ज्यावेळी कोरोना व्हायरसशी लढा देत असतं, त्यावेळी रोगप्रतिकारक शक्ती ओव्हरड्राईव्हमध्ये जाते. अशावेळी डेक्सामेथासोन शरीरारचं नुकसान थांबवण्यासही मदत करतं.शरीराच्या अति-प्रतिक्रियेला 'सायटोकाईन स्टॉर्म' म्हणतात. हे घातक असतं.ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका चाचणीत हॉस्पिटलमधील 2,000 रुग्णांना डेक्सामेथासोन औषध देण्यात आलं आणि त्यांची तुलना हे औषध न दिलेल्या 4,000 जणांसोबत करण्यात आली.व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या धोक्यात 40 टक्के ते 28 टक्के घट झाली. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या धोक्यात 25 टक्के ते 20 टक्के घट झाली.मुख्य संशोधक प्रा. पीटर हॉर्बी यांच्या मते, "आतापर्यंत हे एकमेव औषध आहे, ज्यामुळे मृत्यूदर कमी झालाय आणि तेही अत्यंत लक्षणीयरीत्या. ही अत्यंत महत्त्वाची प्रगती आहे."

बीबीसीचे आरोग्य प्रतिनिधी फर्ग्युस वाल्श यांचं विश्लेषण

डेक्सामेथासोन हे पहिलं प्रमाणित औषध आहे ज्यामुळे कोव्हिडच्या मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं. यावर क्लिनिकल ट्रायल झाल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर हे औषध नवं नाही. थोडंसं महाग आहे पण स्टेरोईडस् इतकीच याची किंमत आहे. ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. याचा फायदा जगभरात कोरोनाविरोधात लढत असणाऱ्या रुग्णांना लगेच होऊ शकतो. डेक्सामेथासोनचा वापर 1960 पासून केला जात आहे. संधीवात आणि अस्थम्याच्या रुग्णांवर हे औषध वापरलं जातं. व्हेंटिलेटरवर जाणारे निम्मे पेशंट दगवतात. अशा वेळी हे औषध जीवनदायी ठरू शकतं.

अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलेल्या रुग्णांना हे औषध सलाइनद्वारे दिलं जातं आणि ज्यांची प्रकृती थोड्या प्रमाणात स्थिर आहे त्यांना तोंडावाटेही दिलं जातं. रेमडेसिव्हिरनंतर प्रथमच दुसरं औषध हे कोव्हिडवर परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. कोरोना व्हायरसच्या लक्षणांवर हे औषध प्रभावीरीत्या काम करतं. कोव्हिडची लक्षणं 15 दिवसांवरून 11 दिवसांवर आणण्यात या औषधाला यश मिळालं आहे पण याने मृत्यू टाळता येतोच असं खात्रीशीररीत्या सांगता येत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)