कोरोना व्हायरसः हर्ड इम्युनिटीविषयी स्पॅनिश संशोधकांनी का शंका व्यक्त केली?

फोटो स्रोत, AFP
कोरोना व्हायरसची जागतिक साथ नियंत्रणात आणण्यासाठीचा पर्याय म्हणून हर्ड इम्युनिटी पाहिलं जातंय. पण आता स्पेनमध्ये झालेल्या संशोधनाने यावर प्रश्नचिन्हं निर्माण केलंय.
60,000पेक्षा जास्त लोकांवर हा अभ्यास करण्यात आलाय. यानुसार स्पॅनिश लोकसंख्येच्या फक्त 5% जणांमध्ये अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिजैवकं तयार झाल्याचं लॅन्सेट या वैद्यकीय पत्रिकेत म्हटलंय.
लोकसंख्येतल्या पुरेशा प्रमाणातल्या लोकांना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात यासाठीची प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि परिणामी विषाणूचं संक्रमण मंदावतं. यालाचा हर्ड इम्युनिटी किंवा समूहाची रोग प्रतिकारक्षमता म्हणतात.
फोटो स्रोत, Getty Images
ज्यांना आतापर्यंत संसर्ग झालेला नाही त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी सुमारे 70 ते 90% लोकांनी 'इम्युन' असणं गरजेचं असतं.
या अहवालानुसार स्पेनच्या ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता तिथल्या लोकांमध्ये अँटीबॉडिजचं प्रमाण जास्त होतं. पण किनारपट्टीच्या भागात हे प्रमाण 3% पेक्षा कमी होतं.
"स्पेनला कोव्हिड -19चा मोठा तडाखा बसूनही अँटीबॉडिजचं हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि हर्ड इम्युनिटी तयार करण्यासाठी अपुरं आहे," या संशोधकांनी रिपोर्टमध्ये म्हटलंय.
"अशा परिस्थितीत भविष्यात ही साथ आटोक्यात यावी म्हणून सोशल डिस्टंन्सिंगचे उपाय आणि नवीन केसेस शोधून उपचार आणि आयसोलेशन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे पर्यायच महत्त्वाचे ठरतील."
फोटो स्रोत, EPA
युरोपातली ही अशा प्रकारची सर्वात मोठी पाहाणी आहे.
अमेरिका आणि चीनमध्ये अशा प्रकारचे अभ्यास करण्यात आलेले आहेत. लॅन्सेटमधल्या लेखात म्हटलंय, "लोकसंख्येतल्या या गटाच्या अभ्यासावरून आढळलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेकजणांना या संसर्गाचा प्रादुर्भाव झाला नव्हता. अगदी ज्या भागात विषाणूचं मोठं संक्रमण झालं, तिथेही."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
स्पेनमधली आताची परिस्थिती
या देशात आतापर्यंत कोरोनामुळे किमान 28,385 जणांचा मृत्यू झालाय. तर अडीच लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झालेला आहे. पण गेल्या तीन आठवड्यांपासून दररोजच्या मृत्यूंची संख्या ही 10 पेक्षा कमी आहे.
पण स्पेनच्या नैऋत्येकडील गलिसिया प्रांतात मात्र परत उद्रेक झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आलेले आहेत. इथली लोकसंख्या 70,000 च्या आसपास आहे.
फोटो स्रोत, Getty Images
स्थानिक बारमधून हा संसर्ग पसरल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. बार आणि रेस्टॉरंट्सनी आपल्या क्षमतेच्या अर्ध्यावरच काम करण्याचे आदेश देण्यात आलेत.
गलिसिया भागात कोव्हिड 19च्या 258 केसेस आहेत. यामध्ये लुगो प्रांतातल्या 117 केसेसचाही समावेश आहे.
तर कॅटलोनियाच्या स्वायत्त सरकारने संसर्गाचं प्रमाण वाढल्यानंतर शनिवारी 2,10,000 नागरिक असणाऱ्या या भागातही पुन्हा निर्बंध लावले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)