जेम्स अँडरसनचा 600 विकेट्सचा पराक्रम

जेम्स अँडरसन, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जेम्स अँडरसन

टेस्ट क्रिकेट इतिहासातला सगळ्यांत यशस्वी फास्ट बॉलर होण्याचा मान जेम्स अँडरसनने पटकावला आहे. पाकिस्तानच्या अझर अलीला आऊट करत जेम्स अँडरसनने 600व्या विकेट्सची नोंद केली. हा विक्रम करणारा अँडरसन हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला पहिला फास्ट बॉलर आहे. सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत अँडरसन चौथ्या स्थानी आहे.

2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध लॉर्ड्स इथे अँडरसनने पदार्पण केलं होतं. अँडरसनच्या पहिल्या ओव्हरमध्ये झिम्बाब्वेच्या बॅट्समननी 17 धावा कुटल्या. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये अँडरसनने मार्क व्हरम्युलेनला आऊट करत खातं उघडलं. पहिल्याच टेस्टमध्ये अँडरसनने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली.

अँडरसनने ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलला तब्बल 11 वेळा आऊट केलं आहे. परंतु सिडल हा तळाचा बॅट्समन असल्याने ही विकेट मिळवणं तितकंसं आनंददायी नाही. अँडरसनने 9 वेळा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आऊट केलं आहे.

अँडरसनने इंग्लंडच्या चार अॅशेस विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.

टप्पा पडून स्विंग होऊन आत येणारा किंवा बाहेर निघणारा बॉल हे अँडरसनचं हुकूमी अस्त्र आहे.

ढगाळ वातावरण, स्विंगला पोषक खेळपट्यांवर अर्थात घरच्या मैदानावर अँडरसनचा सामना करणं भल्याभल्या बॅट्समनला कठीण जातं. इंग्लंडमध्ये खेळताना अँडरसनचं बॉलिंग सरासरी 23.76 आहे. मात्र अन्य देशात खेळताना अँडरसनला बॅट्समनच्या बॅटचा तडाखा बसला आहे. कारण विदेशात त्याची बॉलिंग सरासरी 32.63 आहे.

इंग्लंडमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्यूक बॉल कुकाबुरा चेंडूच्या तुलनेत अधिक स्विंग होतो. अँडरसनच्या यशात ड्यूक बॉलचा वाटा मोठा आहे.

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स इथं अँडरसनच्या नावावर 103 विकेट्स आहेत. लॉर्ड्स इथे 23 टेस्टमध्येच अँडरसनने विकेट्सची शंभरी ओलांडली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)