कोरोना व्हायरस : सगळ्यांत आधी लस तयार करण्याची घाई किती महाग ठरू शकते?
- गॉर्डन कॉरेरा
- बीबीसी प्रतिनिधी

11 ऑगस्टला रशियाने कोव्हिड 19 साठीची सर्वांत पहिली लस तयार केल्याची घोषणा केली. या लसीला 'स्पुटनिक' नाव देण्यात आलं होतं. यामागचा रशिया देत असलेला संदेश साफ होता.
1957मध्ये सोव्हिएत रशियाने स्पुटनिक उपग्रह अवकाशात सोडत अंतराळ क्षेत्रात आघाडी घेतली. आता वैद्यकीय क्षेत्रातही अशीच पहिली झेप आपण घेतली असल्याचा रशियाचा दावा आहे.
पण तज्ज्ञांनी याविषयी शंका व्यक्त करत असं करणं इतकं सोपं नसल्याचं म्हटलंय. ज्याप्रकारे या लशीची घोषणा करण्यात आली त्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणारी भीषण स्पर्धा दिसून येते. 'व्हॅक्सिन नॅशनलिजम' म्हणजेच लसीवरून सुरू झालेल्या या राष्ट्रवादाच्या युद्धात शॉर्टकट्स, हेरगिरी, अनैतिक जोखीम आणि मत्सर या सगळ्याबाबतचे आरोप करण्यात येत आहेत.
कोव्हिड 19 वरची लस ही वैद्यकीय क्षेत्रातल्या एखाद्या पुरस्कारासारखी मानाची झाली आहे. यामुळे लोकांचा जीव वाचेल फक्त म्हणून हे महत्त्वं आलेलं नाही. तर यामुळे जगात कोव्हिडमुळे निर्माण झालेली संकटं नष्ट व्हायला मदत होईल आणि हे करण्यात ज्याला यश मिळेल त्याला मानाचं किंवा विजेत्याचं स्थानही मिळेल.
कोणत्याही वैदयकीय उत्पादनासाठी अशाप्रकारचे गंभीर राजकीय डावपेच झाल्याचं आपण यापूर्वी कधीही पाहिलं नसल्याचं अमेरिकेतल्या जॉर्जटाऊन विद्यापीठातले ग्लोबल हेल्थ लॉचे प्रोफेसर लॉरेन्स गॉस्टिन म्हणतात.
ते सांगतात, "कोव्हिड 19च्या लशीबद्दल देशांमध्ये अशी चढाओढ आहे कारण सुपरपॉवर म्हणून जगात ओळखले जाणाऱ्या देशांना या लशीद्वारे आपली विज्ञानातली प्रगती दाखवायची आहे. आपलं राजकीय वर्चस्व दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
लशीसाठी जगभरात जे प्रयत्न सुरू आहेत त्यापैकी साधारण सहा प्रयोग आता ट्रायलच्या टप्प्यात पोहोचले असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. यामध्ये चीनचे तीन, ब्रिटनचा एक, एक अमेरिका आणि एक जर्मनी - अमेरिका एकत्र करत असलेला प्रयोग असे मिळून सहा लशींच्या ट्रायल्स सुरू आहेत.
खरंतर कोणतीही लस तयार करण्यासाठी सहसा अनेक वर्षांचा काळ लागतो. पण सध्या सगळीकडेच ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाने स्पुटनिक लशीच्या नोंदणीच्या नेहमीच्या प्रक्रियेत काटछाट गेल्याने काळजी व्यक्त करण्यात येतेय.
फोटो स्रोत, Sputnik/Aleksey Nikolskyi/Kremlin via REUTERS
रशियाच्या गुप्तहेर यंत्रणांनी संशोधन हॅक केल्याचा आरोप जुलै महिन्यात ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाने केला होता. पण रशियाने हे आरोप फेटाळून लावले होते. यानंतरच्या आठवड्यांमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने दोन चिनी हॅकर्सवर लशीसंबंधीची माहिती चोरण्याचा आरोप केला होता. चीनच्या गुप्तहेर संघटनेच्या वतीने हे काम केल्याचा आरोप या चिनी हॅकर्सवर होता.
चीनने हे आरोप फेटाळले आणि व्हायरसविषयीची आपल्याकडची माहिती आपण जगाला दिली असून इतर देशांना आपण मदत करत असल्याचं चीनने म्हटलं.
वैद्यकीय चाचण्यांसाठी लागणारा दीर्घ कालावधी हे सगळ्या जगासाठी सध्या चिंतेचं मोठं कारण आहे.
ग्लोबल हेल्थ प्रोग्रामचे संचालक थॉमस बोलिकी सांगतात,"नक्कीच शॉर्टकट घेतला जातोय. विशेषतः रशियाच्या बाबत हे घडलेलं आहे. लस तयार करणं कठीण काम नाही पण ती लस सुरक्षित आणि परिणामकारण आहे, हे सिद्ध करणं कठीण आहे. पण जर देशांना फक्त लस तयार करण्यात रस असेल, तर ते शॉर्टकट स्वीकारू शकतात."
फोटो स्रोत, O’Neill Institute
अमेरिकेतल्या जॉर्जटाऊन विद्यापीठातले ग्लोबल हेल्थ लॉचे प्रोफेसर लॉरेन्स गॉस्टिन
शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या न करता लशीची नोंदणी करण्याच्या रशियाच्या निर्णयावर पश्चिमेतल्या देशांकडून टीका करण्यात येतेय.
अमेरिकेतल्या कोरोना व्हायरस टास्क फोर्समधले एक महत्त्वाचे सदस्य असणाऱ्या डॉ. अँथनी फाऊची यांनी रशियाच्या लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता याविषयी शंका व्यक्त केलीय. तर ही टीका म्हणजे मत्सर असल्याचं म्हणत रशियाने या टीकाकारांना उत्तर दिलंय.
या लशीसंबंधीची आकडेवारी लवकरच आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रसिद्ध करणार असल्याचं रशियन लस विकसित करणाऱ्यांनी म्हटलंय.
चीनच्या प्रयत्नांना वेग
आपल्या कंपनीतल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीने लस चाचणीपूर्वी देण्यात येत असल्याचं चिनी औषध कंपन्यांनी म्हटलंय. तर स्पुटनिक लशीचा डोस आपल्या मुलीला देण्यात आल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं होतं.
हे दोन्ही देश आपल्या सैन्यातल्या जवानांवर लशीची चाचणी घेण्याच्या विचारात असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. या जवानांना होकार वा नकार देण्याचा अधिकार असेल का यावरून यामागच्या नैतिकतेविषयीही सवाल करण्यात आले होते.
पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत काम करणारी चिनी कंपनी कानसिनो द्वारे विकसित करण्यात आलेल्या लशीचा वापर सैन्यातल्या जवानांवर करण्यास जून महिन्यात परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी या लशीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणीदेखील सुरू करण्यात आली नव्हती.
प्रोफेसर गॉस्टिन सांगतात,"संशोधनातल्या मानवी सहभागाबद्दल आपण काही नैतिक धोरणं तयार केलेली आहेत, म्हणजे याचा दुरुपयोग केला जाणार नाही."
फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप
लस विरोधी मोहीम राबवणाऱ्यांना संधी
चाचण्या पूर्ण न करता लवकरात लवकर लस बाजारात आणण्यासाठी घाई केल्यास त्यामुळे लोकांमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. जर लशीचे दुष्परिणाम झाले तर यामुळे लशींच्या विरोधात असणाऱ्यांना आयती संधी मिळेल.
लस तयार करण्यासाठीचे बहुतेक प्रयत्न हे व्यावसायिकांकडून केले जात आहेत आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीत केले जात आहेत. पण असं असूनही देशांनी याचा संबंध आपल्या स्वतःच्या प्रतिष्ठेशी जोडलाय.
बोलिकी सांगतात, "यामध्ये काही देश विशेषतः एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले आहेत आणि आपण या जागतिक साथीचा मुकाबला कशा प्रकारे करत आहोत याविषयीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत."
अमेरिकेत यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका होणार आहेत आणि यामुळेच ट्रंप प्रशासनावर मोठा दबाव आहे.
लस विकसित करण्यात जर ब्रिटनला यश आलं, तर ते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पाठबळ मिळाल्यासारखं असले कारण सध्या त्यांना सतत विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. लस विकसित करण्यामध्ये ब्रिटन जगाचं नेतृत्त्वं करेल, असं त्यांचे आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक यांनी म्हटलं होतं.
लस आणि राष्ट्रवाद
थॉमस बोलिकी सांगतात, "पश्चिमेतल्या देशांमध्ये नक्कीच लसीवरून राष्ट्रवाद उफाळलेला आहे. लसीचा सुरुवातीचा पुरवठा आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्याच्या ब्रिटन आणि अमेरिकेच्या धोरणांवरून हे दिसून येतं."
हे सत्य आहे की राष्ट्रवादातून अशी स्पर्धा निर्माण व्हायला कोरोना येण्यापूर्वीच सुरुवात झाली होती. पण या रोगाने हा राष्ट्रवाद आणखी प्रबळ केला.
व्हेंटिलेटर्स आणि PPE किट्स मिळवण्यासाठी सुरुवातीला प्रचंड रस्सीखेट झाली. प्रत्येक देशाला आपापली शिपमेंट सुरक्षित करण्यात स्वारस्य होतं. बाहेरच्या देशांकडून आयात होणाऱ्या सामानावर आपलं अवलंबून असणं आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज यावरून दिसून येते.
लस विकसित करण्यात यश आल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करून देण्यात येईल असं सध्या म्हटलं जातंय. पण प्रत्यक्षात असं यश आल्यानंतर तो देश सगळ्यात आधी आपली लोकसंख्या सुरक्षित करणं आणि अर्थव्यवस्था सावरणं यासाठी याचा वापर करेल. कारण जर हे करण्यात त्या देशाला अपयश आलं तर त्याला लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल.
जगातल्या श्रीमंत देशांनी पुन्हा एकदा जागतिक योजनांमध्ये सामील व्हावं असं आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांनी 18 ऑगस्टला पुन्हा एकदा केलं होतं. असं झाल्यास लस तयार झाल्यानंतर ती गरीब देशांनाही देता येईल.
ते म्हणाले, "आपण व्हॅक्सिन राष्ट्रवाद थांबवणं गरजेचं आहे."
दुसऱ्या देशांचं समर्थन मिळवण्यासाठी, धोरणात्मक संबंधांसाठीचा एक पर्याय म्हणूनही या लशीचा वापर होऊ शकतो.
बोलिकी म्हणतात, "प्रत्येक सरकार हे लसीची सुरुवातीची बॅच धोरणात्मक वापरासाठी राखून ठेवण्याची शक्यता आहे."
लस बाजारात आली याचा अर्थ ती प्रभावी असेलच असं नाही. शिवाय कोणीतरी एकच विजेता ठरेल, असा सध्याचा काळ नसल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिलाय. म्हणजेच लस विकसित करणं आणि त्यानंतर त्यासाठीची मागणी पूर्ण करणं यासाठीच्या स्पर्धेची ही सुरुवात असू शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)