भारत-चीन सीमावाद: एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा होणार

एस.जयशंकर

फोटो स्रोत, S.JAISHANKAR/TWITTER

शांघाय सहकार्य संघटनेच्या मॉस्कोत होणाऱ्या बैठकीच्या निमित्ताने भारत, रशिया आणि चीनचे परराष्ट्र मंत्री सहभागी होतील अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर चार दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. मॉस्कोत बुधवार-गुरुवारी होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हॉव्ह भूषवणार आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे द्विपक्षीय बैठका घेतील आणि तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भोजन बैठकीत सहभागी होतील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितलं.

शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या देशांच्या अध्यक्षांनी 2001 साली शांघायमधील एका परिषदेत केली. 2005 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा निरीक्षक म्हणून समावेश करण्यात आला. 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तानला पूर्ण सदस्य म्हणून सामावून घेण्यात आलं.

दरम्यान भारत-चीन सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट होण्याआधी दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सनी पूर्व लडाखमध्ये भेट घेतली.

पूर्व लडाखमधील वातावरण निवळावे यासाठी मार्ग काढण्यावर लक्ष केंद्रित असेल.

भारत आणि चीन दरम्यान 3500 किलोमीटर लांब सीमा आहे आणि दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरू आहे. या वादावरून दोन्ही देशात 1962 साली युद्धही झालेलं आहे.

लडाखच्याच गलवान व्हॅलीमध्ये 15 जूनला दोन देशांमध्ये चकमक झाली होती यात 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत पण अजूनही तणाव कायम आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पॅंगॉग लेक जवळ चीनच्या सैन्याने 29 आणि 30 ऑगस्टला घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व्हेलन्स कॅमेऱ्यामुळे भारताला या हालचालीची आधीच माहिती मिळाली आणि त्यांनी हा प्रयत्न उधळून लावल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती सध्या नाजूक असल्याचं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी नुकतेच चीनने प्रयत्न केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा केला.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांच्यात 5 सप्टेंबर मॉस्कोमध्ये बैठक झाली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)