डोनाल्ड ट्रंप: 'कोरोनाच्या धोक्याची कल्पना असूनही ट्रंप यांनी लोकांना सांगितलं नाही'- वुडवर्ड

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, CHIP SOMODEVILLA/GETTY IMAGES

सर्वसाधारण तापाच्या तुलनेत कोरोनाचा धोका प्रचंड असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना माहिती होतं. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक कोरोनाचा धोका मोठा असल्याचं सांगितलं नाही असं एका पुस्तकात म्हटलं आहे.

70च्या दशकात वॉटरगेट प्रकरणाचे उद्गाते पत्रकार आणि लेखक बॉब वूडवर्ड यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. डिसेंबर 2019 ते जुलै 2020 या कालावधीत ट्रंप यांची अठरा वेळा मुलाखत घेतल्याचा दावा वुडवर्ड यांनी केला आहे. पुस्तकात म्हटलं आहे की "अमेरिकेत कोरोनाने पहिला मृत्यू होण्याआधीच ट्रंप यांनी वुडवर्ड यांना सांगितलं की हा महाभयंकर असा आजार आहे".

कोरोनासंदर्भात नागरिकांमध्ये गोंधळ उडू नये असं ट्रंप यांना वाटत होतं. दरम्यान अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 90 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमी ट्रंप आणि वुडवर्ड यांच्यातील संवादाचा काही भाग प्रकाशित केला. यामध्ये कोरोना संकट, वंशवाद आणि अन्य मुद्यांचा समावेश आहे. वुडवर्ड यांचं #रेज' हे पुस्तक 15 सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.

कोरोना किती विनाशकारी आहे याविषयी ट्रंप यांना पूर्ण कल्पना होती. मात्र सार्वजनिक पातळीवर त्यांनी कधी हे सांगितलं नाही. फेब्रुवारीत वुडवर्ड यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान कोरोना हा फ्ल्यूपेक्षा गंभीर आणि धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. हा आजार हवेच्या माध्यमातून पसरतो. तुमचा त्याच्याशी संपर्क येण्याची म्हणजे स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही श्वास घेतलात तर तो तुमच्या श्वासावाटे शरीरात शिरतो. त्यामुळेच सर्वसाधारण फ्ल्यूपेक्षा अधिक धोकादायक आहे असं ट्रंप म्हणाले होते.

फेब्रुवारी महिन्यातच ट्रंप असंही म्हणाले होती की कोरोना विषाणूचा फैलाव नियंत्रणात आहे आणि लवकरच कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर येईल. याच महिन्यात कोरोना धोकादायक असल्याचं त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर सांगितलं. 10 मार्चला ते म्हणाले, नागरिकांना शांत राहावं. कोरोना निघून जाईल. नऊ दिवसांनंतर अमेरिकेत कोरोना संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा ट्रंप वुडवर्ड यांना म्हणाले, मी कोरोनाला कमी लेखू इच्छित होतो. आताही मी कोरोनाला मोठं करू इच्छित नाही. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरावं असं मला वाटत नाही.

फोटो स्रोत, EPA

व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया

बुधवारी पत्रकारांशी बोलताना ट्रंप म्हणाले, "लोकांमध्ये भयाचं वातावरण पसरावं असं मला वाटत नाही. लोकांमध्ये अफरातफरीचं माजावी असंही मला वाटत नाही. आम्हाला आत्मविश्वास दाखवायचा होता, आमची ताकद दाखवायची होतं".

वुडवर्ड यांच्या पुस्तकासंदर्भात ते म्हणाले, "हे पुस्तक म्हणजे राजकीयदृष्ट्या माझ्यावरील हल्ला आहे".

पुस्तकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना ट्रंप यांच्या प्रेस सचिव केले मैकएनानी यांनी उत्तरं दिली. त्या म्हणाल्या, "राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाचा धोका कमी असल्याचं दाखवलं नाही. राष्ट्राध्यक्षांना लोकांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दृढनिश्चयी आणि खंबीर बनवायचं होतं. कोरोनाचं संकट मोठं आणि गहिरं आहे याबाबत राष्ट्राध्यक्ष अतिशय गंभीर होते".

फोटो स्रोत, Reuters

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी म्हटलं आहे की, "जीवघेणा विषाणू अमेरिकेत वेगाने पसरत होता तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपलं काम करण्यात अपयशी ठरले. हा अमेरिकेच्या लोकांचा विश्वासघात आहे. कारण कोरोना हा जीवनमरणाचा प्रश्न आहे.

ते पुढे म्हणाले, ट्रंप यांनी दोन आठवड्यांपूर्वी कार्यवाही केली असती तर मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळून 54 हजार नागरिकांचा जीव वाचला असता. पण राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या धोक्याला कमी लेखलं. कोरोनाला रोखण्यासाठी कृती करण्यावर भर दिला नाही. ज्यामुळे लोकांचे जीव धोक्यात गेले आणि अर्थव्यवस्थेचंही नुकसान झालं. ही सरसकट बेपर्वाई आहे. हे वर्तन कधीही समर्थनीय होऊ शकत नाही".

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)