कोरोना व्हायरस : लशीच्या क्लिनिकल ट्रायल थांबवल्या, लस सुरक्षित असेल ना?

कोरोना लस

फोटो स्रोत, Oxford University / John Cairns

कोरोना विषाणूवर उपाय म्हणून सुरू असलेल्या लशीच्या काही क्लिनिकल ट्रायल्स थांबवण्यात आल्या आहेत. लशीचा डोस देण्यात आलेली व्यक्ती आजारी पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे धोक्याचं ठरू शकतं.

अॅस्ट्राझेन्का फार्मा कंपनी जी लशीसंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बरोबरीने काम करत आहे त्यांनी ही रुटीन प्रक्रिया असल्याचं सांगितलं. स्पष्टीकरण देता येणार नाही असं आजारपण ही लस दिल्यानंतरची रिअॅक्शन असू शकते.

लशीच्या चाचण्या थांबवणं सर्वसामान्य घटना आहे का? कोरोनावरच्या लशीसंदर्भात याचे परिणाम काय असू शकतात?

लशीच्या चाचण्यांविषयी आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे?

कोरोना विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती लशीद्वारे बळकट करण्यात अॅस्ट्राझेन्का-ऑक्सफर्ड लस आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्या लस तयार करण्याच्या प्रक्रियेला उशीर होणं निराशाजनक आहे.

युकेमधल्या एका व्यक्तीला लस देण्यात आली. त्यानंतर त्या व्यक्तीला गंभीर स्वरुपाचा त्रास होऊ लागला. त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. स्टॅट न्यूजने ही बातमी दिली आहे. बाकी माहिती समजू शकलेली नाही मात्र त्या व्यक्तीची प्रकृती सुधारत असल्याचं समजतं आहे.

फोटो स्रोत, Reuters

अॅस्ट्राझेन्का कंपनीने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. स्टँडर्ड रिव्ह्यू प्रोसेसनुसार लशीकरण प्रक्रिया थांबवण्यात आली. डेटा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. बीबीसीचे मेडिकल एडिटर फर्ग्युस वॉल्श यांच्या मते या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात.

लसीकरण चाचण्या अशा पद्धतीने खंडित होतात का?

वॉल्श यांच्या मते लशीच्या चाचण्या अशा पद्धतीने खंडित झाल्याचं ऐकिवात नाही. लशीची चाचणी झालेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि आजाराचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही तर चाचणी प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागते असं वॉल्श यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूवर लशीची चाचणी प्रक्रिया खंडित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिलमध्ये लशीच्या चाचण्या सुरू झाल्यानंतर असं एकदा झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूवर वेगवान पद्धतीने लस शोधण्यासाठीच्या योजनेतील अमेरिकेचे मॉन्सेफ स्लाओयू यांच्या मते, अमेरिका आणि युकेतील तटस्थ तज्ज्ञांद्वारे सखोल परीक्षण केलं जात आहे. एखादी अचानक रिअॅक्शन दिसल्यास जगभरातील सगळीकडे ही मानकं पाळली जातात.

कोरोनावरची लस सुरक्षित असेल ना?

लशीकरण चाचणी थांबवण्यात आल्यानंतर अॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड यांनी बाजारात येणारी लस ही शंभर टक्के सुरक्षित असावी यासाठीचीच उपाययोजना असल्याचं स्पष्ट केलं.

कोरोनावर लस शोधून काढण्यासाठी कार्यरत 9 फार्मा कंपन्यांनी ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली. त्यानुसार लशीच्या निर्मितीदरम्यान सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल.

यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, बायोएनटेक, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, फायझर, मर्क, मॉडर्ना, सनोफी, नोव्हॅक्स यांनी उमेदवारांच्या सुरक्षेला सर्वोत्तम प्राधान्य असेल असं स्पष्ट केलं.

क्लिनिकल ट्रायलदरम्यान तसंच लशीच्या उत्पादनादरम्यान उच्च दर्जाची शास्त्रोक्त आणि तात्विक मानकं प्रमाण असतील.

लस कधी उपलब्ध होणार?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात 180 लशीकरण कार्यक्रम सुरू आहेत मात्र कुठेही क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेल्या नाहीत.

सर्वसमावेशकता, रुग्णांच्या आरोग्याची हमी, सुरक्षाविषयक नियमावली या निकषांवर तावून सुलाखून सिद्ध झाल्यानंतरच लशीला परवानगी मिळू शकते असं आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं.

अॅस्ट्राझेन्का-ऑक्सफर्ड लशीचं काम सगळ्यांत आघाडीवर आहे. त्यांनी फेझ1 आणि फेझ2 टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी फेझ3चं काम सुरू केलं होतं.

अमेरिका, युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेत मिळून 30,000 स्वयंसेवकांना लशीचा डोस देण्यात येणार होता. मात्र आता ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, EPA

फेझ3 टप्प्यात हजारो स्वयंसेवकांना लशीचे डोस देण्यात येतात, याप्रक्रियेला काही वर्ष लागू शकतात.

3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी कोरोनावरची लस उपलब्ध व्हावी असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलं होतं.

मात्र राजकारणासाठी लशीच्या सुरक्षेला देण्यात येणारं प्राधान्य डळमळीत होणार नाही ना अशी साशंकता ट्रंप यांच्या उद्गारानंतर अनेकांनी व्यक्त केली.

रशियाने तयार केलेल्या लशीच्या विश्वासार्हतेसंदर्भात काही शास्त्रज्ञांनी संशय व्यक्त केलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)