हरवलेल्या फोनमध्ये सापडले माकडाने काढलेले सेल्फी आणि व्हीडिओ

फोटो स्रोत, ZACKRYDZ RODZI
माकडाने काढलेला सेल्फी
फोन आणि त्यातही स्मार्टफोन हरवणं केव्हाही त्रासदायकच. मलेशियातल्या एका माणसाचा फोन हरवला. शोध घेतल्यानंतर घरामागच्या जंगलात तो सापडला. फोनमध्ये माकडाने काढलेली सेल्फी आणि व्हीडिओ सापडल्याने माणूस चक्रावून गेला आहे.
माकड फोन खाण्याचा प्रयत्न करत असल्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत असं झॅकड्रायझ रॉडझी यांनी सांगितलं. रॉडझी याचा तो फोन होता, त्यांनीच हे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
झोपलेलं असताना फोन कुणीतरी चोरून नेला असं त्याला वाटत होतं. फोन नक्की कसा गेला हे अद्याप त्याला कळलेलं नाही. फोटो आणि व्हीडिओज कोणत्या परिस्थितीत घेण्यात आले हेही ठोसपणे सांगता येणार नाही.
वीस वर्षांचा रॉडझी शनिवारी सकाळी अकरा वाजता उठला तेव्हा त्याचा स्मार्टफोन गायब होता.
चोरीच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. कोणीतरी करणी-काळी जादू केल्यासारखं मला वाटलं असं रॉडझीने सांगितलं. जोहोर या दक्षिणेकडच्या राज्यातील बाटू पहाट इथला रॉडझी कम्प्युटर सायन्सच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
काही तासांनंतर बीबीसीबरोबर शेअर केलेल्या व्हीडिओत, शनिवार दुपारची 2.01 मिनिटांची वेळ आहे. माकड फोन खाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. रसरशीत हिरवी पानं आणि पक्ष्यांच्या पार्श्वभूमीवर माकड कॅमेऱ्याकडे रोखून बघत असल्याचं दिसतं आहे.
माकड, झाडंझुडपं आणि भवतालाचे फोटो कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत.
रविवार दुपारपर्यंत फोनचा मागमूस लागला नाही असं रॉडझीने सांगितलं. रविवारी दुपारी रॉडझीच्या वडिलांना त्यांच्या घराबाहेर एक माकड दिसलं.
रॉडझीच्या नंबरवर कॉल केल्यानंतर जंगलात थोड्या अंतरावर रिंग वाजत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. जंगलात ताडाच्या झाडाच्या पानांखाली मातकटलेल्या स्थितीत फोन मिळाला.
फोटो स्रोत, ZACKRYDZ RODZI
माकडाचे उद्योग
फोन घेऊन जाणाऱ्याचा फोटो फोनमध्ये असेल असं रॉडझीच्या काकांनी गंमतीत म्हटलं. फोन साफसूफ केल्यानंतर रॉडझीने फोटो गॅलरी उघडली आणि त्याला धक्का बसला. फोटो गॅलरीत माकडांच्या फोटो आणि व्हीडिओजचा ढीग साचला होता.
जगभरात अनेक ठिकाणी माकडं शहरात भरवस्तीत किंवा वस्तीजवळ राहत असल्याची उदाहरणं आहेत. मात्र आमच्या भागात माकडांनी वस्तू चोरून नेल्याचं याआधी घडलेलं नाही. भावाच्या खोलीतल्या उघड्या खिडकीतून माकड आत आलं असावं असं रॉडझीला वाटतं.
हे असं आयुष्यात एकदाच घडू शकतं असं रॉडझीने रविवारी ट्वीट करत म्हटलं आहे. हजारो नेटिझन्सनी लाईक्स आणि रीट्वीट केलं आहे.
माकडांचे सेल्फी बातमी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये ब्रिटिश फोटोग्राफरने एका माकडाने काढलेल्या फोटोवरून न्यायालयात गेलेला खटला जिंकला. एका प्राणिप्रेमी संघटनेने माकडाची बाजू दोन वर्ष लढवली होती.
2011 मध्ये इंडोनेशियाच्या जंगतालील नारुटो नावाच्या माकडाने डेव्हिड स्लेटर यांचा कॅमेरा ताब्यात घेतला आणि अनेक सेल्फी काढले. या फोटोंचे स्वामित्व हक्क माझे असल्याचं स्लेटर यांनी सांगितलं. मात्र पेटा या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेने मात्र हे फोटो प्राण्याने काढलेले असल्याने स्वामित्व हक्क प्राण्याचे असल्याचं सांगितलं.
कॉपीराईटचा कायदा माकडाला लागू होऊ शकत नसल्याचं अमेरिकेतील न्यायालयाने सांगितलं आणि पेटाची केस फेटाळून लावली. त्या फोटोंच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईपैकी 25 टक्के हिस्सा नारुटो माकडं आणि दुर्मीळ प्राण्यांच्या संवर्धनासाठी देण्याचं स्लेटर यांनी मान्य केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)