कोरोना लस: नाकावाटे शरीरात घेता येणाऱ्या लसीच्या चाचणीला सुरुवात

  • मिशेल रॉबर्ट
  • बीबीसी प्रतिनिधी
लस

फोटो स्रोत, Getty Images

यूकेमधील संशोधक लवकरच नाकावाटे शरीरात घेता येईल, अशा कोरोना व्हायरसवरील लसीची ट्रायल घेणार आहे.

थेट फुप्फुसांपर्यंत लस पोहोवल्यामुळे चांगल्याप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल, असा संशोधकांना विश्वास आहे.

अस्थमाचं औषध ज्यापद्धतीनं नाकावाटे घेतलं जातं, त्यापद्धतीनं ही लस दिली जाईल.

इंपीरियल कॉलेज लंडनची टीम या लसीची दोन जणांवर आधी ट्रायल घेणार आहे.

यामध्ये ऑक्सफर्डच्या लसीच्या प्रयोगात सामील झालेली एक व्यक्ती आणि जून महिन्यात इम्पिरियल कॉलेजच्याच मानवी चाचणीत सहभागी झालेल्या व्यक्तीचा समावेश असणार आहे.

असं असलं तरी जगभरातल्या 180 जणांवर ही ट्रायल घेण्यात येणार असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

या संशोधनाचे प्रमुख ख्रिस चिऊ यांनी याविषयी सांगितलं, "कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. कारण कोरोनाचा विषाणू नाक, घसा याद्वारे थेट फुप्फुसांत पोहोचतो. त्यामुळे अस्थमासारख्या उपचार पद्धतीनं ही लस डायरेक्ट फुफ्फुसात सोडली गेली, तर त्याचा परिणाम अधिक चांगला होईल."

"कोरोनाचा विषाणू नाक, घसा इथल्या पेशींवर हल्ला करतो. त्यामुळे त्या पेशी कमकुवत होतात, त्यांना मजबूत करण्यासाठी याचा फायदा होईल," असंही ते म्हणाले.

संशोधक रॉबिन शटॉक यांनी म्हटलंय, "कोरोनावरची लस तयार करण्यासाठी जगभरातील संशोधक काम करत आहेत. यामुळे लशीच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाशी लढण्यासाठीच्या अँटिबॉडिज तयार होतता का, हे आपणाला कळेल.

"असं असलं तरी चाचण्या नाक, घसा यामध्ये कोरोनाचे विषाणू कसा परिणाम करतात, हे सांगण्याची शक्यता कमीच आहे. एका गटाकडे कोरोनावरची योग्य असली तरी ती देण्याची पद्धत मात्र चुकत आहे, असंही होऊ शकतं आणि असं होत असल्यास यापद्धतीच्याच चाचण्या ते आपल्याला सांगू शकतात," ते पुढे सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)