IPL 2020: अजिंक्य रहाणे खेळताना का दिसत नाहीये?

अजिंक्य रहाणे, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन,

अजिंक्य रहाणे

दिल्ली कॅपिटल्स संघात असूनही अजिंक्य रहाणे खेळताना का दिसत नाहीये असा प्रश्न क्रिकेटरसिकांच्या मनात सातत्याने येतो आहे.

टीम इंडियाचा कसोटी संघाचा उपकर्णधार, राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार, रॉयल्सकरता सर्वाधिक रन्स करणारा अजिंक्य रहाणे खेळत का नाही? असा सवाल क्रिकेटरसिकांना पडला आहे. प्रत्येक मॅचपूर्वी बीबीसी मराठीच्या इन्स्टाग्रामवर हँडलवर आम्ही मॅचचा प्रीव्ह्यू घेऊन येतो. मॅच संपल्यानंतर बीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये भेटतो. मॅचबद्दल गप्पा मारतो, चर्चा करतो. दररोज रहाणे का खेळत नाहीये हा प्रश्न क्रिकेटरसिक विचारतात. रहाणे का खेळत नाहीये याचा घेतलेला आढावा.

लिलावापूर्वी काय घडलं?

राजस्थान रॉयल्सने संघातील खेळाडूंचा आणि त्यांच्या गुणकौशल्यांचा आढावा घेतला. स्टीव्हन स्मिथ, जोस बटलर, संजू सॅमसन संघात आहेत. 20 ओव्हर्समध्ये 4 ते 7 किंवा त्यानंतर येणाऱ्या बॅट्समनला फार संधी मिळते असं नाही. तंत्रशुद्ध बॅटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्यला अंतिम अकरात खेळवता येईल का याचाही त्यांनी विचार केला. बेन स्टोक्स संघात असेल तर रहाणेला खेळवणे अवघड होऊ शकतं हे संघव्यवस्थापनाच्या लक्षात आलं.

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन,

अजिंक्य रहाणे

राजस्थानसाठी खेळताना दमदार प्रदर्शन असूनही अजिंक्य रहाणेला त्यांनी ट्रेडऑफच्या माध्यमातून दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलं. त्याबदल्यात दिल्लीकडून मकरंद मार्कंडेय आणि राहुल टेवाटिया हे फिरकीपटू राजस्थानकडे आले.

अजिंक्यचा आयपीएल प्रवास

सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये रहाणे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र तिथे त्याला अंतिम अकरात खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्याच नाहीत.

प्रयोगशील संघ म्हणून प्रसिद्ध राजस्थान रॉयल्स संघाने रहाणेला ताफ्यात समाविष्ट केलं. राहुल द्रविडच्या बरोबरीने रहाणे राजस्थानसाठी सलामीला येऊ लागला. भरपूर रन्स, अतिशय उत्तम फिल्डिंग यामुळे रहाणे 2012-2015 या कालावधीत राजस्थानचा अविभाज्य घटक झाला.

राजस्थान संघावर दोन वर्षांची बंदीची कारवाई झाल्यानंतर रहाणे 2016-17 अशी दोन हंगांमांसाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळू लागला. नव्या संघाकडून खेळतानाही रहाणेची धावांची भूक मंदावली नाही.

फोटो स्रोत, MANJUNATH KIRAN

फोटो कॅप्शन,

अजिंक्यने रॉयल्ससाठी शतकही झळकावलं आहे.

2018 मध्ये राजस्थानने राईट टू मॅच कार्ड वापरून आणि 4 कोटी रुपये खर्चून रहाणेला ताफ्यात दाखल करून घेतलं. बॉल टेपरिंग प्रकरणात अडकल्याने स्टीव्हन स्मिथ खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. स्मिथच्या अनुपस्थितीत रहाणेने संपूर्ण हंगामात रॉयल्सचं नेतृत्व केलं.

2019 हंगामात प्राथमिक फेरीच्या बहुतांश सामन्यांमध्ये रहाणेनेच रॉयल्सचं नेतृत्व केलं. मात्र स्टीव्हन स्मिथचं आगमन झाल्यानंतर रहाणेकडून नेतृत्व काढून घेऊन स्मिथकडे देण्यात आलं. कर्णधारपद गेलं तरी रहाणेने रन्स करण्याचा वसा सोडला नाही.

2020 हंगामासाठी राजस्थानने रहाणेला दिल्ली कॅपिटल्सला दिलं.

रहाणेची आयपीएलमधली कामगिरी

तेरा वर्षांमध्ये अजिंक्य केवळ एका हंगामात (2010) खेळू शकला नाही. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अजिंक्य अकराव्या स्थानी आहे. टेस्ट स्पेशालिस्ट असा शिक्का बसलेला, ट्वेन्टी-20 प्रकाराला याची शैली साजेशी नाही अशी टीका होत असतानाही रहाणेने तंत्रशुद्ध बॅटिंगद्वारे सातत्याने रन्स टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन,

रहाणे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.

आयपीएल स्पर्धेत, अजिंक्यने 140 मॅचेसमध्ये 32.92ची सरासरी आणि 121.92च्या स्ट्राईकरेटने 3820 रन्स केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. 404 चौकार आणि 74 षटकार रहाणेच्या आक्रमक बॅटिंगची ग्वाही देतात. 15 एप्रिल 2012 रोजी रहाणेने रॉयल्ससाठी खेळताना बेंगळुरूविरुद्ध नाबाद 103 रन्सची खेळी केली होती. गेल्या वर्षी त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105 रन्सची खेळी साकारली होती. इतकी वर्ष आयपीएलमध्ये खेळताना अजिंक्यने 55 कॅच टिपले आहेत. अफलातून फिल्डिंगसाठी तो ओळखला जातो.

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम रहाणेच्याच नावावर आहे.

आयपीएलमध्ये 25 मॅचेसमध्ये रॉयल्सचं नेतृत्व करताना 9 मॅचेसमध्ये संघाने विजय मिळवला तर 16वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकण्याची टक्केवारी 36 टक्के आहे.

दिल्लीची अडचण काय?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत अशा आक्रमक बॅट्समनची फळी आहे. आयपीएलचे सगळे हंगाम खेळणारा धवन सलामीला येत मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचतो. स्थानिक क्रिकेट, रणजी करंडक, U19 अशा विविध टप्प्यांवर सिद्ध केल्यानंतर पृथ्वी शॉ दिल्लीसाठी खेळतो आहे. कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स हे पृथ्वीच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. श्रेयस अय्यरकडे दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा आहे. पल्लेदार षटकार लगावण्यासाठी श्रेयस प्रसिद्ध आहे.

धोनीनंतर विकेटकीपर बॅट्समन म्हणून निवडसमितीची ऋषभ पंतला पसंती आहे. वेगाने रन्स करणं ही ऋषभची खासियत आहे. मोठी धावसंख्या पटावर नोंदवायची असेल तर वेगाने रन्स करणाऱ्या बॅट्समनला प्राधान्य मिळणं साहजिक आहे. सातत्याने षटकार खेचू शकणाऱ्या बॅट्समनना पसंती मिळू शकते. त्यामुळे हे चौघं खेळणं जवळपास निश्चित आहे. 20 ओव्हर्समध्ये बॅट्समनला मिळणाऱ्या संधी मर्यादित असतात. अनेकदा मैदानात उतरल्या लगेच फटकेबाजीला सुरुवात करावी लागते. रहाणे हा पारंपरिक शैलीने खेळणारा बॅट्मसन आहे. त्याला फिनिशरची भूमिका जमेल का? असाही एक प्रवाह आहे.

गेल्या वर्षी टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचे मेन्टॉर होते. रहाणेला संघात घेण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती असं समजतं. मात्र आता गांगुली दिल्लीच्या मेन्टॉरपदी नाहीत. गांगुली आता बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा असल्याने ते आता दिल्ली व्यवस्थापनाचा भाग नाहीत.

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन,

अजिंक्य यंदा दिल्ली संघात आहे.

याव्यतिरिक्त दिल्लीकडे शिमोरन हेटमायरसारखा तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध खेळाडू आहे. बॅटिग-बॉलिंग-फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्या पेलू शकणारा ऑलराऊंडर मार्कस स्टॉनिइस आहे. स्टॉनिइसला पर्याय ठरू शकेल असा कीमो पॉलही दिल्लीकडे आहे. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेला अंतिम अकरात खेळवणं दिल्लीसाठी कठीण आहे. पाटा खेळपट्टीवर फटकेबाजी करणं सोपं ठरू शकतं मात्र बॉलिंगसाठी अनुकूल खेळपट्यांवर खेळताना अजिंक्यचं तंत्र उपयोगी ठरू शकतं याची जाणीव दिल्लीला आहे.

अक्षर पटेल-अमित मिश्रा-रवीचंद्रन अश्विन यांच्यापैकी दोघेजण खेळतातच. कागिसो रबाडा हा दिल्लीचा हुकूमी एक्का आहे. त्याच्या बरोबरीने अँनरिच नोइके छाप पाडतो आहे. तिसऱ्या स्थानासाठी इशांत शर्मा-मोहित शर्मा-अवेश खान यांच्यात चुरस आहे. याव्यतिरिक्त तुषार देशपांडे, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल हेही शर्यतीत आहेत.

विकेटकीपर बॅट्समन अलेक्स कॅरे आणि स्पिनर संदीप लमाचीने हेही संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोच पॉन्टिंगचं काय म्हणणं?

अजिंक्य रहाणे हा एक दर्जेदार बॅट्समन आहे. गेली अनेक वर्ष तो सातत्याने रन्स करतो आहे. मात्र संघ निवडताना तो फर्स्ट चॉईस नसेल असं दिल्लीचे कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी म्हटलं आहे. ट्वेन्टी-20 स्टाईल बॅटिंगसंदर्भात रहाणेबरोबर मी सातत्याने चर्चा करतो आहे. त्याचा उत्तम सराव सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं.

सोशल मीडिया

रहाणे दिल्लीसाठी खेळत नसल्याने असंख्य दर्दी क्रिकेटरसिकांनी टीकाही केली आहे. रहाणेला तुम्ही ताफ्यात दाखल करून घेता आणि खेळवत नाही हे चुकीचं आहे असं असंख्य चाहत्यांचं म्हणणं आहे. खेळवायचं नव्हतं तर मग रहाणेला घेतलं कशाला असा सवालही अनेक चाहते करत आहेत. रहाणे दिल्लीसाठी खेळत नसल्यासंदर्भात माजी खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, SESHADRI SUKUMAR

फोटो कॅप्शन,

अजिंक्य रहाणे

तूर्तास दिल्लीच्या तीनच मॅच झाल्या आहेत. तीनपैकी दोनमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे मात्र अवघड खेळपट्टीवर त्यांना पराभवाला सामना करावा लागला आहे. प्रत्येक संघाला 14 मॅचेस खेळायच्या आहेत. प्लेऑफसाठी चांगल्या रनरेटसह पात्र होण्याचा दिल्लीचा प्रयत्न आहे. दिल्लीने आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. प्राथमिक फेरीच्या 11मॅच अजूनही बाकी आहेत. पुढच्या मॅचेसमध्ये रहाणे खेळताना दिसूही शकतो.

रहाणेचे समकालीन खेळाडू काय करत आहेत?

आयपीएल स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन नावावर असणाऱ्या खेळाडूंमध्ये रहाणेचा समावेश होतो. रहाणेचे समकालीन खेळाडू विविध संघांमधून खेळत आहेत. विराट कोहली बेंगळुरूचा कर्णधार आणि मुख्य बॅट्समन आहे. रोहित शर्मा मुंबईचं नेतृत्व करत आहे आणि ओपनिंगचीही जबाबदारी आहे. शिखर धवन दिल्लीकडूनच खेळतो आहे. चाळिशीकडे झुकलेला महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. मनीष पांडे हैदराबादसाठी खेळतो आहे. रॉबिन उथप्पा राजस्थान संघात आहे. दिनेश कार्तिककडे कोलकाताचं नेतृत्व आहे. अमित मिश्रा दिल्लीसाठी तर पीयुष चावला चेन्नईसाठी खेळत आहेत. धवल कुलकर्णी मुंबईच्या ताफ्यात आहे. त्याला यंदाच्या हंगामात अजून संधी मिळालेली नाही. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)