कमला हॅरिस वि. माईक पेन्स : उपाध्यक्षपदाच्या डिबेटमध्ये कोण जिंकलं?

  • अँथनी झर्कर
  • उत्तर अमेरिका प्रतिनिधी
कमला हॅरिस आणि माईक पेन्स

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतील उपाध्यक्षपदासाठीच्या डिबेटचा म्हणजेच वादविवादाचा कार्यक्रम डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स यांच्यात झाला.

90 मिनिटांच्या या चर्चेमध्ये दोघांनीही काही मुद्दे मजबूतपणे मांडले आणि दोघांकडूनही काही गोंधळ झाले.

गेल्या आठवड्यातल्या डिबेटच्या तुलनेतलं वेगळेपण

गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्षपदासाठीचे उमेदवार असणाऱ्या डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यातला डिबेटचा पहिला कार्यक्रम पार पडला.

या डिबेटदरम्यानची दोन्ही उमेदवारांची वागणूक, आरडाओरडा, एकमेकांवर करण्यात आलेले आरोप या गोष्टींची मोठी चर्चा झाली होती.

ट्रंप यांनी वारंवार बायडन यांचं बोलणं मध्येच तोडलं, आणि बायडन वैतागून त्यांना 'शट अप' म्हणाले.

गेल्या आठवड्यातल्या या घटना उपाध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांच्या लक्षात होत्या.

उतावीळपणे मध्येमध्ये बोलणाऱ्या ट्रंप यांच्या अगदी विरुद्ध अशी पेन्स यांची वागणूक होती. ते अतिशय शांत होते, आणि जेव्हा कधी त्यांनी हॅरिस यांना मध्ये रोखलं, तेव्हा हॅरिस यांच्याकडे त्याचं उत्तर होतं.

"उपाध्यक्ष महोदय, अजून माझं बोलून झालेलं नाही. तुमची हरकत नसेल तर मी माझा मुद्दा पूर्ण करते. मग आपण याविषयी बोलू."

ही चर्चा होती उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उमेदवार आणि एका श्वेतवर्णीय पुरुष उमेदवारामध्ये. त्यामुळेच एरवी शांत असणाऱ्या पेन्स यांनी हॅरिस यांना मध्येच थांबवणं हे काहीसं उद्धट वाटण्याचा धोका पत्करण्यासारखं होतं.

शिवाय या वादविवादाच्या कार्यक्रमाच्या सूत्रधार असणाऱ्या सुझन पेज यांच्या सूचनांनाही त्यांनी अनेकदा दाद दिली नाही आणि बराच वेळ बोलत राहिले.

ट्रंप-पेन्स जोडीच्या विरोधात गेलेल्या महिला मतदारांचा विचार केल्यास बोलण्यासाठीच्या या जास्तीच्या कालावधीची त्यांना राजकीय किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

संपूर्ण चर्चेदरम्यान दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना आक्रमकपणे कोणत्याही मुद्यावर धारेवर धरलं नाही, त्यामुळे या चर्चेतून नवीन फारसं काही समोर आलं नाही किंवा तणावपूर्ण परिस्थितीत हे उमेदवार कसे वागतात हेही समजू शकलं नाही.

कोव्हिडच्या जागतिक साथीचा मुद्दा

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

चर्चेची सुरुवात कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीपासून झाली. आणि कमला हॅरिस यांनी बहुतांश वेळा या मुद्द्यावरूनच पेन्स यांच्यावर टीका करणंही अपेक्षितच होतं. पेन्स यांनी या मुद्यावर बहुतांश काळ बचावात्मक पवित्रा घेतलेला होता.

अमेरिकेतल्या 2 लाख 10 हजार मृत्यूंची आठवण करून देत हॅरिस यांनी ट्रंप प्रशासन ही साथ हाताळण्यास अकुशल आणि असमर्थ असल्याचं म्हटलं.

यावर पेन्स यांचं उत्तर तयारच होतं. बायडन- हॅरिस यांनी मांडलेली योजना ही ट्रंप प्रशासनाच्या धोरणांची नक्कल असल्याचं सांगत त्यांनी लस तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांतला वेग आणि प्रशासनाने उचललेल्या इतर पावलांविषयी सांगितलं.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द व्हाईट हाऊस कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं, यावर चर्चा करण्यात दोन्ही उमेदवारांनी फार काळ खर्ची घातला नाही. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा हॅरिस यांनी न हाताळताच सोडून दिला आणि चर्चा लवकरच दुसऱ्या मुद्द्यावर वळली.

सध्याच्या जनमत चाचण्यांनुसार ट्रंप प्रशासनाने ज्या प्रकारने ही परिस्थिती हाताळली त्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे. आणि असं असताना हा मुद्दा फारसा वरचढ होऊ न देणं, हा पेन्स यांचा विजय म्हणायला हवा.

फोटो स्रोत, Reuters

हवामान बदल आणि वर्णभेदाचा मुद्दा

साथीच्या बाबत बॅकफुटवर असणाऱ्या पेन्स यांनी पर्यावरणाच्या मुद्यावरून हॅरिस यांच्यावर हल्ला केला. जो बायडन यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान पर्यावरण बदलाच्या - क्लायमेट चेंजच्या मुद्द्याला महत्त्वं दिलेलं आहे.

कार्बन उत्सर्जनाविषयी पावलं उचलण्याचं बायडन - हॅरिस यांनी म्हटलंय. पण पेन्सेलव्हेनिया आणि ओहायो सारख्या स्विंग स्टेट्स असणाऱ्या राज्यांमधले मतदार याकडे त्यांच्या रोजगारावरचे निर्बंध म्हणून पाहतात. पेन्स यांनी हाच मुद्दा उचलून धरला.

वर्णभेद आणि कायदा - सुव्यवस्था या मुद्द्यांवरून हॅरिस - पेन्स यांच्यात खडाजंगी झाली.

ट्रंप यांच्याप्रमाणेच पेन्स यांनीही चर्चा या मुद्द्यावरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतल्या विविध शहरांमध्ये वर्णभेदाच्या विरोधात उफाळून आलेली निदर्शनं मोडून करण्यात आलेला बळाचा वापर आणि असमानता या मुद्द्यांवर ही चर्चा होती. आपला अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास असून या देशात वर्णभेद आहे, असं म्हणणं म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणाऱ्या सगळ्यांचा अपमान असल्याचं पेन्स यांनी म्हटलं.

सॅन फ्रान्सिस्कोच्या फिर्यादी वकील (Prosecutor) आणि कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी म्हणून काम केलेल्या कमला हॅरिस यांनी हा मुद्दा त्वेषाने खोडून काढला.

"मी इथे बसून उपाध्यक्षांकडून या देशासाठी कायद्याचं महत्त्वं काय आहे, यावरचं व्याख्यान ऐकणार नाही," त्या म्हणाल्या.

अगदी गेल्या आठवड्याच्या डिबेटपर्यंतही ट्रंप यांनी श्वेतवर्णीय वर्चस्ववाद्यांचा स्पष्टपणे आणि विचारपूर्वक निषेध केला नसून 'आपल्या राष्ट्राध्यक्षपदी अशी व्यक्ती' असल्याचं हॅरिस यांनी म्हटलं.

या मुद्द्यावर चर्चा होत असताना माईक पेन्स यांच्या डोक्यावर एक माशी येऊन बसली होती, आणि कदाचित यावरून पुढचे काही दिवस चर्चा होत राहील.

उमेदवारांचं भविष्य

ही चर्चा पाहणाऱ्यांना अमेरिकन राजकारणाचा वर्तमान आणि भविष्यकाळ पहायला मिळाला.

सध्याच्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही उमेदवार आपल्या जोडीदाराची बाजू सावरून धरत असले तरी त्यांचं लक्ष्य नोव्हेंबरनंतरच्या भविष्याकडेही आहे.

इतर अनेक उपाध्यक्षांप्रमाणेट पेन्स यांचा डोळा त्यांच्या स्वतःच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीवर आहे. आणि तसं करण्यासाठी त्यांना ट्रंप यांचा मतदार वर्गही जिंकून घ्यावा लागेल.

या संपूर्ण डिबेटदरम्यान त्यांनी ट्रंप यांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केलाच पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचाही प्रयत्न केला.

कमला हॅरिस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी स्वतः राष्ट्राध्यक्ष पदासाठीची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. आणि जो बायडन यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर आपण डेमोक्रॅटिक पक्षाची धुरा सांभाळायला सक्षम असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या चर्चेदरम्यान केला.

संधीचा फायदा घेत त्यांनी त्यांचं बालपण आणि पार्श्वभूमी याबद्दल बोलत अमेरिकन प्रेक्षकांना स्वतःची ओळख करून दिली. पेन्स यांच्या अगदी विरुद्ध वागत त्या अनेकवेळा थेट कॅमेऱ्यात पाहात बोलल्या. एखाद्या मुद्द्यासाठीचे गुण मिळवत असतानाच ही चर्चा पाहणाऱ्या लोकांनी कनेक्ट होणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांना पक्कं माहीत होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)