कोरोना : 432 वर्षांपूर्वी कोणत्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम बनवले गेले?

  • झरिया गोरवेट
  • बीबीसी फ्युचर
Bildagentur-online/Alamy

फोटो स्रोत, Bildagentur-online/Alamy

भयंकर भाकित वर्तवल्यासारखं वाटावं, अशी भावना ही पुस्तिका वाचताना होते. लोकांनी परस्परांपासून सहा फूट अंतर राखावं, हस्तांदोलन करू नये आणि घरातल्या एका व्यक्तीला बाजारहाट करण्यासाठी पाठवावं, असे सल्ले या नियमपुस्तिकेत देण्यात आले आहेत.

नोव्हेंबर 1582. मध्यरात्रीची वेळ. सार्डिनिअ बेटातील अल्गेरो बंदरामध्ये गोदीवर उभा राहून एक खलाशी शहराकडे शेवटचा दृष्टिक्षेप टाकत होता.

हा दुर्दैवी नाविक भूमध्य समुद्रापार 447 किलोमीटर दूर असलेल्या मार्सेलिसहून आल्याचं कळलं होतं. तिकडे वर्षभर प्लेगने थैमान घातलेलं- आणि हा खलाशी सोबत प्लेग घेऊनच आला असावा. आधीच तो बुद्धिभ्रम झाल्यासारखं बोलत होता, शिवाय या आजाराचं वैशिष्ट्य असलेली सूजही त्याच्या जांघेच्या भागात आलेली होती- ही सूजच प्लेगची गाठ म्हणून परिचित होती.

तरीही, या खलाशाने प्लेगच्या राखणदारांना- किंवा मॉर्बरांना- गुंगारा देण्यात यश मिळवलं होतं. प्लेगची काहीही लक्षणं दिसणाऱ्यांना थांबवायचं, हे या राखणदारांचं काम होतं. तर त्यांनी नजर चुकवून हा खलाशी शहरात शिरला. काहीच दिवसांमध्ये तो मरण पावला आणि प्लेगचा प्रादुर्भाव सुरू झाला.

या टप्प्यावर अल्गेरोमधल्या अनेक लोकांचा सर्वनाश सुरूच झालेला होता. तत्कालीन अधिकृत आकडेवारीनुसार, या साथीच्या आजारात 6 हजार लोकांचा मृत्यू झाला आणि बेटावरील केवळ 150 लोक जिवंत राहिले, असा अंदाज अठराव्या शतकातील एका इतिहासकाराने वर्तवला हे. वास्तविक या साथीने शहरातील 60 टक्के लोकसंख्या मरण पावल्याचं मानलं जात होतं. (तत्कालीन सरकारने कर टाळण्यासाठी ही अतिशयोक्ती केलेली असू शकते). मृतांचं सामूहिक दफन व्हायला लागलं, त्यातील काही अजूनही टिकून आहे- एका वेळी 30 लोकांची हाडं तिथल्या खंदकांमध्ये भरून जायची.

पण परिस्थिती याहून भीषण होण्याची शक्यता होती. आजूबाजूचे जिल्हे बहुतांशाने या साथीपासून मुक्त राहिले. साथ अल्गेरोमध्येच राहिली आणि आठ महिन्यांमध्ये निघून गेली. हे एका माणसामुळे आणि त्याने मांडलेल्या सामाजिक अंतराच्या भविष्यवेधी संकल्पनेमुळे घडल्याचं मानलं गेलं.

"या काहीशा संकुचित शहरात इतका ज्ञानी डॉक्टर होता ही थोडी धक्कादायक बाब आहे," असं ओस्लो विद्यापीठातील इतिहासाचे सन्मान्य प्राध्यापक ओली बेनेडिक्टाउ सांगतात. या विषयावरील एका शोधनिबंधाचं सह-लेखन त्यांनी केलं आहे. "पिसा आणि फ्लोरेन्स अशा मोठ्या व्यापारी शहरांमध्ये साथीविरोधातील उपाययोजना अधिक कडकपणे अंमलात आल्या असतील, अशी आपली अपेक्षा असते. पण हा डॉक्टर त्याच्या काळापुढचं पाहत होता, ही लक्षणीय बाब आहे."

जिवंत कोंबड्या आणि लघवी

इतिहासातील सर्वांत कुख्यात प्लेगची साथ 1346 साली येऊन गेली. युरोप व आशिया खंडांमध्ये मिळून अंदाजे पाच कोटी लोकांचा मृत्यू या साथीत झाला. ही साथ 'काळा मृत्यू' म्हणून ओळखली गेली.

अल्गेरो

फोटो स्रोत, Milosz Galezowski/EyeEm/Getty Images

फोटो कॅप्शन,

अल्गेरो

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

भविष्यातील पिढ्यांना या विध्वंसाची कल्पना येणार नाही, असं फ्लोरेन्समधला इटालियन कवी फ्रान्सेस्को पेत्रार्का याला वाटलं.

त्याने लिहिलं होतं: "आनंदात राहणाऱ्या भावी पिढ्यांना इतका भयंकर नाश अनुभवायला मिळणार नाही आणि आमच्या साक्षींकडे ते आख्यायिका म्हणून पाहतील." आज बोगदे खणले जातात तेव्हा प्लेगला बळी पडलेल्यांचे अवशेष नियमितपणे सापडत असतात. लंडनमध्ये क्रॉसरेलसाठी खोदकाम सुरू होतं, तेव्हाही असे अवशेष सापडले. एकट्या फॅरिंग्डन भागाखाली 50 हजार शरीरं लुप्त झाल्याचं उपलब्ध नोंदींवरून दिसतं.

प्लेगची साथ पुन्हा कधीच इतक्या महाविध्वंसक रितीने पसरली नाही, पण पुढची काही शतकं ती नियमितपणे येत राहिली. पॅरिसमध्ये 1670 सालपर्यंत दर तीन वर्षांतून एकदा प्लेगची साथ येऊन जात असे, असं सांगितलं जातं. 1563 साली लंडनमधील 24 टक्के लोकसंख्या प्लेगला बळी पडल्याचं मानलं जातं.

आधुनिक विज्ञानाचं आगमन होण्यापूर्वीचा हा काळ होता. आजार 'खराब हवे' मुळे होतात अशी समजूत तेव्हा प्रचलित होती आणि व्हिनेगर हेच सर्वांत प्रगत अँटिसेप्टिक होतं. स्वतःच्या लघवीने आंघोळ करणं यांसारख्या ओंगळ प्रकारांपासून ते जिवंत कोंबडीचं ढुंगण प्लेगच्या गाठीवर घासून त्यातलं 'विष' बाहेर काढायचा प्रयत्न करणाऱ्या विचित्र प्रकारांपर्यंत विविध गोष्टी उपचाराखाली केल्या जात होत्या.

प्लेगसंबंधीचं ज्ञान

बेनेडिक्टाउ आणि त्यांच्या सह-लेखकांनी नमूद केल्याप्रमाणे, अल्गेरो शहर साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी समर्थ नव्हतं. शहरातील स्वच्छतेची व्यवस्था धड नव्हती, मोजकेच डॉक्टर होते व त्यांचं प्रशिक्षण चांगल्या दर्जाचं नव्हतं आणि तिथली वैद्यकीय संस्कृती "मागास" होती. त्यामुळे साथीला तोंड देणं त्यांच्यासाठी अवघड होतं.

पण तिथे क्विन्तो तिबेरिओ अॅन्जेलेरिओ हा पन्नाशीतला डॉक्टर- प्रोटोमेडिक्स¬- राहत होता. उच्चवर्गीय क्विन्तो यांचं प्रशिक्षण परदेशात झालेलं होतं, कारण त्या वेळी सार्दिनिअमध्ये विद्यापीठंच नव्हती. क्विन्तो नुकतेच सिसिलीहून आले होते, हे अल्गेरोच्या रहिवाशांचं नशीबच होतं. सिसिली शहराने 1575 साली प्लेगच्या साथीला यशस्वी तोंड दिलं होतं.

अल्गेरोमध्ये पहिल्या रुग्णाला गाठी दिसल्या, त्यानंतर मरण पावलेल्या दोन स्त्रियांच्या अंगावर विशिष्ट प्रकारच्या जखमा होत्या- हेही प्लेगचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. अॅन्जेलेरिओ यांना हे काय होऊ घातलंय याचा तत्काळ अंदाज आला. त्यांनी लगोलग रुग्णांच्या विलगीकरणाची परवानगी मागितली, पण वारंवार त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले- पहिल्यांदा संदिग्ध भूमिका घेणाऱ्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली, त्यानंतर प्रतिनिधीगृहाने त्यांचा अहवाल फेटाळला आणि प्रलयाचा भास होत असल्याने ते अशी मागणी करत आहेत अशी निर्भत्सना केली.

अॅन्जेलेरिओ अस्वस्थ झाले. "व्हाइसरॉयकडे जाण्याचं धाडस किंवा निर्भीडपणा त्यांच्यात होता," असं बेनेडिक्टाउ सांगतात. त्यांच्या सहमतीने अॅन्जेलेरिओ यांनी शहराच्या भिंतींभोवती तिहेरी आरोग्य साखळी उभारली, जेणेकरून बाहेरच्या लोकांशी व्यवहार थोपवता येईल.

हे उपाय लोकांना अजिबात पसंत पडले नाहीत आणि अॅन्जेलेरिओ यांना जाहीररित्या ठेचून मारायची लोकांची इच्छा होती. पण अधिकाधिक लोकांचा मृत्यू होऊ लागल्यावर लोक भानावर आले आणि त्यांनी साथ आटोक्यात आणण्याच्या कार्यासाठी पूर्णतः अॅन्जेलेरिओ यांच्यावर भरवसा ठेवला. काही वर्षांनी त्यांनी Ectypa Pestilentis Status Algheriae Sardiniae या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली, त्यात अल्गेरोमध्ये त्यांनी अंमलात आणलेल्या 57 नियमांची तपशीलवार नोंद केलेली होती. त्यांनी केलेल्या उपाययोजना अशा होत्या:

टाळेबंदी

एक, नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये किंवा एकमेकांच्या घरी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला. त्यानुसार अॅन्जेलेरिओ यांनी सर्व बैठका, नृत्याचे कार्यक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रम बंद ठेवायचे आदेश दिले आणि बाजारहाट करण्यासाठी प्रत्येक घरातून केवळ एकाच व्यक्तीने बाहेर पडावं, असा सक्तीचा नियम घालून दिला. आजच्या साथीच्या काळातील निर्बंधांशी अगदीच साधर्म्य सांगणारा हा नियम होता.

प्लेगची साथ

फोटो स्रोत, Pictorial Press/Alamy

टाळेबंदी केवळ अल्गेरोमध्येच लागू केली गेली होती असं नाही. "उदाहरणार्थ- 1631 सालच्या वसंतात फ्लोरेन्स शहरात संपूर्ण विलगीकरण लागू करण्यात आलं होतं," असं 'बर्कबेक, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन'मधील इटालियन रेनेसाँ इतिहासाचे प्राध्यापक जॉन हेन्डरसन म्हणतात आणि आजच्यासारखंच तेव्हाही नियमभंग सर्रास होत होता.

"1630 च्या उन्हाळ्यापासून 1631च्या उन्हाळ्यापर्यंत, वर्षभराच्या कालावधीत सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 550 वेगवेगळ्या घटनांमध्ये लोकांना दंड झाल्याचं मला आढळलं," असं हेन्डरसन म्हणतात. बहुतांश काळ शहरात पूर्ण टाळेबंदी नव्हती, पण एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला प्लेग असल्याचा संशय असेल आणि तिला रुग्णालयात नेले असेल, तर त्या घरातील लोकांनी 40 दिवस स्वतःला विलग ठेवणे अपेक्षित होते. "Quarantine" हा शब्द इथूनच आला. इटालियनमधील "quaranta giorni" या मूळ शब्दप्रयोगाचा अर्थ "40 दिवस" असा आहे.

"लोक स्वाभाविकपणे अस्वस्थ झाले," हेन्डरसन सांगतात. स्मार्टफोन, स्ट्रिमिंग सेवा, किंवा अगदी किफायतशीर किंमतीमधील पुस्तकं, असं काहीच नसलेला तो काळ होता. तरीही लोकांनी घरातच बंदीवास सहन करत कंटाळ्यावर मात करण्याचे काही अभिनव मार्ग शोधून काढले. "टाळेबंदीच्या काळात लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद कसे दिले, याचा असामान्य जिवंत वृत्तान्त निरनिराळ्या न्यायालयीन खटल्यांमधून मिळतो."

काही वेळा लोक कमनशिबी ठरल्याचं दिसतं: एका खटल्यातल्या नोंदीनुसार, घरातून रस्त्याकडे पळत गेलेली कोंबडी पकडायला एक बाई धावत रस्त्यापर्यंत आली. "कोंबडी पकडून ती घरी धावत परत जात असताना, आरोग्य मंडळाच्या एका सदस्याने तिला बघितलं नि प्लेगसंबंधीचे नियम मोडल्याबद्दल अटक केलं," असा एक दाखला हेन्डरसन सांगतात. तिला तुरुंगात ठेवण्यात आलं, पण लवकरच एका सहानुभूती राखणाऱ्या न्यायाधीशाने तिची सुटका केली. तिचा गुन्हा अगदीच मामुली असल्याचं न्यायाधीशाने स्पष्ट केलं.

दुसऱ्या एका खटल्यामध्ये एका महिलेने खालच्या मजल्यावर राहणाऱ्या मुलाकडे दोरीने टोपली सोडली, त्यात तिच्या मुलाने मोज्यांचे फाटलेले जोड ठेवले- ते शिवून घ्यायचे होते, मग त्या बाईने टोपली वर खेचली. "तेवढ्यात आरोग्य मंडळाचा अधिकारी तिथे आला, ती काय करतेय हे त्याने पाहिलं होतं, मग त्याने तिला तुरुंगात नेऊन ठेवलं," असं हेन्डरसन सांगतात.

पण इतर लोकांचे गुन्हे शिक्षा करण्यासारखेच होते. "काही लोक संसर्ग झालेल्या घरांच्या गच्च्यांवर चढून गेले- तिथे मित्रांना भेटून गिटार वाजवायची, सोबत दारू प्यायची, असं त्यांनी ठरवलेलं असायचं. परस्परांच्या घरात जाऊ नये, हा प्लेगसंबंधीचा नियम यात मोडला जात होता," हेन्डरसन म्हणाले.

शारीरिक अंतर

त्यानंतर सहा फूट अंतर राखायचा नियम होता. अॅन्जेलेरिओ यांनी अशी सूचना केली की, (या सूचनेचं इंग्रजी भाषांतर बेनेडिक्टाउ यांच्या सहकाऱ्यांनी केलं)- "बाहेर जाण्याची मुभा असलेल्या लोकांनी स्वतःसोबत सहा फूट लांब काठी ठेवायलाच हवी. लोकांनी एकमेकांपासून एवढं अंतर राखणं अनिवार्य आहे."

सामाजिक अंतर राखण्याच्या धोरणासंदर्भात अॅन्जेलेरिओ किती कुशल होते, याची साक्ष यातून मिळते. मी ज्या-ज्या तज्ज्ञांनी बोलले, त्यापैकी कोणीही या घडामोडीबद्दल कधी इतर कुठे ऐकलं नव्हतं. तरीही, कोव्हिड-19 साथीच्या सुरुवातीला जगभरातील अनेक देशांमध्ये अॅन्जेलेरिओ यांच्या सूचनेशी विलक्षण साधर्म्य राखणारं धोरण राबवण्यात आलं. शक्य असेल तिथे लोकांनी एकमेकांपासून दोन मीटरांचं (6.6 फूट) अंतर राखावं, अशी शिफारस जगभरात प्रशासनांनी केली.

social distancing

फोटो स्रोत, amie Lawton/Getty Images

युनायटेड किंगडम, फ्रान्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया व जर्मनी यांसह अनेक ठिकाणी किमान अंतर एक किंवा दीड मीटर इतकं कमी करण्यात आलं. पण सोळाव्या शतकातील अॅन्जेलेरिओ यांचं धोरण विज्ञानाच्या दृष्टीने अधिक रास्त असण्याची शक्यता दिसते: एका अभ्यासात नोंदवलेल्या अंदाजानुसार, कोव्हिड-19 चा संसर्ग होण्याचा धोका दोन मीटरच्या तुलनेत एक मीटर अंतर राखल्यावर दोन ते दहा पट अधिक असू शकतो.

शिवाय, अॅन्जेलेरिओ यांनी यापुढे जाऊन उपाययोजना केल्या होत्या. लोकांना अंतर राखण्याची आठवण राहावी यासाठी अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांच्या काउन्टरजवळ एक मोठा कठडा - किंवा parabonda- घालून घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. सामूहिक प्रार्थनेच्या वेळी हस्तांदोलन करताना लोकांनी काळजी घ्यावी, अशीही शिफारस त्यांनी केली.

"त्यांनी साथीविरोधात उपाययोजना करताना उद्दिष्टावर (तत्कालीन इतर डॉक्टरांच्या तुलनेत) अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं," असं बेनेडिक्टाउ म्हणतात. "हा प्रमाणाशी संबंधित मुद्दा असावा, शिवाय आवश्यक उपाययोजनांची समजूत त्यांना खूप आधी आली."

बाजारातून आणलेल्या वस्तू धुवून घेणं

प्रबोधनकाळ (रेनेसाँ) मुख्यत्वे अभिजात तत्त्वज्ञान, साहित्य व विशेषतः कला यांचं सुवर्णयुग मानला जातो. या काळात मायकलँजेलो, डोनातेल्लो, राफेल आणि लिओनार्दो (दा व्हिन्ची)- हे इटालियन कलावंत आहेत, निन्जा टर्टलांची ही नावं नव्हेत- यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या प्रतिभेने आपापल्या क्षेत्रात परिवर्तन घडवलं. शिवाय, या कालखंडात आपल्या वैज्ञानिक आकलनानेही मोठी झेप घेतली.

सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याचा शोध भौतिकशास्त्रवेत्ता निकोलस कोपर्निकसने लावला, आणि पॅराशूट, हेलिकॉप्टर, सशस्त्र वाहनं, आणि आरंभिक काळातील यंत्रमानव यांच्या रचनांसाठीचे आराखडे दा व्हिन्ची काढत होता- असा हा कालखंड. त्यानंतर सन 1500 च्या आसपास आघाडीच्या विचारवंतांनी अशी संकल्पना मांडली की, 'खराब हवे'मुळे आजार होतात. या दूषितपणाचा संसर्ग झालेल्या वस्तूंना स्पर्श केल्यामुळे लोक आजारी पडत असतील ही शक्यता त्यांनी मांडली.

"प्रबोधनकाळाचा उदय आणि आजार कसे पसरतात हे जाणून घेण्याची सोळाव्या शतकातील लोकांची क्षमता यांच्यात संबंध असल्याचं मला वाटतं," असं बेनेडिक्टाउ म्हणतात.

"आजार संपर्कातून व संबंधांतून पसरतात, हे अॅन्जेलेरिओ यांना कळलं होतं." लोकांनी आपल्या घरांचं निर्जंतुकीकरण करावं, रंगसफेती करावी, हवा खेळती ठेवावी आणि घरांना 'पाणी द्यावं', अशी सूचना त्यांनी दिली होती. विशेष मोल नसलेल्या वस्तू जाळून टाकाव्यात, तर महागडं फर्निचर धुवावं, वारा लागेल असं ठेवावं किंवा त्याचं निर्जंतुकीकरण करून घ्यावं.

त्यावेळी वस्तू येतील तसतसं त्यांचं निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत होती- विशेषतः जहाजांवरून येणाऱ्या मालाबाबत हे तत्त्व लागू केलं जात असे. "कापड ही सर्वांत धोकादायक वस्तूंपैकी असल्याचं त्यांना वाटत होतं," असं लीड्स विद्यापीठातील प्रारंभिक आधुनिक युरोपाचे सामाजिक व सांस्कृतिक इतिहासकारक अॅलेक्स बाम्जी म्हणतात. "पण पत्रांसह सर्व प्रकारच्या वस्तूंचं निर्जंतुकीकरण केलं जात असे," असं त्या सांगतात. अशा काही कृतींच्या खुणा मागे राहिल्याचं आजही दिसतं.

"वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी धूर व जाळ वापरण्यात आला असेल, तर काही वस्तूंवर थोडंफार जळाल्याच्या खुणा दिसतात."

Archaeologists found traces of 660-year-old bacteria in the skeletons of plague victims unearthed by the Crossrail project in London

फोटो स्रोत, Amer Ghazzal/Alamy

आरोग्यविषयक पासपोर्ट

शहरात प्रवेश करू पाहणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्या काळजीपूर्वक तपासणी करणं, हा प्लेगला प्रतिबंध करण्याचा एक लोकप्रिय मार्ग होता. ही व्यवस्था अल्गेरोमध्ये यशस्वी ठरली नाही- 1582 साली पहिला संसर्ग झालेला रुग्ण बंदरावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना गुंगारा देऊन शहरात पोचलाच. त्या वेळी युरोपात हे इतर ठिकाणीही सर्रास दिसत होतं.

काही वेळा प्रशासन प्रत्यक्ष कागदपत्रं देऊन संबंधित धारकाला प्रवेशद्वारातून आत यायची परवानगी मिळत असे. ती व्यक्ती प्लेगमुक्त असल्याचं प्रमाणित केल्यामुळे किंवा योग्य लोकांशी ओळख असल्याच्या कारणावरून त्यांना प्रवेश मिळत असे.

"तर, तुम्ही प्रवासी असाल, आणि तुम्हाला व्यवसायासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागत असेल- त्यात तुमच्या शहरामध्ये प्लेग पसरलेला असेल किंवा प्लेगची लागण झालेल्या शहरात तुम्ही प्रवास करून जाणार असाल- तर तुम्हाला आरोग्यविषयक पासपोर्ट घ्यावं लागत असे," असं स्टर्लिंग विद्यापीठातील इतिहासाचे सहायक प्राध्यापक फिलिप स्लॅव्हिन म्हणतात.

कोव्हिड-19 साथीची सुरुवात झाली तेव्हा "आरोग्यविषयक पासपोर्ट"ची संकल्पना पुनरुज्जीवित करण्यात आली. अलीकडे लंडन, न्यूयॉर्क, हाँगकाँग व सिंगापूर यांसह अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 'कॉमनपास' ची चाचणी घेतली जाते आहे. संबंधित वापरकर्त्याच्या चाचणीचा निकाल व लसीकरणाच्या नोंदी दाखवणारा हा डिजिटल दस्तावेज आहे. पासधारकारच्य संदर्भात संसर्गाची स्थिती काय आहे याची चटकन खातरजमा करून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुरक्षित व अधिक कार्यक्षम करण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.

विशेष म्हणजे रोगप्रतिकारकतेची वैज्ञानिक संकल्पना उदयाला यायच्या कित्येक शतकं आधी अल्गेरोमधील साथ आली होती, तरीही अॅन्जेलेरिओ यांनी प्लेगची लागण होऊनही त्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या लोकांना विशिष्ट कामं दिली होती. थडगी खोदण्यासाठी या गटातील लोकांना घ्यावं, असा आदेश त्यांनी काढला. हे काम अत्यंत जोखमीचं होतं, कारण मृत्युशय्येवर असलेल्या रुग्णांजवळ 'कन्फेशनल बूथ' घेऊन जाणं आणि मग अर्थातच मृतांची शरीरं दफनभूमीकडे घेऊन जाणं, ही कामं त्यांना करायची असत.

विलगीकरण

प्लेगचा संसर्ग झाल्याची शंका असलेल्या लोकांचं विलगीकरण करण्याचं धोरण पहिल्यांदा राबवणाऱ्यांमध्ये इटलीचा समावेश होतो. तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात हे धोरण राबवण्यात आलं. प्लेगचं पहिलं रुग्णालय- lazaretto - 1423 साली व्हेनिस इथे उघडण्यात आलं आणि लवकरच तिथे संसर्ग झालेले रुग्ण, संसर्गातून बरे होत आलेले रुग्ण आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले लोक यांच्यासाठी वेगवेगळे सुविधाकक्ष ठेवण्यात आले. सालापर्यंत या शहरात सुमारे 8 हजार लोक संसर्ग झालेल्या रुग्णांच्या कक्षात जमा झाले होते, आणि बऱ्या होत आलेल्या रुग्णांच्या कक्षात सुमारे 10 हजार रुग्ण होते.

अखेरीस प्लेगच्या आजारावर उपचार करण्यासाठी हे इटालियन रुग्णालय आदर्श प्रारूप मानलं जाऊ लागलं. सार्डिनिअसह इटलीत इतर विविध ठिकाणी अशी रुग्णालयं उभी राहिली. ही अंशतः रुग्णालयं होतं, अंशतः तुरुंग होती- त्यात विलगीकरणाची सुविधा सर्वसाधारणतः अनिवार्य ठेवलील असायची, आणि काही वेळा शहरातील प्लेगसंदर्भातील सुरक्षारक्षक रुग्णांना थेट तिथे घेऊन जात.

"या रुग्णालयांकडे सकारात्मकतेने पाहिलं जात नव्हतं- लोक अनेकदा त्यांचं वर्णन 'नरकसदृश' असं करत असत," असं बाम्जी म्हणतात. पण रुग्णालयातील वास्तव परिस्थितीपेक्षा तिथे जाणं कलंकित मानलं जात असल्यामुळे हे वर्णन केलं जात असण्याची शक्यता जास्त आहे, असा इशाराही त्या नोंदवतात.

"या रुग्णालयांवर प्रचंड पैसा खर्च केला जात होता- हा एक नोंदवण्याजोगा मुद्दा," असं बाम्जी म्हणतात. "तिथलं अन्न खूप चांगलं होतं, याचा पुरावा मिळतो." या रुग्णालयांमध्ये राहिलेल्यांपैकी अर्धे लोक मरण पावले, पण अर्थातच उर्वरित अर्धे लोक बरे होऊन आपापल्या घरी गेले- उर्वरित लोकसंख्येच्या तुलनेत या मृत्युदराचा विचार करता येतो.

अॅन्जेलेरिओ यांनी नमूद केल्यानुसार अल्गेरोमधील प्लेग रुग्णालय लक्षणीयरित्या सुव्यवस्थित होतं. पलंग, फर्निचर आणि अन्न यांसारखी कोणतीही वस्तू त्या संस्थेत आणली किंवा संस्थेतून बाहेर नेली, तरी त्याचा माग ठेवण्याचं काम प्लेगसंदर्भातील सुरक्षारक्षक करत होते. समाजातील गरीब लोकांना उपचारासाठी पैसे द्यावे लागत नसत. आजारी रुग्णांना काही वेळा तिथून त्यांच्या घरी नेलं जात असे, तर अनाथ बालकांना स्तनपान देण्यासाठी नर्स उपलब्ध नसेल तेव्हा "चांगला खुराक असलेल्या शेळ्यां"चं दूध या मुलांना बाटलीतून दिलं जात असे. या शेळ्यांना रुग्णालयाच्या आवारामध्ये मोकळेपणाने फिरायची मुभा होती.

मृत मांजरं

सोळाव्या शतकात साथीच्या आजारांविरोधात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि आज केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांच्यातील साधर्म्य कितीही असलं, तरी त्यात काही कळीचे भेदही आहेत.

प्रबोधनकालीन सार्डोनिअमध्ये अॅन्जेलेरिओ यांच्या साथप्रतिकारक योजनांमध्ये अंधःश्रद्धा व धर्म यांना महत्त्वाचं स्थान होतं. प्लेग ही ईश्वरी शिक्षा आहे, त्यामुळे लोकांनी सर्वोत्तम नैतिक वर्तन ठेवावं असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या काही सूचना अपरिणाकारक होत्या आणि बुचकळ्यातही पाडणाऱ्या होत्या.

The Lazzaretto Nuovo was built on an island next to Venice in 1468, as a place to quarantine incoming ships and cargo

फोटो स्रोत, AlFA Visuals/Alamy

"टर्की कोंबड्या आणि मांजरं यांना मारून समुद्रात फेकून द्यावं," अशी एक सूचना त्यांनी दिली होती. साथीच्या रोगावरची ही आश्चर्यकारस प्रतिक्रिया सर्रास आढळत असे. लेखक डॅनिएल डफो यांनी नमूद केल्यानुसार, लंडनमध्ये 1665 सालच्या प्लेगवेळी, 40 हजार कुत्र्यांची व 2 लाख मांजरांची कत्तल करायचा आदेश महापौरांनी दिला होता. या कामासाठी कुत्रे मारण्यात कुशल असलेल्यांची विशेष नेमणूक करण्यात आली.

परंतु, शहरातील भटक्या प्राण्यांची अशी सरसकट कत्तल केल्याने अपेक्षित परिणाम होण्याऐवजी उलटाच परिणाम झाला असण्याची शक्यता आहे- कारण उंदीर प्लेगचे वाहक असल्याचं स्पष्ट होतं. (काही शहरांमध्ये थेट उंदरांवरही कत्तलीची कारवाई झाली, पण अॅन्जेलेरिओ यांच्या वृत्तान्तात त्याचा उल्लेख नाही).

आता 2020 सालातील साथीचा विचार करू. मांजरं व कुत्रे यांना कोव्हिड-19 चा संसर्ग होऊ शकतो, याचा ठोस पुरावा मिळाला असतानाही त्यांच्यावर आधीसारखंच प्रेम केलं जातंय. पाळीव प्राणी दत्तक देणाऱ्या अनेक संस्थांनी अलीकडच्या काही महिन्यांमध्ये विक्रमी नोंदणी झाली. ऑस्ट्रेलियातील आरएसपीसीए या संस्थेच्या शाखेत कोरोनाची साथ पसरल्यापासून 2 लाख अर्ज आले.

बेनेडिक्टाउ यांच्या मते, प्लेग आणि कोव्हिड-19 यांच्यातली तुलना काहीशा साशंकतेने करायला हवी. "प्लेगची साथ खूप जास्त भीषण होती आणि त्यातील मृत्युदर अकल्पनीय होता," असं ते म्हणतात. "विविध शहरातील किंवा जिल्ह्यातील60 टक्के आणि काही ठिकाणी 70 टक्के लोकांना प्राण गमवावे लागले होते."

मग अल्गेरोमधल्या रहिवाशांचं काय झालं? तिथली साथ आठ महिने टिकली आणि मग शहरात पुढील 60 वर्षांत प्लेग आला नाही- पण तो आला तेव्हा तिथले लोक सर्वांत आधी अॅन्जेलेरिओ यांच्या नियमपुस्तिकेकडे वळले. 1652 सालच्या साथीवेळीही डॉक्टरांनी या नियमपुस्तिकेचं शब्दशः अनुसरण केलं. विलगीकरण केलं गेलं, वस्तूंचं व घरांचं निर्जुंतुकीकरण होऊ लागलं आणि शहराभोवती आरोग्य साखळी उभारण्यात आली.

सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी अल्गेरोमध्ये आलेल्या दुर्दैवी खलाशाने साथीची सुरुवात केली असली, तरी त्याच्या निमित्ताने आणखीही काही गोष्टींची सुरुवात झाली: स्वच्छता व सामाजिक अंतर यांच्यासाठीची एक सर्वांगीण स्वरूपाची मार्गदर्शकपुस्तिका यातूनच लिहिली गेली- आणि ती तिच्या काळाच्या खूप पुढचा विचार करणारी ठरली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)