अफगाणिस्तानात मुलींच्या गायनावरील बंदीचा तपास होणार

प्रतिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रतिनिधिक छायाचित्र

अफगाणिस्तानातील 12 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींना सार्वजनिक ठिकाणी गायनास बंदी घालणाऱ्या आदेशाची चौकशी केली जाईल, असं अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. राजधानी काबुल येथील शिक्षण विभागाच्या संचालकांनी हा आदेश काढला होता.

मुलींच्या गायनावरील बंदीच्या आदेशावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेक मुलींनी गाणी गातानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यासोबत #IAmMySong असा हॅशटॅग वापरला.

तालिबानसोबत शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढवणारा हा वाद मानला जातोय. कारण तालिबानच्या सत्ताकाळात मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती, तसंच संगीत क्षेत्रातही अनेक प्रतिबंध लादण्यात आले होते.

काबुलमधून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार, 12 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींना शाळेतील कार्यक्रमात गायनास बंदी घालण्यात आली आहे. तसंच, या वयातल्या मुलींना संगीत विषयासाठी पुरुष शिक्षक नसावा, असंही सांगण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय की, या पत्रकाचा तपास केला जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.

खरंतर मुलींच्या गायनावरील ही बंदी काही दिवसांपूर्वी घोषित झाली. तेव्हापासूनच या आदेशावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका सुरू झाली. अनेक नामवंत लोकांनी या विरोधात मोहीमही सुरू केली होती. हा आदेश म्हणजे शैक्षणिक हक्कांना एक पाऊल मागे घेणारा निर्णय असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

"ईश्वरा, आम्हाला माफ कर. कारण माणूस प्रचंड क्रूर होऊ शकतो की, तो लहान मुलांनाही लिंगभेदाच्या दृष्टीनं पाहतो," असं प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शफिका यांनी ट्वीट केलंय.

काही महिलांनी तर या आदेशाला तालिबानच्या सत्ताकाळाशी जोडलंय. अफगाणिस्तानातील तालिबनाची सत्ता 2001 साली संपुष्टात आली. मात्र, तालिबानच्या सत्ताकाळात मुलींनी शाळेत जाण्यास आणि संगीत शिकण्यास बंदी घालण्यात आली होती.

"हे प्रजासत्ताकाच्या आतून तालिबानीस्तान आहे," असं अफगाणिस्तानातील मानवाधिकार कार्यकर्त्या सीमा समर म्हणतात. सीमा समर या गेल्या 40 वर्षांपासून मानवाधिकारांसाठी काम करतायेत. त्यांनी असोशिएटेड प्रेस (AP) सोबत बोलताना ही टीका केली.

अफगाणिस्तान सरकारवर सध्या तालिबानसोबत शांतता करार करण्याचा दबाव आहे. दुसरीकडे, हिंसा संपावी अशी अनेक अफगाण महिलांची इच्छा आहे. कारण त्या त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत, असं प्रतिनिधींचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)