कोव्हिड 19 लसीकरण थांबवू नका, WHOचं युरोपियन देशांना आवाहन

अॅस्ट्राझेनका, ऑक्सफर्ड, कोरोना, लस,

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

युरोपातील काही देशांनी अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीच्या वापरावर बंदी घातली आहे.

रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार वाढल्यामुळे फ्रान्स, इटली आणि जर्मनीने अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीवर बंदी घातली आहे. पण कोव्हिड 19साठीचं लसीकरण थांबवू नये, असं आवाहन WHO ने या देशांना केलंय.

मात्र रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार लशीमुळेच होत आहेत याचा पुरावा उपलब्ध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांसोबतच युरोपातल्या अनेक लहान देशांनी खबरदारी म्हणून लसीकरण थांबवलं असून याविषयीचा तपास करण्यात येतोय.

तर जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षा तज्ज्ञांची याचसाठी मंगळवारी बैठक होतेय.

लशीसंदर्भात जगभरातून आढावा घेत आहेत पण लशीकरण सुरू राहणं महत्त्वाचं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

WHOचे प्रवक्ते क्रिस्टियन लिंडमेअर यांनी सांगितलं, "WHO ला याविषयीची पूर्ण कल्पना आली, सखोल अभ्यास करण्यात आला आणि आताच्या सूचनांमध्ये काही बदल करण्याची गरज भासली, तर त्याबद्दल लगेच सर्वांना सांगितलं जाईल. पण आजच्या घडीला लशीमुळेच हे घडल्याचं सांगणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि या व्हायरसमुळे गंभीर आजार होऊ नये यासाठी लसीकरण मोहीम सुरू राहणं महत्त्वाचं आहे."

युरोपियन युनियन आणि युकेत मिळून 17 दशलक्ष नागरिकांना लस देण्यात आली आहे. या सगळ्यांपैकी चाळीसपेक्षा कमी नागरिकांमध्ये रक्ताची गुठळी होण्याचा त्रास आढळला असल्याचं अॅस्ट्राझेनकाने म्हटलंय.

ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनका लशीचा वापर तातडीने थांबवण्यात येत असल्याचं जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. पॉल एहरिलच इन्स्टिट्यूटच्या शिफारशीनंतर जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.

युरोपियन मेडिसिन्स एजन्सी लशीसंदर्भात नवा सल्ला देत नाही तोपर्यंत अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीचा प्रयोग थांबवण्यात येत असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.

इटलीतील औषधांसंदर्भातील संस्थेने लशीच्या वापरावर बंदीची सूचना केली आहे.

रविवारीच नेदरलँड्सने अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीच्या वापरावर बंदी आणली होती. 29 मार्चपर्यंत लशीचा वापर थांबवणार असल्याचं नेदरलँड्स प्रशासनाने म्हटलं आहे.

आयरिश रिपब्लिक, डेन्मार्क, नॉर्व, बल्गेरिया आणि आईसलँडने या देशांनी लशीच्या वापरावर तात्पुरती बंदी आणली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

लशीचा वापर

काँगो रिपब्लिक आणि इंडोनेशियाने लसीकरण अभियान लांबवणीवर टाकलं आहे. ऑस्ट्रियाने सावधानतेचा उपाय म्हणून लशीच्या वापरावर बंदी आणली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र रक्ताची गुठळी लशीमुळे होते याचे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. जगभरात ज्या ज्या देशांमध्ये ही लस देण्यात येत आहे तिथल्या नागरिकांचा प्रतिसाद नोंदवून घेण्यात येतो आहे. त्याचा तपशीलवार अभ्यास सुरू आहे असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

द युरोपियन मेडिकल असोसिएशन ही संस्थाही रक्ताची गुठळी होण्याच्या प्रकारांचा अभ्यास करते आहे. लस देता येऊ शकते असं या संस्थेचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)