म्यानमार : BBC चे प्रतिनिधी आंग थुरा यांना घेतलं ताब्यात

आंग थुरा
फोटो कॅप्शन,

आंग थुरा

बीबीसीचे प्रतिनिधी आंग थुरा यांना म्यानमारची राजधानी नेपिडाओमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. ते न्यायालयाबाहेरून वार्तांकन करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.

बीबीसीनं एक पत्रक जारी करत, या घटनेविषयी चिंता व्यक्त केली आहे आणि म्यानमारच्या अधिकाऱ्यांना बीबीसीच्या प्रतिनिधीचा शोध घेण्यास सांगितलं आहे.

म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या एका निदर्शनात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये निदर्शन सुरू आहे.

आंग थुरा यांना स्थानिक पत्रकार समूह मिझिमाच्या पत्रकारासोबत ताब्यात घेण्यात आलं. म्यानमारच्या लष्करी सरकारनं याच महिन्यात मिझिमाचा परवाना रद्द केला होता.

दोन्ही पत्रकारांना ताब्यात घेण्यासाठी आलेली माणसं अनोळखी गाडीत आली आणि त्यांना गाडीत बसण्यास सांगितलं. या घटनेनंतर बीबीसीचा आंग थुरा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बीबीसीनं म्हटलंय, "बीबीसी म्यानमारमधील आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेप्रती गंभीर आहे आणि आम्ही आंग थुरा यांना शोधण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत."

"आम्ही अधिकाऱ्यांना मागणी करतो की, आंग थुरा यांना शोधण्यासाठी आमची मदत करावी आणि ते सुरक्षित असल्याचं सांगावं. आंग थुरा हे बीबीसीचे अधिकृत पत्रकार आहेत आणि जे गेली अनेक वर्ष नेपिडाओत वार्तांकन करत आहेत," असंही बीबीसीनं पत्रकात म्हटलंय.

आतापर्यंत 40 पत्रकारांना अटक

म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी उठावापासून 40 पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान आंग सान सू ची यांच्यासहित अनेक लोकनियुक्त नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 16 जण अद्याप अटकेत आहेत. लष्करानं 5 माध्यम संस्थांचा परवाना रद्द केला आहे.

स्थानिक माध्यमं आणि अंत्यसंस्कार करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या मते, शुक्रवारी (19 मार्च) ज्या 8 जणांचा मृत्यू झाला होता, त्यांच्यावर सुरक्षादलानं ऑन्गबान शहरात गोळ्या झाडल्या होत्या.

एका प्रत्यक्षदर्शीनं वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितलं, "सुरक्षादल बॅरियर हटवण्यासाठी आलं होतं, पण लोकांनी विरोध केल्यानंतर त्यांनी गोळीबार केला."

फोटो स्रोत, Getty Images

यंगूनमधील काही वृत्तांनुसार, "हिंसेमुळे अनेक जण शहर सोडून चालले आहेत आणि त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली आहे."

असं म्हटलं जात आहे की, आंदोलनकर्त्यांनी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यासाठी पोलीस लोकांवर दबाव टाकला जात होता.

एक आंदोलनकर्ती संस्था असिस्टंस असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर नुसार, म्यानमारमधील लष्करी उठावानंतर तिथं कमीतकमी 232 जणांचा मृत्यू झाला आहे.

14 मार्चला सर्वाधिक हिंसा झाली, यादिवशी 38 जणांची हत्या करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)