इस्रायलमध्ये 2 वर्षांत 4 वेळा निवडणुका, नेतन्याहू यांचा विजयाचा दावा

नेतनयाहू

फोटो स्रोत, Reuters

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सार्वत्रिक निवडणुकीत आपण मोठा विजय मिळवल्याचा दावा केला आहे.

गेल्या 2 वर्षांतील ही इस्रायलमधील ही चौथी निवडणूक आहे. एक्झिट पोलनुसार यावेळीही नेतन्याहू यांना पूर्ण बहुमत मिळवता येणार नाही.

इस्रायल संसद म्हणजेच नेसेटमध्ये एकूण 120 सदस्य असतात. 120 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाला 53 किंवा 54 जागा मिळतील तर त्यांच्या विरोधी पक्षाला एकूण 59 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याचा अर्थ नेतन्याहू यांचे माजी समर्थक आणि राष्ट्रवादी यामीना पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट हे किंगमेकर ठरू शकतात. त्यांचा पक्ष सात ते आठ जागा जिंकू शकतो, असं विश्लेषक सांगतात.

मात्र, ते कोणत्या गटाला समर्थन देतील हे अद्याप त्यांनी जाहीर केलेलं नाही.

इस्रायली प्रसारमाध्यमांमध्ये एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाल्यानंतर बेनेट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "इस्रायलसाठी जे चांगल असेल ते मी करीन."

इस्रायलींना स्थिर आणि राष्ट्रवादी सरकार हवं आहे - नेतन्याहू

आपला पक्ष अंतिम निकाल स्पष्ट होईपर्यंत प्रतिक्षा करणार असल्याचं आम्ही नेतन्याहू यांना कळवलं आहे, असंही बेनेट म्हणाले.

कोरोना आरोग्य संकटामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास विलंब होतोय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बेंजामिन नेतन्याहू

बुधवारी (24 मार्च) दुपारपर्यंत अंतिम मतमोजणी पूर्ण होईल असं इस्रायलच्या निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

23 मार्चला बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं, "इस्रायलच्या नागरिकांचे धन्यवाद. तुम्ही लिकुड पक्ष आणि उजव्या विचारसरणीच्या गटांना माझ्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवून दिला आहे. आतापर्यंतच्या निकालात लिकुड सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे."

नेतन्याहू म्हणाले की, बहुतेक इस्रायली हे राष्ट्रवादी आहेत आणि त्यांना स्थिर राष्ट्रवादी सरकार हवं आहे हे स्पष्ट झाले आहे.

इस्रायलमध्ये 67.2 टक्के मतदान झाले आहे.

71 वर्षीय बेंजामिन नेतन्याहू 2009 पासून सलग सत्तेवर आहेत. 1990 च्या दशकातही ते तीन वर्षं पंतप्रधान होते.

नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

नेतान्याहू यांनी आपल्या निवडणूक प्रचार मोहिमेत कोरोनाचं लसीकरण आणि अरब देशांसोबत सुधारलेले संबंध या आधारावर मतं मागितली.

फोटो स्रोत, EPA

त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही आहेत. या आरोपांची चौकशी होत नाही आणि जोपर्यंत यासंदर्भातील खटला सुरू आहे तोपर्यंत नेतन्याहून यांनी पंतप्रधान पदावर राहू नये अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, नेतन्याहू यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत.

गेल्या तीन निवडणुकांमध्ये नेतन्याहू किंवा त्यांच्या विरोधकांना स्थिर सरकार देता आलेलं नाही.

संरक्षणमंत्री बेनी गँट्झ यांच्याशी युती करून स्थापन झालेलं आधीचं सरकार सात महिन्यांनंतर डिसेंबरमध्येच कोसळलं.

एक्झिट पोलमध्ये गँट्झ यांच्या पक्षाला सात जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. "नवे पंतप्रधान मिळावेत यासाठी जे काही शक्य आहे ती मी करेन," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)