थंड पदार्थ खाल्यानंतर झिणझिण्या का येतात? शास्त्रज्ञांना सापडलं कारण...

थंड पदार्थ

फोटो स्रोत, Getty Images

थंड पाणी पिल्यानंतर किंवा आईस्क्रीम, कुल्फी यांच्यासारखे थंड पदार्थ खाताना पहिल्या घासाला तुम्हाला झिणझिण्या येतात का?

अशा थंड पदार्थांशी गाठ पडल्यानंतर टीव्हीवरील एका जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे 'अशी एक तीव्र सणक तुमच्या डोक्यात जाते का?'

असं काही असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

थंड पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर काही लोकांना झिणझिण्या का येतात, त्यांना या वेदना कशामुळे होतात, याचं कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, असं होण्याचं कारण म्हणजे तुमचे संवेदनशील दात.

तुम्ही खात असलेल्या पदार्थांच्या तापमानात अचानक मोठी घट झाल्यास तुमचे संवेदनशील दात आणि तिथे असलेल्या पेशी ही माहिती चटकन मेंदूला पोहोचवतात. याच प्रक्रियेत तुम्हाला वेदनादायक अशा झिणझिण्यांना सामोरं जावे लागते.

दातांच्या या झिणझिण्यांवर डॉक्टर नवी टूथपेस्ट, डेंटल पॅच किंवा च्युईंग गम यांसारखे उपाय सुचवतात.

या विषयावर संशोधन करत असलेल्या शास्त्रज्ञांच्या टीमचे प्रमुख प्रा. कॅथरिना झिमेरमान या आहेत. त्यांचं संशोधन सायन्स अॅडव्हान्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.

जर्मनीच्या फ्रेडरिक-अलेक्झांडर युनिव्हर्सिटीत त्यांचं हे संशोधन सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images

प्रा. झिमेरमान यांनी बीबीसीशी बोलताना याविषयावर सविस्तर माहिती दिली.

संवेदनशील असलेली नेमकी पेशी तुम्हाला सापडल्यास यावर उपचार करणं शक्य आहे, असं त्या सांगतात.

प्रा. झिमेरमान यांच्या टीमने केलेल्या संशोधनानुसार, या पेशींना ओडोंटोब्लास्ट नावानेही ओळखलं जातं. शास्त्रीय भाषेत त्यांना TRPC5 असं संबोधतात. दातांचं बाह्य आवरण (एनॅमल) तसंच आतील भागाचं आवरण या दोन्हींच्या मध्यभागी या पेशी आढळून येतात.

एनॅमलमध्ये कोणतीच चेतना नसते. पण त्यानंतर असलेल्या डेन्टाईनमध्ये ही चेतना आढळून येते.

आतील आणि बाह्य भागाला जोडून ठेवण्याचं काम हे डेन्टाईन करत असतं. याच ठिकाणी मज्जातंतूच्या पेशीही असतात.

कधीकधी दात किडणे किंवा इतर दातांच्या विकारांमुळे हे डेन्टाईन उघडं पडतं. अशा प्रकारे डेन्टाईन बाह्य गोष्टींच्या संपर्कात आलं तर त्याचा परिणाम हा वेदनादायी असतो.

पण हे घडतं कसं?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदीर तसंच मानवांवर काही प्रयोग केले.

वेदना कशी वाढत जाते, यादरम्यान पेशी तसंच मज्जासंस्थेत नेमकी कोणती प्रक्रिया घडते, हे शोधणं या प्रयोगाचं उद्दीष्ट होतं.

डॉ. झिमेरमान सांगतात, "दातांवर असंख्य अशी TRPC5 छिद्र असतात. संवेदशील दातांच्या उपचाराकरिता आपल्याला च्युईंग गम, टीथ स्ट्रीप किंवा टूथपेस्टचा यांची मदत होऊ शकते. त्यांच्या मदतीने दातांच्या वरील आवरणाला पडलेली छिद्रं भरता येऊ शकतात.

किंवा घरगुती उपचार पद्धतीने क्लोव्ह ऑईलच्या मदतीनेही ही छिद्र भरली जाऊ शकतात.

पण अशा प्रकरणांमध्ये बहुतांश डॉक्टर घरगुती उपचारांचा सल्ला शक्यतो देत नाहीत. दातदुखीने बेजार असलेल्या रुग्णांनी सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं हेच महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात.

ब्रिटिश डेंटल असोसिएशनचे प्रा. डॅमियन वॉल्मसली यांनीही या विषयावर माहिती दिली.

ते सांगतात, "दुखणं थांबवण्यासाठी तात्पुरते उपचार करून काही काळ आराम मिळू शकतो. पण या व्याधीचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर त्याच्या मुळात जाऊन योग्य उपचार करणं गरजेचं आहे. रोजच्या रोज नियमितपणे ब्रश करण्यामुळे दात आणि हिरड्यांच्या समस्या थांबवता येऊ शकतात."

हे संशोधन रंजक आहे. मात्र दातांच्या संवेदनशीलतेकडे आणि वेदनेकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. यावर उपचार शक्य आहेत. किड हटवणं, संवेदनशील दातांसाठीचे टुथपेस्ट वापरणं यांसारखे काही उपाय यावर लागू होऊ शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

डॉ. वॉल्मसली यांच्या मते, भविष्यात सगळ्याच टुथपेस्टमध्ये TRPC5 एजंट समाविष्ट केले जाऊ शकतील. या टुथपेस्टच्या वापराने दातांमधील संवेदनशीलता कमी करण्यास मदत होऊ शकते.

प्रा. झिमेरमान यांच्या टीमला या संशोधनासाठी कोणती आर्थिक मदत मिळाली नाही. जर्मन रिसर्च फाऊंडेशन आणि अमेरिकेतील हॉवर्ड ह्यूग्स मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मदतीने हे संशोधन करण्यात आलं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दातांवरील एनॅमल आणि डेन्टाईनची थर पातळ झाल्यामुळे दाताला नुकसान होतं. एखादा गोड पदार्थ खाल्यानंतर दातांवर आम्लयुक्त पदार्थांचा मारा झाल्यास दातांची झिज होते. त्यातून पुढे दात किडण्यासारखे प्रकार घडतात.

आम्लांमुळे दातांवर छिद्र पडू शकतात. तुम्ही तुमच्या आहारात साखरयुक्त किंवा आम्लयुक्त पदार्थांचा किती वापर करता, त्यावर तुमच्या दातांचं आरोग्य अवलंबून आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)