कोरोना : ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात 3,001 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

बोल्सोनारो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

बोल्सोनारो

ब्राझीलमध्ये गेल्या 24 तासात ब्राझीलमध्ये 3,001 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4 लाखांहून अधिक झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये जगात ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत अमेरिका पहिल्या स्थानी आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाची लसीकरण मोहीम अत्यंत धीम्या गतीनं होताना दिसतेय. याचाच फटका ब्राझीलवासियंना बसत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि नवीन रुग्णांची 14 दिवसांच्या आकडेवारीची सरासरी पाहिल्यास दोन्ही उच्चांकवर असले, तरी थोडीशी घटही झालीय.

सरकारने ब्राझीलमध्ये कोरोनाची स्थिती कशी हाताळली, याची चौकशी काँग्रेसनं सुरू केली आहे.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो हे सातत्यानं लॉकडाऊन आणि मास्कचा विरोध, तसंच परवानगी नसलेल्या औषधांच्या वापराला समर्थन करत आहेत. त्यांच्यावर आता देशभरातून टीका होत आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे प्रसार वाढलाय. मात्र, राष्ट्रीय नियमांबाबतच्या असमन्वयामुळे बराच फटका बसताना दिसतोय.

फोटो स्रोत, Getty Images

मार्च आणि एप्रिलमधील 37 दिवसात ब्राझीलमध्ये 1 लाख मृत्यूंची नोंद झाली. ब्राझीलमध्ये हे महिने सर्वात नुकसानकारक ठरलेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 45 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, काही शहरांनी लसीकरण मोहीम थांबवली आहे. कारण लशीच्या डोसचा तुटवडा निर्माण झालाय. 212 मिलियन लोकसंख्येपैकी केवळ 13 टक्के लोकांनी लशीचा पहिला डोस घेतलाय.

याआधीही ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता. 31 मार्च 2021 रोजी एका दिवसात तब्बल 3,780 लोकांचा जीव गेला होता. त्यावेळी ब्राझीलमध्ये राजकीय संकटही उभं राहिलं होतं. त्यावेळी म्हणजे 31 मार्च 2021 रोजी बीबीसीनं घेतलेल आढावा खालीलप्रमाणे :

याआधी एका दिवसात 3,780 जणांचा मृत्यू

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्यासमोर त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतलं सगळ्यात मोठं संकट उभं झालंय. एकीकडे त्यांच्या देशाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी राजीनामे दिले आहेत, तर दुसरीकडे ब्राझीलमध्ये कोव्हिड -19 झालेल्या एका दिवसांतल्या मृत्यूंची सर्वोच्च संख्या नोंदवली गेलीय.

फोटो स्रोत, Reuters

लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी दिलेले राजीनामे हे बोल्सोनारो यांच्याविरोधात केलेलं आंदोलन म्हणून पाहिलं जात आहे. लष्करावर नियंत्रण मिळवण्याच्या बोल्सोनारो यांच्या प्रयत्नांचा निषेध म्हणूनही या राजीनाम्यांकडे पाहिलं जातंय.

कोरोना काळात बोल्सोनारो यांच्या ज्या पद्धतीनं काम केलंय, त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची ढसळली आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास 3 लाख 14 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काल (30 मार्च) एकाच दिवसात तब्बल 3 हजार 780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ब्राझीलमध्ये कोरोनाची सद्यस्थिती काय आहे?

ब्राझील कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमधील 1 कोटी 26 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिका जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत पहिल्या स्थानावर आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला ब्राझीलमधील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. ब्राझीलमधील 80 टक्के इंटेन्सिव्ह केअर बेड्स भरले होते.

रिओ ग्रँड दो सुल येथील साथरोग तज्ज्ञ डॉ. पेड्रो हल्लाल यांनी बीबीसीशी बोलताना ब्राझील हे जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते अशी भीती व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी सातत्यानं लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्त अर्थव्यवस्थेला फटका बसेल, असा त्यांचा युक्तिवाद होता.

कोरोनाच्या परिस्थितीबाबत तक्रार करणं बंद करा, असंही त्यांनी ब्राझीलमधील जनतेला म्हटलं होतं.

आधी कोरोना लशीबाबत शंका घेणाऱ्या बोल्सोनारो गेल्या आठवड्यात मात्र म्हटलं की, 2021 या वर्षाला आपण लसीकरणाचं वर्ष बनवू. लवकरच आपण नियमित आयुष्यात परत येऊ.

आतापर्यंत ब्राझीलमध्ये एकूण लोकसंख्येच्या केवळ 8 टक्के जनतेचंच लसीकरण झालं आहे.

राजकीय घसरण

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरून राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं पहायला मिळालं. ब्राझीलमधील 43 टक्के लोकांना देशातील कोरोनाच्या उद्रेकाबद्दल बोल्सोनारो जबाबदार असल्याचं वाटत आहे. मार्चच्या मध्यात प्रसिद्ध झालेल्या एका मतचाचणीतून ही बाब समोर आली आहे.

त्यांचं सरकारही संकटात आहे. 16 मार्चला ब्राझीलच्या नवीन आरोग्यमंत्र्यांनी सूत्रं हातात घेतली. कोरोनाची साथ आल्यापासूनचे ते चौथे आरोग्यमंत्री आहेत. मार्सेलो क्विरोगा हे कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांचे पूर्वसुरी हे एक लष्करी अधिकारी होते, ज्यांच्याकडे कोणतंही वैद्यकीय प्रशिक्षण नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सोमवारी (29 मार्च) संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कॅबिनेटमध्ये बदलांची निकड निर्माण झाली आहे. चीनसोबतचे संबंध हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप परराष्ट्र मंत्र्यांवर करण्यात आला. चीनसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे कोव्हिड-19 लशींचा तुटवडा निर्माण झाला.

लष्करी अधिकाऱ्यांच्या एकनिष्ठतेवरून संरक्षण मंत्र्यांचे बोल्सोनारो यांच्यासोबत मतभेद झाले. त्यांच्यापाठोपाठ मंगळवारी (30 मार्च) लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या प्रमुखांनीही राजीनामे दिले. ब्राझीलच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षांशी मतभेद झाल्यामुळे तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी एकत्रित पायउतार होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बीबीसीचे लॅटिन अमेरिकेतील प्रतिनिधी विल ग्रँट यांनी म्हटलं की, बोल्सोनारो हे जानेवारी 2019 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच बोल्सोनारो हे इतक्या मोठ्या राजकीय संकटाला सामोरे जात आहेत.

राष्ट्राध्यक्ष हे विभाजनवादी व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या वांशिक, समलैंगिकतेविरोधात तसंच महिलांविरोधातील टिप्पणीवरून अनेकदा वाद उफाळून आला आहे.

स्वतः माजी लष्करी असलेल्या बोल्सोनारो यांनी 2019 मध्ये 1964 च्या लष्करी उठावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या उठावानंतर 1985 पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती. या उठावात किमान 434 जण ठार झाले होते किंवा गायब झाले होते, असं 2014 साली नेमलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून समोर आलं होतं.

बोल्सोनारो यांनी या कार्यक्रमांचं समर्थन केलं होतं.

बुधवारी (31 मार्च) नव्याने नियुक्त झालेले संरक्षण मंत्री जनरल वॉल्टर ब्रागा यांनीही या कार्यक्रमांचं समर्थन केलं. शांतता आणि लोकशाहीला त्यावेळी खरंच मोठा धोका निर्माण झाला होता आणि लष्करानं या धोक्याचं निवारण केलं होतं. त्यामुळे देशात शांतता प्रस्थापित झाली होती. म्हणूनच ही गोष्ट साजरा करण्याची आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)