व्लादिमीर पुतिन यांनी रशियन राजकारणावर पकड कशी बसवली?

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

पंडित जवाहरलाल नेहरू भारत स्वतंत्र झाल्यापासून पुढची सतरा वर्षं देशाचे पंतप्रधान होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनाही 15 वर्षांचा कार्यकाळ मिळाला.

एखाद्या नेत्याला जनतेचा असा उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याच्या घटना एरवी मात्र भारतीय राजकारणात विरळच. मुळात या नेत्यांनाही दर पाच वर्षांनी निवडणूक लढणं क्रमप्राप्त आहे.

आपल्या शेजारच्या चीनमध्ये मात्र अध्यक्ष शि जिनपिंग यांना घटनेनंच आजीवन कम्युनिस्ट पार्टीचा नेता म्हणजे पर्यायाने चीनचा अध्यक्ष राहण्याचा मान बहाल केला आहे.

आता रशियाचे व्लादिमीर पुतिनही 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकणार आहेत. एका घटनादुरुस्तीमुळे पुतिन यांना हे शक्य होणार आहे. 2036 मध्ये पुतिन 83 वर्षांचे असतील आणि त्यांनी तोपर्यंत ते सत्तेत कायम राहिले तर स्टॅलिन यांना मागे टाकून ते रशियातले सगळ्यात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले नेते असतील.

मूळात पुतिन हे साधंसुधं व्यक्तिमत्व नाहीये. आंतरराष्ट्रीय राजकारणातला त्यांचा दबदबा आणि रशियातली त्यांची माचोमॅनची प्रतिमा असं सगळंच विलक्षण आहे.

हातात रायफल धरून रक्षा करणारे पुतिन.. मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅकबेल्ट होल्डर पुतिन.. बर्फाळलेल्या पाण्यात उडी मारणारे पुतिन.. हातात वाघाचे बच्चे धरणारे पुतिन.. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अशी अनेक रूपं तिथली सरकारी माध्यमं दाखवत असतात. निवडणुका झाल्या तरी अनभिषिक्त सम्राट असल्याप्रमाणे तिथे पुतिनच पुन्हा पुन्हा निवडून येतात. आता त्यांनी घटनादुरुस्ती करून पुढची 15 वर्षं या पदावर राहू शकण्याची सोय करून ठेवली आहे.

रशियाच्या संसदेने एक महत्त्वाची घटनादुरुस्ती मंजूर केली आहे, ज्यामुळे पुतिन 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहू शकणार आहेत. या घटनादुरुस्तीवर त्यांनी सही केल्यामुळे आता ते वयाच्या 83 वर्षांपर्यंत या पदावर राहू शकतात.

पण भविष्यातल्या या गोष्टींची बीजं इतिहासात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

रशियाचे लोकप्रिय नेते बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये वाढत्या वयामुळे राजकारणातून निवृत्ती घेतली, तेव्हा त्यांचे राजकीय वारसदार म्हणून व्लादिमीर पुतिन यांचं नाव आपसूकच पुढे आलं.

पुतिन यांनी 16 वर्षं केजीबीमध्ये आंतरराष्ट्रीय गुप्तहेर म्हणून काम करून 1991मध्ये केजीबीचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिला तो राजकारणात प्रवेशासाठीच.

येस्तसिन यांच्या पाठोपाठ 1999 मध्ये पुतीन आधी रशियाचे पंतप्रधान झाले आणि 2000मध्ये निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. रशियन घटनेतल्या तरतुदीनुसार कुणीही दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर लगेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाही. त्याप्रमाणे 2008मध्ये पुतिन यांचा कार्यकाळ संपायला हवा होता. पण, पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडलं आणि ते एक पायरी उतरून पुन्हा पंतप्रधान झाले. पंतप्रधान असतानाही सगळे प्रमुख निर्णय पुतिनच घ्यायचे एवढी त्यांची पक्षावर पकड होती.

पुन्हा 2012मध्ये पुतिन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि यावेळी आपला दुसरा कार्यकाळ संपत असताना त्यांनी देशात घटनादुरुस्तीच्या हालचाली सुरू केल्या. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळाला आठ वर्षांची असलेली मर्यादा वाढवून सोळा वर्षं करण्याची.

21 जुलै 2020ला रशियात या घटनादुरुस्ती प्रस्तावावर सार्वमत झालं आणि अलीकडे जाहीर झालेल्या निकालाप्रमाणे पुतिन यांचे बहुतेक प्रस्ताव मान्य झाले आहेत. अर्थात, हे सार्वमत वादग्रस्तही ठरलंय.

त्यामुळे पुतिन जर निवडणुका जिंकत राहिले आणि त्यांची तब्येत ठीक असेल तर ते 2036 पर्यंत रशियाचे प्रमुख राहू शकतात.

रशियात निवडणुका कशा होतात?

रशियात राष्ट्राध्यक्षपदाची निवड थेट लोकांच्या मतदानातून होते. दर चार वर्षांनी ही निवडणूक होते. म्हणजे अमेरिकेत होते तशी. पण अमेरिकेतल्या रशियातल्या निवडणुकीत मोठा फरक आहे. कारण रशियात होणाऱ्या निवडणुकीकडे संशयाने पाहिलं जातं. तिथे पुतीनच निवडून येणार, हे जणू सगळ्यांनी गृहित धरलेलं असतं. निवडणुकीच्या रिंगणात इतर उमेदवार असतात, पण त्यातले अनेक जण थेट पुतीनवर टीका करणं टाळतात.

अॅलेक्सी नवालनीसारख्या पुतीनवर टीका करणाऱ्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर करण्यात आलं. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. पुढे नवालनींवर जीवघेणा हल्ला झाला. नंतर त्यांना जुनी केस काढून तुरुंगात बंद करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पुतीन यांचे विरोधक नवालनी

पण पुतिन लोकप्रिय नाहीयेत, असंही म्हणणं जोखमेचं ठरेल. कारण रशियात वेळोवेळी निदर्शनं जरी होत असली तरी पुतिन यांची लोकप्रियता शाबूत असल्याचं काही सर्व्हेंमधून पुढे आलं.

कृतीशील राजकारणी आणि 'माचोमॅन' प्रतिमा

एकेकाळी अमेरिका आणि तेव्हाचं सोव्हिएट रशिया या जगातल्या दोन महासत्ता होत्या. पण, दोघांमधल्या शीतयुद्धानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय राजकारणातलं रशियाचं महत्त्व थोडं कमी झालं. नाटो देशांनी अमेरिकेची री ओढायला सुरुवात केली.

अशावेळी व्लादिमीर पुतिन यांनी मध्य-पूर्व आशिया आणि युरोपातही केलेल्या काही कारवायांमुळे रशियाला त्याचं गतवैभव थोडंफार परत मिळवलं. रशियातली त्यांची लोकप्रियता त्यामुळे अफाट वाढली.

मार्च 2014 मध्ये क्रिमिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धात त्यांनी त्वरित सैनिकी हस्तक्षेप करून तिढा सोडवला, तर सीरियातल्या बंडखोरांना हुसकून लावण्यासाठी त्यांनी सीरियन सरकारला उत्स्फूर्त मदत केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

चेचन्या इथं बंडखोरांचं बंडही त्यांनी क्रूरपणे मोडून काढलं.

इस्लामिक स्टेट्सविरुद्धची लढाई असो किंवा कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रश्न, रशिया त्वरित त्यात उतरून प्रसंगी लष्करी कारवाईलाही डगमगत नाही, असा लौकिक रशियाला पुतिन यांनी मिळवून दिला.

पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीचा वेध बीबीसी मॉनिटरिंगच्या ऑल्गा रॉबिनसन यांनी अगदी अचूक घेतला आहे.

त्या म्हणतात, 'राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वीच व्लादिमीर पुतिन केजीबीचे अधिकारी म्हणून लोकांना माहीतच होते. त्यांची ती कारकीर्दही गाजली. पण, 1990 च्या दशकात ते राष्ट्रीय पुढारी म्हणून लोकांच्या समोर आले. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. अगदी 80% लोकांची त्यांना मान्यता होती. मॉस्कोमध्ये झालेले बाँबस्फोट आणि क्रिमियातही तातडीने पावलं उचलून कारवाई करण्याचा त्यांचा स्वभाव लोकांना आवडला.

ते सतत टेलिव्हिजनवर लोकांसमोर विविध रुपात यायचे. ते दर्शनही लोकांना आवडत होतं. किंबहुना मीडियावर संपूर्ण अंकुश ठेवता आल्यामुळेच ते इतके लोकप्रिय झाले असंही काहींचं म्हणणं आहे. काहीही असो. परदेशातही त्यांनी मान मिळवला. आणि रशियाला मिळवून दिला. विरोधकांवर विषप्रयोग आणि डोपिंग सारख्या प्रकरणांमुळे मात्र ते वादात सापडले.

पुतिन आणि आंतरराष्ट्रीय वाद

सतत राजकीय प्रकाशझोतात असलेलं व्यक्तिमत्त अभावानेच वादरहित राहतं. व्लादिमीर पुतिन यांच्या भोवतीही अनेक वाद निर्माण झाले. त्यातले काही ओल्गा रॉबिनसन यांनी आपल्याला सांगितलेही.

रशियातल्या मीडियावर अंकुश ठेवून स्वत:ला पोषक अशाच बातम्या देण्याचा आग्रह हा त्यांच्यावरचा पहिला आरोप आहे. आपल्या राजकीय विरोधकांना केजीबीमधल्या अनुभव आणि साधनांचा वापर करून कधी विष-प्रयोग तर कधी पॉइंट ब्लँक मारल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. नवाल्नी हे ताजं उदाहरण आहेच.

फोटो स्रोत, Getty Images

स्पोर्ट्स हा खरंतर पुतिन यांचा लाडका विषय आहे. पण, इथंही 2015 मध्ये रशियामध्ये सरकार पुरस्कृत डोपिंग स्कँडल उघड झालं होतं. सरकारी संस्थाच अॅथलीट्सना उत्तेजक द्रव्य पुरवत होत्या आणि ते घेण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतली एकूण 57 मेडल रशियाला परत करावी लागली. आणि मानहानी झाली ती वेगळीच.

पुतिन यांच्या कारकीर्दीला काळा बट्टा लावणारा आणखी एक वाद म्हणजे 2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा अमेरिकेत झालेला आरोप. ट्रंप यांनी निवडून आल्यावर पुतिन यांना आपला मित्र म्हटलं. हा आरोप कदाचित सिद्ध होणार नाही. पण, त्याविषयी कायम बोललं जाईल.

शेवटी कोव्हिड परिस्थितीतही रशियात बनणाऱ्या लसी आणि एकूणच कोव्हिडमुळे रशियात होणारे मृत्यू या गोष्टी लपवल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)