प्रिन्स फिलीप : असामान्य आयुष्य जगणारं एक असामान्य व्यक्तिमत्व

  • जॉनी डायमंड
  • रॉयल करस्पाँडंट
प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ (दुसऱ्या)

फोटो स्रोत, PA Media

प्रिन्स फिलीप यांना त्यांच्या समकालीनांपेक्षा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगू शकतील, अशा सर्वांपेक्षा दीर्घ आयुष्य लाभलं. म्हणूनच ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलीप यांचं द्विआयामी चित्र आपल्यासोबत कायम राहिलं आहे.

अनेकांना प्रिन्स फिलीप यांच्या आयुष्याबद्दल प्रचंड आकर्षण होतं.

त्यांच्या निधनानंतर परिस्थिती बदलत जाणार आहे. कारण प्रिन्स फिलीप हे असामान्य आयुष्य जगणारे असामान्य व्यक्तिमत्व होते.

अशांत राहिलेल्या 20 व्या शतकाने अनेक विरोधाभास पाहिले होते. या सगळ्या विरोधाभासांचे साक्षीदार प्रिन्स फिलीप राहिले.

प्रिन्स फिलीप यांच्या आई-वडिलांची भेट क्वीन व्हिक्टोरिया यांच्या अंत्यविधीदरम्यान 1901 साली झाली होती. त्यावेळी युरोपच्या चार देशांमध्ये राजघराणी होती. प्रिन्स फिलीप यांचे नातेवाईक युरोपभर पसरलेले होते.

पहिल्या महायुद्धात अनेक राजघराण्यांचा पाडाव झाला. पण प्रिन्स फिलीप यांचा जन्म जिथे झाला, तिथं राजेशाही आपले पाय घट्ट रोवून उभी होती. प्रिन्स फिलीप यांचे आजोबा ग्रीसचे राजे होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रिन्स फिलीप त्यांच्या जन्माच्या 18 महिन्यांनंतर

त्यावेळी एकटेरिनबर्ग या ठिकाणी बोल्शेविकांनी रशियन झारसह प्रिन्स फिलीप यांच्या चुलत आजींची हत्या केली होती.

प्रिन्स फिलीप यांची आई म्हणजे क्विन व्हिक्टोरियाच्या खापर-पणतू होय.

प्रिन्स फिलीप यांच्या चारही बहिणींनी जर्मनांसोबत विवाह केला.

फिलीप हे रॉयल नेव्हीमध्ये ब्रिटनकडून लढत होते. मात्र, त्यांच्या तीन बहिणींनी मात्र नाझींना पाठिंबा दिला होता. कारण त्यांना प्रिन्स यांच्या लग्नात बोलावलं जाणार नाही, हे त्यांना माहीत होतं.

शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आर्थिक सुधारणाही झाली. त्यावेळी फिलीप यांनी स्वतःला ब्रिटन उभारणीच्या कामात झोकून दिलं. त्यांनी देशाला वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यासाठी आग्रह धरला. औद्योगिक आराखडे, योजना, शिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान या विचारसरणीचा अवलंब केला.

फोटो स्रोत, Getty Images

हेराल्ड विल्सन यांनी तांत्रिक क्रांतीबाबत विचार मांडण्याच्या दहा वर्षांआधी प्रिन्स फिलीप देशात आधुनिकता आणण्याबाबत भाषणं आणि मुलाखती देताना दिसून येत होते.

जग आणि देश श्रीमंत होत गेला तसतसा प्रिन्स फिलीप यांनी पर्यावरणाचाही मुद्दा मांडला होता. तो त्या काळी फॅशनेबलही मानला जात नसे, हे विशेष.

प्रिन्स फिलीप यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ खूपच धकाधकीचा राहिला. शालेय शिक्षणानंतर काही वर्षे त्यांची भटकंतीतच गेली. त्यांना आपल्या मूळ देशातूनच तडीपार करण्यात आलं होतं. त्यांचा परिवार विखुरला होता. त्यांना अनेक वर्षे परक्या देशात आश्रय घ्यावा लागला.

प्रिन्स फिलीप हे फक्त एका वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांना देशातून बाहेर काढण्यात आलं. तिथून सर्वप्रथम ते इटलीला पोहोचले. तिथून फ्रान्समध्ये दाखल झाले.

फोटो स्रोत, PA Media

फ्रान्समध्ये त्यांच्या एका नातेवाईकांनी भाड्याने घेतलेल्या घरात ते राहायचे. पण तिथंही सुखाने राहाणं त्यांच्या नशिबात नव्हतं. एका वर्षातच त्यांना तिथून ब्रिटनच्या आश्रमशाळेत दाखल करण्यात आलं. त्यांची आई प्रिन्सेस अलाईस यांना मानसिक आरोग्याची समस्या असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

प्रिन्स फिलीप यांच्या चार बहिणी लग्न करून जर्मनीला गेल्या.

प्रिन्स ऑफ ग्रीस असलेले फिलीप या कालावधीत तब्बल 10 वर्ष भटकंती करत होते. बेघर अवस्थेतील फिलीप यांची काळजी करणारं त्या काळी कुणीच नव्हतं.

मला वडील होते, असं कुणालाच वाटलं नसेल, असं एकदा प्रिन्स फिलीप यांनी म्हटलं होतं. किंग अँड्र्यू यांचं युद्धादरम्यान निधन झालं. त्यांच्याकडील संपत्ती घेण्यासाठी फिलीप मोंटे कार्लो या ठिकाणी गेले होते. पण तिथं कपडे-ब्रश आणि कफ-लिंकव्यतिरिक्त काहीच शिल्लक नव्हतं.

फोटो स्रोत, PA Media

यानंतर प्रिन्स फिलीप यांनी स्कॉटलंडच्या उत्तर समुद्रकिनारी भागात गोर्डोनस्टॉनमधील एका खासगी शाळेत प्रवेश घेतला.

फिलीप कणखर, स्वतंत्र आणि सक्षम होते. त्यांनी तसंच असणं अपेक्षित होतं.

गोर्डोनस्टॉनमध्ये सामूहिक सेवा, सांघिक काम, वैयक्तिक जबाबदारी यांची चांगली शिकवण दिली जात असे.

याच ठिकाणी फिलीप यांच्या मनात समुद्राविषयी प्रचंड प्रेम आणि कुतूहल निर्माण झालं.

आयुष्य विलक्षण पद्धतीने जगलं पाहिजे, असं फिलीप यांचं मत होतं. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या अनेक भाषणांमधून दिसून येत असे.

स्वातंत्र्याचं सार म्हणजे शिस्त आणि संयम अशी व्याख्या त्यांनी केली होती. 1958 मध्ये घानामध्ये केलेल्या एका भाषणात बोलून दाखवलं होतं.

युद्धोत्तर काळात ब्रिटिश शाळा समाजात पुढे येऊ लागल्या. त्यावेळी त्यांनी मानवतावादी दृष्टीकोन कायम ठेवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

त्याच्या दोन वर्षांपूर्वी त्यांनी इपस्विचच्या शाळेत नैतिक धडेही दिले होते. त्यामध्ये वैयक्तिक योगदानाचं महत्त्व तसंच समाजाला दिशा देण्याचं तत्व याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं.

फोटो स्रोत, PA Media

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

गॉर्डोनस्टॉनमध्ये फिलीप यांचं आयुष्य अत्यंत रंजक होतं. कर्ट हान यांच्या दृष्टीकोनातून ब्रिटन आणि हुकूमशाहीतून जन्माला आलेल्या लिबरल लोकशाहींमधला फरक त्यांनी समजून घेतला.

सुरुवातीला नौदल आणि नंतर पॅलेसमधील आयुष्यात फिलीप यांच्यावर अनेक बंधनं होती.

1939 मध्ये डार्टमाऊंट नेव्हल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नौकाविहार की ड्रायव्हिंग नेमकं कुणाला प्राधान्य द्यावं हे त्यांना कळेना. गॉर्डनस्टोन शाळेत ते नौकाविहार शिकले होते. डार्टमाऊंटमध्ये आल्यानंतर त्यांनी त्यात आणखी प्राविण्य मिळवलं. पण ड्रायव्हिंगही त्यांना प्रिय होतं आणि त्यात त्यांना जिंकायला आवडत होतं.

खरंतर त्यांनी डार्टमाऊंट कॉलेजात उशीरा प्रवेश घेतला होता. पण तरीसुद्धा 1940 मध्ये ते त्यांच्या वर्गात पहिल्या क्रमांकानं ग्रॅज्युएट झाले. पाच पैकी 4 विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी ते रॉयल नेव्हीतले सर्वात तरूण लेफ्टनंट ठरले होते.

नौदलात जाण्याची परंपरा त्यांच्या कुटुंबात आधीपासून होती. त्यांच्या आईचे वडिल (आजोबा) पहिले सी लॉर्ड होते. म्हणजेच कमांडर ऑफ रॉयल नेव्ही होते. तर त्यांचे 'डिकी' काका म्हणजेच लॉर्ड माउंटबॅटन नेव्हीत महत्त्वाच्या पदावर होते जेव्हा फिलीप यांचं ट्रेनिंग सुरू होतं. युद्धात त्यांनी फक्त शैर्यच नाही तर त्यांचं सामरिक रणनिती कौशल्यसुद्धा दाखवले. जे त्यांच्यात नैसर्गिकपणेच होतं.

फोटो स्रोत, PA Media

एकदा प्रिन्स फिलीप यांची प्रशंसा करत गॉर्डनस्टोन शाळेचे मुख्याध्यापक कुर्त हान मुख्याध्यपकांना आदरपूर्वक लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, "जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कुठल्याही व्यवसाय-नोकरीत स्वतःचं कौशल्य सिद्ध करत तुमचं नाव मोठं करेन."

हुशार आणि महत्त्वाकांक्षी अशा या तरुण अधिकाऱ्याबाबत इतरांची प्रतिक्रिया वेगवेगळी होती. ज्यावेळी फिलीप यांच्याकडे अधिकार आले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अतिशय कठोरपणे हातळलं. चूक केलेल्या व्यक्तीबद्दल ते असहिष्णू होते, असं एका लेखकाने लिहिलं आहे.

'एक तर मी जीव देईन किंवा फिलीप यांच्या हाताखाली पुन्हा काम करेन', असं एका अधिकाऱ्याने लेखकाशी बोलताना म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

डार्टमाऊंटमध्ये 1939 साली युद्धाचे स्पष्ट संकेत दिसू लागले होते. त्यावेळी नशीबाने ते नौदलात आले. आधीपासूनच ते समुद्राच्या प्रेमात होते. समुद्राचं वागणं असाधारण असतं, असं ते नेहमी म्हणत असत. पण समुद्रातलं खरं युद्ध अद्याप बाकी होतं.

किंग जॉर्ज पाचवे नेवल कॉलेजच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत फिलीप यांचे काका त्यांच्यासोबत होते. तसंच किंग जॉर्ज यांची मुलगी राजकन्या एलिझाबेथ हीसुद्धा तिथे आली होती. फिलीप यांना त्यांची काळजी घेण्यास सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, PA Media

राजकन्या एलिझाबेथ यांच्यावर फिलीप यांचा प्रभाव पडला. ते तरूण होते, आकर्षक आणि आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांच्यात राजघराण्याचं रक्त होतं. एलिझाबेथ यासुद्धा सुंदर होत्या, थोड्या बुजऱ्या स्वभावाच्या थोड्याशा गंभीर अशा होत्या. प्रिन्स फिलीप त्यावेळी राजकन्या एलिझाबेथ यांच्याकडे आकर्षित झाले.

पण यामुळे त्यांच्या दोन आवडत्या गोष्टींची एकमेकांशी स्पर्धा होणार असल्याची त्यांना तेव्हा कल्पना होती का? आपल्याला समुद्र आणि सुंदर तरुणींपासून दूर जावं लागेल याची त्यांना कल्पना होती का? 1948 मध्ये त्यांचा विवाह झाल्यानंतर पुढचा काही काळ या दोन्ही गोष्टी त्यांना करता आल्या.

नवविवाहित तरुण म्हणून माल्टामध्ये राहताना त्यांना अत्यंत प्रिय असणारी गोष्ट त्यांच्याकडे होती - बोटीचं नेतृत्त्वं. सगळ्यांपासून दूर माल्टामध्ये त्यांनी 2 वर्षं घालवली. पण किंग जॉर्ज (सहावे) यांचं आजारपण आणि त्यानंतर त्यांच्या अकाली निधनाने या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या.

किंग जॉर्ज (सहावे) यांच्या निधनाची बातमी सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार आहे, हे त्यांना माहिती होतं. प्रिन्सेस एलिझाबेथ या महाराजांच्या वतीने आफ्रिकेच्या दौऱ्यावर होत्या. केनियातल्या एका लॉजवर असताना फिलीप यांना आधी महाराजांच्या निधनाबद्दल सांगण्यात आलं.

फिलीप यांचं त्यावेळचं वर्णन करताना त्यांचे सचिव माईक पार्कर यांच्याकडे पाहत फिलीप म्हणाले होते, "त्यांच्यावर अचानक टनभर विटांचं ओझं कोसळलं असावं, असं वाटलं." ते काही क्षणांसाठी खुर्चीमध्ये तोंडावर वर्तमानपत्र ठेवून बसले. त्यांच्या आयुष्यातली राजकन्या आता राणी झाली होती. त्यांचं जग पूर्णपणे बदललं होतं.

फोटो स्रोत, PA Media

स्वतःच्या भावना क्वचितच बोलून व्यक्त करणाऱ्या फिलीप यांनी त्यांच्या नेव्हीतल्या कामाला पूर्णविराम लागण्याबद्दल त्यांच्या खास पद्धतीने एकदा म्हटलं होतं, "नेव्हीमधलं करियर सुरू न ठेवता येण्याची एक गोष्ट वगळता बाकी कशाचीच खंत वाटली नाही..."

फिलीप यांना ओळखणारे आणि या कामासाठीची त्यांची ओढ जाणणारे पहिले सी लॉर्ड (माजी) अॅडमिरल लॉर्ड वेस्ट सांगतात, "फिलीप यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं. पण नेव्हीतलं काम थांबवणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी हानी होती. मला हे माहिती आहे."

ज्या क्षणी प्रिन्सेस एलिझाबेथ राणी झाल्या, त्याचवेळी फिलीप यांच्या आयुष्यात आणखी एक विरोधाभास उभा राहिला. पुरुषप्रधान जगामध्ये त्यांचा जन्म आणि जडणघडण झाली होती. त्यांचं व्यक्तिमत्व कणखर होतं, शरीरयष्टी बळकट होती आणि पूर्णपणे पुरुष सहकारी असणाऱ्या व्यवसायात ते कार्यरत होते. त्यांना त्यांच्यातल्या पुरुषत्वाचा अभिमान होता.

फोटो स्रोत, PA Media

त्यांच्या पहिल्या मुलाचा - चार्ल्स यांचा जन्म झाल्यावर त्यांनी माईक पार्कर यांना सांगितलं होतं, "मुलगा होण्याने पुरुषत्व सिद्ध होतं." पण अक्षरशः एका रात्रीत त्यांचं जग बदललं आणि पत्नीला - महाराणी एलिझाबेथ यांना साथ देणं हेच पुढची 65 वर्षं त्यांचं आयुष्य होतं.

ते त्यांच्या पत्नीच्या मागे चालत. पत्नीसाठी त्यांना नोकरी सोडावी लागली. पत्नीच्या नंतर खोलीमध्ये प्रवेश केल्यास त्यांना माफी मागावी लागत असे. प्रिन्सेस एलिझाबेथ यांचा महाराणी म्हणून राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसून त्यांच्या हाताखाली हात ठेवून त्यांचा "liege man of life and limb" म्हणजे त्यांच्या आयुष्य आणि शरीराचा समर्थक होण्याची शपथ घ्यावी लागली.

त्यांची मुलं त्यांचं - माऊंटबॅटन हे नाव लावणार नव्हती. "मी जणूकाही एक अमिबा आहे," असे उद्गार त्यांनी काढले होते. पण याबद्दल काहीही करणं त्यांना शक्य नव्हतं. कारण एलिझाबेथ या महाराणी होत्या. आणि फिलीप त्यांचे पती होते.

फोटो स्रोत, PA Media

उलथापालथ करणाऱ्या या घटनांबद्दल प्रिन्स फिलीप फार कमी बोलत. महाराणींच्या राज्याभिषेकाच्या आधी ते म्हणाले होते, "घरामध्ये मी नैसर्गिकरित्या प्रमुखपदावर होतो. काय करायचं आहे हे विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येत. 1952मध्ये सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात बदलल्या."

हा बदल क्रूर होता, असं ते सांगत. सतत घुसमट होत असल्याचं त्यांना वाटत असे. त्या काळी आपला कुणीच मित्र किंवा मदतनीस नाही, अशी भावनाही त्यांच्या मनात निर्माण झाली होती.

एका लेखकाने त्यांच्याबद्दल लिहिलं, सुरुवातीच्या काळात पॅलेसमधील कर्मचाऱ्यांना वाटलं की हे स्वीकारणं त्यांच्यासाठी अवघड आहे. ते घमेंडखोर आहेत, उद्धट आहेत, असं म्हटलं जायचं. काही लोकांकडून त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जात असे. ते जर्मन आहेत, त्यांच्यात नाझी रक्त आहे, असं म्हटलं गेलं. त्यांनी जर्मनीच्या नाझी सैन्याला हरवण्यात मोठा भूमिका बजावूनही असं म्हटलं गेलं.

फोटो स्रोत, PA Media

त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न प्रिन्स फिलीप यांनी केला. परदेश दौऱ्यांमध्ये ते राणी एलिझाबेथ यांच्याबरोबर राहत.

त्यांना आनंद देणारे खेळ, औद्योगिक किंवा संशोधनात्मक चर्चा ते करत.

यासोबत त्यांनी काही काळ एकट्यानेही प्रवास केला. तसंच 1950 ते 1960 दरम्यान अनेक ब्रिटनच्या वसाहतींना निरोपही त्यांनी दिला.

घरी त्यांच्याकडे खूप काम होतं. तरूण, विज्ञान यांच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं.

क्रिकेट, स्क्वॅश, पोलो, पोहणं, घोडेस्वारी, समुद्रसफारी केली. त्यांनी विमान उडवणंही शिकून घेतलं. त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंदही यादरम्यान जोपासला.

पॅलेसमध्ये असतानाही ते शांत बसून राहत नसत. कुणी काय केलं, याचा शोध घेण्याचं काम ते करत. सँडरिंगहम येथील एका मिळकतीचं व्यवस्थापन केलं तसंच पुनर्विकासही करून घेतला.

आपण एका क्रिएटिव्ह मिशनवर आहोत, असं त्यांना वाटायचं असं लेखकाने लिहिलं आहे.

समकालीन ब्रिटिश समाजातील काही समस्यांकडे लक्ष देणारी गतिमान व्यवस्था म्हणून राजघराण्याला पुढे आणण्याचा त्यांचा विचार होता.

फोटो स्रोत, AFP

प्रिन्स फिलीप तरूण आणि दिसायला खूपच सुंदर होते. 'कॅमेरा फ्रेंडली'ही होते. त्यांनी अनेकवेळा सहजपणे कॅमेऱ्याच्या समोर विनोद करत स्मितहास्य करायचे.

बकिंगहॅम पॅलेसमधील पहिल्या मजल्यावर प्रिन्स फिलीप यांची अभ्यासखोली होती. इथं हजारो पुस्तकं ठेवलेली होती. तसंच संपूर्ण भागात रोपांनी सजावट करून बगिचा बनवण्यात आला होता.

ते इथं बसून विविध विषयांचा अभ्यास करायचे. लिहायचे. आपली भाषणं ते स्वतः टाईप करायचे. दरवर्षी ते सुमारे 60 ते 80 भाषणं देत असत. यामधून त्यांच्या ज्ञानाचं प्रतिबिंब सर्वांना मिळायचं.

आधुनिक विचारांचे असले तरी काही प्रमाणात ते जुन्या परंपरा मानत. विशेषतः शहराच्या यांत्रिकीकरणावर ते भाष्य करत.

चालत्या गाडीतून कचरा बाहेर टाकणाऱ्या लोकांवर ते टीका करायचे. या समस्येवर कायमचा उपाय कसा करावा, याबाबत ते चर्चा करत.

प्रिन्स फिलीप हे एक पर्यावरणवादी होते, असं म्हटल्यास काहींना आश्चर्य वाटेल. पण ते खरोखर एक पर्यावरणवादी होते.

निसर्गाचं विनाकारण केलं जाणारं शोषण आपण थांबवायला हवं, असं प्रिन्स फिलीप यांचं मत होतं.

1982 मध्ये त्यांनी तो मुद्दा पहिल्यांदा मांडला होता. औद्योगिक विकास करताना वातावरणात सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडबाबत त्यांनी चर्चा केली. ग्रीनहाऊस इफेक्टबाबत ते बोलत असत.

त्यांनी नेहमीच आपले पाय जमिनीवर ठेवले. 'मला ऐकावं, असं का कुणाला वाटेल?', असं ते सतत म्हणत.

मला राज्यशासनातील फारसा काही अनुभव नाही, असं ते एकदा म्हणाले होते. आपल्या भाषणादरम्यान प्रेक्षकांना हसवण्याचा ते प्रयत्न करत. 2017 मध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती स्वीकारली होती.

फोटो स्रोत, ANDREW MATTHEWS / PA

प्रिन्स फिलीप कधीकधी उद्धटपणे वागले असतील. कधीकधी त्यांनी आश्चर्यचकित केलं. पण त्यातला काही भाग हा असंयमीपणाचा होता. गोष्टी दुप्पट वेगाने मिळवण्याच्या इच्छेने हे घडलं. इतरांना जे वाटतं त्याकडे दुर्लक्ष करणे, शिवाय पद आणि स्वभावातून आलेला अविचारीपणा, याकडे वाईट वर्तणूक म्हणून पाहिलं गेलं.

मागे वळून पाहताना प्रिन्स फिलीप यांच्याबद्दल दोन विरोधाभास प्रकर्षाने जाणवतात.

पहिलं म्हणजे सार्वजनिक जीवनात कित्येक वर्षे नेतृत्व करणारा पण प्रत्यक्षात अत्यंत खासगी आयुष्य जगणारा एक व्यक्ती.

फोटो स्रोत, TIM GRAHAM / GETTY IMAGES

पालक, शाळा आणि देश यांच्या जंजाळात अडकलेला एक मुलगा ज्याने आपल्या सार्वजनिक जीवनात खासगी जीवनाकडे दुर्लक्ष करणं शिकून घेतलं. पॅलेसमध्ये गेल्यानंतर त्यांना एक जागतिक दृष्टिकोन मिळाला.

प्रिन्स फिलीप यांची आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकांना अनेकवेळा 'मला माहीत नाही,' तुम्हाला काय समस्या आहे?' अशी उत्तरं मिळाली होती.

त्यांनी चिरंजीव चार्ल्स यांच्याबद्दल बोलताना म्हटलं होतं, "ती एक रोमँटिक व्यक्ती आहे. पण मी व्यावहारिक विचार करणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मी कधीकधी भावनाहीन वाटू शकतो."

प्रिन्स फिलीप यांच्याबाबतचा दुसरा विरोधाभास म्हणजे त्यांच्या कुटुंबात अडचणी आल्या. त्यांच्या बहिणींसाठी ते अस्तित्वातच नव्हते. पण ते कुणासोबत मैत्रीही करू शकले नाहीत.

एका लेखकाने त्यांच्याबाबत लिहिलं, त्यांना मैत्री करण्याची परवानगीच नव्हती. ते अतिशय निष्ठूर जगात वावरत होते. शिवाय राजघराण्याचे काही निर्बंधही होते. बाहेरच्या लोकांना आत प्रवेश करण्याची परवानगी नसायची.

1970 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान जेम्स कॅलेघन यांनी म्हटल्याप्रमाणे रॉयल कुटुंब तुम्हाला मित्राप्रमाणे वागवतं, पण मित्र कधीच बनवत नाही.

रॉयल मरिन्स याठिकाणी प्रिन्स फिलीप 64 वर्षे कॅप्टन जनरल होते. त्याच ठिकाणी मेजर जनरल चार्ल्स स्टिकलँड सांगतात, ड्यूक यांच्यासोबत आम्ही नॉर्वेच्या एका मोहिमेवर होतो. त्यांनी सर्वांना हॅलो करून कमांडिंग ऑफिसर्ससोबत लंच करणं अपेक्षित होतं. याऐवजी त्यांनी एका छोट्याशा डब्यात जेवण घेतलं. एका स्टुलावर बसून किस्से सांगितले. आमच्या येथील सैनिकांशी गप्पा मारल्या आणि हेलिकॉप्टरने परत गेले.

तरुण पुरुषांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून हे उत्साहवर्धक होतं.

हे जुने फिलीप होते. कोणताही कार्यक्रम नाही. मानसन्मान बाजूला ठेवण्यात आला. एका मोठ्या ग्रुपसोबत अतिशय आपुलकीने चर्चा केली.

प्रिन्स फिलीप यांचा खासगीपणा, पद आणि इतर गोष्टींबाबत माहिती असणारे आता इथं नाहीत, त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी आवश्यक माहिती आपल्याकडे नाही. पण त्यांचा स्वभाव गुण आणि विरोधाभासांचं चित्रण करणं आव्हानात्मक आहे, असं कलाकार आणि आर्किटेक्ट सर ह्यूग कॅसन यांना वाटतं.

आयुष्यभर राणी एलिझाबेथ यांना आधार देण्यापुरतं आयुष्य मर्यादित होतं का, असा प्रश्न एकदा प्रिन्स फिलीप यांना विचारण्यात आला होता.

तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, "अॅबसोल्यूटली, अॅबसोल्यूटली."

प्रिन्स फिलीप यांनी स्वतःला नेता म्हणून कधीच मानलं नाही. त्यांच्यात ती क्षमता होती तरीसुद्धा. त्यांनी स्वतः मिळवलेल्या यशाला त्यांनी फारसं महत्त्वही दिलं नाही.

लंडन शहराच्या स्वातंत्र्याचा स्वीकार करताना 1948 मध्ये ते म्हणाले होते, "आपलं एकमेव वैशिष्ट्य."

आम्हाला जे करावयास सांगण्यात आलं होतं, ते आम्ही केलं. आम्ही आमच्या क्षमतेनुसार उत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत, यापुढेही तेच करत राहणार."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)