प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन, देण्यात येतेय तोफांची सलामी

प्रिन्स फिलीप, राणी एलिझाबेथ,
फोटो कॅप्शन,

प्रिन्स फिलीप

ब्रिटन, जिब्राल्टर आणि समुद्रामध्ये तैनात असणाऱ्या रॉयल नेव्हीच्या जहाजांवरून आज (शनिवार 10 एप्रिल) ड्यूक ऑफ एडिंबरांना सलामी देण्यात आली.

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं शुक्रवारी (9 एप्रिल) वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं.

रॉयल हॉर्स आर्टिलरीचा तळ असणाऱ्या वुलविच बराकींमध्येही तोफांची अशी सलामी देण्यात आली.

फोटो कॅप्शन,

काऊंटी डाऊनच्या हिल्सबरो कॅसलमधले जवान सलामी देताना

ही सलामी देण्यासाठी ब्रिटीश सैन्य पहिल्या महायुद्धाच्या काळातल्या क्यूएफ - 13 पाऊंडर फील्ड गन्सचा वापर करत आहे.

फोटो कॅप्शन,

पोर्ट्समथमध्ये HMS डायमंडमधून मानवंदना देण्यात आली.

लॉर्ड हाय अॅडमिरलचं पद भूषवणाऱ्या आणि दुसऱ्या महायुद्धात नौदलाचे अधिकारी म्हणून सहभागी झालेल्या ड्यूक ऑफ एडिंबरांना रॉयल नेव्हीच्या जहाजांनी समुद्रात मानवंदना दिली.

फोटो स्रोत, AFP

टॉवर ऑफ लंडनला ऑनरेबल आर्टिलरी कंपनीने प्रिन्स फिलीप यांना तोफांची सलामी दिली.

ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून (ब्रिटीश वेळेनुसार) लंडन, एडिंबरा, कार्डिफ आणि बेलफास्टमध्ये त्यांना 41 तोफांची सलामी दिली जाईल. या दरम्यान दर मिनिटाला एक राऊंड फायर केला जाईल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

टॉवर ऑफ लंडन येथे सलामी देताना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याचं टीव्ही इंटरनेटवर थेट प्रक्षेपण करण्यात येत असून लोकांनी घरीच थांबून हे प्रक्षेपण पहावं, असं आवाहन करण्यात आलं होतं.

ड्यूक ऑफ एडिंबरांच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्षाच्या स्मरणार्थ शुक्रवारी (9 एप्रिल) वेस्टमिनिस्टर अॅबेची घंटा संध्याकाळी 6 वाजल्यापासून 60-60 सेकंदांच्या अंतराने 99 वेळा वाजवण्यात आली.

ड्यूक ऑफ एडिंबरांच्या निधनाची घोषणा करणाऱ्या बकिंगहॅम पॅलेसकडून आलेल्या पत्रकात म्हटलं होतं, "अतीव दुःखाने हर मॅजेस्टी राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती हिज रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ एडिन्बरा यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत.""हिज रॉयल हायनेस आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये शांतपणे निवर्तले."

राणी एलिझाबेथ (द्वितीय) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातवंडं आणि दहा पतवंडं आहेत.

त्यांचे पहिले पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स यांचा 1948 मध्ये जन्म झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या भगिनी, द प्रिन्सेस रॉयल, प्रिन्सेस ॲन यांचा 1950 मध्ये, 1960 साली ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांचा आणि 1964 साली अर्ल ऑफ वेलेक्स प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

प्रिन्स फिलीप यांच्या निधनाच्या घोषणेनंतर बकिंगहॅम पॅलेसबाहेर जमलेले नागरिक

प्रिन्स फिलीप यांचा 10 जून 1921 रोजी कोर्फू या ग्रीक बेटावर जन्म झाला होता. त्यांचे वडील प्रिन्स अँड्र्यू ऑफ ग्रीस अँड डेन्मार्क हे राजे जॉर्ज (पहिले) ऑफ हेलेनेस यांचे कनिष्ठ पुत्र होते.

त्यांच्या आई प्रिन्सेस ॲलिस लॉर्ड माउंटबॅटन यांची मुलगी आणि राणी व्हिक्टोरिया यांची नात होत्या.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, प्रिन्स फिलीप हे असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान होतं.

फोटो स्रोत, Reuters

डाउनिंग स्ट्रीट इथून बोलताना बोरिस म्हणाले, राजघराण्याला योग्य वाटचाल करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाट होता. राष्ट्राचा समतोल आणि सुख जपण्यासाठी राजघराणं एक व्यवस्था म्हणून अग्रणी ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्ट्रेजन यांनी फिलीप यांच्या निधनाने अतीव दु:ख झाल्याचं सांगितलं. "राणी एलिझाबेथ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मी सांत्वनपर संदेश पाठवला आहे", असं त्यांनी सांगितलं.

मार्च महिन्यात, द ड्यूक ऑफ एडिंबरा यांना महिनाभराच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं.

सेंट बॉर्थोलेम्यू हॉस्पिटलात, त्यांच्यावर हृदयविकाराशी संबंधित उपचार करण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)